रोमांचक प्रवास - महाबळेश्वर Supriya Joshi द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

रोमांचक प्रवास - महाबळेश्वर

लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रत्येक वर्षी आम्ही कुठेतरी फिरायला जायचो. जान्हवी २ वर्षाची असताना आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला गेलो होतो.

आमची जान्हवी आणि आज्जीची मनाली तशी एकदम शांत आणि शहाणी. तिचा जन्म होताना मला अगदी ५ मिनिटच त्रास झाला आणि आमच्या गोड परीने जन्म घेतला! मला मुलगीच हवी होती आणि नवऱ्याला काहीही चालणार होते. शिवाय कुठलाही त्रास न होता बाळंतपण झाल्यामुळेतर आमच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जन्म झाल्यानंतरसुद्धा तिने कधीही त्रास दिला नाही.

आम्ही तिघे महाबळेश्वरला गेलो. खूप खुश होतो आम्ही! सकाळी लवकर निघाल्याने महाबळेश्वरला लवकर पोहचलो. हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन पोटभर जेवून तृप्ततेचा ढेकर देऊन खरेतर एक ताणून द्यायचा बेत होता पण आमच्या मनालीला बाहेर फिरायला जायचे होते! "इथे मज्जा करायला आलो आहे मग का झोपायचे?",असा प्रश्न विचारल्यावर तिची समजूत घालायचे थांबवून आम्ही दोघे गुपचूप तयार झालो आणि बाहेर हिंडायला बाहेर पडलो. पण एकदा बाहेर पडल्यावर फ्रेश वाटले.

वेण्णा लेकला गेलो, तिथे मस्त बोट रायडींग करून नंतर तिला घोड्यावर बसवले. सुरुवातीला खूप घाबरली, थोडेसे डोळ्यातून पाणीपण आले. तरीही मी तिला उतरवून खाली घेणार नाही हे लक्षात आल्यावर गाल फुगवून घोड्यावर बसून राहिली पण थोड्यावेळाने तिला एकदम छान वाटले. राऊंड संपल्यावर खाली उतरायला पण नाही म्हणाली आणि अजून एक फेरी करून आली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हा दोघांना आपली झोप मोडली म्हणून जी नाराजी आली होती ती एका झटक्यात दूर होऊन एकदम ताजेतवाने झालो.

तिथून एकदोन पॉईंट्स बघून आम्ही सनसेट बघायला गेलो. सीझन नसल्यामुळे अगदी तुरळक गर्दी होती. आम्ही पोहचलो तेव्हा अजून सनसेट व्हायचा होता म्हणून तिथे एकेठिकाणी बसलो होतो. आमच्याजवळ अजून एक आज्जीआजोबा बसले होते, ते जान्हवीकडे बघत होते तर आमची मनाली तिरक्या नजरेने त्यांच्याकडे बघायची आणि ते बघून हसले कि परत लाजायची. त्यांनी तिला जवळ बोलावले पण विचारल्याशिवाय कोणाकडेही जायचे नाही आणि काही घायचे नाही ही सक्त ताकत असल्याने तिने आमच्याकडून पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच त्यांच्याकडे गेली. आज्जीआजोबांना लहान मुलं खूप आवडत असावीत कारण ते तिच्याबरोबर तिथे पळापळी पण खेळले. बोलता बोलता हेपण कळाले की आम्ही एकाच हॉटेल मध्ये उतरलो आहोत. मग काय! आम्ही सगळेच एकदम खुश झालो आणि सूर्यास्त बघून एकत्रच हॉटेलवर गेलो.

हॉटेलवर येऊन फ्रेश होऊन १५ मिनिटांनी बाहेर गार्डन मध्ये भेटायचे ठरले. ह्यावेळेस मात्र जान्हवीने त्यांच्याबरोबर त्यांच्या रूममध्ये न जाता आमच्याबरोबर येणाच्या निर्णयाने का माहित नाही पण मला थोडेसे हुश्श झाले! आम्ही १५ मिनिटांनी तिथे गेलो तर आज्जीआजोबा आमची वाटच बघत होते. ते दोघेजण जान्हवीबरोबर खेळायला लागले. आम्ही दोघेजण तिथेच बसून गप्पा मारत होतो.

