अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ७) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ७)



शेवटी जानकी आणि रघुवीर च एकदाच लग्न ठरलं होतं.नातेवाईकांना ही फोन करून कळवण सुरू झालं होतं..येत्या रविवारी अग्निहोत्री कडले जेष्ठ मंडळी देवांच्या घरी जाणार होते.जानकी मनातून आनंदी नव्हती .घरच्यांना फसवतोय ही सल तिच्या मनाला टोचत होती पण सगळ्यांसमोर आनंदी असण्याचं ती दाखवत होती. दोन्ही घरी उत्साहाच वातावरण होत.लग्नात काय काय करायच ह्याची योजना आखली जात होती.
एकदाचा रविवार उजाडला आणि अग्निहोत्री मंडळी देवांच्या वृंदावनात पोहचली.
त्यांचं छान स्वागत करण्यात आलं.जानकी ,मंदार आणि मिनाक्षीताई सोडून सगळेच तिथे गेले होते.अण्णांनी सोबत त्यांच्या गुरुजींना देखील नेले होते जेणे करून साक्षगंध आणि लग्नाचा मुहूर्त काढता येईल.रघुवीर ला आशा होती की घरच्यांसोबत जानकी येईल पण जानकी न आल्याने त्याचा हिरमोड झाला.
जिजींनी सगळयांना त्यांचं संपूर्ण घर दाखवल
सगळ्यांना घर फार आवडलं.. जेवणं आटोपली.मग सगळे बैठकीत जमून मूळ मुद्यावर आले..

" आप्पासाहेब ..मला अस वाटत की आपण साखरपुडा आणि लग्नाचा शुभ दिवस ठरवून घेवूया.." अण्णा म्हणाले..

" हो हो मी ही तेच म्हणणार होतो.." आप्पा म्हणाले..

गुरुजींनी पंचाग,रघुवीर आणि जानकीची पत्रिका बघून साखरपुडा आणि लग्नाच्या काही तारखा काढल्यात.त्यात सगळ्यांच्या सोयीच्या तारखा बघून दोन तारखा नक्की करण्यात आल्या.

"ठरलं तर मग येत्या पंधरा दिवसांनी पंचवीस तारखेला साखरपुडा आणि दोन महिन्यांनी एप्रिल च्या तीस तारखेला लग्न.." आप्पा खुशीत म्हणाले.

" हो पण लग्न आणि साखरपुडा दोन्ही अकोल्यालाच होईल बरं" अण्णा म्हणाले..

" आमची काहीच हरकत नाही,तुम्ही म्हणाल तिथे लग्न होईल"जिजी म्हणाल्या..

" पण अकोल्याला खूप ऊन असतं आणि पाण्याचा दुष्काळ कस मॅनेज होईल सगळं" रघुवीर म्हणाला.

" तुम्ही त्याची काळजी नका करू रघुवीरराव तुम्हाला कसला त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ आम्ही ,तुमची गैरसोय होणार नाही" अण्णा थोडे कडक शब्दात म्हणाले..कदाचित त्यांना रघुवीर च मध्ये बोलणं आवडलं नव्हतं.जिजींनी एकदा रागाने रघुवीर कडे पाहिलं मग कुठे रघुवीर शांत बसला.

काय कस सगळं करायचं ते ठरलं.मानपान, हुंडा या गोष्टींचा प्रश्नच नव्हता.अग्निहोत्री जानकीच्या लग्नात कुठलीच कमतरता ठेवणार नव्हते.रघुवीर ने लगेच जानकीला मॅसेज करून साखरपुडा आणि लग्नाची तारीख कळवली.इतक्या लवकर सगळं होणार म्हणून ती काळजीत पडली.घरी पोहचल्यावर घरातल्या मंडळींकडून उर्वरित संपुर्ण माहिती तिला दिली.

" माई अग इतक्या लवकर साखरपुडा का ठरवला?काय घाई आहे " जानकी म्हणाली.

" कशी गोष्ट करते जानू अग तुमच्या पत्रिका बघून जो शुभ दिवस निघाला तोच नक्की केला न आम्ही आणि शुभ कार्यात उगाच उशीर नको" माई म्हणाल्या..

" जानू तुझं होणार सासरच घर आणि घरची मंडळी खूप छान आहेत ग..आज पाहिलं आपल्या सारखेच तेही लोकं खूप प्रेमाने एकत्र राहतात.जिजी माईंसारख्या च त्यांच्या सुनांना वागवतात.प्रेम,आदर,काळजी अस सगळं भरभरून आहे त्या घरी.तू खुप खूष राहशील ग तिथे" अरुताई ला बोलतांना गहिवरून आलं होतं.

" हो जानू ताई म्हणतातआहेत ते अगदी बरोबर आहे तू खरच भाग्यवान आहेस इतक छान सासर मिळालं तुला.." जयश्री ताई म्हणाल्या

"रघुवीरराव ही खूप छान आहेत बरं का. आम्ही गेलो तर खूप छान स्वागत केलं त्यांनी आमचं." मनु म्हणाली..
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जानकी चूप बसली आणि खोटखोटं का होईना तीही त्यांच्या आनंदात सहभागी झाली. रात्री अचानक तिला रघुवीर ने फोन केला.

