२९ जून २०६१ - काळरात्र - 1 Shubham Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९ जून २०६१ - काळरात्र - 1

या पुस्तिकेतील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण व नाट्य, चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

This declaration is as per the Copyright Act 1957 read with Sections 43 and 66 of the IT Act 2000. Copyright protection in India is available for any literary, dramatic, musical, sound recording, and artistic work. The Copyright Act 1957 provides for the registration of such works. Although an author’s copyright in a work is recognized even without registration. Infringement of copyright entitles the owner to remedies of injunction, damages, and accounts.

-----------

२९ जून २०६१, बुधवार.

सूर्य सिंह राशीत होता आणि त्याच्याभोवती फिरणारे सर्व ग्रह एकाच रेषेत आले होते. दर बारा वर्षांनी येतात तसे. थोडक्यात काय तर त्या दिवशी सिंहस्थ कुंभमेळा होता. अजून एक मोठी चमत्कारिक गोष्ट त्या दिवशी घडणार होती. हॅलेचा धूमकेतू त्या दिवशी पृथ्वीवरून जाणार होता. ‘कुंभमेळा’ आणि ‘धूमकेतू’ हे एकाच दिवशी आल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कारण भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याला (शाहीस्नानाला) खूप परमपवित्र आणि महत्वाचं मानलं गेलं आहे. याउलट धूमकेतू दिसणं म्हणजे अपशकुनी मानलं गेलं आहे. खगोलशास्त्रीय बाबींचा अभ्यास करणार्‍या व्यक्तींसमोर मोठा पेच पडला होता. कारण या घटनेचा नेमका परिणाम काय होईल हे कुणीच सांगू शकत नव्हतं. अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवली होती त्यामुळे ‘नशीब’ या शब्दाला आता जास्त किंमत येणार होती. म्हणजे आगामी दिवसांत घडणार्‍या घटनांना प्रयत्नांऐवजी नशिबाचा जोर लागणार होता आणि चांगलं किंवा वाईट यांवर नशिबाचा शिक्का मारून लोकं मोकळं होणार होते. “नशीब”, एक सरळ आणि सुटसुटीत कारण.....असो,

हंसीकाने भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे बघितलं. सात वाजले होते. तिने थोड्या नाराजीनेच फोन हातात घेतला आणि शौनकला कॉल लावला. त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. दहा मिनिटांनंतर तिने परत एकदा कॉल ट्राय केला. शौनकचा फोन अजून बंदच होता.

“अरे यार, कुठं अडकला हा...? निदान आजतरी वेळेवर निघायला हवं होतं याने.” असं म्हणून तिने हातातला फोन ठेवला आणि तयारी करण्यासाठी म्हणून उठली. तयारी करून झाली तेव्हा साडेसात झाले होते. तिने परत एकदा शौनकला कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि नाराजीने घड्याळाकडे बघितलं. “अरे हो, सक्षमला लावते. सोबतच असतात दोघं. इतका वेळ झालं माझ्या लक्षात कसं आलं नाही?” असं स्वतःशीच बोलत तिने सक्षमला कॉल लावला. त्याचासुद्धा फोन स्विच ऑफ येत होता. तिने परत एकदा आरशात बघितलं आणि हातातला फोन पर्समध्ये टाकला. वेळ बघितला तर आठ वाजण्यात आले होते. स्वतःशीच काहीतरी पुटपुटत तिने दरवाजा लॉक केला आणि निघाली. शेवटचं एकदा शौनक आला का? हे बघण्यासाठी तिने पार्किंगमध्ये शौनकची गाडी बघितली आणि नाराजीनेच गाडीत बसली. सिटबेल्ट लावून गाडी सुरू केली आणि मेन रोडला लागली तेव्हा भल्यामोठ्या ट्राफिकमध्ये अडकली. गाडी ट्राफिकमध्ये अडकलेली असताना तिचं लक्ष तिच्या उजव्या हाताकडे गेलं. तिच्या उजव्या करंगळीत प्लॅटिनमची रिंग होती. ती तिला शौनकने भेट म्हणून दिली होती. तिने बारकाईने त्या अंगठीकडे बघितलं आणि थोड्या विचारात पडली. मग काहीसा विचार करून तिने अंगठी काढली आणि डेस्कमध्ये ठेऊन दिली. तिच्या कुंडलीनुसार प्लॅटिनम हा तिच्यासाठी चांगला धातू नव्हता, पण शौनकच्या आग्रह आणि प्रेमाखातर ती प्लॅटिनम वापरत होती. त्यात आजचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार काहीसा कोड्यात टाकणारा असल्यामुळे कशाला उगाच रिस्क? असं म्हणून ती अंगठी काढून ठेवली होती. नाही म्हटलं तरी ‘अॅस्ट्रोलॉजी’ तिचं प्रोफेशन असल्यामुळे या गोष्टींवर विश्वास ठेवणं तिच्या बुद्धीला पटत होतं.

