पहिला विमान प्रवास Supriya Joshi द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

पहिला विमान प्रवास

आनंदना घाना मध्ये जॉब ऑफर आली तेव्हा आम्ही ती स्वीकारावी की नाही ह्याच विचारात होतो. पण नंतर विचारविनीमय करून असे ठरवले की हे दोन वर्षासाठी एकटेच जातील आणि मी दोन मुलींना घेऊन इथेच राहीन म्हणजे मग मला जॉबपण सोडायला लागला नसता. पण आपण जे ठरवतो तसेच नेहमी घडते असे होत नाही.

कॉन्ट्रॅक्ट साइन करताना तुमच्या बायकोला पण घेऊन या म्हणून डायरेक्टरने आम्हाला कळवले. माझ्याशी काय बोलायचे असेल हे न कळून आम्ही तसेच संभ्रमाअवस्थेत ऑफिसमध्ये पोहचलो. डायरेक्टर साहेबांचे वय साधारण ६०-६५ च्या दरम्यान असेल. गृहस्थ खूप चांगले वाटले. आम्ही गेल्यावर त्यांनी माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या, माझी सगळी माहिती विचारली आणि माझ्याशी बोलायला सुरुवात केली. मला म्हणाले,"तुझ्याशी बोलून खूप छान वाटले मला! खूप चांगला जॉब आहे तुझा, हा जॉब सोडून जायला तुला नको होत असेल ना!" मला काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते. पण त्यांनी माझ्या मनातले ओळखले आणि म्हणाले, "मला माहीत आहे, इतका चांगला जॉब, पगार सोडून मुलींना घेऊन कुठे आफ्रिकेत जंगलात जाऊन राहणार त्यापेक्षा इथेच राहिलेले बरे असे तुला वाटत असेल ना!” पण त्यांनी मला असे समजावून सांगितले की मला माझ्या बाबांची आठवण झाली.

त्यांनी सांगितले,"आमच्यावेळी बायका नवरा जिथे जायचा त्याच्या मागे जायच्या. मला अगदी मान्य आहे की आजकाल मुली ह्या स्वतंत्र झाल्या आहेत आणि त्यांनी व्हायला पण पाहिजे. बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती आणि कणखरपणा असतो, त्या एकट्या असल्या तरी सगळे निभावून नेऊ शकतात पण पुरुष जरी दाखवत असले तरीही ते खूप दिवस एकटे नाही राहू शकत. बाहेरच्या देशात सगळे ओपन असल्यामुळे त्यांचा कधीही पाय घसरू शकतो आणि मला कुठलेही कुटुंब उध्वस्त करायचे नाहीये. त्यामुळे माझ्या कंपनीमध्ये मी सुरुवातीपासून एक पॉलिसी ठेवली आहे, मी कोणालाही कधीही फॅमिलीशिवाय घेत नाही. हं! अगदी लग्न झाले नसेल तर गोष्ट वेगळी! मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे तर मी सांगतो म्हणून तू जाऊन बघ एकदा तिकडे. नक्कीच आवडेल तुला”. अश्याप्रकारे त्यांनी मला खूप छान समजावून सांगितले आणि विचार करायला १० मिनिटं दिली.

मग काय! लग्नात बांधलेली गाठ अशी न सोडता आदर्श बायको बनून त्यांच्याबरोबर घानाला जायचा निर्णय घेतला आणि ह्यांनी कॉन्ट्रॅक्टवर सही केली.

हे मेमध्ये अगोदर जाऊन तिकडे घर, सामान घेऊन घर सेट केल्यावर आम्ही तिघी सप्टेंबरमध्ये तिकडे जायचे असे ठरले. त्यावेळी त्यांच्या बॉसने हेपण सांगितले की तुला २ लहान मुलींबरोबर एकटीला नाही पाठवणार, इकडून कोणी कुटुंब जाणारे असेल तर त्यांच्याबरोबरच पाठवू.

