Death seen in front books and stories free download online pdf in Marathi

समोर दिसलेला मृत्यू

माझी आई युगांडाला आमच्याबरोबर थोड्या दिवसांसाठी राहायला आली होती. त्यावेळी तिला वेगवेगळी ठिकाणे दाखवण्यासाठी खूप फिरलो. खूप साऱ्या ट्रिप्स अविस्मरणीय होत्या पण त्यातली एक ट्रिप कायम लक्षात राहिली ती म्हणजे - Queen एलीझाबेथ नॅशनल पार्क...

आम्ही 3 कुटुंब मिळून जंगल सफारीला जाणार होतो. एकत्र मज्जा येईल म्हणून बसच बुक केली होती. साधारण 6 तासाचा प्रवास असल्यामुळे पहाटे 5 वाजताच घरून निघालो. खूप मज्जा केली जाताना. दमशराज, नावाच्या , गावाच्या, गाण्याच्या भेंड्या असे खूप सारे खेळ खेळलो आणि बसमध्ये खायला म्हणून प्रत्येकाने भरपूर नाश्ता करून घेतला होता. त्यामुळे 6 तास कसे गेले ते समजलेच नाही. हॉटेलमध्ये थोडा आराम करून दुपारच्या जंगल सफारीला म्हणून बाहेर पडलो. साधारण 4 ते 6.30 ह्या वेळेत तुम्हाला जंगलात घेऊन जातात. त्यावेळी बरेचसे प्राणी दिसले, खूप वेगवेगळे पक्षी दिसले. परत जाताना तर संध्याकाळचा संधीप्रकाश आणि सिंहाच्या जोडीवर त्याची छटा.... हे दृश्यच इतके विलोभनीय होते की मनविभोर झाले. अश्या तऱ्हेने दिवस सत्कारणी लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून परत सफारीसाठी आमची यात्रा सुरू झाली. पहाटेच तुफान पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणातला थंडावा सुखावणारा होता पण सकाळी कुठलेच वेगळे प्राणी बघायला न मिळाल्यामुळे थोडा विरस झाला होता. दुपारी जंगलातच असलेल्या सेरेना हॉटेलमध्ये थांबून तिथूनच संध्याकाळची सफारी करून नंतरच आम्ही रहात असलेल्या हॉटेलमध्ये जायचे हे ठरवून तिथेच वेळ घालवला, विश्रांती घेऊन आता आपल्याला सगळे प्राणी, पक्षी दिसणार ह्या उमेदीने सगळे संध्याकाळच्या सफारीला निघालो. सुरुवातीला 1 तास एकही प्राणी किंवा पक्षीसुद्धा दिसला नाही. इतकेच काय तर युगांडन कॉब आणि म्हशी सगळीकडे असतात त्यांचे सुद्धा दर्शन झाले नाही. काही कळतच नव्हते. अगदी आम्ही सगळ्यांनी मिळून काहींनी गणपतीला, काहींनी देवीला तर काहींनी श्रीकृष्णाला असे प्रत्येकाने कुठल्या न कुठल्या देवाला साकडे घातले. बहुतेक देवाला आमची दया आली असणार कारण थोड्याचवेळात गाईडला वॉकीटॉकी वर कुठेतरी चित्ता दिसल्याचे समजले, आमच्याबरोबर बऱ्याच गाड्या त्या दिशेने धावल्या. नुकतीच केलेली शिकार झाडाच्या वरच्या फांदीवर लटकवून तो मस्त आराम करत बसला होता. गाईडने आम्हाला शांत राहण्यास सांगितले होते तरीही आमची एकदम हळू आवाजात कुजबुज सुरूच होती. ह्या चित्त्याने आपली शिकार झाडावर कशी काय नेऊन ठेवली असेल, लगेच का खात नसेल वगैरे....

नंतर खूप प्रकारचे सिंहाचे व जिराफचे पूर्ण कुटुंब, युगांडन कॉबचे, झेब्राचे, म्हशींचे, हत्तीचे कळप, अनेक प्रकारचे साप, 2 साप तर एकमेकांना गुंडाळून हवेत गिरकी घेताना सुद्धा पाहिले. अगदी आमच्या बसच्या बाजूला हे झाल्यामुळे तर थोडी भीती पण वाटली.

