आईने जेंव्हा जुईबद्दल ऐकल तेंव्हा का कुणास ठाऊक तिला असं वाटल की हे नाव तिने आधी घरातच ऐकलय कुणाकडून तरी, पण कुणाकडून हे तिला आठवेना. आणि निशिकांतने इतका मोठा निर्णय घेतला आणि ती याबद्दल अनभिज्ञ होते, या विचारांमुळे जुई बद्दल तिने जास्त विचार केला नाही; पण कदाचित तिला असं वाटून गेलं की ऋचा जास्त माहिती देऊ शकेल या बद्दल. म्हणून तिने ऋचाला विचारावं असं मनाशी ठरवलं निशिकांतची समजूत घातली खरी पण जास्त काही न बोलता. निशिकांतचा एव्हाना थकल्यामुळे डोळा लागला आणि आई देखील त्याच्या अंगावर पांघरून घालून तिच्या रूम मध्ये निघून गेली. पण तिच्या डोक्यातील विचारांची शृंखला काही केल्या थांबत नव्हती. विचार करता करता तिलाही झोप लागली. निशिकांतचे बाबा आधीच झोपले होते.
सकाळी नेहेमीप्रमाणे निशिकांत क्लिनिकला जाण्यासाठी तयार झाला. ४ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज तो क्लिनिकला जात होता. आजारी असल्याकरणाने विश्रांती साठी सुट्टी घेतली होती खरी त्याने पण ना शरीराचा थकवा गेला होता ना मनाचा; उलट रिकामपण असल्यामुळे विचारांचा नुसता कल्लोळ माजला होता. आज त्याने पुन्हा स्वत:ला कामांमध्ये गुंतून घेण्याचे ठरवलं. दिवस तसा ठीक गेला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही कारण मनात अस्वस्थता कायम होती. का तो जुईची वाट बघत होता हे त्यालाही माहीत नव्हतं, खरतर ती न सांगता निघून गेली होती मग कोणत्या आशेने तो तिच्या वाटेकडे डोळे लावून होता. या विचारानंतर एक दीर्घ उसासा सोडून त्याने त्याची बाइक सुरू केली. आणि घरी न जाता तो बागेत जाऊन बसला.
दुपारी आईने निशिकांतची खोली साफ केली. आणि तिला तोच फोटो मिळाला जो जयकडे होता. जय हा निशिकांतचा मोठा भाऊ जॉबसाठी तो उत्तरखंडला होता. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होता. फोटो बघून तिला आठवल तिने जुई हे नाव कुठे ऐकल होत. कारण जयने दाखवलेल्या फोटोतील मुलीच नाव पण जुई होत. हा निव्वळ योगायोग की नियती हे मात्र अजून ठरायच होत कारण नाव सारखी असू शकतील पण निशिकांतच्या खोलीत जयच्या मैत्रिणीचा फोटो कसा? या बद्दल काहीच अंदाज बांधता येत नव्हता. जय सहा महिन्यातून किंवा लागून सुट्ट्या आल्या तरच घरी येत होता. आणि जुई जर जयची मैत्रीण आहे तर मग तिची निशिकांतशी ओळख कशी?
या प्रश्नाचं उत्तर फक्त जय आणि निशिकांतच देऊ शकतील, याची एव्हाना आईला खात्री पटली होती. निशिकांत जेवून त्याच्या खोलीत गेल्यावर आईने हा विषय त्याच्या वाडिलांजवळ मांडला. या विषयाबद्दल पूर्ण माहिती नसताना निदान निशिकांतशी तरी बोलू नकोस असं त्यांनी सुचवलं कारण त्यांना ही निशिकांतची अवस्था ठाऊक होती. आणि जयशी तसंही पुढील चार दिवस काहीही कॉनटॅक्ट होऊ शकणार नव्हत असा कॉल कालच त्याने केलेला असल्यामुळे आईकडे एकच पर्याय होता की ऋचाला भेटून सर्व काही जाणून घ्यायच. हा निर्णय पक्का झाल्यावर आईने झोपून घेतलं. सकाळी रोजची काम आवरताना आईने ऋचाचा फोननंबर निशिकडे मागितला. अचानक आईने असा ऋचाचा नंबर का मागवा हा विचार करताना आईला आपण जुईबद्दल सांगितल म्हणून तिला टेंशन तर आलं नसेल ना असा विचार निशिकांतच्या मनात चमकून गेला. नंबर तर त्याने दिला आईला पण आता आई पुढे काय करणार याबद्दल निशिकांतला खूप टेंशन आलं.
त्याला हे समजत होत की आपण हे सर्व आईपासून लपवून ठेवल त्यामुळे आई नाराज आहे. मग आता तिला कसं विचारू की ऋचाचा नंबर का हवाय? काय करावं हे त्याला सुचतच नव्हतं. त्याच विचारांमध्ये तो क्लिनिकला निघाला. जाताना विचार केला की संध्याकाळी दादाशी बोलू याबद्दल आणि जमलंस तर आई आणि बाबांशी सुद्धा. ऋचाला आईने कॉल केला मात्र तिच्याशी आईच कॉनटॅक्ट होऊ शकला नाही कारण ऋचाचा फोन आउट ऑफ होता. आणि मग कामाच्या व्यापात आई फोन बद्दल विसरून गेली .
क्रमश: