विश्वास Supriya Joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विश्वास



ह्या महिन्यात मितालीची किटी असल्याने आम्ही सगळेजण तिच्याकडे जमणार होतो. तिने साऊथइंडियन थिम ठेवली होती. आम्ही सगळ्याजणी अश्या तयार झालो होतो कि साऊथइंडियनच दिसत होतो. मितालीने घरपण छान सजवले होते. गेल्यागेल्या सगळ्याजणी एकमेकांचे कौतुक करत होत्या. त्यात प्रत्येकीने कुठून कसे सामान विकत आणले किंवा कोणाकडून घेतले, कोणाची कुठल्या प्रकारची साडी आहे, कोणी डोळ्यात जास्त काजळ घातले आहे, कोणाचा गजरा कुठल्या फुलांचा आहे ह्या सगळ्याबद्दल खाता खाता चर्चा सुरु होती. गप्पांची मैफील एकदम रंगात आली होती. नेहमीप्रमाणे एकदम कोणीतरी रजनीचा विषय काढलाच.सगळ्याजणी तिच्याविषयी वाईटच बोलत होत्या. मी आत्ताच इथे राहायला आल्यामुळे कोणाबद्दल फारशी माहिती नव्हती आणि दुसर्यांबद्दल मागे वाईट बोललेले मला आवडत नसल्यामुळे मी सगळ्यांचे बोलणे गुपचूप ऐकत होते. तिच्याबद्दल बोलत असताना मध्येच दुसरा विषय सुरू झाला आणि मी "हुश्श" करून गप्पांमध्ये सामील झाले. नंतर आम्ही दोन-तीन खेळपण खेळलो. मी एका खेळात जिंकल्यामुळे मला छोटेसे बक्षीस मिळणार होते त्यामुळे आणखीनच खुश झाले. आजची साऊथइंडियन वेशभूषेत श्रीनिधीला सगळ्यात जास्त मतं मिळाल्याने अगोदर तिचा सत्कार करून तिला ताज घालण्यात आला (ह्या किटीमध्ये एक ताज आणून ठेवला आहे. दर महिन्याला जिच्याकडे किटी असते ती एक थिम देते, त्याप्रमाणे सगळे आवरून जातात. सगळ्याजणी जमल्यावर सुरुवातीला थोडेसे खाऊन, पिऊन झाले कि सगळ्यामिळून त्या थिमप्रमाणे कोण सगळ्यात जास्त आवरून आले आहे तिला जिची किटी आहे ती फुलांचा बुके देऊन तो ताज घालते, ती तो ताज घरी घेऊन जाऊन दुसऱ्या महिन्यात घेऊन येते व त्या महिन्यात जी जिंकते तिच्याकडे तो ताज जातो. असा वर्षभर तो ताज सगळीकडे फिरत असतो). नंतर अजून दोन-तीन खेळ खेळून त्या विजेत्यांनापण छोटे छोटे काहीतरी गिफ्ट दिले जाते. खूप मज्जा येते. अश्याप्रकारे भरपूर गप्पा आणि पोटभर जेवण झाल्यावर थोड्यावेळाने एकेक करून सगळ्या निघून गेल्यावर मी व मितालीच घरी राहिलो होतो. राहून राहून दर वेळेला रजनीबद्दल ऐकत असल्यामुळे मला तिच्याबद्दल जाणून घ्यायची जी उत्सुकता होती ती मी मितालीला विचारून पूर्ण करायची ठरवले. बोलता बोलता सहज म्हणून मी तिला विचारले,"सगळे रजनीबद्दल वाईटच का बोलतात आणि तिच्याशी खूप कमीजण बोलतात तेपण जुजबी." तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून धक्काच बसला.