खेळताखेळता तिघेजण आमच्यापासून दूर गेले. आज्जीआजोबा दोघेही चांगले असल्याने ते जान्हवीकडे नीट लक्ष देतील म्हणून आम्ही एकदम निर्धास्त होतो. आम्ही दोघेजण तिथेच गप्पा मारण्यात गुंगून गेलो होतो. साधारण ५-१० मिनिटांनी मी सहज इकडेतिकडे बघितले तर हे तिघेही कुठेच दिसत नव्हते. ह्यांना सांगितल्यावर म्हणाले,"असतील इथेच कुठेतरी, हॉटेल सोडूनतर जाणार नाहीत ना, उगाचच काळजी करतेस!" अजून ५ मिनिट शांत बसल्यावर मात्र माझा जीव खालीवर होऊ लागला. हे वैतागून उठले आणि आम्ही तिघांना शोधत निघालो पण ते कुठेच दिसेनात. हॉटेलमध्ये जाऊन स्टाफला विचारल्यावर त्यांनीपण ‘आम्ही त्यांना कुठेच बघितले नाही म्हणून सांगितले’. आता मात्र काळजीने जीव घाबराघुबरा झाला होता. तिथे आम्हाला शोधायला मदत करण्याऐवजी दोघातिघांनी आम्हालाच नावे ठेवायला सुरुवात केली. '२ तासाच्या ओळखीवर असे स्वतःच्या मुलीला कोणी एकटे सोडते का? दोघांनाच इतका वेळ घालवायचा होता तर कशाला लेकीला घेऊन आलात? सोडायचे होते शेजाऱ्यांकडे आणि यायचे होते'. एकतर जान्हवी कुठे आहे ते कळत नसल्यामुळे जीव जातो की काय असे वाटत असताना लोकांनी आम्हालाच नावे ठेवायला सुरुवात केल्यामुळे तर आणखीनच टेंशन आले. मॅनेजरने तिथे असलेल्या सगळ्या स्टाफला कामाला लावले आणि तो आमच्याबरोबर गेटवर आला, तिथे असलेल्या रखवालदाराला त्यांनी कोणा आजीआजोबांना लहान मुलीबरोबर बाहेर जाताना बघितले का म्हणून विचारले? तर त्याने सांगितले की,“ आत्ताच ड्युटी चेंज झाली आणि मी कामावर आलो आहे त्यामुळे मला काही कल्पना नाही”. आता मात्र वेगवेगळे विचार मनात यायला लागले. पोलिसांकडे जाऊयात म्हणून मी मागे लागले. पण हॉटेल खूप मोठे असल्याने अजून थोडे शोधून मग ठरवूयात असे ह्यांचे व मॅनेजरचे बोलणे झाल्यावर आम्ही परत रिसेप्शनवर आलो. सगळा स्टाफ पूर्ण हॉटेल शोधून आला होता पण हे तिघे कुठेच नव्हते. आम्ही सगळे सुन्न झालो होतो.

आता पोलिसांना फोन करावा म्हणून मॅनेजरने फोन उचलला तोपर्यंत मी त्या तिघांना एका स्टाफ बरोबर रिसेप्शनकडे चालत येताना बघितले. काही न सुचून मी धावत त्यांच्याकडे पोहचले आणि त्या आज्जींच्या हातातून जान्हवीचा हात ओढून घेऊन जवळ घेण्याऐवजी तिला २ धपाटे घातले आणि "कळत नाही का? कितीवेळा सांगितले आहे की असे कोणाबरोबर आम्हाला न सांगता जायचे नाही. तिथेच खेळायच्या ऐवजी त्यांच्याबरोबर कश्याला लांब जायचे", असे म्हणून एवढ्याश्या २ वर्षाच्या मुलीला अजून ४ धपाटे घातले. हे सगळे काय चालले हे न कळल्यामुळे जान्हवीने मोठ्याने भोकाड पसरले. जसे काही ते दोघे माझ्यापासून जान्हवीला ओढून घेऊन जातील असे वाटून मी जान्हवीला तिचा हात घट्ट पकडून माझ्या मागे घेतले, हेपण खूप घाबरले होते. त्यांनी आज्जीआजोबांना वाटेल तसे बोलायला सुरुवात केली. ते दोघेपण खूपच घाबरले होते. त्यांच्याबरोबर आलेला स्टाफ आम्हा दोघांशी बोलायचा प्रयत्नपण करत होता पण आम्ही दोघे कोणाचेच ऐकणाच्या मनःस्थितित नव्हतो त्यामुळे त्याला शांत बसायला सांगून आम्ही आरडाओरडा करत पूर्ण हॉटेल डोक्यावर घेतले होते. आज्जीआजोबा खाली मान घालून उभे होते. ज्या स्टाफने त्या तिघांना आणले होते तो आम्ही काही ऐकत नाही म्हंटल्यावर मॅनेजरशी बोलून त्याला सगळा वृत्तांत सांगितला.

