२९ जून २०६१ - काळरात्र - 7 Shubham Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९ जून २०६१ - काळरात्र - 7

सर्वजण सुन्न होऊन हंसीकाचं बोलणं ऐकत होते. तिने सर्वांच्या चेहर्‍याकडे बघितलं. त्यांची अजून ऐकण्याची उत्सुकता चेहर्‍यावर खूप मोठ्या प्रमाणात दिसत होती. हंसीका म्हणाली, “मला माहिती असलेल्या पैकी हे शेवटचं, काकभुशुंडी यांनी अकरा वेळा रामायण आणि सोळा वेळा महाभारत वेगवेगळ्या काळात ऐकलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व रामायण आणि महाभारत कथांचा शेवट एकमेकांपेक्षा पुर्णपणे वेगळा होता.”

तिचं हे बोलणं ऐकताच आर्या आणि सारंग डोक्याला हात लावून बसले. कुणाला काहीच कळत नव्हतं. अनिने हंसीकाला विचारलं, “आता यावर काय उपाय? हे आपल्यासोबत का घडतंय? याची तुला काही कल्पना आहे का?”

हंसीका म्हणाली, “नाही. पण मी अंदाज लावू शकते. आज आपल्या आकाशगंगेतले सर्व ग्रह एका सरळ रेषेत आहेत आणि त्यात भर म्हणजे धूमकेतू गेला. त्यामुळे शक्यता आहे की अवकाशात असं काहीतरी झालं असेल ज्याने मी आता वर्णन केलेली ब्रह्मांड एकमेकांच्या जवळ आली असतील आणि त्यात जायचा मार्ग म्हणजे धूमकेतू असेल?”

तिचं हे बोलणं ऐकून मात्र सर्वजण एकदम चिंतेत पडले. तोच एकाएकी सारंग उठला आणि म्हणाला, “ते काहीही असो, मी बाहेर जातोय आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून परत येतो. तुम्ही इथंच थांबा.”

“नको सारंग, प्लीज.” रचना त्याला तिच्याकडे ओढत म्हणाली.

“चला निघूया.” सारंग रचनाचा हात त्याच्या हातातून सोडवत म्हणाला. तो कुणाचही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

“तू येणार असशील तर मी पण येते.” रचना त्याचा बाहू पकडत म्हणाली.

“एकदा विचार करा. काहीही होऊ शकतं.” हंसीकाने सूचना दिली.

शौनक उठून उभा राहिला आणि सारंगसोबत जाण्यासाठी तयार झाला. त्याला बघून हंसीका आणि रचनासुद्धा बाहेर निघण्याची तयारी करू लागल्या. या चौघांना असं बाहेर जाताना बघून आर्या म्हणाली, “प्लीज दोन पुरुष तरी थांबा घरात.”

सक्षमने हात वर करून तो घरातच थांबत असल्याची खून केली आणि अनिने तिला अंगठा दाखवून तोसुद्धा घरात थांबत असल्याचं सांगितलं.

“चार निळ्या ग्लोस्टिक्स आणि टॉर्च घ्या आणि जर कुणाशी कॉन्टॅक्ट झाला तर त्यांच्याकडे फोन मागा. माझ्या भावाची मदत घेणं आपल्या सर्वांना खूप गरजेचं आहे. काहीही झालं तरी त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. नाहीतर काहीही विचित्रपणा होऊ शकतो.” अनि पोटतिडकीने बोलत होता.

“हो, आम्हाला कुणी भेटलं तर नक्की आम्ही फोन मागू. तू चिंता करू नकोस.” शौनक अनिला म्हणाला.

“हॉकी स्टिक्स घेऊन जा.” आर्या म्हणाली.

“नको, काळजी करू नका. आम्ही फक्त पंधरा मिनिटांत येतो. तुम्ही सावध रहा,” असं म्हणत सारंगने दार उघडलं.

ते चौघं बाहेर आले. बाहेर खूप काळोख होता. रस्त्यावर कुणीही नव्हतं. अगदी चिटपाखरूसुद्धा नव्हतं. रात्रीचे बारा वाजले होते. बारा म्हणजे काही विशेष गोष्ट नव्हती. पण का? काय माहीत? विचित्र वातावरण होतं एकदम. सारंगच्या मागोमाग सर्वजणं चालू लागले. ते एका काळोखातून गेले आणि त्यांना समोरच एक बंगला दिसला, त्यावर नाव होतं, मृगजळ.....!!!

सारंग त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागला. तो बांगल्याजवळ जाताच त्याला खिडकीतून काही लोकं दिसले. तो जवळ जाणार इतक्यात त्याला शौनकने बजावले, “सारंग कुठे चाललास?”

“अरे बघितलं नाही का? मृगजळ. हे अनिचं घर आहे. आपण आता इथूनच तर बाहेर पडलो ना? मग हे घर परत इथं कसं काय? चल बघू काय ते,” सारंग गोंधळून म्हणाला.

“मूर्खपणा करू नको सारंग. मागे फिर हे अनिचं घर नाहीये.” असं म्हणत रचनाने त्याला बाहेर ओढलं. त्यांची कुजबूज सुरूच होती, तोच त्यांना दिसलं की, त्या घरातील एक व्यकी खिडकीजवळ येत आहे. ते तिथून मागे फिरले आणि परत त्या काळोखाच्या जागेवर आले.