चित्त्यामुळे सगळ्या गाड्यांना निघायला उशीर झाला होता. पहाटे पाऊस पडून गेल्यामुळे आणि आम्ही चित्त्याला बघण्यासाठी ज्या वाटेवरून जायला परवानगी असलेला रस्ता सोडून आत गेल्यामुळे चिखल झालेल्या ठिकाणाहून गाडी चालवायला लागत होती. आमचा गाईड आणि ड्रायव्हर दोघेही खूप चांगले होते. संध्याकाळच्या वेळेत आणि इतक्या चांगल्या वातावरणात सगळे प्राणी बाहेर पडतात तरीही आमचा गाईड चिखलात गाडी घुसू नये म्हणून खाली उतरून बघून ड्रायव्हरला रस्ता सांगत होता. संध्याकाळ होऊन गेल्यामुळे सगळेच घाबरले होते. पण गाईडमुळे आम्ही जंगलात असलेल्या हॉटेलजवळ 8 वाजेपर्यंत पोहचलो(आम्ही त्याला जिथून घेतले होते). तिकडे पोहचल्यावर आम्हाला सांगितले की तिथून येताना 3 गाड्या चिखलात अडकल्या आणि त्यांची सुटका करण्यासाठी रेस्क्यूटीम गेली होती. त्यावेळी आम्ही देवाचे इतका चांगला गाईड मिळवून दिल्याबद्दल मनापासून आभार मानले.

आम्ही जंगलाच्या बाहेरचे हॉटेल बुक केले होते. आणि तिथे तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर गाडी चालवायला परवानगी नसते पण आमचे हॉटेल जंगलाच्या बाहेर होते आणि बाहेर जायला खूप मोठे जंगल पार करून जावे लागते. season असल्यामुळे सेरेना हॉटेल फुल्ल होते, एकही रूम शिल्लक नव्हती. त्यामुळे तिथे राहायची सुद्धा सोय होणार नव्हती आणि लहान मुलंपण बरोबर होती म्हणून आमच्या गाईडने तिथल्या सेक्युरिटीशी बोलून त्यांना सगळी परिस्थिती सांगून परवानगी घेतली.

दुपारपासून बसमध्येच बसून असल्याने सगळ्यांना वॉशरूमला जायचे होते, सगळेजण जीव मुठीत घेऊन खाली उतरले. मी व माझी छोटी लेक आर्या आणि माझी आई व जान्हवी असे आम्ही एकमेकांचे हात धरून वॉशरूमला गेलो. सगळेजण परत जाऊन बसमध्ये बसू लागले पण माझी एक मैत्रीण तिच्या लहान मुलीला वॉशरूमला घेऊन गेली होती म्हणून तिच्यासाठी मी आणि आर्या थांबलो होतो. त्या बसमध्ये चढेपर्यंत मी व आर्या खाली थांबलो, आणि आर्या एकदम पुढे उभी असलेली थोडी मागे वळली. मी तिला उचलून घेऊन पायरीवर चढवून मी एक पाय पायरीवर ठेवला आणि एकदम बिबट्या चालत येत असलेला बघितला! एकदम बोबडीच वळली. पटकन दुसरा पाय पायरीवर ठेवला आणि तो अगदी जवळ आला. ड्रायव्हर दरवाज्यापाशीच उभा असल्याने त्याने आतून पटकन दार बंद केले. मी आर्याला घट्ट पकडून मागे घेतले होते पण भीतीपायी तिला परत सोडायचे पण लक्षात नाही आले. आईने आर्याला घेतले व ह्यांनी मला थोडे हलवल्यावर मग मी शुद्धीवर आले. जाताना सगळ्यांना पुढे बसायचे होते, खिडकीकडे बसायचे होते, मागे बसले की उलटी होती, चक्कर येते म्हणून म्हणणारे बसमध्ये शिरल्याशिरल्या मागे जाऊन बसले. मला व आर्याला पुढचीच सीट रिकामी राहिली होती. माझी अवस्था बघून आईने मला तिच्या जागेवर बसायला सांगितले पण मी तिला निक्षून नाही म्हणून सांगून मी व आर्या पुढच्या सीटवर व आमच्या बाजूच्या सीटवर हे असे बसलो. आणि आमचा परत थरारक प्रवास सुरु झाला....

सेक्युरिटी व गाईड ने ड्रायव्हरला खूप साऱ्या सूचना देऊन झाल्यावर आम्ही तिकडून जायला निघालो. ज्या बिबट्याने मला घाबरवले होते तो बिबट्या आमच्याबरोबर पुढची १० मिनिट गाडीच्या बाजूने चालत होता. तेव्हामात्र चित्ता बघताना सेक्युरिटीने वारंवार सांगूनही आम्ही शांत न बसणाऱ्या आत्ता एकदम शांत झालो होतो. चुकून आवाज झाला, त्याने ऐकलं आणि काही केलेतर ह्या भीतीने बसमध्ये एकदम शांतता पसरली होती. लहान मुलीसुद्धा सगळे समजल्याप्रमाणे शांत बसल्या होत्या.