आम्ही थोडे शांत झाल्यावर हे मॅनेजरकडे पुढे काय करायचे हे विचारत त्याच्याकडे वळले. मॅनेजरने आम्हाला व आज्जीआजोबांना तिथे एका सोफ्यावर बसवले. आमच्याशेजारी त्या आज्जीआजोबांना बसवल्यावर आम्ही तिथून उठून उभे राहिलो तेव्हा त्याने आम्हाला दुसऱ्या सोफ्यावर बसवले. आज्जीआजोबा खाली मान घालून एकही शब्द न बोलता शांत बसून होते. मॅनेजरने आम्हाला पाणी देऊन चहापण दिला. आम्ही काहीही घ्यायला नकार दिल्यानंतर त्याने आम्हाला माझे थोडेसे ऐकून घ्या म्हणून सांगितले आणि "संजय सांग सगळे", म्हणून त्या स्टाफला सांगितल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली,"आज्जीआजोबा ह्या बाळाबरोबर खेळत असताना तिथे बागेत बाळासमोर अचानक मोठा साप आला.

खरेतर आमच्याकडे अजिबात साप किंवा असले प्राणी नाहीयेत पण कुठून कसा हा साप बागेत आला माहित नाही आणि आज्जींनी हे बघितल्यावर बाळाला एकदम मागे ओढणार तेवढ्यात त्या सापाने एकदम आज्जींच्याच पायावर दंश केला आणि तिकडून सरपटत निघून गेला. ह्याबाळाने घाबरून जोरात रडायला सुरुवात केली आणि आजोबापण एकदम घाबरून गेले. मी तिकडून जात असताना हे सगळे बघितले आणि पळत त्यांच्याकडे गेलो तोपर्यंत सापाने आज्जींना दंश केला होता. मी लगेच आज्जींना उचलून दवाखान्यात घेऊन जाऊ लागलो पण बाळाला एकटे कसे सोडणार म्हणून आजोबांनी हिला कडेवर घेतले व सगळेजण दवाखान्यात गेलो. नशिबाने साप विषारी नसल्याने आज्जींना प्रथोमपचार करून लगेच सोडले आणि आम्ही लगेच इथे यायला निघालो. तिकडून निघताना आज्जीआजोबांना त्यांच्यापेक्षा तुमचीच काळजी जास्त होती, तुम्ही किती घाबरला असाल म्हणून दवाखान्यात थोडावेळसुद्धा न थांबता आम्ही लगेच हॉटेलवर आलो!

हे सगळे ऐकून आम्ही सुन्न झालो होतो. काय बोलावे कळत नव्हते. मी जान्हवीला घट्ट धरून मिठी मारली, बिचारी आमची मनाली रडूनरडून शांत होऊन उसासे देत होती. पण मन सैरभैर झाल्याने तिच्यावर काय गुजरत असेल ह्याकडे लक्षच दिले नव्हते. आज्जीआजोबा उठून आमच्याशेजारी येऊन बसले. लाजेने आम्ही अर्धेमेले होऊन खाली मान घालून बसलो. आजोबांनी ह्यांच्या आणि आज्जींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मात्र माझा बांध सुटला आणि मी आज्जींच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. त्या माझं रडून होईपर्यंत पाठीवर थोपटत राहिल्या. रडू थांबल्यानंतरमात्र मी आणि ह्यांनी एकत्रच त्यांच्या पायावर डोके ठेवले, त्यांनी लगेच आम्हाला खांद्याला धरून उभे केले आणि जवळ घेतले. आम्ही दोघे त्यांची वारंवार माफी मागत होतो पण ते आमच्यावर जरासुद्धा चिडले नव्हते. थोड्यावेळाने आजोबा म्हणाले,"आम्हाला पूर्ण कल्पना आहे तुम्हा दोघांवर काय बेतले असेल! आपले मुलं नुकत्याच ओळख झालेल्या माणसांबरोबर अचानक गायब झाल्यावर त्या आईबाबांवर काय परिस्थिती उद्भवली असेल ह्याची पूर्ण कल्पना आम्हा दोघांना आहे. तुम्ही जे वागलात ते समर्थनीय आहे. दवाखान्यातून परत येताना तुमच्या दोघांचाच चेहरा समोर येत होता आणि आम्हाला हे सगळे खरेच अपेक्षित होते. आमचा तुम्हावर जरासुद्धा राग नाहीये". हे ऐकल्यानंतर मात्र आम्हाला जे अपराधी वाटत होते ते थोडेसे कमी झाले. हळूहळू सगळी परिस्थिती नॉर्मल झाली. आज्जीआजोबांनी काही झालेच नसल्यासारखे एकदम व्यवस्थित बोलायला सुरुवात केली. सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले आणि तिथल्या मॅनेजरने आम्हाला स्पेशल ट्रीट देऊन तिथेच सगळे आणून दिले. आम्ही सगळ्यांनी आनंदाने हसतखेळत आमचे जेवण आटोपले आणि चक्कर मारायला बाहेर पडलो. जान्हवी आमच्यापेक्षा अगोदर नॉर्मल झाली होती आणि ती लगेच आज्जीला जाऊन चिकटली. खरेच तेव्हा 'लहानपण देगा देवा' ही म्हण आठवली. लहान मुले मनात काही न ठेवता किती लवकर आहे ती परिस्थिती स्वीकारतात ना! त्यावेळी मीपण असेच वागायचा प्रयत्न करणार हे ठरवले (अर्थात मी हे लगेच विसरून पण गेले).