आर्या झाली आणि माझा महेंद्र मध्ये जॉब पक्का झाला म्हणून मग आम्ही माझ्या कंपनीजवळ एक फ्लॅट मिळत होता तो विकत घेतला. रहायला पण नव्हतो गेलो अजून आणि हा जॉब मिळाला. जान्हवी पावणेपाच आणि आर्या साडेपाच महिन्याची असताना आम्ही हा निर्णय घेतला. हे गेल्यानंतर मी बहिण संगिताच्या जवळ आणि तिथे शेजारी खूप चांगले होते म्हणून आईच्या घरी राहायला आले (आई भावाकडे US ला गेली होती). दोन्ही लहान मुलींना घेऊन एकटीने सगळे सांभाळून नोकरी करणे शक्य नसल्याने लगेच राजीनामा दिला होता. ह्या दरम्यान जान्हवी इतकी लहान असूनही बरीचशी कामे स्वतःहून समजून करत होती. बिल्डिंगच्या बाहेरच भाजीवाल्या, किराणा दुकान सगळे होते. बाईसाहेबांना खायची आणि करायची दोन्हीची आवड! त्यामुळे रोज सकाळी आम्ही आज काय खायला करायचे हे ठरवायचो आणि ही मस्त पिशवी व पैसे घेऊन रोजच्या रोज भाजी, किराणा आणायची. संगिता रोज सकाळी चक्कर मारून काय हवे असेल ते आणून द्यायची पण तरीही अजून काही लागणार असेलतर जान्हवी लगेच जाऊन घेऊन यायची. एकदा ५ वर्षाची जान्हवी भाजी आणायला गेली होती आणि तिथून एक मुलगा असा विचित्र नजरेने तिच्याकडे बघत तिथेच उभा राहिला. त्याच्याकडे तिचे लक्ष गेले तेव्हा तो तिच्याकडे बघून हसला आणि हिला खूप भीती वाटली. आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच २-३ जण भाजी विकायला बसायचे, तिथल्या एका काकूंकडे जाऊन तिने भाजी विकत घेतली आणि त्यांना तिने 'मला खूप भीती वाटतीये' असे सांगितले. त्या काकू तिला गेटपर्यंत सोडायला आल्या. थोड्यावेळाने संगिता तिथून गाडीवर येत असताना त्यांनी तिला थांबवून निक्षून सांगितले, "तुम्ही इतक्या लहान मुलीला भाजी आणायला कसे पाठवता? आज ती कित्ती घाबरली होती, थोडीतरी काळजी घेत जा की!" खूप चिडली ती हे ऐकून आणि घरी येऊन ती मला,"मी रोज घरी येते, काय आणायचे आहे का विचारते, मग तू जान्हवीला भाजी, किराणा आणायला का पाठवतेस?" मला समजेचना आज हिला काय झाले? मी तिला म्हणाले,"अग जान्हवीलाच भाजी, किराणा आणायला आवडते. कालतर आम्ही खव्याचा एक नवीन पदार्थ करायचा ठरवला होता म्हणून मी तिला सांगितले की तू आर्याजवळ बस, मी जाऊन खवा घेऊन येते. तर म्हणाली की तू घरी थांब तिच्याजवळ, मी जाऊन घेऊन येते असे म्हणून थोड्या लांब असलेल्या दुकानात जाऊन तिने खवा विकत आणला. काय झाले?" माझे ऐकून ती थोडी शांत झाली आणि तिने तिचे भाजीवाल्या बाईंबरोबर झालेले बोलणे मला सांगितले. ते ऐकून मीपण खूप गोंधळून जान्हवीला बोलावले आणि काय झाले म्हणून विचारले. तेव्हा तिने सगळा किस्सा सांगून सगळे कळाल्यावर तू मला परत बाहेर पाठवणार नाहीस म्हणून मी तुला काहीच सांगितले नाही म्हणून सांगितले. त्यावेळी काय बोलावे ते सुचलेच नाही पण नंतर तिच्याशी बोलता बोलता आणि अनेक गोष्टींमधून मी तिला समजावून सांगितले आणि त्यानंतर आजतागायत तिने माझ्यापासून कधीही कुठलीही गोष्ट लपवून ठेवली नाहीये!

ह्या तीन महिन्यांत खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावे लागले पण संगिता आणि तिचे पूर्ण कुटुंब ह्यांचा खूप आधार होता मला त्यामुळे सगळे तरून गेले.

