अजब लग्नाची गजब कहाणी (भाग १) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजब लग्नाची गजब कहाणी (भाग १)



" अरु, जयु,मनु अग कुठे आहात ग सगळ्या, लवकर या बरं इकडे" माई फोनवरच बोलणं संपवून मोठ्याने आवज देत म्हणाल्या .


"माई अहो काय झालं??काही हवंय का तुम्हाला?" अरुताई म्हणाल्या.


" मला काहीही नको ग ..आता माहिती का कुणाचा फोन होता?? माझी बालमैत्रीण रुख्मिणी चा " माई म्हणाल्या..


"काय सांगताय काय माई..अहो तुम्ही रुख्मिणी मावशींबद्दल नेहमी सांगत असता.. आणि बरेच वर्षात तुमची गाठ भेट सुध्दा नाही मग हे अचानक कस घडलं." अरुताई आश्चर्याने म्हणाल्या ..


" अग ..आपण नाही का जानूच नावं नोंदवलं विवाह मंडळात .तिच्याही नातवाच नोंदवलं आहे त्यात नाव तिथेच त्यांनी आपल्या जानूची सगळी माहिती वाचली आणि फोन केला ..बघ न काय योगायोग रुख्मिणी ने फोन केला आणि मी उचलला.. तिने तीच नाव सांगितलं रुख्मिणी देव बोलतेय अमरावती वरून मग बाकी सगळं तिने तिच्या नातवा विषयी सांगितलं.. तरी रुख्मिणी म्हणल तर मनात आलं की ही आपली मैत्रीण रुक्मिणी तर नसेल न म्हणून मग बोलता बोलता मी तिला विचारलं की तुमच माहेर कोणतं तर तिने सांगितलं की मूर्तिजापूर मग खात्रीच पटली की ही आपलीच रुख्मिणी ..तरी मी विचारलं की मूर्तिजापूर च्या देशपांडे ची रुख्मिणी का?? तर ती हो म्हणाली ..मग काय विचारता इतका आनंद झाला मला ,मी तिला म्हणलं अग मी शारदा कुलकर्णी तुझी बाल मैत्रीण.. तिला ही खूप आनंद झाला ग..इतक्या गप्पा मारल्या आम्ही की काय सांगू.. आणि तिच्या नातवासाठी आपल्या जानूला बघायला यायच म्हणते आहे" ..माई म्हणाल्या


" अय्या माई ..किती छान न ..तुमच्या बालमैत्रिण सोबत अशीही भेट घडून येईल असं वाटलं नसेल न तुम्हाला आणि बघा न त्यांच्याच नातवाच स्थळ जानूसाठी आलं " भाग्यश्री ताई म्हणाल्या..


" हो न..आणि माहिती आहे का मुलगा बँकेत मॅनेजर आहे म्हणे, खूप शिकला पण आहे.. पुन्हा त्यांचं आपल्या सारखच एकत्र कुटुंब आहे.अमरावती ला मोठं घर ही आहे..शिवाय परिचित ठिकाणी आपली पोरगी पडली तर घोर नाही जीवाला..तसही आपण ही जानू साठी एकत्र कुटुंबच बघत होतो आणि अमरावती काही लांब नाही, वाटेल तेव्हा पोरीला भेटता येईल..अरु अग ही जोडी कदाचित वरूनच जुळून आली असावी बघ " माई भारावून गेल्या सारख्या बोलत होत्या


" ते कसं काय माई??" अरु ताई म्हणाल्या..


" मुलाच नाव माहितीय का काय आहे ..रघुवीर.

आपली जानकी आणि हा रघुवीर" माई म्हणाल्या ..


" अगबाई खरंच का ? मग तर ही जोडी जमायलाच हवी माई...अण्णांना सांगायला हवं ..त्यांनाही आनंद होईल..पण प्रश्न आहे जानूला कस समजवायच " अरुताई म्हणाल्या.


" जानू ला सांगायची जबाबदारी मनूची ..तीच तिला नीट सांगू शकेल .." माई म्हणाल्या


" पण माई तिने ठणकावून सांगितलं की सध्या काही दिवस तरी पाहण्याचा कार्यक्रम नको म्हणून ..अजून चिडेल ती .." मनु म्हणाली..


"मग हे काम तुमचे अण्णाच करू शकतात, चला मी अण्णांना सांगून येते" माई बोलून निघून गेल्या..


चला तर अजब गजब कुटुंबातील सदस्यांची ओळख करून घेऊ या..


सर्वप्रथम घरचे जेष्ठ व्यक्ती श्री.प्रभाकर अग्निहोत्री उर्फ अण्णा यांचा परिचय घेऊ.. तर हे अण्णा अग्निहोत्री कुटूंबाचा आधार स्तंभ .सेवानिवृत्त मुख्याध्यापक..अतिशय कर्मठ,हट्टी तापट ,शिस्तप्रिय त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण .उंच ,गोरेपान, वयोमानाने पांढरे झालेलं केस..पण अजूनही अण्णांचे बरचेशे दात शाबूत होते बरं.. आवज ही तसाच कडक ..ते म्हणतील तेच घरात होणार..त्यांच्या मुलांचे आणि आता मुलांच्या मुलांचे महत्वाचे निर्णय अण्णांच घेतात..त्यांनी घेतलेले निर्णय नेहमीच योग्य ठरतात हे विशेष.. घरातला प्रत्येक व्यक्ती त्यांना घाबरतो बरं का.


