अजब लग्नाची गजब कहाणी (भाग ३) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजब लग्नाची गजब कहाणी (भाग ३)


" काय !! रविवारी अकोला जायच आहे मुलगी पाह्यला ..मला न विचारता ठरवलंच कस तुम्ही?? मी येणार नाही अजिबात तुमच्यासोबत ..तुम्हीच जात बसा" रघुवीर चिडून म्हणाला..

" म्हणजे तुझ्या आयुष्याचा इतकाही निर्णय
घेण्याचा अधिकार नाही आहे का आम्हाला आणि तुला मुलीचा फोटो बघ म्हणलं तर तेही नको म्हणतोय " रुख्मिणी रागात आजी म्हणाल्या..

" जिजी अग तस कुठे म्हणलं मी पण मला एकदा विचारायचं तर खरी ..मला काम असतं बँकेत आणि प्लिज आता फोटो वगैरे पाहण्याची जबरदस्ती नको करू मला" रघुवीर नरमाईने बोलला..

" रविवारी कसली काम असतात रे तुला..ते काही नाही आपण जातोय रविवारी ..अरे तुला माहिती का मुलीची आजी आपल्या जिजींची बालमैत्रिणी आहे" रघुवीरची आई रमाताई म्हणाल्या..

" पण आई मला नाही इतक्यात लग्न करायच ग..तरी तुम्ही ऐकत नाही माझं..उठसुठ आला रविवार की चाललं मुली पाहायला..मला कंटाळा आलाय आता या सगळ्याचा" रघुवीर काहीसा वैतागून म्हणाला..

" रघु अरे अठ्ठावीस वर्षाचा झाला आहेस चांगला..अजून किती वर्ष बिनलग्नाचा राहणार आहेस??" जिजी म्हणाल्या..

" अठ्ठावीस वर्ष वय खूप झालं का जिजी??अग अजून लहान आहे मी..लग्नाची जबाबदारी पेलणं नाही होणार माझ्याने" रघुवीर म्हणाला..

" मला चर्चा नकोय आता ..रविवारी आपण मुलगी पाहायला जाणार म्हणजे जाणार..रमे घरात सगळ्यांना सांग रविवारच ..कोण कोण येतंय ते बघ" जिजी फर्मान ऐकवून निघून गेल्या..रघुवीर नुसता एकटक बघत राहिला त्याला वाद घालायला जिजींनी वाव दिलाच नाही..

चला तर या वरपक्षाची अर्थात देव कुटूंबाची ओळख करून घेऊया..

सर्वप्रथम कुटूंबातील सगळ्यात जेष्ठ व्यक्ती
श्री.विठ्ठलराव देव ( आप्पा) सेवानिवृत्त शासकीय न्यायाधीश .कोर्टात जरी हे न्यायाधीश होते पण घरी त्यांच्या पत्नी रुक्मिणी ताई याच न्यायाधीश आहेत त्यांचा निर्णय म्हणजे अंतिम..नोकरीच्या कठीण जबाबदारी मुळे विठ्ठल रावांना घरची जबाबदारी फारशी सांभाळता आली नाही.. जिजींनी त्यावेळी खंबीरपणे अक्ख घर एकटीने सांभाळलं ..मुलांची शिक्षण, लग्न यांसारखे महत्वाचे निर्णय जिजींनीच घेतलं..स्वभावाने थोड्या कठोर, रोखठोक बोलणाऱ्या जिजींना घरात सगळेच घाबरत.. विठ्ठलराव एकदम शांत स्वभावाचे..

ह्यांचे जेष्ठ चिरंजीव नारायणराव देवहे पेशाने वकील आहेत..ह्यांच्या पत्नी सौ.रमा देव या थोरल्या सुनबाई मनमिळाऊ,काहीश्या भित्र्या आणि अत्यंत प्रेमळ..ह्यांना एक मुलगी आणि एक मुलगा ..मुलगी सौ. गायत्री पाठक लग्न करून पार लांब मुंबई ला असते.. तर मुलगा म्हणजेच आपल्या कथेचा नायक रघुवीर देव दिसायला देखणा,तसंच अत्यंत आळशी निष्काळजी आणि जानकी सारखाच स्वप्नाळू..
त्यालाही इतक्यात लग्न करायचे नाही .त्याने तर वर्षभरात कुठल्या न कुठल्या कारणाने चक्क वीस मुलींना नकार दिला..घरचे मात्र ह्याला नवरी मिळवण्याच्या कसून प्रयत्नात आहेत..

