२९ जून २०६१ - काळरात्र - 17 - अंतिम भाग Shubham Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९ जून २०६१ - काळरात्र - 17 - अंतिम भाग

उपसंहार

हा संसार अनंत आहे आणि प्रत्येक आणूत माझे अस्तित्व आहे, हे भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे. अनंत ब्रह्मांडात एकाच वेळी उत्पत्ति, स्थिति आणि लय करण्याचा माझा रोजचा दिनक्रम असतो. असं देखील भगवान विष्णुंनी म्हटलं आहे. त्याच धर्तीवर ही कहाणी... कुणाचाही काहीही दोष नसताना केवळ नशीब म्हणून नशीब न मानणार्‍या लोकांसोबत नशिबाने किंवा काळाने खेळलेला हा खेळ... या खेळाचा निकाल मात्र नियंत्याच्या हातात.

भाषण, लेख व नाटकादी साहित्यकृती यांच्या अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर म्हणजे उपसंहार. नीतिपर कथेचे तात्पर्यवजा सार, नाटकाच्या शेवटी येणारे भरतवाक्य व तत्सदृश भाषण अशा विविध प्रकारांत उपसंहार आढळतो. तर ह्या उपसंहारची गरज होती आणि आहे.

नमस्कार, आपण कादंबरीच्या शेवटच्या भागापर्यंत येऊन पोहोचलात. त्याबद्दल धन्यवाद..! कादंबरी वाचताना बर्‍याच वेळा अर्धवट सोडून जाण्याचा विचार मनात आला असेल, काय सुरू आहे? ते नक्की समजत नसेल, पण आपण शेवटपर्यन्त ही कंटाळवाणी वगैरे कादंबरी वाचली त्याबद्दल खरंच धन्यवाद...

तरीही बर्‍याच अनुत्तरित प्रश्नांनी डोक्यात काहूर माजले असेल. त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा “उपसंहार.”

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण एकाच विश्वात राहत असतो. पण ह्या आठ जणांच्या आयुष्यात असं काही अकल्पित घडलं की त्यांचं आयुष्य आणि विश्वचं बदलून गेलं. शब्दशः बदलून गेलं. त्यात कुणाचीही काहीही चुक नव्हती. मग असं झालं कशामुळे? हा गहन प्रश्न आहे. हे ग्रहस्थितीमुळे झाले असेल की धूमकेतूमुळे हे खरंच कोड्यात टाकणारं आहे. याचा दोष कुणाला द्यावा?

काय होणार आहे? याची सर्वांत जास्त माहिती असलेल्या हंसीकाच्या नशिबी असं जगणं यावं ही खरंच वाईट गोष्ट. बिचारी हंसीका ज्या विश्वात पोहोचली तिथे सर्वकाही सुरळीत होते. तिने तिथल्या मुळ हंसीकाला दोनदा मारण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने देवाचा नियम असा आहे की एका विश्वात तो एकच जण जीवंत राहू शकतो जो मुळ त्या विश्वातला आहे. त्यामुळे दुसर्‍या विश्वातल्या मुळ हंसीकाचे मारणे जवळपास अशक्य होते.

सर्वांत आधी सारंग आणि रचना ‘मृगजळ’मध्ये येतात तेव्हा सुमारे साडेदहा वाजलेले असतात. तेव्हा खरतर धूमकेतूच्या पृथ्वीवरून पास होण्याचे वेध लागलेले असतात. म्हणजेच डी-कोहेरन्सचे काम करणे बंद झालेले असते. सारंग आणि रचना “डार्क झोन” पास करून आलेले असतात. याचा अर्थ ते दुयर्‍या रियालीटी मधून आलेले असतात. म्हणूनच जेवताना रचना सक्षमला म्हणाली की तू जीममध्ये पडला होतास ना? कारण तिच्या विश्वात (रियालीटीत) सक्षम जीममध्ये पडलेला असतो आणि या रियालीटीमध्ये रचना टेनिस कोर्टवर पडलेली असते आणि त्या रियालीटीत ती कधी टेनिस कोर्टवर कधी गेलीच नसेल. सारंग आणि रचना हे दुसर्‍या रियालीटीमधून आलेले असल्याचे कुणालाच माहिती नव्हते कारण हंसीकाने धूमकेतू आणि त्याच्या परिणामांची गोष्ट कुणालाही संगीतलेली नसते.

