हनिमून Supriya Joshi द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

हनिमून

लग्न झाल्यावर एक रीत/पद्धत असल्याने आम्हीपण हनिमून साठी दिल्ली, कुलू, मनाली, सिमला ह्याठिकाणी गेलो होतो.

पुण्याहून मुंबई व तिथून राजधानी एक्सप्रेसने दिल्ली आणि तिथूनपुढे आम्ही सगळीकडे कारने फिरलो. तसे आम्ही आजपर्यंत ट्रेनने भरपूर प्रवास केला पण मी राजधानी एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदाच बसले होते. राजधानी एक्सप्रेस खूपच छान होती. ऐसपैस, एकदम स्वच्छ! आम्ही आमच्या सीटवर बसल्यावर लगेच पाणी आणून दिले, नंतर खायलापण आणून दिले. ह्यांनी मार्केटिंग मध्ये असल्यामुळे खूपदा अश्या ट्रेनने प्रवास केला होता पण मी हे सगळे पहिल्यांदाच अनुभवत होते! एकदम भारी वाटले. दिल्ली कधी आले कळलेपण नाही!

दिल्लीला स्टेशनवर उतरल्यावर आमच्या नावाचे फलक घेऊन आमच्या कारचा चालक आमची वाट बघत उभाच होता. गाडीत पण पाण्याची बाटली होती. ३ किंवा ४ स्टार हॉटेल सगळीकडे बुक केले होते. त्यामुळे हॉटेलपण एकदम भारी होते.

लग्नाअगोदर दर २ वर्षांनी आम्ही ट्रिप काढायचो पण नेहमी 2nd क्लासने प्रवास केला आणि हॉटेल चांगले असायचे पण ३ किंवा ४ स्टार मध्ये कधीच राहिलो नाही. त्यामुळे ह्या सगळ्याचे खूप कुतूहल आणि नवऱ्याबद्दल जाज्वल्य अभिमान जागा झाला होता.

मस्त आराम करून संध्याकाळी तिथली काही ठिकाणे फिरलो. असे २ दिवस दिल्ली दर्शन केले. लग्नाअगोदर आम्ही दोघांनीही दिल्ली बघितल्यामुळे काही मोजकीच ठिकाणे फिरलो.

नंतर मग आमचा प्रवास सुरु झाला! १० रात्र आणि ११ दिवस असा प्रवास असल्यामुळे आम्ही वाटेतली सगळीच ठिकाणे बघत जाणार होतो. मला गाडीमध्ये जास्त बसल्यावर थोडे गरगरल्यासारखे होई आणि झोप अत्यंत प्रिय असल्याने माझा गाडीतला बराचसा प्रवास झोपण्यातच गेला. त्यावरून मला "बाहेरचे इतके छान सृष्टीसौंदर्य आणि नवीनच लग्न झालेले असून नवऱ्याबरोबर गप्पा मारण्यापेक्षा आमची बायको प्रवासात पूर्णवेळ झोपून होती आणि मग नाईलाजाने मी चालकाबरोबर सृष्टीसौंदर्य बघत व गप्पा मारत प्रवास पूर्ण केला" असे आजही ऐकून घ्यावे लागते.

ह्या प्रवासादरम्यान घडलेले २-३ प्रसंग मात्र कायमचे मनावर कोरले गेले.

दिल्लीहून 6-6.30 तास प्रवास करून हिमायलायच्या कुशीत वसलेल्या परवानो ह्या गावात येऊन आम्ही थोडावेळ थांबून फ्रेश झालो. तिथेच एका उंच डोंगररांगेत खूप सुंदर व नयनरम्य असे ‘ट्रिम्बल ट्रेल’ म्हणून एक रिसॉर्ट आहे. तिथे जाण्यायेण्याचा एकच स्रोत आणि तो म्हणजे रोपवे. हा साधारण 2 km चा वनवे रोपवे आहे आणि आपण तो 8 मिनिटात पार करतो.

इतक्या उंचावरून जाताना सुरुवातीला खरेच पोटात गोळा येतो. खाली पूर्ण जंगल आहे, भरपूर झाडी! सुरुवातीची १ मिनिटाची वाटलेली भीती गेल्यानंतर ते सौंदर्य बघून नजर हटत नव्हती. इतक्या वर्षांनीसुद्धा आत्ता लिहिताना ते सृष्टीसौंदर्य नजरेसमोरून तरळून गेले. डोंगरावरील परिसरसुद्धा खूपच छान आहे. तिथे वर बरेच हॉटेल्स व रेस्टॉरंट आहेत. खरेच त्या बाजूला फिरायला गेलात तर आवर्जून ह्या जागेला भेट द्या!

