२९ जून २०६१ - काळरात्र - 11 Shubham Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९ जून २०६१ - काळरात्र - 11

“तुझं बोलणं तसंच आहे. अगदी तसंच. कॉलेजमधल्या दिवसांतल. काहीच बदल झाला नाही तुझ्यात.” रचना परत शौनकच्या जवळ जात म्हणाली.

“अच्छा, काय करणार आता?” शौनक निर्विकारपणे म्हणाला.

शौनक आणि रचनाचं हे बोलणं किचनच्या एका कोपर्‍यातून आर्या ऐकत होती. रचना शौनकला मिठी मारण्याचा प्रयत्न करणार तोच अचानक आर्या किचन मधून हॉलमध्ये जाण्यासाठी निघाली आणि तिला बघून शौनक म्हणाला, “रचना प्लीज, यू आर क्रॉसिंग यॉर लिमिट्स....”

रचना दूर झाली आणि किचनकडे जाण्यासाठी निघाली. आर्या हॉलमध्ये आली आणि हंसीका समोर बसली. तोपर्यंत आर्याने मैत्रिणीचं कर्तव्य म्हणून हंसीकाला शौनक आणि रचनाच्या गोष्टी सांगितल्या. रचना हॉलमध्ये आली आणि आर्याच्या बाजूला बसली. सर्वांचे फोटो जमा करत असल्याचं तिने बघितलं. हंसीकाच्या हातातल्या फोटो आणि कात्रीकडे तिचं लक्ष गेलं. तिला काहीतरी आठवलं आणि तिने तिच्या पर्समधून शौनकचा एक फोटो काढत हंसीकासमोर धरला आणि म्हणाली, “हा घे. कशाला कापतेस तो फोटो?”

“अगं, त्यात माझासुद्धा सेपरेट फोटो नाहीये.” असं म्हणत हंसीकाने तो फोटो कापून टाकला आणि रचनाकडे एकटक नजरेने बघू लागली. पण ही काही वादाची वेळ नाहीये हे दोघांना समजत होतं. त्यामुळे दोघं जणी त्या विषयावर काहीच बोलल्या नाहीत.

इकडे सारंगची बडबड चालू होती, “जर मी इथे हरतोय तर मी तिथेसुद्धा हरत असेल.” सर्वजण त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करत होते. पण तो एकटाच खरं बोलत होता.

शौनक अजून किचनमध्येच होता. त्याला रचनाशी केलेल्या बोलण्याची लाज वाटत होती. ती चक्क मिठी मारायला निघाली होती त्याला. आर्याने जर हंसीकाला संगितले तर आपली काही खैर नाही असं त्याला राहून राहून वाटत होतं. तो त्यामुळेच हंसीकासमोर यायला धजावत नव्हता. तो येत नाही असं बघून हंसीका उठली आणि किचनमध्ये गेली. किचनमध्ये असलेल्या फ्रीजमधून शौनक काहीतरी काढत होता. त्याला कुणाचीतरी चाहूल लागली आणि त्याने फ्रिजच्या दारावरून बघितलं. ती हंसीका होती. शौनक थोडा घाबरला, ही इथे का आली? असा विचार त्याच्या मनात आला. तो खोटंच हसून म्हणाला, “हे हंसीका, तू ब्रेड घेशील का?”

“थॅंक्स, मला नको ब्रेड. सर्वकाही ठीक आहे ना? की काहीतरी सुरू आहे? मला आर्याने भरपूर काही सांगितले.” हंसीका एका दमात बोलून गेली.

“या वेळी आर्याने सांगितलेल्या गोष्टींपेक्षा काही महत्वाच्या गोष्टी आहेत अजून. तू ज्या आर्याबद्दल बोलते आहेस, ती आपल्या विश्वातली नाहीये. हे तुलासुद्धा चांगलं माहितीये. त्यामुळे तिने सांगितलेलं खरं की खोटं यावर वाद घालण्याची माझी इच्छा नाहिये.” शौनकने थेट मुद्द्याला हात घातला.