पुण्याचा रस्त्यांवर माणसांपेक्षा वहानांची जास्त गर्दी होती. चाकरमान्यांची घरी जायची घाई सुरू होती. सकाळी दिवस उजाडण्याआधी घरातून निघलेले ते मॉडर्न मजूर सूर्य बुडाला तरीही अजून घरी पोहोचले नव्हते. हे त्यांच्यासाठी रोजचेच होते. त्यामुळे आता सवय झाली होती. त्यांनासुद्धा आणि पुण्याचा रस्त्यांनासुद्धा...

हंसीका आणि शौनक हे गेल्या दोन वर्षांपासून लीव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. शौनक एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सीनियर मॅनेजर होता आणि हंसीका ही एक ‘न्यूमरोलॉजिस्ट’ आणि ‘अॅस्ट्रोलॉजिस्ट’ होती. तिच्या कोथरूडमधल्याच घरीच तिचं ऑफिस तयार होतं. त्याच घरात ते दोघं रहात होते. त्यांची दोघांची भेट त्याच घरात झाली होती. साधारणतः तीन वर्षांपूर्वी हंसीकाचा क्लायंट अनिकेत उर्फ आनि त्याच्या मित्रासोबत आला होता, हाच तो शौनक. बघताक्षणीच त्याला हंसीका आवडली होती. मग शौनकनेसुद्धा त्याच्या अडचणींबद्दल सांगितलं, हंसीकाने त्यावर काही उपाय सुचवले. शौनकने तसं करून बघितलं आणि त्याच्या अडचणी हळूहळू कमी झाल्या. आता त्या त्याच्या प्रयत्नांमुळे झाल्या की कशामुळे ते माहिती नाही पण त्याचा हंसीकावर खूप विश्वास बसला. मग तिला ‘थॅंक्स’ म्हणण्यासाठी तो भेटायला गेला. हळूहळू भेटी वाढत गेल्या, मग मैत्री झाली. त्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं तेच कळलं नाही. दोघांना अजून जास्त समजून घेण्यासाठी त्यांनी लीव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि मागील दोन वर्षांपासून ते सोबत राहत होते. दोघांत काही भांडण वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे अजूनतरी सर्व ठीकठाक होते.

मुंगीच्या वेगाने गाडी पुढे सरकत होती. शौनकशी न होणारा संपर्क आणि ट्राफिक यामुळे हंसीका जाम वैतागली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. तो शौनकचा फोन होता. एका क्षणासाठी तिला राग आला पण काहीतरी जेन्युयन कारण असेल म्हणून स्विच ऑफ असेल असा विचार करून तिने फोन उचलला आणि त्याने बोलायला सुरुवात करण्याचा आतच तिने सुरुवात केली,

“हॅलो, मी पोहोचेल पंधरा मिनिटांत. तू कुठे आहेस?”

“आम्ही निघालोय, पण केव्हा पोहोचू? ते नाही सांगू शकणार.” पलीकडून येणार्‍या आवाजवरून शौनक वैतागलेला वाटत होता.