कुफ्री ह्या गावात महासू पीक म्हणून कुफ्रीमधली सगळ्यात उंच जागा आहे, तिथे तुम्हाला घोड्यावर बसूनच जावे लागते. आम्ही दोघेजण दोन घोड्यांवर बसून चढ चढायला सुरुवात केली. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे अगोदरच खराब असलेली पायवाट अजूनच खराब झाली होती आणि त्यात एका बाजूला खोल दरी होती. माझा घोडा दरीच्या बाजूला होता. घोड्यांचे मालक त्यांना पकडून चालत होते, आम्ही त्यांना, "इतक्या खराब रस्त्यावर घोडे नीट जातील ना!" हे विचारल्यावर त्यांनी,"हा घोड्याचा नेहमीचा रस्ता आहे, ते डोळे बंद करून पण जाऊ शकतात" असे उत्तर दिल्यावर आम्ही त्यांच्यावर आमचा सगळा भार टाकून निर्धास्त झालो.

दोन्ही घोडे थोडेफार मागेपुढे असे चालले होते त्यामुळे आम्ही दोघे मस्त गप्पा मारत चाललो होतो. अचानक मी ज्या घोड्यावर बसले होते त्याला एकदम काय झाले काय माहीत, त्याचा एकदम तोल गेला आणि एक पाय दरीत गेला, आम्ही खाली पडणार हे मला कळल्यावर मी त्याची दोरी घट्ट पकडली तो अजूनच बिथरला आणि दरीत पडलेला पुढचा एक पाय आणि पुढचाच दुसरा पाय असे दोन्हीही पाय एकदम वर केले! नशीब त्या घोडा पकडलेल्या माणसाने त्याला पटकन जोरात आत ओढून घेतले. जवळजवळ आम्ही आतल्या बाजूला खालीच पडणार होतो पण दुसरा घोडा पकडलेला माणूस चपळाईने सरसावला आणि दोघांनी त्या घोड्याला पकडले. हे सगळे खरेतर अगदी १ मिनिटात घडले होते पण तो १ मिनिट आमच्यासाठी जीवनमरणाचा खेळ झाला होता. खरेच त्या दिवशी मरण काय असते ह्याचा थोडासा का होईना पण अनुभव आला! आलेले संकट देवाच्या कृपेने थोडक्यात निभावले. हा सगळा प्रकार झाल्यानंतर ह्यांनी वर न जाता आम्हाला परत पायथ्याशी सोडायला सांगितले.

बाकी कुठेही न जाता आम्ही थेट हॉटेलवरच आलो. खुपवेळ हे काहीच बोलत नव्हते, मी शेवटी, "जे झाले ते झाले, मी मेलेतर नाही ना", असे म्हणाले तेव्हा डोळ्यात पाणी येऊन मला जवळ घेऊन म्हणाले,"परत असे कधीच बोलू नकोस". थोड्यावेळाने आम्ही नॉर्मल/फ्रेश होण्यासाठी म्हणून हॉटेलमध्येच फिरायचे ठरवले. हॉटेल खूप मोठे आणि छान असल्यामुळे तिथे आमचा वेळ कसा गेला ते कळालेच नाही. तिथे असलेले टेनिस, डार्ट आणि अजूनही खूप वेगवेगळे गेम्स खेळलो, भरपूर हिंडलो, सगळ्यांशी भरपूर गप्पा मारल्या. अशारितीने 'शेवट छान तर सगळे छान' ह्या उक्तीप्रमाणे त्या दिवसाचा शेवट खूप छान झाला.

सिमल्याहून हॉटेलमधून निघताना सगळ्या स्टाफला खूप वाईट वाटत होते. खूपजणांनी सांगितले की अजूनपर्यंत आम्हाला कोणीच अश्या मित्रत्वाच्या नात्याने वागवले नाही. आम्ही त्या सगळ्यांना खूप छान टीप दिली त्यामुळेतर खूपच आनंदित झाले. त्यांनी आम्हा दोघांना खूप छान पुष्पगुछ व छोटे गिफ्ट्सपण खूप प्रेमाने दिले.

आता आम्ही सिमल्याहून कुलूला जायला निघालो. मी गाडीत झोपत असल्यामुळे हे चालकाबरोबर पुढेच बसायचे, त्यामुळे ह्यांची त्याच्याशी छान गट्टी जमली होती! प्रवासात दोघेजण मस्त गप्पा मारायचे, तो तिथला लोकल असल्यामुळे खूप सारी माहिती पण देत होता. ह्यांना मुळातच भूगोल खूप आवडत असल्यामुळे आणि सामान्य ज्ञान पण खूप चांगले असल्यामुळे सगळी माहिती लक्षपूर्वक ऐकून खूप सारे प्रश्नपण विचारत होते! दोघांचे खूपच छान गुळपीठ जमले होते.

सिमल्याहून कुलूला जाताना मंडी नॅशनल हायवे पार करून जावे लागते. आत्ताचे माहीत नाही पण त्यावेळी एकपदरीच रस्ता होता. खूपच छोटा रस्ता, वळणेपण भरपूर, काहीकाही ठिकाणी तर ब्लाइंड टर्न होते. ते कमी की काय म्हणून एका बाजूला खोल मोठी दरी व बियास नदी आणि एका बाजूला उंचच्या उंच पहाड असा रस्ता होता. तुरळक रहदारी आणि चालकाचा नेहमीचा रस्ता असल्याने तो खूप सफाईने गाडी चालवत होता. बारीक पावसाची रिपरीप पण चालू होती. ते गाडीत लावलेले मंद सुमुधुर संगीत, अप्रतिम सृष्टीसौंदर्य आणि त्यात बारीक पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि त्याचा मातीतून येणार सुगंध. आहा! खूप सुंदर नजारा होता. नेहमी गाडीत झोपणारी मीपण उठून बसून सगळे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होते. इतके छान, सुंदर, मनमोहक सौंदर्य आणि वातावरण होते की आम्ही कोणीही एकमेकांशी न बोलता विध्यात्याशी जोडले गेलो होतो! आणि अचानक.......

आमच्या गाडीच्यासमोर खूप मोठी दरड कोसळली. आमच्यात आणि त्या कोसळलेल्या दरडीत फारफारतर २-३ इंचाचे अंतर असेल. गाडीच्या काचेला दरड चाटून खाली पडली होती त्यामुळे काचेला मोठा तडा गेला पण कसे काय माहीत नाही, इतकी मोठी दरड असूनसुद्धा काच तुटली नाही. आमच्यासमोरच्या दोन्ही गाड्या दरडीखाली सापडल्या होत्या.

काय चालले आहे काही कळतच नव्हते. आम्ही तिघेही सुन्न झालो होतो! सगळी ट्रॅफिक जाम झाली होती.

बरेच तास तिथेच उभे राहिल्यानंतर मग आम्ही परत गाडी मागे वळवून मंडी ह्या गावात आलो. पुढे जायला रस्ता नसल्याने सगळेजण इथेच राहणार होते त्यामुळे हॉटेलपण पॅक होते. त्यातल्या त्यात बरे हॉटेल मिळेपर्यंत रात्र झाली होती. भूकतर उडूनच गेली होती पण तरीही थोडेफार खाऊन आम्ही लगेच आमच्या खोलीत गेलो. प्रचंड ताण आणि खूप वेळ ट्राफिक मध्ये अडकून राहिल्यामुळे खूपच दमलो होतो. २ मिनिटात झोपी गेलो ते सरळ सकाळी ५ वाजता तिथला मुलगा उठवायला आल्यामुळे जाग आली. लगेच आवरून फक्त चहा पिऊन गाडीजवळ आल्यावर चालक म्हणाला,"काल रात्रीच कोसळलेली दरड काढल्यामुळे रस्ता clear झाला आहे आणि काल इथे अडकलेले सगळेजण आणि आजचे जाणारे असे खुपजण असतील, त्यामुळे रहदारी खूपच वाढेल. आपण लवकर निघू म्हणजे मग आपण ट्रॅफिक मध्ये न अडकता लवकर पोहोचू". आम्ही सकाळी ६ वाजताच तिथून निघालो. आमच्यासारखा विचार करणारे बरेचजण होते. तरीही म्हणावी इतकी रहदारी नसल्याने तसे आम्हाला फार अडकून बसावे लागले नाही. नंतर आम्हाला कळले की ७ नंतर जे कोणी निघाले त्यांना ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे खूपच वेळ अडकून राहावे लागले.

आमची सिमला ट्रिप खूपच छान झाली. आईने आमच्याबरोबर आमचे न ऐकता,"राहू दे जवळ. नाहीच खाल्ला गेलातर परत येताना कोणालातरी देऊन टाका सगळा फराळ" असे म्हणून खूप सारा फराळ दिला होता. रोज हॉटेलचे खाऊन कंटाळा आला होता आणि बरोबर भरपूर फराळ असल्याने आम्ही एक दिवस संध्याकाळी तिथल्या भाजीमंडईत जाऊन कांदे, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घेऊन आलो. हॉटेल मधून सूरी घेऊन सगळे मस्त बारीक चिरून चिवड्यात घालून दडपे पोहे करून खाल्ल्यावर बरे वाटले! आणि त्यादिवशीच ठरवले की आता रोज थोडा थोडा फराळ खायचा.

सिमल्याहून कुलूला गेलो, तिथून मनालीला. मनाली मध्ये आम्ही "Apple" म्हणून असलेल्या रीसॉर्टमध्ये उतरलो होतो.

तिथला बराचसा स्टाफ हा मराठी होता आणि त्यात एकजण आमच्यासारखेच नवीनच लग्न झालेले जोडपे होते. आम्ही सगळ्यांशीच बोलून, हसतखेळत राहत असल्यामुळे आमची त्यांच्याबरोबर एकाच दिवसात गट्टी जमली. आम्ही सगळ्यांनी एकत्र खूप मज्जा केली, बऱ्याच ठिकाणी आम्ही एकत्र हिंडलो, आमच्यासाठी त्यांनी हॉटेलचे खाऊन कंटाळा आल्यामुळे बरेचदा महाराष्ट्रीयन घरगुती स्वयंपाक केला होता! मला मुगाचा हलवा खूप आवडत नाही, मी खातच नाही पण त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर १ चमचा खाल्ला. इतका चविष्ट झाला होता की अर्धाच्यावर मीच तो हलवा संपवला. तसा हलवा मी अजूनपर्यंत खाल्ला नाहीये! त्यांनी आम्हाला एका दिवसासाठी रूम upgrade करून हनिमून स्वीट पण दिला. आईशपथ! रूम एकदम भारी होती आणि त्यातल्या सगळ्या अमेनिटीज पण. सगळे जवळपास समवयस्क असल्याने खूप दंगा केला. पत्ते, बॅडमिंटन, कॅरम, दमशराज, गाण्याच्या भेंड्या असे बरेच खेळ खेळलो. त्यांना आम्ही ह्या जन्मात तर कधीच विसरू शकणार नाही.

दोन वाईट प्रसंग झाल्यावर मात्र आता तिसरा प्रसंग ओढवू नये म्हणून हे खूपच काळजी घेत होते. चालकाला पण सारखे सांगत होते, "काळजी घे, गाडी हळू चालव".

प्रवासादरम्यान खूप चांगला चालक आणि सगळी माणसे पण खूप चांगली भेटली होती आम्हाला! अक्षरशः परत दिल्ली रेल्वे स्टेशनवर सोडताना चालकाच्या डोळ्यात पाणी तरळले होते. निघताना त्याने आम्हाला दोघांना आठवणीत राहील असे खूप छान गिफ्ट दिले.

सिमला, कुलू, मनाली, अंबाला, पालमपूर, कुरुक्षेत्र, दिल्ली अशी बरीच ठिकाणे आम्ही पाहीली. हे दोन प्रसंग सोडले तर आमची ट्रिप खूपच छान झाली. हिमाचल प्रदेश/ काश्मीर ही खरेच देवाची भूमी असणार.. खूप छान वातावरण, निसर्गाची पूर्ण कृपा आहे ह्या भागावर इतकी सुंदर सृष्टी, निसर्गरम्य परिसर. आणि तिथली जनता पण खूपच साधी आणि सगळे स्वभावानेपण खूप चांगले आहेत! तसाही प्रत्येकाला हनिमून हा कायम लक्षात राहतोच पण ह्या २ वाईट प्रसंगाने आणि खूप साऱ्या चांगल्या प्रसंगाने आमची ही ट्रिप अविस्मरणीय झाली!