दुसऱ्यादिवशी सकाळी आम्ही नाश्त्यासाठी परत एकत्र भेटलो. बाहेर फिरायला जाणार होतो पण आज्जींना दगदग नको म्हणून त्या दोघांनी "तुम्ही तिघे बाहेर फिरून या" असे वारंवार सांगूनही आम्ही त्यांच्याबरोबर थांबलो. जान्हवीसुद्धा आज्जीआजोबांना सोडून यायला तयार नव्हती. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय बघायलाच हॉटेलमधून बाहेर पडायचे व आज हॉटेलमध्येच थांबून कायकाय करता येईल ह्याचा विचार करून आम्ही सगळ्यात अगोदर स्विमिंग करायचे ठरवले. हे, आजोबा आणि जान्हवी तिघे पोहणार, मी आणि आज्जी तिथेच बसून पत्ते खेळणार असे ठरले. ते तिघेजण कपडे बदलून आत जायचे म्हणून पूलच्या अगदी कडेवर उभे राहून आम्ही गप्पा मारत होतो, बहुतेक काहीतरी विनोद झाला होता कारण आम्ही खूप जोरात हसत होतो आणि आमचे ऐकून जान्हवीपण सगळे समजल्यासारखे जोरात हसायला लागली. आम्हाला तिचे हसणे बघून अजून जोरात हसू येत होते. सगळे जोरजोरात हसत असताना आमच्या बाईसाहेब थोड्याश्या मागे झाल्या आणि ....

एकदम पाण्यात धपकन पडल्यामुळे पाणी जोरदार वर उडाले आणि ती एकदम खाली गेली. आम्हाला दोघांना काहीही न सुचून आमचा जागेवर पुतळा झाला होता. तोपर्यंत आजोबांनी उडी मारून जान्हवीला बाहेर काढले आणि आमच्या पिलाला वाचवले. जान्हवीने मात्र डोळे वर केले होते आणि श्वासपण घेत नव्हती, आमची सगळ्यांची जाम तंतरली होती पण ती लगेच शुद्धीवर आली आणि आम्हाला हुश्श झाले!

तिसरा प्रसंग काही ओढवू नये म्हणून आम्ही खबरदारी घायची ठरवली आणि हॉटेलच्या आतमध्येच वेळ घालवायचा ठरवला. पण होनी को कौन टाल सकता है!