“पण मला काहीतरी कुजबूज ऐकू......”

हंसीकाचं वाक्य पूर्ण होण्याआधी शौनक हॉलकडे जायला लागला आणि लाईट गेली. सर्वजण परत घाबरले. नाही म्हटलं तरी नक्की काय सुरू आहे हेच समजत नव्हतं. सर्वजण हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबल भोवती जमले आणि कॅन्डल्स लावू लागले. हळूहळू एकामागून एक सर्व कॅन्डल्स पेटवल्या गेल्या आणि सर्वांच्या चेहर्‍यावरील प्रकाश दिसेल इतपत उजेड निर्माण झाला. प्रत्येकाची निळ्या रंगाची ग्लोस्टिक सोबत होतीच. सर्वजण एकमेकांकडे निःशब्दपणे बघतच होते. इतक्यात काच फुटल्याचा आवाज आला. सर्वांच्या काळजात धस्स झाले.

“क... कोण आहे तिकडे?” शौनक घाबर्‍या आवाजात ओरडला.

“हा आवाज आपल्यापैकी कुणाच्यातरी गाडीचा काच फोडल्याचा आहे. चला बघूया.” सारंग शांतपणे हसत बोलला.

“नाही, बाहेर पडणं मुर्खपणाचं ठरेल.” हंसीका म्हणाली.

“मग आपल्या गाडया अशाच फोडू द्यायच्यात का?” आर्याने प्रश्न उपस्थित केला.

“बघा, तुम्ही येणार नसाल तर मी जातोय बाहेर.” सारंग खुर्चीवरून उठत म्हणाला.

“चला सर्वांनीच जाऊयात. प्रत्येकाने आपापली गाडी चेक करून घ्या. ग्लोस्टिक्स सोबत असू द्या फक्त. जवळ जवळ थांबूयात. काहीही होणार नाही.” शौनक धीर देत म्हणाला.

शौनकने हळूच दार उघडलं. सर्वजण हळूहळू त्याच्या मागोमाग जाऊ लागले. आर्याने तर हंसीकाच्या दंडाला घट्ट पकडून ठेवलं होतं.

“काय वाटतं? कुठून आला असेल तो?” सक्षमने सारंगला विचारलं.

“नाही, मला नाही माहिती. बावळटा सारखं काहीही विचारू नकोस. शांत रहा थोडावेळ.” सारंगने प्रत्युत्तर दिलं.

रस्त्यावरील स्ट्रीट लाईटच्या पिवळ्या प्रकाशात सर्वजण घोळक्याने चालले होते. निळ्या ग्लोस्टिक्स हातात असल्यामुळे त्यांचे चेहरे त्या निळ्या प्रकाशात अजून तणावात दिसत होते. आजूबाजूला नीरव शांतता होती. सर्वांच्या चालण्याचा आवाज मात्र येत होता. जवळच लावलेल्या अनिच्या गाडीजवळ सर्वजण आले. त्याच्या गाडीचा मागचा काच फुटला होता. नव्हे, तो कशाने तरी फोडण्यात आला होता.

“ओह माय गॉड. व्हॉट द फक? ही काच फोडलीये कुणीतरी... कुणी दिसतंय का ?” आर्या गाडीकडे बघत किंचाळली.

“नाही, कुणीच नाहीये. काल्म डाउन आर्या. एव्रिथिंग विल बी फाइन. सर्वांनी आपआपल्या गाड्या बघा प्लीज.” अनिने सूचना केली.