“आता कुठे आहात तुम्ही?” हंसीकाने अतिशय शांत स्वरात विचारलं.

“आम्ही हिंजवाडी चौकाच्या जस्ट मागे आहोत आणि खूप ट्राफिक आहे. त्यामुळे आमच्यासाठी कुठे थांबू नकोस. तू पोहोच आम्ही आलोच तुझ्या मागे.” शौनकने सांगितलं.

“ठीक आहे. पण सारंग आणि रचनाचं काय?” हंसीकाने विचारलं.

“हॅलो..., हॅलो...,” शौनकला काहीच ऐकू येत नव्हते.

“हॅलो….,” स्पीकर लावण्यासाठी तिने फोन हातात घेतला तर काय... हंसीकाच्या हातातल्या फोनच्या स्क्रीनवर तडे पडले होते. स्क्रीन अक्षरशः फुटली होती. हातातून फोन दगडावर पडल्यावर जशी स्थिती होईल तशी त्या फोनची स्थिती झाली होती. हंसीकाला फार आश्चर्य वाटलं. तिने फोनच्या मागे हात लावून फोनचं तापमान बघितलं तर ते नॉर्मल होतं. पण स्क्रीन अचानक कशी फुटली? हा गहन प्रश्न होता.

“ओह शिट. अचानक काय झालं या फोनला?” झालेला प्रकार तिच्या लक्षात येत नव्हता. समोर बघितलं तर ट्राफिक कमी झाली होती. तिने फोन बाजूच्या सीटवर ठेवला आणि ड्रायव्हिंगवर लक्ष देऊ लागली. पण स्क्रीनला अचानक काय झालं हे तिला समजत नव्हतं. थोड्या थोड्या वेळाने ती बाजूच्या सीटवर ठेवलेल्या फोनकडे बघत होती. “आताच तर घेतला होता राव, महिनासुद्धा नाही झाला अजून....” हंसीका स्वतःशीच बोलत होती. फोन घेऊन फक्त एक महिना झाला असल्याने तो रिप्लेस होईल हे तिच्या लक्षात आले आणि तिला आनंद झाला. चेहर्‍यावर स्मितहास्य फुलले. थोड्याच वेळात ती सक्षम आणि आर्याच्या “मृगजळ” नावाच्या बंगल्याजवळ पोहोचली. बाहेर आधीच दोन कार पार्क केल्या होत्या. पैकी एक सक्षमची होती आणि दुसरी अनिची. मग नाइलाजाने तिने बाजूच्या बंगल्यासमोर कार पार्क केली. मनगटावरील घड्याळात नऊ वाजण्यात आले होते....

शौनक, हंसीका, सक्षम, आर्या, अनि, नीलिमा, सारंग आणि रचना हे आठ जणं वर्षभरातून दोन दिवस भेटून पार्टी वगैरे करायचे. एका वर्षातून दोन दिवस भेटणं हा त्यांचा कार्यक्रम कॉलेज सुटल्यापासून सुरू होता. शौनक, सक्षम, आनि, रचना आणि सारंग हे कॉलेजपासून सोबत होते. कॉलेजच्या अगदी पहिल्या सेमिस्टरपासून त्यांची मैत्री जुळली होती ती अगदी आज सात वर्षं झाली तरी तशीच टिकून होती, अगदी घनिष्ठ. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता आपल्या वाटा वेगळ्या झाल्या तरी आपण वर्षातून दोन दिवस तरी भेटायचं आणि मस्त धमाल करायची, पार्टी करायची आणि गत आठवणींना उजळा द्यायचा. मग त्यांचं गेट टू गेदर सुरूच राहिलं. त्यात पुढे सक्षमची बायको आर्या, आनिची गर्लफ्रेंड नीलिमा आणि शौनकची लीव्ह इन पार्टनर हंसीका अॅड झाले. अल्पावधीतच आर्या, नीलिमा आणि हंसीका सर्वांसोबत इतक्या मिक्स झाल्या की ते सर्वजण आधीपासूनच सोबत आहे असं कुणा नवख्याला वाटलं असतं.