इथे आल्यानंतर रजनी आकांक्षाच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. सुरुवातीला दोघींचे खूप छान पटायचे. आकांक्षाच्या घरी रोज नॉनव्हेज बनायचे मग ती तो केलेला पदार्थ वाटीभरून रोज रजनीला द्यायची. पण रजनीकडे फक्त वीकएंडला वेगवेगळे पदार्थ बनायचे त्यामुळे ती वीकेंडला जे केलेले असेल ते आकांक्षाला घरी काही करायला लागू नये म्हणून सगळ्यांना पुरेल एवढे द्यायची. तिथूनच ठिणगी पडायला सुरुवात झाली. सगळ्या येणाऱ्याजणार्यांना आकांक्षा सांगायची की मी हिला रोज काहीतरी पदार्थ देते, ही मात्र काहीच देत नाही. कोणीतरी हे रजनीला सांगितले, तिला खूप वाईट वाटले. वीकएंडला दोन्हीही दिवस ती जेकाही करायची ते अगदी मोठा बाउल भरून द्यायची इतके कि त्यांना स्वयंपाक पण करावा लागत नसे. म्हणजे आठवडाभर आकांक्षा जेकाही द्यायची ते ती दोन दिवसात भरपूर देऊन समसमान करायची शिवाय दोघींमध्ये खूप चांगली मैत्री असल्याने आकांक्षा हिच्याबद्दल असे काही बोलेल ह्याची रजनीला कल्पनापण नव्हती.
हळूहळू दोघींमधली तेढ वाढत जाऊन बोलणेपण बंद झाले. आकांक्षाचे घर तिसऱ्या मजल्यावर तर रजनीचे तळमजल्यावर. मग सगळ्या मैत्रिणी आकांक्षाकडे जायचे असलेतरीही अगोदर रजनीकडे hi hello करायला तिच्याकडे थोडावेळ थांबायच्या, आकांक्षाला भयंकर संताप यायचा, सगळ्यांना सांगायची तिच्याकडे जाऊ नका. पण बाकीच्या तिचे का ऐकतील ना!
रजनीच्या नवऱ्याची पार्टनरशीप फर्म होती. तो पार्टनर नेहमी घरी यायचा. नवरा टूरला गेला असला तरीही यायचा. मग काय आकांक्षाने सगळीकडे हे सांगायला सुरुवात केली की रजनीचे त्या पार्टनरसोबत संबंध आहेत! रजनीच्या नवऱ्यालापण विचारले की हा तू घरी नसतानापण सारखासारखा घरी का येतो? तेव्हा त्याने सांगितले की आमची सगळी कागदपत्र घरीच असतात आणि रजनी बऱ्याचदा accounting entries करते त्यामुळे खूपदा घरी यावे लागते. एवढे सांगूनही तिचे समाधान झाले नाही. तिने gossiping करणे काही सोडले नाही. रजनीला जितके बदनाम करता येईल तेवढे केले आणि एखादी गोष्ट पटवून देणे हीतर तिची खासियत!! त्यामुळे खुपजणांनी आकांक्षावर विश्वास ठेवला.
त्यातून रजनीच्या नवऱ्याचा स्वभावपण थोडा विचित्रच. स्वतःचाच मोठेपणा करायचा, दुसर्यांना टोमणे मारायचे, आपलेच खरे करायचे, ह्या स्वभावामुळे आणि बिचाऱ्या रजनीवर लावलेल्या खोट्या आरोपांमुळे बऱ्याचश्या लोकांनी त्यांच्याशी संबंध कमी केले.
खरेच सांगते तिच्या नवऱ्याच्या स्वभावाचा आम्हालापण त्रास झाला आहे. पण तरीही मी खात्रीने सांगू शकते की ते असे काही करूच शकत नाही....

तशीच बैचैन मनाने घरी आले. तरीही तिचा विचार काहीकेल्या मनातून जात नव्हता. खूप वाईट वाटत होते तिचे. आणि सारखा हा प्रश्न पडतोय माणसे अशी का करतात? का अशी वागतात? त्यांना काय करायचे दुसऱ्यांच्या जीवनाशी? का लुडबुड करायची? आणि दुसऱ्यांचे नाव असे का खराब करायचे? आणि लोकांना एवढे कळत नाही का एवढा विश्वास ठेवायचा दुसऱ्यांच्या सांगण्यावर?

सुप्रिया कुलकर्णी