वरवर जरी कठोर असले तरी मनाने मात्र खुप प्रेमळ आहेत हो अण्णा..त्यांनी बांधलेल्या भल्यामोठ्या काहीस जुन्या पद्धतीच्या या निवासस्थानाला त्यांनी " गोकुळ" हे नाव दिले होते..


यानंतर आहेत सौ.शारदाताई अग्निहोत्री ..अण्णांच्या धर्मपत्नी.. पतिव्रता स्त्री.. कायम अण्णांच्या धाकात राहिलेल्या माई मात्र खुल्या विचारांच्या होत्या.. सुनांवर कायम मुलींप्रमाणे माया करण्याऱ्या..सतत हसतमुख, सुगरण .आजवर काटकसरीने संसार केला सगळ्यांची मनं जपत आल्या.. तशीच शिकवण त्यांनी त्यांच्या सुनांना पण दिली..अतिशय प्रेमळ अश्या या माई..


पुढील पात्र आहे माई आणि अण्णांचे जेष्ठ चिरंजीव श्री.अनंत अग्निहोत्री.. अतिशय साधे,सरळ आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व.. शासकीय नोकरीत कार्यरत आहेत..


अनंतरावांच्या पत्नी सौ .अरुंधती अग्निहोत्री.. गोकुळ सदनातल्या दुसऱ्या माई..प्रतिकृती समजा माईंची..घरातली थोरली सून म्हणून सगळ्यांना सांभाळून घेणारी,कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ अश्या या अरुंधती..


श्री .जयंत अग्निहोत्री या घरचे धाकटे चिरंजीव..एका शाळेमध्ये आर्ट्स टीचर आहेत..मिश्कील स्वभावाचे जयंतराव म्हणजे गोकुळातला हास्याचा झरा आहेत ..


जयंतरावांच्या पत्नी सौ. जयश्री अग्निहोत्री ..हसऱ्या खोडकर अश्या या जयश्री ताई. अरुंधती ताईंप्रमाणेच प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष.दोघीही जावा अगदी बहिणी बहिणी प्रमाणे राहतात..


अनंत आणि जयंत यांना एकुलती एक बहीण सुद्धा आहे बरं तीच नावं सौ. मीनाक्षी दीपक जोशी -अग्निहोत्री.. लग्न झाल्यानंतर वर्षभरात या माहेरी परतल्या..अण्णांसारख्या च हट्टी.. वडिलांचा विरोध झुगारून त्यावेळी त्यांनी प्रेमविवाह केला पण दोघांचे विचार पटेनासे झाले .रोजचीच भांडण त्यात मीनाक्षी ताई हेकेखोर ..स्वतःचच खरं करणाऱ्या.. सरळ संसार मोडून आल्या..ते काहीही असलं तर त्या अत्यंत हुशार आहेत ..प्राध्यापिका म्हणून त्या महाविद्यालयात नोकरी करतात..


अनंत आणि अरुंधती यांना दोन अपत्य मोठा मुलगा चैतन्य हा सुद्धा त्याच्या काका प्रमाणे शिक्षक आहे पण संगीत विषयाचा ..याची पत्नी सौ मानसी अग्निहोत्री नवीन पिढीतली थोरली सून..आजे सासू आणि सासूचा आदर्श ठेवून पुढे चालणारी. या जोडप्याला दोन वर्षाची जुळी मुलं आहेत अनय आणि चिन्मय..


तर जयंत आणि जयश्री यांना ही दोन अपत्य.मोठा मुलगा ओंकार ह्याच महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे तर धाकटा मंदार हा बारावीला आहे..


अहो कथेचं मुख्य पात्र राहीलच की... कथेची नायिका कु.जानकी अनंत अग्निहोत्री .गोकुळातल्या सगळ्यांची ही लाडकी या पिढीतली एकुलती एक मुलगी.. अरुंधतीताई जेंव्हा जानकीच्या वेळी गरोदर होत्या तेंव्हा अण्णांच्या आई म्हणजे जानकीबाई खूपच आजारी होत्या .. अरुंधतीताईंना म्हणाल्या होत्या की मी तुझ्याच पोटी पुन्हा जन्म घेईल.. जानकीच्या जन्माच्या महिना आधी जानकीबाई गेल्या आणि महिन्या नंतर जानकीचा जन्म झाला..त्यावेळी लहानग्या जानकीला पाहून अण्णा म्हणाले होते"माझी आई परत आली" ही जानकी म्हणजे अण्णांचा जीव की प्राण ..म्हणून बाळाचं नावं जानकी ठेवलं..अस म्हणतात की रंग रूपाने जानकी मोठ्या जानकीबाईं सारखीच दिसते.. गोरा रंग ,काळेभोर डोळे , चाफेकळी नाक, हसली की गालावर पडणारी खळी आणि सोनेरी छटा असलेले लांबसडक केस..सुंदर तितकीच लाघवी आणि अत्यंत स्वप्नाळू ,पदवीधर शिक्षण पूर्ण होऊन काही दिवस होत नाही तर या तेवीस वर्षीय जानकीच्या लग्नासाठी वर संशोधन सुरूही झालं . पण त्यात ही अटी शर्ती आहेत बरं का.. जानकी ला मात्र सध्याच लग्न करायच नाही आहे तीचे स्वप्न काही वेगळेच आहेत ..पण घरच्यांपुढे तीच चालते कुठे ..तर अस हे भलंमोठं अग्निहोत्री कुटुंब निघालय जानकीसाठी वर संशोधन करायला. बघूया पुढे काय गमती जमती घडतात ते...