आम्ही दोघे पुढच्या सीटवर बसल्याने आम्हाला पुढच्या काचेतून सगळे दृश्य दिसत होते. तो काळोख आणि बसमधील निःशब्दता खरेतर असह्य होत होते, अंगावर काटा आला होता, भीतीने गाळण झाली होती, जीव कंठाशी आला होता. पुढच्या क्षणी काय होणार हे माहित नव्हते. पण बस सुरु झाल्यावर ती वाऱ्याची झुळूक, रातकिड्यांचा आवाज, एका लयीत हलणारी गवताची पाने, मध्येमध्ये असणाऱ्या झाडांच्या पानाच्या आवाजाची झुळझुळ, मध्येच येणारे प्राण्यांचे,पक्ष्यांचे आवाज अंगावर रोमांच आणत होता. का माहीत नाही पण त्यावेळी काहीतरी वेगळीच जाणीव होऊ लागली होती, खूप शांत आणि हलके वाटत होते, कुठलेतरी मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटत होते. जसे काही मनात साठवून ठेवलेल्या आणि त्याची अडगळ असह्य झालेल्या गोष्टी एकदम गायब झाल्या होत्या आणि मन पूर्णपणे रिकामे झाले होते. (त्यानंतर खूप दिवस मन हलके झाल्यामुळे खूप छान वाटत होते.) आणि अचानक डोळ्यातून पाणी वाहायला लागले. तो सुखद व आनंद देणारा अनुभव अविस्मरणीय व बऱ्याच आनंद देणाऱ्या क्षणांमधला एक होता. मला नक्की खात्री आहे कि हाच अनुभव ह्यांना आणि ड्रायव्हरला आला असणार.

बस एकदम संथ गतीने चालली होती. अंधाराची डोळ्यांना सवय होऊन बाहेरचं सगळे दिसायला पण लागले होते. जर समोरून एखादे जनावर रस्ता पार करत असेल तर आम्ही बस बंद करून तो पार केल्यावर मग पुढे जायचे असे चालू होते. बरेचसे प्राणी, त्यांचे कळप बघायला मिळाले. सकाळी पाणघोडा पाण्यात डुंबताना बघितले होते पण इथे प्रत्यक्ष पूर्ण बघायला मिळाला. मध्येच एक मोठा हत्तींचा आणि त्यांची खूप सारी पिल्लं असलेला कळप रस्त्यावर येऊन उभा राहिला. एकेक करून सरळ रांगेत ते रस्ता पार करत होते. खूप वेळ आम्ही तिथे उभे राहिलो होतो. त्यांनी रस्ता पार करताच आम्ही गाडी सुरु केली आणि एकदम धिप्पाड असलेल्या २ हत्तींनी मागे वळून बघितले. एकतर त्यांचे डोळे अंधारात चमकत होते. आईशपथ सांगते असे वाटले आता आम्ही संपलो. हत्ती, पाणघोडा व गेंडा हे ताकतवर प्राणी. एका झटक्यात त्यांनी बस उलथापालथी केली असती. ड्रायव्हरने लगेच गाडी बंद केली आणि जवळपास १५-२० मिनिटं आम्ही ते अगदी दूर जाईपर्यंत थांबून राहिलो. त्यानंतर मात्र कोणी दिसले तर ते रस्त्यापासून पूर्ण आत जाईपर्यंत आम्ही थांबत होतो.

एक धिप्पाड पाणघोडा आमच्या बससमोरून रस्ता पार करताना आम्ही गाडी बंद करून उभे होतो, चालता चालता अचानक रस्त्याच्या मध्येच उभे राहून आमच्याकडे बघितले, ते चमकणारे डोळे आमच्याकडे बघत असतानाच एकदम तो पूर्णच बसकडे वळला. एकदम न सुचून ड्रायव्हर ने गाडी मागे घेतली तर तो एकदम पुढे यायला लागला. त्याक्षणीच गाडी बंद करून हेडलाईट पण बंद केले आणि काय होईल ते परमेश्वराच्या हातात सोपवून उभे राहिलो. (नंतर ड्रायव्हर ने सांगितले कि जर जोरात गाडी अजून मागे घेतली असती आणि तिथे बाकीचेपण प्राणी असतील तर सगळ्यांनी मिळून गाडीवर हल्ला केला असता असा विचार मनात येताच त्याने गाडी बंद केली आणि हेडलाईट आपोआप बंद केले गेले) पाणघोडा हळूहळू चालत बसकडे येत होता. आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. अचानक तो चालायचे थांबला आणि गाडीकडे बघत बसला. बहुतेक त्याच्या मनात आले असेल कि आत्ता इथे उजेड दिसला होता आणि एकदम कसलातरी आवाज आला होता आणि एकदम बंद कसा काय झाला हा विचार करून तो गोंधळून जागेवरच थांबला असावा किंवा आमच्यासारखे घाबरला पण असू शकतो नाही का! खूपवेळ एकाच जागी उभा राहून खूपच कंटाळा येऊन शेवटी त्याने रस्ता पार केला, त्यानंतरही आम्ही जवळपास ५ मिनिट काय माहित तिथेच लपून बसला असेल आणि एकदम बाहेर आला तर ह्याविचाराने तसेच उभे राहिलो.