आम्ही निघायच्या अगोदर आई परत आली. लहान मुलींना घेऊन जायचे आणि तिथे काही मिळेल की नाही माहीत नाही म्हणून जितके सामान घेऊन जाऊ शकतो ते घेऊन जायचे असे ठरले. आणि ट्रॅव्हल एजन्ट (ज्याने आमचे तिकीट बुक केले होते) त्यांना किती किलोची एक सुटकेस allow आहे म्हणून विचारले तर त्यांनी सांगितले असे काही नाहीये , तुम्ही पाहिजे तेवढे सामान एका बॅगेत भरू शकता. आम्हाला खूप आश्चर्य वाटत होते कारण अमेरिकेत तुम्ही ३२ किलोची एक अश्या २ सुटकेस घेऊन जाऊ शकता आणि इथे ह्या एजन्ट ने सांगितले की कितीही किलोच्या प्रत्येकी २ सुटकेस नेऊ शकता. ज्या फॅमिलीबरोबर जाणार होतो त्यांनापण फोन करून किती किलोची एक सुटकेस घेऊन जाऊ शकतो आणि त्यांच्या सुटकेसमध्ये जर जागा असेल तर ते आमचे किती किलो वजन घेऊन जाऊ शकतात? हे विचारले. तर त्यांनी पण वजनाचे टेन्शन घेऊ नका तुम्ही, हेच सांगितले आणि साधारण ६-७ किलो वजन आम्ही घेऊ शकतो म्हणून सांगितले. तेवढ्याच कमी सुटकेस न्यायला लागतील म्हणून आम्ही एक सुटकेस ५० किलोची भरली व त्यातलेच सामान काढून त्यांच्या बॅगेत द्यायचे हेपण ठरवले आणि बाकीच्या सुटकेसमध्ये ३२ किलोच भरले. सगळे पॅकिंग करून झाले. भरपूर सामान घेऊन जात होतो आणि आईने पण खूप सारे सामान आणले होते.

अखेरीस जायचा दिवस उजाडला. पहिल्यांदाच विमान प्रवास आणि २ लहान मुलींना घेऊन जायचे असल्याने टेन्शन आले होते. पण त्यातल्या त्यात हे समाधान होते की दोनीही मुली खूप शांत आणि ह्यांच्याच कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या एका महाराष्ट्रीयन फॅमिलीबरोबर आम्ही जाणार असल्याने थोडा ताण कमी जाणवत होता. सगळे सोडायला येणार म्हणून एकच मोठी गाडीच ठरवली होती. वेळेवर एअरपोर्ट वर पोहचून त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितले की आम्ही १० मिनिटात पोहचत आहोत, तुम्ही चेकइन काउंटर वर जाऊन आमची वाट बघा. आर्याला कांगारू बॅगमध्ये ठेवून मी व जान्हवी ट्रॉली घेऊन निघालो. सगळे बाहेर उभेच होते. खुप धडधड होत होती. भल्यामोठ्या असलेल्या रांगेत जाऊन आम्ही उभे राहिलो, थोड्याच वेळात ती फॅमिली आली. मी त्यांना माझे सामान घ्याल का विचारले तर त्यांना ऐकूच आले नाही, दोनदा विचारून मग जे होईल ते बघता येईल हा विचार करून शांत बसले. आमचा नंबर आला आणि आर्याने रडायला सुरुवात केली. अगोदरच टेन्शन आले होते त्यात आर्या रडत होती तशीच काउंटरवर गेले तर ५० किलो ची सुटकेस बघून त्यांनी सांगितले की ३२ kg च्या वर सुटकेस घेत नाही. मग काय तिकडूनच एक सुटकेस विकत घेतली आणि सामान ह्यातून त्यात घातले. परत रांगेत जाऊन उभे राहिलो, आमचा नंबर आला आणि आर्याने रडायला सुरुवात केली. सगळ्या सुटकेसचे वजन बरोबर होते. तिथे मला एक माणूस मदत करायला म्हणून आला आणि त्याने हॅन्डबॅग पण चेकइन काउंटर वर ठेवले त्यामुळे बरोबर ते ८ kg जास्त भरले. आर्या रडत होती त्यामुळे माझ्या हे लक्षातच आले नाही. काउंटरवरची मुलगी आणि मला मदत करायला म्हणून आलेला तिचा हस्तक ह्यांनी मला सांगितले की वजन जास्त भरल्यामुळे Rs.१०,०००/- एक्सट्रा भरावे लागतील. आमच्याबरोबर जे होते त्यांनी काहीच मदत केली नाही की लक्षपण दिले नाही पण तरीही मी त्यांना काय करू म्हणून विचारल्यावर सांगितले की मी देईन पैसे आणि नंतर आनंदकडून घेईन. मग काय मी पैसे दिले आणि तिने मला कच्ची रिसीट दिली म्हणजे दोघांनी मिळून ते पैसे खाल्ले पण आर्या इतकी रडत होती की मला काय करावे ते कळतच नव्हते. एवढीशी ५ वर्षाची जान्हवी मात्र एकदम अगदी शहाण्यासारखी वागत होती. मला सगळी मदत करत होती, एवढे पैसे भरून त्या शहाण्याने आमची हॅन्डबॅग काउंटर वरून काढून परत मला दिली. मी त्याला सांगितले पण ही बॅगतर मी चेकइन केली आहे तर म्हणाला सोडा हो मॅडम तुम्हाला जास्त वजन नेऊ दिले ते बघा.

वेडी झाले होते मी. एरवी कायम तलवार घेऊन तयार असणारी मी काही बोलले नाही. तिकडून निघालो आणि आर्या एकदम शांत. माझ्याकडे आर्या, पर्स आणि ८ kg ची ट्रॉली बॅग होती , जान्हवीने तिच्या खांद्यावर ७ kg वजनाची सॅक घेतली होती. एवढ्याश्या मुलीला ती खूप जड होती पण तरीही तिने एक अक्षर तोंडातून न काढता तशीच घेतली होती.

आम्ही सगळ्यांना भेटून आत गेलो. एकतर सगळ्यांना सोडून जात असल्यामुळे खूप रडू येत होते आणि वर टेन्शनपण वाढले होते. आत जिथे बोर्डिंग पास व पासपोर्ट चेक करतात तिथे गेलो तर परत आर्याबाईंनी रडायला सुरुवात केली. पण इथे मात्र त्याचा फायदा झाला, त्या बाईंनी जास्त काही चेक न करता लगेच आम्हाला आत पाठवले. आमचे विमान खूप दूर लागणार होते त्यामुळे खूप चालावे लागले. जान्हवी आणि मी दोघीही दमलो होतो. AC असुनपण घाम फुटला होता. रूममध्ये जाऊन बसल्यावर लगेच जान्हवीची सॅक खांद्यावरून काढली तर पोरगी एकदम कळवळली. आर्याला कांगारू बॅग मधून बाहेर काढले, तर बाईसाहेब एकदम खुश झाल्या. पहाटे ४ वाजले होते. आम्ही ज्यांच्याबरोबर जात होतो त्यांचा मुलगा जान्हवीएवढाच! त्याला त्याच्या बाबांनी झोप आली म्हणून कडेवर घेतले होते पण जान्हवी माझ्याबरोबर इतका वेळ जागी होती आणि एकदाही झोप आली, पाय दुखतात वगैरे कुठलीही तक्रार केली नाही, खूप कौतुक वाटत होते मला तिचे. खरेच ५ वर्षाची माझी लेक आहेच खूप समजूतदार.

परत विमानात जाताना, मी आर्याला कांगारू बॅगेत घालत होते तर ‘नाही नाही’ म्हणून भोंगा काढला पण लवकर चालायला शिकल्यामुळे तिथे तुरुतुरु पळायला सुरुवात केली तर एवढे सामान घेऊन तिला पकडणे शक्य झाले नसते आणि मला सगळे घेऊन तिला कडेवर घेणेपण शक्य नव्हते, तिला ओरडून तसेच बॅगेत घालून,सॅक जान्हवीच्या खांद्यावर व मी ट्रॉली आणि पर्स घेऊन निघालो. पुढची सीट मिळाली होती. आणि आर्यासाठी पाळणा. फ्लाईट मध्ये एअर होस्टेसने सुद्धा काहीही मदत केली नाही. बॅग्स वर ठेवताना मी तिला मदत मागितली तर आम्ही नाही करू शकत म्हणाली. मग जान्हवी आर्याला घेऊन बसली आणि मी कशीतरी बॅग वर ठेवली आणि जागेवर बसले. आम्ही दोघी शारीरिक पेक्षा मानसिक दृष्ट्या खूप दमलो होतो.