नंतर सक्षम आणि अनि जेव्हा दुसर्‍या घरात (लाईट असलेल्या घरात) जातात तेव्हा त्यांना तिथे पडलेला बॉक्स दिसतो. ज्यात सर्वांचे फोटो आणि रुबिक्स क्युब असतो. खरंतर ते घर आपल्या रियालीटीपेक्षा भरपूर वेळाने पुढे असते. कारण असाच बॉक्स आणि युनिक इयडेंटिडी ठेवण्याचा प्रकार पुढे हे सर्व करतात हे आपल्याला कादंबरी वाचताना कळते. म्हणजे काही वेळाच्या अंतराने सर्वच गोष्टी सर्वच रियालीटीमध्ये सारख्याच घडत असतात.

थोड्या वेळाने अनि जेव्हा नोट लिहायला सुरुवात करतो तेव्हा तशीच नोट दूसर्‍या रियालीटीतला अनि दारावर चिकटवून जातो. हा अनि अजून एका वेगळ्या विश्वातला असतो.

काही वेळाने जेव्हा शौनक, हंसीका, सारंग आणि रचना जेव्हा ह्या प्रकरणाचा छडा लावायला म्हणून बाहेर पडतात तेव्हा ते “मृगजळ” नावाचं घर बघतात. तेव्हा खरं म्हणजे ते डार्क झोन पास करून आलेले असतात आणि ते दुसर्‍या रियालीटीतलं मृगजळ असतं. नंतर जेव्हा ते माघारी फिरतात तेव्हा त्यांच्यासमोर तेच चार जाणं उभे असतात. अपवाद फक्त लाल ग्लोस्टिक्सचा असतो आणि इथेच चूक होते. भयंकर मोठी चूक.

जेव्हा ते घरात येतात तेव्हा ते त्यांचे घर नसतेच मुळी. कारण हेच की ते दोनदा डार्क झोन मधून पास झालेले असतात. नशिबाने त्या घरातील शौनक, सारंग, हंसीका आणि रचना हेसुद्धा घडणार्‍या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बाहेर पडलेले असतात. त्यामुळे घरातल्या सर्वांना वाटते की घरात आलेले चौघं हे आपल्याच घरातले आहेत.

नंतर जेव्हा पुस्तकाचा विषय निघतो तेव्हा नक्की काय सुरू आहे हे सर्वांना समजते किंवा तशी कल्पना तरी येते. पण तो पर्यन्त सर्वजण एकमेकांच्या रियालीटीत मिक्स झालेले असतात आणि रचना व सारंग हे तर पहिल्यापासूनच दुयर्‍या रियालीटीतले असतात.

पुढे जेव्हा नीलिमा झोपलेली असते तेव्हा तिला उठवण्यात येतं कारण शक्यता असते की एखाद्या रियालीटीत अनि झोपलेला असेल. आणि इथे झोपलेल्या व्यक्तिला म्हणजे नीलिमाला उठवलं तर ज्या रियालीटीत अनि झोपला असेल त्या रियालीटीत अनिला उठवण्यात येईल आणि जेणेकरून तो सर्वांना झालेल्या प्रकाराबद्दल आणि पुस्तकाबद्दल सांगेल. थोडक्यात काय तर नक्की काय प्रकार सुरू आहे? हे सर्व रियालीटीतल्या लोकांना समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत होते.