विठ्ठलरावांचे दोन नंबरचे चिरंजीव श्री.वल्लभ देव ह्यांच स्वतःच मेडिकल आहे.तर पत्नी सौ .गौरी देव गृहिणी आणि उत्तम स्वयंपाक त्या करतात.ह्यांना दोन अपत्य मुलगी मुक्ता ही पदवी शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला आहे तर मुलगा कार्तिक हा बारावीला आहे ..

देव कुटूंबाचे धाकटे चिरंजीव दिगंबर हे आधुनिक शेती करतात..आप्पांची अमरावती पासून जवळच असलेलं त्यांचं गाव निंबोरा येथे वीस एकर शेती आहे ..ती सगळी शेती दिगंबरराव पाहतात..त्यांची पत्नी सौ.राधा या शिक्षिका आहेत आणि या जोडप्याला दोन मुलं आहेत मोठा मुलगा अत्री दहाव्या वर्गाला तर लहाना अथर्व हा आठव्या वर्गाला ..अस हे देव कुटूंब ह्या कुटुंबातील सगळे सदस्य एकमेकांसोबत अगदी प्रेमाने आणि एकोप्याने राहतात.. या सगळयांनाच रघुवीर च्या लग्नाची घाई झालेली आहे..पण रघुवीरला सध्याच लग्न नकोय तरीही त्याला जानकीला बघायला जावं लागणारच आहे..देव कुटूंबाच्या या " वक्रतुंड'" निवासस्थानी जानकी सून बनून येते की नाही ह्याची उत्सुकता सर्वांना लागली होती..

"वहिनी अहो खूप सुंदर दिसते मुलगी" मोबाईल वर जानकीचा फोटो बघत गौरीताई म्हणाल्या..

"आणि नावही बघा अगदी अनुरूप आहे " राधाताई म्हणाल्या ..

" त्यांचंही आपल्या सारखं एकत्र कुटुंब आहे म्हणे..म्हणजे मुलीला सवय आहे एकत्र कुटूंबात राहायची ..चटकन मिसळून जाईल बघ आपल्या कुटूंबात" रमाताई म्हणाल्या..

" मग नाही तर काय अशीच मुलगी हवी होती आपल्या रघुसाठी नाहीतर त्याला आवडली होती ती रागिणी कसली शिष्ट मुलगी होती...(गौरीताई बोलता बोलता थांबल्या) वहिनी सॉरी चुकून माझ्या तोंडून त्या रागिणीचा विषय निघाला" गौरीताई म्हणाल्या..

" तो विषय माझ्याही मनातून जात नाही ग..रघुच्या अस मुलींना सतत नकार देणं ,लग्न करत नाही म्हणणं यावरून मला सारख अस वाटत की तो अजूनही रागिणीला विसरलेला नाही.. बर विचारलं तर नीट काही सांगत सुद्धा नाही." रमाताई काळजीने म्हणाल्या..

" वहिनी अहो नका विचार करू..जे होते ते चांगल्यासाठीच..माझं मन सांगतंय की ही जानकी नक्कीच आपल्या रघुच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल.." राधाताई धीर देत म्हणाल्या..

" हो वहिनी ..दुधात जशी साखर विरघळते न तशीच ही आपल्या कुटूंबात मिसळून जाईल .." गौरी ताई म्हणाल्या..

रविवारी कुणी कुणी मुलगी पाहायला जायच हे जिजींनी सगळ्यांना बजावून सांगितलं..तिकडे गोकुळात ही पाहुणे येणार म्हणून लगबग सुरू होती..

"बापरे चिवडा, लाडू,चकल्या इतकं सारे पदार्थ? दिवाळी तर नाही सध्या मग हे एवढे पदार्थ कश्याला ..काही विशेष ?? " स्वयंपाक घरात महिला मंडळींना पदार्थ बनवतांना बघून जानकी म्हणाली..

" विशेष नाही तर काय रविवारी पाहुणे येणार आहेत नाही का आपल्या घरी" माई म्हणाल्या.