फ्लाईट ने टेक ऑफ केल्यावर मी आर्याला त्या पाळण्यात ठेवले. जान्हवी, आर्या दोघीही शांतपणे झोपल्या. मला वॉशरूमला जायचे होते म्हणून एअरहोस्टेसला सांगितले तर तिने सरळ सरळ नकार दिला. शेवटी नाईलाजाने जान्हवीला उठवले व जाऊन आले. प्रवास थांबून आमचे विमान केनियाला लँड झाले परत आम्ही एवढे जड सामान घेऊन खाली उतरलो.

परत तिकडून घानाला जायच्या विमानाकडे प्रस्थान केले. तिथेतर आमच्या विमानाकडे जाण्यासाठी खूप मोठा जिना उतरून जायचा होता आणि जान्हवीचे खांदे थोडे सुजले होते. त्यामुळे मागे सॅक, खांद्यावर पर्स, कांगारू बॅगेत आर्या आणि हातात सुटकेस असा सगळा सरंजाम घेऊन आम्ही तिघी चालत होतो. मला सगळे सांभाळताच येत नव्हते. अर्धा जिना उतरल्यावर इतकी दमले की तिथे २ मिनिटं खालीच बसले. मग जान्हवीने हातातली सुटकेस घेतली पण तिलापण खूप त्रास होत होता मग थोडावेळ ती, थोडावेळ मी अशी सुटकेस घेऊन आम्ही कसातरी जिने उतरलो आणि परत विमानात चढायला म्हणून दुसरा जिना चढायला सुरुवात केली. अशक्य इतक्या उंच पायऱ्या होत्या.

दरवाज्यात आले आणि माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागले. ह्यावेळी नशीब चांगले होते, एअरहोस्टेस खूप चांगली होती, तिने माझ्या खांद्यावरची सॅक घेतली, सुटकेस घेतली आणि आम्हाला सीट दाखवून बॅग्सपण वर ठेवल्या. इतका मानसिक त्रास होत होता की कुठून आपण घानाला चाललो आहोत असे राहून राहून वाटत होते. पण पुढचा प्रवास छान झाला. एकदाचे विमान लँड झाले, एअरहोस्टेसने येऊन माझी बॅग व सॅक खाली आणून दिली. मी तिचे खूपवेळा आभार आणि अजूनही प्रार्थना करते की देव तिचे सगळे चांगले करो!

आता परत मोठ्या सुटकेस काढणे, ट्रॉलीमध्ये ठेवणे हे करावे लागणार ह्या विचारानेच नको झाले पण तिथे कामाला असणारे एक गृहस्थ मला बघून स्वतःहून माझ्याकडे आले आणि मला एक ट्रॉली दिली. मला २ मिनिटं कळतच नव्हते की त्यांच्याकडून मदत घायची की नाही पण त्यांनी सांगितलं की तुझ्या नवऱ्याने मला तुझी मदत करायला सांगितले आहे. मग मी बिनधास्त झाले. ट्रॉलीमध्ये वर आर्याला बसवून त्यावर त्याने आमच्या हॅन्डबॅग्स ठेवल्या आणि त्यांनी आमच्या मेन सुटकेसची ट्रॉली घेऊन आम्ही बाहेर आलो. ह्यांना बघितले आणि माझ्या सहनशक्तीचा बांध सुटला पण ह्यांचा मित्र पण आम्हाला घ्यायला आला होता. त्याची ओळख करून दिल्यामुळे मी आलेलं रडू दाबून ठेवले. जान्हवीने बाबांना घट्ट मिठी मारली, आर्यापण लगेच ह्यांच्याकडे गेली. आणि मी पर्स सुद्धा हातात न घेता हात हलवत चालत कार मध्ये बसले.

सुप्रिया