नीलिमाच्या झोपण्याचं कारण म्हणजे तिने ‘केटमाइन’चे सेवन केलेले असते. त्यामुळे हंसीका असा निष्कर्ष काढते की आर्याने वाईनमध्ये केटमाइन टाकलेले असेल तर शक्यता आहे की सर्वजणांवर त्याचा परिणाम झालेला असेल आणि म्हणून सर्वजण असे विचित्र वागताहेत. पण आर्या सर्वांना सांगते की तिने नीलिमाला केटमाइन तिच्या सांगण्यानुसार दिले होते. त्यामुळे ती शक्यता सुद्धा नष्ट होते आणि सर्वांना कळून चुकते की घडणारा प्रकार हा खरा आहे. इथे किचनमध्ये असताना सर्वप्रथम हंसीकाच्या लक्षात येते की ती दुसर्‍या रियालीटीत पोहोचली आणि कारण असतं ते बोन्सायचं रोपटं आणि आर्या आणि नीलिमाची त्यावरील रिएक्शन.

हे सर्व घडत असताना तिकडे अनि आणि सक्षम पुस्तक आणि फोटो असलेला बॉक्स घेण्यासाठी घरात येतात. ते दुसर्‍या रियालीटीमधून आलेले असतात. त्यांचा येण्याचा उद्देश असतो की फोटो असलेला बॉक्स आणि पुस्तक हे काढून घेतले तर सर्वकाही सुरळीत होईल. त्यमुळे ते पटकन त्या वस्तु घेऊन निघतात.

त्यात सारंगचा दूसरा प्रयत्न असतो की घडणारा प्रकार कुणालाही कळू नये यासाठी अनिच्या भावाचं पुस्तक कुणाच्याही हातात पडू नये. म्हणजे जे काही सर्व सुरळीतपणे सुरू आहे ते तसेच सुरू राहील आणि कुणालाही काहीही कळणार नाही. त्यसाठी तो दुसर्‍या विश्वातल्या स्वतःला ब्लॅकमेल करण्यासाठी नोट लिहितो आणि कथेच्या शेवटी एक पत्र दाराखालून येतं, ते पत्र दुसर्‍या विश्वातल्या सारंगनेच सरकवलेलं असतं.

काही वेळाने जेव्हा गाडीची काच फुटल्याचा आवाज होतो तेव्हा सर्वजण बाहेर जातात. ती काच दुसर्‍या रियालीटीतल्या सारंगने फोडलेली असते. (कारण तो स्वतःसाठी बनवलेली नोट द्यायला गेलेला असतो.) तिथे हंसीकाला हिरवी ग्लोस्टिक असलेला शौनक भेटतो आणि ती नंतर घाबरून ज्या घरात जाते तेव्हा ती परत एकदा दुयर्‍या रियालीटीतल्या घरात जाऊन पोहोचते. तिथे परत फोटो जमवून काहीतरी युनिक इडेंटिडी बनविण्याची तयारी सुरू होते.

तिथल्या घरात अनि आणि सक्षम नसतात. ते दुसर्‍या घरात (लाईट असणार्‍या) गेलेले असतात. म्हणजे ती रियालीटी हंसीका असलेल्या रियालीटीपेक्षा बराच वेळ मागे असते.

परत एकदा मोठा गोंधळ उडतो. परत सर्वजण फोटोसाठी बॉक्स तयार करतात. नंतर सारंगसाठीची नोट सारंगला मिळते आणि सारंगची भांडेफोड होते. मग मारामारी सुरू होते आणि हंसीका तो सर्व प्रकार खिन्न मनाने बघत असते. घरातून निघताना तिला दारावर चिकटवलेली नोट आढळते. तीच नोट... म्हणजे सर्वदूर न समजण्याइतका प्रचंड गोंधळ माजलेला असतो. हंसीका ते घर सोडते आणि पुढील कथा सर्वश्रुत आहे…..

धन्यवाद...!!!