थोड्या अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला सिंहाचे कुटुंब होते. काहीजण बसले होते तर काहीजण उभे होते. सिंह मस्त एकेठिकाणी उभा राहून गार वाऱ्याचा आनंद घेत होता, एक सिंहीण पहुडली होती आणि तिची ४-५ पिल्ले तिच्या अंगावर खेळत होती, तर दुसरी सिंहीण सिंहाच्या आजूबाजूला फिरत होती, तर तिसरी पडून स्वतःचे अंग स्वच्छ करत होती. लगेच बस आणि हेडलाईट्स दोन्ही बंद करून तिथेच उभे राहिलो. तिकडून ते हलत पण नव्हते! ड्रायव्हरला काय करावे कळत नसावे. गाडीचा आवाज येऊन एकदम त्यांनी हल्ला केला तर! खूप वेळ थांबलो, शेवटी लाईट सुरु न करता गाडी सुरु केली. सगळ्यांचे डोळे आमच्या दिशेने चमकत होते, भीतीने काळजाचा ठोका चुकला होता पण तसेच गाडी एकदम हळू वेगात पुढे जाऊ लागली आणि ते डोळे दिसेनासे होईपर्यंत आमच्याकडेच बघत होते.

पुढे काही अंतरावर जवळपास १०-१२ फूट अजस्त्र अजगर बससमोरून झर्रकन निघून गेले. हरण, काळवीट ह्यांचे कळप गाडीचा आवाज बघून घाबरून जोरजोरात उड्या मारत पळत होते. जिराफ, हत्ती, गेंडे, पाणघोडे, युगांडन कॉब, झेब्रे, हरीण, काळवीट, लांडगे, वानर, माकडं, सिंह, बिबट्या, चित्ता, अजूनही बरेच प्राणी व त्यांचे कळप, ४-५ प्रकाराचे साप बघायला मिळाले.

हळूहळू नंतर थोडी भीती कमी होत गेली आणि थांबत थांबत बाहेरचे दृश्य, आवाज, वेगवेगळे प्राणी, त्यांचे आमच्याकडे बघत असताना चमकणारे डोळे, हरणांची भीतीने उड्या मारत जाणे (आणि त्यांना बघून न घाबरता आम्ही गाडी थांबवत होतो) झर्रकन सरपटत जाणारे साप, पक्षी ( एक घुबड झाडाच्या टोकावर बसून आवाज करत होते, डोळे चमकल्यामुळे पटकन तिकडे लक्ष गेले होते), हे सगळे, ते वातावरण आणि रात्रीची शांतता पुढे बसल्यामुळे अनुभवता आली. तो अनुभव काही वेगळाच होता आणि खूप काही शिकवून गेला. त्याक्षणी असे वाटले कि पुढच्या क्षणी आपल्याबरोबर काय होईल हे सांगता येत नाही तरीही आपण पुढच्या १० वर्षाचे प्लॅनिंग करून तेव्हा छान जगायला मिळावे म्हणून आज जगायचे विसरतो. हा विचार केलाच पाहिजे पण त्याबरोबर आजपण जगता यायला हवे.

अश्यारीतीने हळूहळू करत आम्ही एकदाचे जंगल पार केले आणि नंतर मात्र सुसाट वेगात काही वेळातच हॉटेल गाठले. आम्ही दोघे, आई व ड्रायव्हर सोडला तर सगळे इतके शांत झोपले होते कि गाडी बंद केल्यावर सगळ्यांना उठवावे लागले (त्यांना असेच वाटले असेल कि कुठले तरी जनावर आले आहे म्हणून गाडी थांबवली असेल. रूममध्ये जाऊन सगळे तसेच झोपले पण आम्ही दोघे मात्र नंतर बराचवेळ तो अनुभव हृदयात साठवत शांतपणे खूप वेळ नुसतेच बसून होतो.

सुप्रिया

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED