Suvarnamati - 15 books and stories free download online pdf in Marathi

सुवर्णमती - 15

15

इकडे शेषनाग आणि राणीसरकारांना हे कसे पटवून द्यावे हे समजत नव्हते. तिने सूर्यनागाशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण मधेच बोलावणे आल्याने बोलणे होवू शकले नव्हते. आता तर तो फारसा मोकळाही भेटत नव्हता. नृत्याची तालीम करताना तर, दोघेही, त्यावेळी होणाऱ्या शारीरिक जवळीकीने इतके अस्वस्थ होत, की नंतर नजरेला नजरही देत नसत एकमेकांच्या.

शेवटी धीर एकवटून ती शेषनाग आणि राणीसरकारांशी बोलण्यास गेली. सूर्यनागास तिथे उपस्थित पाहून आधार आणि भीती दोन्हींनी मनात घर केलं. पण आता घाबरून चालणार नव्हते.

शेवटी तिने बोलण्यास सुरवात केली. "पिताजी, अत्यंत नाजूक आणि महत्वाच्या विषयावर आपणा दोघांसोबत बोलायचे आहे.” सूर्यनागाचे कान अर्थातच टवकारले.

“बोला बहुराणी, नि:शंक होऊन बोला.” राजाजींनी आश्वस्त केलं

“लहानपणापासून मला हेच बाळकडू मिळालंय की राजघराण्यातील व्यक्तींवर पहिला अधिकार राज्याचा असतो. राज्याच्या दृष्टीने जे हितकारक ते त्याचे कर्तव्य. आमचा विवाहही प्रामुख्याने राजहित नजरेसमोर ठेवूनच झाला." शेषनाग आणि राणीसरकार दोघेही चमकून तिच्याकडे पाहू लागले. पण ती पुढे बोलू लागली. “आता चंद्रनागांचा विवाहही राज्यास मजबूत बनवण्यासाठी योग्य व्यक्तीशी व्हावा असे आपल्या सर्वांनाच वाटते आहे. आज राज्यास सर्वात जास्त धोका परकीयांचा आहे. त्यांना मित्र बनवून आपण बरीच वर्ष तग धरली आहे. जिथे विरोध झाला तेथील जनता देशोधडीस लागली आहे. एक वेळ अशी येईलही की आपण त्यांचा सामना करू शकू, परंतु सध्या ती स्थिती नाही.

मग या मैत्रीस नातेसंबंधात जोडता आले तर? जेन आणि चंद्रनागांचा विवाहसंबंध जुळून आला तर? आपण संमती द्याल? परकीयांचा येथील सर्वेसर्वा लॉर्डच आहेत. त्यांची लेक आपली बहू झाली, तर पुढची कित्येक वर्षे आपल्या राज्यांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीच हिम्मत होणार नाही."

एवढे बोलून ती थांबली. राजाजींनी पत्नी आणि पुत्राकडे नजर टाकली. दोघेही सुवर्णमतीकडे आश्चर्याने पहात होते.

राजाजी म्हणाले, " बहू, एकतर संपूर्ण वेगळी संस्कृती, वेगवेगळी धर्मबंधने, हेही आपण नजरेआड केले तरी लॉर्ड कार्टन? त्यांचे काय? आणि चंद्रनाग आणि जेन?”

मग तिने जेन आणि चंद्रनागाविषयी त्यांना कल्पना दिली. लॉर्डला समजावण्यात आपण स्वतः प्रयत्नांची शर्थ करू असेही सांगितले. यात लॉर्ड दुखावण्याचा मोठा धोकाही ती जाणून आहे, परंतु जेन या विवाहास राजी असल्याने लॉर्ड दहा वेळा विचार करून रोष दर्शवतील असेही ती म्हणाली.

सूर्यनाग गूढ नजरेने पत्नीकडे एकटक पाहात राहिला. शेषनाग त्याच्या या नजरेकडे.

मेजवानीचा दिवस उगवला. एकेक पाहुणा येऊ लागला. खुद्द लॉर्ड कार्टन उपस्थित राहणार, हे समजल्यापासूनच सर्वांचा व्यवहार बदलला होता.

सुवर्णमतीने खास मोत्याच्या कशिद्याचे, मंद रंगाचे रेशमी वस्त्र परिधान केले. लांब केसांच्या, उंच अशा केशरचनेस मोत्यानेच सजवले. गळ्यात, हातात, नाजूक मोत्यांची आभूषणे चढवली. ती तिच्या दालनातून बाहेर आली तेव्हा चंद्रनाग, सूर्यनाग आपापल्या विलायती वेशभूषा परिधान करून तयार होते. जेन विलायती कपड्यांमधे परीसारखी दिसत होती. पण सुवर्णमती बाहेर येताच तिघांच्याही नजरा तिच्यावर खिळल्या. चंद्रनागाने आणि जेनने ताबडतोब आपली पसंती बोलून दाखवली. सुवर्णमतीने सूर्यनागाकडे पाहणेही टाळले. त्याची तिरस्काराने भरलेली नजर, तिला आत्ता याक्षणी, अतोनात वेदना देऊन गेली असती.

ती काहीच न बोलता निघाली तेव्हा जेनने तिला हातास धरून सूर्यनागाशेजारी उभे केले. तिचा हात सूर्यनागाच्या दुमडलेल्या बाहूवर ठेवून मग ती चंद्रनागाशेजारी जाऊन उभी राहिली. त्याने हात दुमडला आणि तिने त्यावर पंजा ठेवला आणि असे ते चौघे मेजवानीच्या भव्य दालनात प्रवेश करते झाले. मेजवानी उत्तम प्रकारे पार पडली. भोजनानंतरचा नृत्याचा कार्यक्रम तर बहारदार झाला. प्रथम सुवर्णमती आणि सूर्यनागाने एक नृत्य केले. शेषनागांच्या नजरेतून त्यांचे अवघडलेपण, सुवर्णमतीच्या चेहऱ्यावर मधूनच येणारे आर्त भाव, सूर्यनागाची मधूनच खिळणारी सुवर्णमतीवरील नजर, दोघेही टाळत असलेली एकमेकांची नजर, यातले काहीच सुटले नव्हते.

नृत्याचे प्रमुख आकर्षण, अर्थातच जेन आणि चंद्रनाग होते. सर्वांच्या नजरा त्या देखण्या जोडीवर खिळल्या होत्या. ही जोडी किती सुंदर नृत्य करते आहे असं सर्वचजण लॉर्डना सांगत होते.

मेजवानी संपली. तिच्या दृष्टीने जे काही करणे आवश्यक होते ते सुवर्णमतीने पार पाडले होते. त्या रात्री ती शांत, गाढ झोपी गेली. इतकी गाढ, की नंतर कितीतरी वेळ, सूर्यनाग तिला न्याहाळत उभा होता हे तिच्या गावीही नव्हते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED