श्वास असेपर्यंत - भाग १३ Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - भाग १३




पुढील एक - दोन महिने कसे गेले काही माहितचं पडले नाही. मग या कालावधीत कधी आनंद आणि मी बरेच लक्ष्मी च्या गोष्टी सांगत असायचो. जेंव्हा ही लक्ष्मीचे नाव निघताचं तिचा हसमुख चेहरा नजरेसमोर येत असायचा. मग ती एखाद्या दिवशी कॉलेज ला नाही आली की, मग तिच्या आठवणीत पूर्ण दिवस जात जायला ही जड वाटत असायचा. एक दिवस जरी ती आली नाही किंवा ती दिसली नाही तरी , मन चलबिचल व्हायचं. ही गोष्ट आनंद चांगलीचं ओळखून घेत असायचा. मग कधी कधी तो माझी चेष्टा सुद्धा करत असायचा...
म्हणायचा, " होणाऱ्या आमच्या वहिनी ची आठवण येत असावी, आमच्या मित्राला!!!"
मग मी चिडून त्याला रागावत असायचो, पण तो फारसं मनावर घेत नसायचा.

मी त्याला सक्त ताकीद दिली होती की, आयुष्यभर लक्ष्मीला कधीच सांगायचं नाही . जसं चालतंय तसंच नित्यनियमाने चालू द्यायचं .
"अरे अमर, बिनधास्त राहा!!! म्हणून आनंद समजावून सांगत असायचा. तसा ही आनंद वर पूर्ण विश्वास असल्याने तो असला काही प्रकार करणार नाही , याची शाश्वती होती . मग कधी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असायच्या. आपल्या समाजासाठी, आपल्या असणाऱ्या परिस्थितीशी झगडावे लागेल, जात, तर कधी वैचारिक पातळीत मतभेद होणारे विषय इत्यादी विषयांवर नेहमी बोलणं व्हायचं.

इकडे मागील दोन महिने पाऊस नसल्याने , कोरडा दुष्काळ पडला. घरी आई बाबांच्या आठवणीने मन हेलावून जायचे . कसे असतील आई बाबा ???? हाताला काम असणार की नाही??? सावकारांच्या कर्जाची चिंता इत्यादी नाना तर्हेचे प्रश्न मनात घोळत असायचे. मग मन मात्र खिन्न होत असे. सारखी आई बाबांची आठवण येत असायची.

एके दिवशी कॉलेजमध्ये असतांना एक व्यक्ती माझी चौकशी करत कॉलेजमध्ये आले. मला सरांनी सांगितले होते , मी त्या व्यक्तीकडे भेटावयास गेलो . तर ते गावचे सदाशिव काका होते. बाबांचे मित्रचं होते. बहुतेक त्यांना काही काम असावं जिल्याच्या ठिकाणी म्हणून शेवटी जाता जाता अमर याचं कॉलेजमध्ये शिकतो आहे हे त्यांना माहिती असावं , म्हणून जाता - जाता अमर ची भेट घेऊन जावं, याचा विचार करून ते मला शोधत आले असावे. अश्या विचारा चक्रात मी त्यांच्या समोर येऊन पोहोचलो. माझ्याचं मागे आनंद सुद्धा पोहोचला .

अहो, सदाशिव काका , " तुम्ही इकडे कसं काय येणं केलं ??? काही काम वगैरे होतं का इकडे???"
मी सहज म्हणून काकांना प्रश्न केला.

थोडा वेळ शांत राहून ते गंभीर मुद्रेत बोलून गेले .

" अरे अमर, तुझे बाबा गेले रे !!!! तोच निरोप घेऊन तुला सांगायला आलो !!"
डोळ्यांत अश्रू आणत काका बोलत होते.

मला काही काकांच्या बोलण्याचा अर्थ कळलेला नव्हता . म्हणून मी त्यांना परत प्रश्न केला,

" गेले म्हणजे नेमके कुठे गेले ??? कुठे कामावर गेले का??? किंवा कुणाच्या घरी गेले??? "

" सांगा ना काका !!!"

अरे अमर , " तुझे वडील , तुझे बाबा आपल्या सर्वांना सोडून देवाघरी गेले!!! तुझे बाबा मरण पावले!!!"
डोळ्यांत अश्रूंच्या धारा येऊन काका बोलत होते .

" माझे बाबा मरण पावले !!" हा एकचं शब्द मला सतत ऐकू येत होता. तो शब्द ऐकून किती तरी वेळ स्तब्ध राहिलो . डोळ्यांत अश्रूंच्या धारा येत होत्या. त्या सारख्या वाहत होत्या . तेवढ्या आनंदनी मला भानावर आणले, आनंदच्या ही डोळ्यांत अश्रू होतें.

आपल्याला जावं लागेल असं काकांनी मला सुचवलं . मी मात्र आता कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तिकडे आम्हांला जाण्यासाठी पैसे नव्हते . आनंदने कॉलेजच्या सरांना ही गोष्ट कानावर घातली असावी आणि त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले. आम्ही सर्व जे वाहन भेटेल त्यात बसून निघालो.

शाळेत नंबर येताचं कडेवर घेऊन नाचणारा बाप,
सर्व गावात कौतुक झाल्यावर चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असणारा बाप,
डोळ्यांसमोर उभा ठाकला होता,
तू शिकून मोठा हो ,
आम्ही रक्ताचं पाणी करेपर्यंत राबतो,
पण तू शिकावं असा आग्रह धरणारा बाप,
आपली परिस्थिती शिकूनच,
तुला ती प्रगती साधायची आहे ,
असं वरचेवर सांगणारा बाप,
चित्राला , स्वतःच्या पोटच्या गोळ्याला हाताने माती देतांना,
खंबीरपणे उभा असणारा बाप,
पायाला दुखापत झाली,
काही केल्या काम होत नव्हतं ,
तरी कामाला जाणारा बाप,
नजरेत दिसत होता ,
मोठ्या हिंमतीने शेती करून,
घेतलेलं सावकाराचं कर्ज फेडू,
असा रोखठोकपणे बोलणारा बाप ,
माझे बाबा मला आठवत होते.......


तेवढ्यात आनंद ने सदाशिव काकांना हे अचानक कसं काय घडलं , यांविषयी विचारणा केली, मी मात्र बाबांच्या आठवणी इतिहास नजरेसमोर नाचत होता. तेव्हा काका सांगत होते की,

" सर्व शेतकऱ्यांप्रमाणे , अमरच्या बाबांनी सावकाराकडून कर्ज शेतीसाठी घेतले होते. त्या बदल्यात आपल्या दोन एकर शेतीचा तुकडा गहाण ठेवला होता. शेतीचा माल निघाल्यावर , ते पैसे देऊन, आपली जमीन वापस घ्यायची असं ठरलं होतं. पण यावर्षी कोरडा दुष्काळ पडला , उभी असणारी पिके जागेवरचं राहून करपून गेली . ज्यांच्याकडे बरा पाऊस पडला, ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती ती पिके जगली . "

" ज्यांच्याकडे शेतीसाठी पैसे होते, त्यांनी परत हिंमत बांधून दुबार पेरणी केली . पण आमचं ' हातावर आणणे आणि पानांवर खाणे ' असल्याने, आंम्ही कुठे दुबार पेरणी करावी. या दुष्काळांमुळे हाताला काहीचं कामे नाही .ज्यांना कामांची गरज ते कुठल्या कुठे कामाला जायचे .पण अमरच्या बाबांना पायाचा त्रास , चिघळत चाललेली जखम , चालणं व्हायचं नाही. आई लागलं ते काम करायची, पण कर्ज कसं कमी करता येईल याचा काही मार्ग सापडत नव्हता . दोन वेळचं पोट भरण्याची पंचायत झाल्याने, आदल्या रात्री उठून ,ज्या सावकारांकडून कर्ज घेतलं, त्यांच्याच विहिरीवर त्यांनी स्वतःला संपवुन घेतलं म्हणजे विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली . " सांगता सांगता आम्हां तिघांच्या डोळ्यांत अश्रूंच्या धारा होत्या.

आत्महत्या हा शब्द ऐकून माझ्या अंगाला कंप सुटला. माझे वडील आत्महत्या करू शकतात यांवर माझा विश्वास बसत नव्हता.. दोन महिन्यापूर्वीच , मी काही काम करतो आणि तुम्हांला पैसे पाठवतो , मदत पाठवतो यांवरून मला खरी - खोटी सुनावणारे , स्वतः अशिक्षित असून शिक्षणाला महत्त्व देणारे, कष्टाचं पाणी करून मला शिकवणारे, माझे बाबा आत्महत्या करणार हे मला काही रुचत नव्हते . पण सदाशिव काकांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापलीकडे काही मार्ग नव्हता.

आत्महत्यां हे तर भित्रेपणाचे, जीवनातून कायम सुटका करून घेण्याचा मार्ग असाच अर्थ आत्तापर्यंत मला माहिती होता . पण माझे बाबा भित्रे नव्हते, जीवनातून पळवाटा शोधणारे नव्हते, उलट असणाऱ्या परिस्थितीशी झगडले , पण नाईलाज, शारीरिक थकव्याने , कर्जाच्या ओझ्याने आणि पायाला झालेल्या जखमेने , या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं म्हणून त्यांनी स्वतःला संपवून घेतलं असेल. पण माझे बाबा भित्रे तर नक्कीच नव्हते.

शेतकऱ्यांचे प्रश्न हे नेहमीचं अनुत्तरित असतात. शेतीतला माल निघाला की लागलीचं तो बाजारात विकावा लागतो . कारण पुरेसे पैसे खर्च करण्यासाठी नसतात. साठवणूक करून ठेवू शकत नाही. वरून याचे देणे त्याचे देणे असल्याने, हातात मात्र काही एक उरत नाही. सरकारचे पोकळ धोरण राबवते. शेतमाल निघाला आपोआप भाव पडतात आणि शेवटी त्याला दलाल लोकांकडुन फसवणूक होते, मग आत्महत्या करणार नाही तर काय करणार ???? वावरात रक्ताचं पाणी होत पर्यंत राबराब राबायचे, शेवटी हाताला काही लागत नाही.

वरून बेभरवशाचा पाऊस, कधी सारखाच कोसळतो, तर कधी ढुंकूनही पाहत नाही. मग या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे. सरकार शासन आर्थिक मदतीचा पाठपुरावा करत असला तरी, एवढ्या मोठ्या कुटुंबात मूठभर भेटणाऱ्या पैशातून कसा उदरनिर्वाह चालणार???? म्हणून शेतकरी कास्तकार आत्महत्या करतो. याचा अर्थ असा नव्हे की तो , जीवनातून पळवाटा शोधत असतो . माझे वडील नक्कीच भित्रे नव्हते. खंबीर होतें.. या विचारा विचारात गावच्या रस्त्याला आम्हीं लागलो.....

क्रमशः ......