"म्हणून इतकं सगळा घाट कशाला घातलाय तुम्ही? आतापर्यंत मला बघायला पाहुणे आलेच होते तेंव्हा नव्हतं इतकं सगळं केलं मग आता यावेळी तरी कशाला उठाठेव करताय" जानकी म्हणाली.

" त्यांची गोष्ट वेगळी ह्यांची वेगळी आहे..आम्हा सगळ्यांना अस वाटतंय जानू की हा संबंध नक्कीच जुळणार..शिवाय माझी बाल मैत्रीण येत आहे पहिल्यांदा तिच्या कुटूंबासोबत आपल्या कडे मग त्यांच्या सोबत द्यायला हवं की नको काही ." माई म्हणाल्या..

" जानू कुठली साडी नेसणार आहेस तू केलंय का नक्की?? नाही तर एक काम कर माझी ती पिवळ्या रंगाची लाल काठाची साडी नेस..खूप छान दिसते त्यात तू" मनु म्हणाली

" अग वहिनी काय तू पण..इतकी फॅन्सी साडी नाही नेसणार मी ..साधीच नेसेल एखादी " जानकी म्हणाली..

" जानू काय आहे हं तुझं नेहमीच अशी करते तू ..मनु म्हणतेय ते बरोबर आहे तिची ती पिवळी साडीच नेस तू .खुलून दिसते तुझ्या अंगावर " अरुताई म्हणाल्या

" आई अग दरवेळी अस नटून थटून हातात पोह्यांचा ट्रे घेऊन जायच .मुलाकडचे लोक प्रश्न विचारतील त्याची खाली मान घालून उत्तर द्यायची ,कंटाळा आलाय मला आता या सगळ्याचा आणि तुम्हाला सोडून नाही जायच मला " जानकी म्हणाली

" प्रत्येक मुलीला यातुन जावच लागत बाळा..आम्हीही गेलोच की ,आपली मनु तर लग्न झालं तेंव्हा तुझ्याच इतकी होती ..एवढ्या मोठ्या कुटूंबाची सवय ही नव्हती तिला पण बघ कशी चटकन रुळली सगळ्यांमध्ये तिच्या शिवाय आता आमच्या कुणाच पान हालत नाही.. जानू तुलाही असच तुझ्या सासरी एकरूप व्हावं लागेल आणि मला खात्री आहे तू नक्की सगळ्यांना आपलस करशील" माई जानकीला जवळ घेत म्हणाल्या..

" माई आधी हिला म्हणावं नीट साडी नेसण शिक सासरी वहिनी नाही येणार आहे साडी नेसून दयायला, आणि स्वयंपाक घरात जरा लक्ष घाला नुसतं वरण, भात, भाजी पोळी आली म्हणजे झालं असं होतं नाही ..स्वयंपाकातल सगळंच जमायला हवं.. नैवेद्याच पान ,जेवणाची पान कसे वाढायचे हे सगळं सुध्दा व्यवस्थित जमायला हवं.." अरुताई म्हणाल्या..

" आई तू तर अशी बोलते आहेस जस उद्याच मी लग्न करून सासरी चाललीय आहे" जानकी म्हणाली..

" करेल हो आई सगळं ती ..सुरुवातीला मला कुठे काही येत होतं पण तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलंच आणि हळूहळू शिकवलं सुध्दा.. तशीच जानू ही शिकेल सगळं" मनु म्हणाली..

"मला तर बाई कधी एकदा रविवार येतोय अन मी कधी एकदा रुख्मिणी ला भेटतेय अस झालय" माई म्हणाल्या..

" जानू तू फोटो पाहिला की नाही मुलाचा,छान दिसतो ग मुलगा " जयश्री ताई म्हणाल्या..

"नाही बघितला ग काकू आणि मला बघायचा पण नाही ..आता येतोच आहे न रविवारी मगच बघेल" जानू म्हणाली..

सगळ्या बाया पुन्हा कामात आणि लग्नाच्या चर्चेत रंगून गेल्या..जानकी मात्र सगळ्यांसोबत असूनही नसल्या सारखी होती..तिकडे रघुवीर सुध्दा काळजीत पडला होता..आता या मुलीला कसा नकार द्यायचा ह्याची कारणं तो शोधत होता..बघू आता तो जानकीला नकार देतोय की होकार पण पुढच्या भागात....

क्रमशः....