दुपारी जेवायला म्हणून डायनिंग हॉलमध्ये गेलो. काल झालेल्या प्रसंगाने आम्हाला सगळे ओळखायला लागले होते आणि आमची सगळेजण खूप छान बडदास्त ठेवत होते. गरमागरम सूप, पंजाबी जेवण. शेवटी जान्हवीला आवडतात म्हणून आइस्क्रीम बरोबर गरम गरम गुलाबजाम व गाजरहलवा घेऊन संजय आला आणि जान्हवीला मोठा बाउल भरून आइस्क्रीम देताना म्हणाला,"आईबाबांच्या मनालीसाठी खास आइस्क्रीम आणि गाजरहलवा, आज्जीआजोबांसाठी गुलाबजामून!" आमच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून त्याने हसत सांगितले,"काल दवाखान्यातून परत येताना गप्पा मारताना जान्हवीने आम्हाला सगळी माहिती दिली हो", हे सांगता सांगता संजयने ट्रे मधून सगळे काढून ठेवताना गुलाबजामून असलेल्या वाटीला ट्रेचा धक्का लागला आणि गरम गुलाबजामून व पाक एकदम आज्जींच्या ज्या पायाला साप चावला होता त्या पायावरच पडला. मी लगेच उठून तिथे असलेल्या सगळ्या ग्लास मधले पाणी आज्जींच्या पायावर ओतले आणि बाजूच्या टेबलवरचे पाणी घेऊन तेपण ओतत राहिले. तोपर्यंत संजय बर्नोल घेऊन आला, वॉशरूममध्ये जाऊन मी त्यांना पायावर बर्नोल लावले आणि तिथे बसवून खूप वेळ पायावर पाणी ओतत राहिले. थोड्यावेळाने दाह कमी झाल्यावर आम्ही त्यांना रूममध्ये घेऊन जाऊन मी परत त्यांना टबमध्ये पाण्यात बसवले. आज्जींना ताप/सर्दी होऊ नये म्हणून ह्यांनी मला त्यांना बाहेर आणायला सांगितले. आम्ही सगळे त्यादिवशी त्यांच्याच रूममध्ये झोपलो. सकाळी आज्जी एकदम नॉर्मल झाल्या होत्या. भाजलेल्याचे डाग पण नव्हते आणि दुखतपण नव्हते. आज्जींनी मला लगेच सुचून त्यांच्या पायावर पाणी ओतले व त्यामुळे नायलॉनचा ड्रेस चिकटला नाही आणि फार त्रास झाला नाही म्हणून खूप कौतुक केले.

त्यादिवशी परत निघायचे असल्याने आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन आवरून परत आज्जीआजोबांच्या रूममध्ये आलो व सगळे एकत्र नाश्ता करायला खाली आलो. त्यावेळी आजोबांनी,"माफ करा आम्हाला, आम्ही तुमच्या ट्रिपची मज्जा घालवली, तुम्हाला साधा सूर्योदयपण बघता आला नाही". असे म्हणून माफी मागितली. आम्ही काही बोलणार तोपर्यंत मॅनेजर आमच्याकडे हसतहसत आला आणि म्हणाला, "हॉटेलने तुम्हाला अजून दोन दिवस राहण्याची विनंती केली आहे". सुट्टी नसल्याने आम्ही नकार दिला पण त्यांनी खूप विनंती केल्यामुळे आम्ही होकार दिला आणि त्यांनी आम्हाला स्पेशल पाहुण्यांसाठी असलेली luxury रूम आम्हाला देऊ केली. त्या दिवशी त्यांच्याकडे असलेल्या ऐसपैस गाडीने आम्हाला पूर्ण महाबळेश्वर फिरवून आणले. २ दिवस आम्हाला पूर्ण VIP सेवा दिली होती. आमचे कपडे पण धुवून दिले होते. आम्ही सगळ्यांनी मसाज, सोना बाथ पण घेतला. कसले रिलॅक्स वाटत होते. अहा! आणि हो आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करायला आलेलो असल्यामुळे त्यांनी खूप छान केक आणून तो सगळ्या स्टाफ व तिथे असलेल्या पाहुण्यांबरोबर एकदम जोरदार पद्धतीने दणक्यात साजरा केला २ दिवस खूप म्हणजे खूपच छान गेले पण ते फुलपाखरासारखे कधी उडून गेले ते कळालेच नाही!

निघायच्या दिवशी सगळा स्टाफ आम्हाला भेटायला आला होता. संजयचे कुटुंब आम्हाला भेटायला आले होते. त्यांनी आम्ही तक्रार केली नाही म्हणून खूपदा आमचे आभार मानले. आज्जीआजोबा व आम्हाला त्यांनी मॅप्रोची मोठी बास्केट हॉटेलतर्फे गिफ्ट म्हणून दिली आणि अजून एक सरप्राईज दिले. आमच्यासाठी खास कालचीच गाडी आम्हाला घरी सोडण्यासाठी दिली होती.

त्यादिवशी मात्र आम्हाला देवाने सगळ्यात मोठी भेट दिली होती. ती म्हणजे हृदयाशी आणि आमच्या आयुष्याशी कायमचे जोडले गेलेले आज्जीआजोबा!

सुप्रिया