"हॅलो ..मी रघुवीर बोलतोय" रघुवीर म्हणाला.

" ही काय वेळ आहे का फोन करायची" जानकी झोपेतून जागी होऊन त्रासिक स्वरात म्हणाली..

" अग इतक्या लवकर झोपली पण होतीस का ?" रघुवीर म्हणाला..

" रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत अन म्हणे इतक्या लवकर झोपली का, अरे कोणी फोनवर बोलतांना पाह्यलं तर काय म्हणेल" जानकी म्हणाली..

"बरं सॉरी इतक्या रात्री फोन केल्याबद्दल.. आणि काय ग कोण कशाला काय म्हणणार आहे? होण्याऱ्या नवऱ्यासोबतच बोलते आहेस न तू मग..आपलं लग्न ठरलंय विसरली का?" रघुवीर म्हणाला..

" काय रे तुला खूप आनंद होतोय वाटत लग्न ठरल्याचा? " जानकी काहीशी चिडत म्हणाली.

" हो मग होणार नाही का आनंद..इतकी सुंदर, गोड, समंजस,संस्कारी मुलगी बायको म्हणून मिळवल्यावर कोण आनंदी असणार नाही" रघुवीर तिची मस्करी करत म्हणाला..

" तू काय हे लग्न खर वगैरे समजायला लागला की काय??जागा हो स्वप्नातून हे लग्न फक्त नाटक आहे खर नाही.." जानकी म्हणाली.

" नाटक ?? अग नाटक कसलं ? खरच लग्न होणार आहे आपलं" रघुवीर म्हणाला..

" ए कशाला घाबरवतो आहेस मला आणि तूच म्हणाला होतास की आपल्याला लग्नाचं फक्त नाटक करायचं आहे आणि आता शब्द फिरवतो आहेस..कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? जानकी घाबरत म्हणाली..

" घाबरू नको मी माझे शब्द वगैरे काही फिरवत नाही आहे अजिबात.. मला सांग नवरा बायको असण्याचं जरी आपण नाटक करणार असलो पण लग्न तर खरोखरच होणार आहे न आपलं म्हणजे सगळ्या विधी खऱ्याच असणार आहेत म्हणून म्हणतोय लग्न तर होणार आपलं" रघुवीर म्हणाला..

" तू लग्नाची तारीख थोडी पुढची का नाही घ्यायला सांगितली?दोन महिन्यात लग्न किती लवकर होतेय" जानकी म्हणाली..

" हे बघ जितक्या लवकर लग्न होईल तितक्या लवकर आपल्याला यातून मुक्त होता येईल आणि जानकी एक रिक्वेस्ट करतो तुला प्लिज अपसेट राहू नको घरच्यांना उगाच वाटायला नको की तू या लग्नामुळे आनंदी नाही आहेस.मी तर खूप उत्साही असल्याच दाखवत आहे तुही तशीच वाग.." रघुवीर म्हणाला..

" अरे इतकं सोप्प नाही माझ्यासाठी..मनात एक चेहऱ्यावर एक अस नाही वागता येत मला पण प्रयत्न करतेय न मी" जानकी म्हणाली.

" हो कळतेय मला पण आपल्याला आता दुसरा पर्याय नाही त्यामुळे असच वागावं लागेल..मी तर उद्या चाललोय साखरपुड्याची खरेदी करायला..मला अण्णांनी सांगितलंय जावई बाप्पू तुम्हाला आवडेल ते कपडे आणि अंगठी आमच्याकडून घेऊन घ्या म्हणून उद्याच खरेदी करतोय" रघुवीर म्हणाला..

" आता काय म्हणावं तुला ,अस कस जमत रे तुला नाटकी वागणं इतक्या सहज" जानकी म्हणाली..

" अहो मॅडम काय करू वागावं लागत अस कधी कधी,तुही शिकशील माझ्यासोबत राहून सगळं" रघुवीर म्हणाला..

" ए मला काही शिकायचं वगैरे नाही हं तुझ्याकडून, चल झोप आता बराच वेळ झालाय" रघुवीर म्हणाला..

" सूंदर आहेस तितकीच खडूस पण आहेस ह तू..चल बाय गुड नाईट" रघुवीर हसत म्हणाला

" गुड नाईट" जानकी ने फोन कट केला..

" अरे देवा काय मुलगी आहे ही" रघुवीर स्वतःशीच बोलत,जानकीचा विचार करत मनाशी हसत होता.

"काय ठग मुलगा आहे हा..देवा!!अरे कसल्या मुलाशी गाठ बांधली माझी" जानकीही स्वतःशी बोलत होती..

दुसऱ्या दिवशी पासूनच साक्षगंधाची जोरदार तयारी सुरू झाली. चैतन्य ने घराजवळच असलेला हॉल बुक करून टाकला. महिला वर्गही त्यांच्या तयारीला लागल्या. कपडे ,दागिन्यांची खरेदी सुरु झाली.कुणाला काय काय द्यायच त्याची यादी करण्यात आली.
नातेवाईकांना आमंत्रण पाठवणं सुरू झाले. दोन्ही घरी एकूण उत्साहाचं वातावरण होत.
आता लवकरच जानकी आणि रघुवीर बंधनात बांधल्या जाणार होते..