सर्वजण आपआपल्या गाड्यांकडे निघाले. हंसीकाची गाडी थोडी दूर होती. पर्समधून गाडीची चावी काढली आणि रिमोटने गाडी अनलॉक केली. गडद अंधारात गाडीचे मागचे लाइट्स चमकले आणि टिपिकल अनलॉकिंगचा आवाज झाला. तिने परत काळोख पास केला आणि तिच्या गाडीजवळ आली. गाडी चहूबाजूंनी न्याहाळली. तिच्या गाडीला काहीही झाले नव्हते. तिने सुटकेच्या निःश्वास सोडला आणि ड्रायव्हर सीट उघडलं. गाडीमधला लाइट सुरू झाला आणि तिने मघाशी डेस्कमध्ये ठेवलेली प्लॅटिनम रिंग काढली. तिला न्याहाळत असतानाच तिने गाडी लॉक केली आणि ती रिंग उजव्या अनामिकेत घातली. रिंग बघत असताना तिला शौनकची आठवण झाली आणि सोबत त्याने आज केलेल्या कृत्याचीसुद्धा. खरं तर तिला शौनकचा राग आला होता. पण आता परिस्थितीच अशी होती की कुणीच कुणालाच काहीही बोलू शकत नव्हते. नक्की काय सुरू आहे? हेच समजत नव्हतं. सर्वजण विचित्र वागत होते. ते एकमेकांच्या रियालीटीत मिक्स झाले होते. हंसीकाच्या मनात असे विचार सुरू असतानाच तिला तिच्यासमोर एक आकृती दिसली. तिने समोर बघितले, तो शौनक होता.

त्याने हंसीकाकडे बघत स्मितहास्य केले आणि म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे ना?”

“हो, ही बघ तू मला दिलेली रिंग.” असं म्हणत हंसीकाने त्याच्यासमोर तिचा हात नेला आणि रिंग दाखवली.

“मी दिलेली? केव्हा?” शौनक चकित होत म्हणाला.

हंसीकाला वाटलं तो तिची मजा घेतोय. त्यामुळे तिने दुर्लक्ष केलं आणि त्या रिंगच्या विषयाला तिलांजली दिली. तिने शौनकला मिठी मारली आणि म्हणाली, “तू ठीक आहेस ना? त्या रचनाबद्दलच्या गोष्टीने? मी विसरले. तू पण विसर.”

“कोणती गोष्ट?” शौनक हंसीकाच्या बाहूंना पकडत म्हणाला.

हंसीकाला परत वाटलं शौनक मजा घेतोय. ती गालातल्या गालात हसली आणि काहीच बोलली नाही. मग मिठीत असतानाच हंसीका म्हणाली, “तुला काय वाटतं? कुणी फोडली असेल अनिच्या गाडीची काच?”

“काय? काय म्हणतेस? अनिच्या गाडीची काच फुटली?” शौनकने आश्चर्यचकित होऊन विचारलं.

आता मात्र हंसीका घाबरली. तिला आधीपासून वाटत होतं की शौनक तिची मजा घेतोय कारण प्लॅटिनम रिंगची गोष्ट काढली की तो नेहमी म्हणायचा, “मी ही रिंग तुला दिलेली आहे. त्यामुळे तू तू दिलेली तू दिलेली असं नको म्हणत जाऊस.” तेव्हा रिंग बद्दल शौनक थोडावेळापूर्वी जे काही बोलला ते सहजच बोलला असं हंसीकाला वाटलं आणि रचनाची गोष्ट तीनेच त्याला विसरायला लावली होती. म्हणून तो विसरला असं दर्शविण्यासाठी त्याने कोणती गोष्ट? असं म्हटलं असं रचनाला वाटलं. पण हंसीकाने जेव्हा अनिच्या गाडीचा विषय काढला तेव्हा मात्र शौनकला त्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वजण आपआपल्या गाड्या बघण्यासाठी सोबत निघाले तेव्हा शौनकनेच दार उघडलं होतं. किंबहुना तोच सर्वांच्या पुढे होता. पण ही गोष्ट आता हंसीका समोर असणार्‍या शौनकला यत्किंचितही माहिती नव्हती.