तिथं ते थांबले असताना त्यांना रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला एक दृश्य दिसले आणि त्यांना आरशात बघत असल्याचा भास झाला. कारण त्यांच्यासमोर तेच उभे होते. शौनक, सारंग, रचना आणि हंसीका... शंभर टक्के जसेच्या तशे. काहीही फरक नव्हता. शिवाय ग्लोस्टिकच्या. त्यांच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तींच्या हातात लाल रंगाची ग्लोस्टिक होती. त्यांचे कपडे, रंग, ऊंची, दिसणं, केशभूषा, चेहर्‍यावरील हावभाव सर्व सर्वकाही अगदी सारखं होतं. काही सेकंद ते आठही जण स्वतःच्या दुसर्‍या रूपाला न्याहाळत होते आणि मग भानावर येताच एकमेकांना आपल्या समोर पाहून त्या आठही जणांची बोबडी वळली आणि ते ज्या दिशेने आले होते त्या दिशेने पळत सुटले. घरात पोहोचेपर्यंत त्यांनी मागे वळून बघितलं नाही की कुणी धाप लागतेय म्हणून थांबलं नाही. ते जिवाच्या आकांताने पळत होते आणि घर जवळ करत होते. धापा टाकत त्यांनी घर जवळ केलं. घरी आले तेव्हा कुणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता.

त्यांना असं घाबरलेलं बघून आर्याने त्यांना पाणी देण्यासाठी म्हणून बॉटल हातात घेतली. पाणी पिऊन झाल्यावर सर्वांनी त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.

“तुम्हाला वेड लागलंय,” आर्या म्हणाली.

“तर, तुम्ही तुमच्या समोर चार आकृत्या पहिल्या ज्या अगदी तुमच्यासारख्या होत्या.” सक्षम म्हणाला.

“हो, एक्सेप्ट ग्लोस्टिक्स. त्यांच्याकडे लाल होत्या आणि आमच्याकडे निळ्या. एवढाच काय तो फरक होता.” हातातल्या ग्लोस्टिक्स दाखवत शौनक म्हणाला.

“म्हणजे त्यांच्याकडील लाइट गेल्यावर त्यांनी लाल ग्लोस्टिक्सचा बॉक्स ओपन केला असेल.” हंसीका म्हणाली.

“तुम्ही त्यांच्याशी काही बोललात का? किंवा ते काही बोलले का तुमच्याशी?” आर्याने विचारलं.

“आम्ही इतके घाबरलेले होतो की कुणाशी काहीही न बोलता तिथून पळत सुटलो.” रचना दरवाज्याकडे बघत म्हणाली.

“तो एक अतिशय काळोख असलेला भाग होता. इतका की याच्या आधी असा काळोख बघितल्याचं मला आठवत नाही.” हंसीका म्हणाली.

“बरोबर आहे तुझं. सक्षम आणि मीसुद्धा जेव्हा पहिल्यांदा बाहेर गेलो होतो तेव्हा आम्हाला सुद्धा असाच अनुभव आला होता. भयंकर काळोख....” अनि हंसीकाकडे बघत म्हणाला.

“हे नक्की काय सुरू आहे? हे आपल्याला कळायला हवं. तुमच्याकडे काही पुस्तकं आहे का?” हंसीका खुर्चीवर बसत म्हणाली.

“कशाची? माझ्याकडे धार्मिक किंवा सायन्सची पुस्तकं नाहीतयेत. कादंबर्‍या वगैरे भरपूर आहेत. पण त्या आता काही उपयोगी ठरतील असं काही वाटत नाही.” सक्षम हॉलमध्ये असलेल्या बूकशेल्फ कडे बोट दाखवत म्हणाला.

“एक मिनिट... माझ्याकडे काहीतरी आहे. जे कदाचित आपली मदत करू शकतं. माझ्या भावाने त्याच्या भारतातल्या विद्यार्थ्यासाठी एक पुस्तक पाठवलं आहे. ते आता माझ्या गाडीत आहे.” अनि उत्साहात म्हणाला.

“ग्रेट, व्हेरी गुड. प्लीज लवकर आण काय आहे ते, काहीतरी मार्ग नक्की निघेल.” असं बोलताना हंसीकाच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती.

अनि गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर जायला निघतो. आर्या त्याच्यासोबत कुणालातरी जायला सांगते. पण झालेल्या प्रकारामुळे कुणीच तयार होत नाही तेव्हा शौनक हातात हॉकी स्टिक घेऊन जाण्यासाठी निघतो. हंसीका दरवाज्यावर काहीतरी बघते आणि जोरात किंचाळते, तेव्हा सारंग पळतच हॉकी स्टिक घेऊन दरवाज्याजवळ जातो आणि काचेतून बघतो. ते अनि आणि शौनक असतात. दरवाज्यावर शौनक आणि अनि आहेत असं बघितल्यावर हंसीका शांत होते आणि किंचाळल्याबद्दल माफी मागते.

अनिच्या हातात एक छोटासा बॉक्स असतो. अनि त्यातून एक पुस्तक बाहेर काढतो. त्याचं नाव असतं, ग्रॅव्हीटेशन : अॅन इंट्रोडक्शन टु करंट रिसर्च.

अनि त्या पुस्तकाची पानं चाळायला लागतो. त्यात त्याला एक कागद सापडतो. तो शांतपणे कागद वाचतो आणि खुर्चीवर काहीतरी विचार करत बसतो. त्याला असं बघून हंसीका त्याच्याजवळ जाते आणि विचारते, “अनि, काय झालं? काय आहे त्यात?”

तो खिन्नपणे म्हणतो, “हे जर खरं असलं तर मात्र आपण पुरते फसलो आहोत कायमचे.”

“पण काय आहे जरा साविस्तरपणे सांग अनि.” सक्षम वैतागून म्हणतो.