अजब लग्नाची गजब कहाणी (भाग २) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजब लग्नाची गजब कहाणी (भाग २)


माईंनी अण्णांच्या कानावर त्यांचं रुख्मिणी आजींसोबत झालेलं बोलणं घातलं..अण्णांना ही आनंद झाला पण प्रश्न त्यांच्या लाडकीच्या आयुष्याचा होता म्हणून सगळी शहानिशा केल्या शिवाय ते पुढील बोलणी करणार नव्हते.
अण्णांनी जानकीला त्यांच्या खोलीत बोलवले..

" अण्णा बोलावलं तुम्ही?" जानकी म्हणाली..

" हो ..बस इथे माझ्यासमोर " अण्णा म्हणाले..

" काय झालंय अण्णा ,तुम्हाला काही बोलायच आहे का माझ्याशी" अण्णांचा चिंतेत असलेला चेहरा बघून जानकी म्हणाली

"जानू बाळा तुझ्यासाठी एक स्थळं आलंय आणि येत्या रविवारी ते आपल्या घरी यायच म्हणतं आहेत" अण्णा म्हणाले

" अहो अण्णा काय इतकी घाई माझ्या लग्नाची..वर्षभरात 3 मुलं येऊन गेलेत मला पाहायला..मला त्या कांदेपोहे कार्यक्रमाचा कंटाळा आलाय हो अण्णा.." जानकी काहीशी वैतागून म्हणाली..

" हे बघ जानू अजून मी त्या मुलाची नीट चौकशी केलेली नाही आहे त्यामुळे लगेच काही रविवारी येणार नाहीत ते आपल्या कडे..पण तुझ्या माईच्या मैत्रिणीचा नातू आहे त्यामुळे तिची फार इच्छा आहे..त्यापूर्वी मी सगळी नीट चौकशी करतो,पत्रिका जुळते की नाही ते पाहतो आणि मगच पुढच ठरवतो.." अण्णा म्हणाले..

" पण अण्णा मला नाही करायच लग्न इतक्यात" जानकी म्हणाली.

" जानकी एक गोष्ट लक्षात ठेव ..आम्ही उठून कुठल्याही मुलाशी लग्न नाही लावणार आहोत.तुझ्या योग्यच मुलगा पाहणार आहोत ..पण त्या करिता सुरुवात तर करायला हवी की नको .एक दोन वर्ष तर जातातच या सगळया गोष्टींमध्ये..आणि मला इतिहासाची पुनरावृत्ती नकोय घरात जे मिनेनी केलं ते इतर कुणी करू नये हीच माझी इच्छा आहे..अनंता पासून ते चैतन्य पर्यंत सगळ्यांसाठी योग्यच जोडीदार पाहिलेला आहे..माझ्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत ..फक्त मिनेच्या बाबतीत मी जरा चुकलोच.तू तर आमच्या काळजाचा तुकडा आहेस तुझ्याबाबतीत चुकायला नको ..आता जा तू मी बघतो मी काय करायच" अण्णा म्हणाले..

जानकी नाराज होऊनच तिथून बाहेर पडली..अण्णांसमोर तिला जास्त काही बोलताच आलं नाही..

" काय मग जानकीबाई अजून एकदा सज्ज व्हा तुम्ही मुलगा येणार आहे म्हणे तुम्हाला बघायला" ओंकार मुद्दाम चिडवत म्हणाला..

" ए ओंक्या चुपबस जरा.. उगाच डोकं नको तापवू माझं..एकतर अण्णांनी काहीच ऐकून नाही घेतलं माझं" जानकी वैतागून म्हणाली..

"सांगायचं न मग बिनधास्त नाही करायच म्हणा मला लग्न" ओंकार

"हो का .इतकं सोप्प वाटत का तुला ..अण्णा पुढे आले की त त प प होते सगळ्यांची आणि म्हणे बिनधास्त सांगायच" जानकी म्हणाली

तेवढयात सगळं महिला मंडळ तिथे आलं..

" काय झालय जानू.. नाकावर इतका राग का दिसतोय" माई म्हणाल्या..

" माई काय ग तुम्ही सगळे .का इतकी घाई करताय माझ्या लग्नाची..मी म्हणलं होत न तुला नाही करायच इतक्यात मला लग्न" जानकी माईच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली..

" अग माय माझे ...अशी काय करते तू मुलगा चांगला आहे ,शिकलेला आहे आणि मुख्य म्हणजे माझ्या मैत्रिणी चा नातू आहे..म्हणजे परिचित लोक असतील ,शिवाय एकत्र कुटुंब आणि आपल्या अकोल्यावरून जवळच आहे अमरावती ..आपल्याच पट्ट्यात पडशील .." माई म्हणाल्या..

" पण माझी काही आवड निवड आहे की नाही.. तुम्ही लोक तुमच्याच आवडीने ठरवत आहात.. अन मला जवळपासचा मुलगा नको असेल तर ,लांब जायच असेल तर" जानकी म्हणाली..

" काय वेड लागलं आहे का तुला? उगाच बडबड करते..तुझं काही लगेच त्या मुलाशी लग्न नाही लावून देणार आहोत आम्ही..फक्त बघायला येणार आहे तो" अरुताई म्हणाल्या..

" आई अग चिडते कशाला? लग्न करून का दूर करताय मला?? माई खर सांगू मला न प्रेमविवाह करायचा आहे,आतू सारखा" जानकी सगळ्यांची या वर काय प्रतिक्रिया येते हे बघण्यासाठी म्हणाली..

" काय!!!" सगळेच एकदम ओरडले..

" तिच्या सारखे दळभद्री लक्षण नको करू जानू तिने ऐकलं नाही आमचं आणि खरं खर सांग तुझं काही प्रेमप्रकरण तर नाही न कुठे" माई खडसावत म्हणाल्या..

" नाही ग माई अस काही..पण माझी इच्छा आहे तशी" जानकी म्हणाली..

" एक धपाटा घालेन बरं जानू आता..आमच्या समोर बोलली ते बोलली आज अण्णांपुढे अस अजिबात बोलायच नाही..माई तुम्ही निरोप कळवाच मावशींच्या घरी रविवारी याच म्हणून.. या कार्टीच काही खर दिसत नाही आहे मला" अरुंधती ताई म्हणाल्या

" वहिनी अहो गम्मत घेतीय ती आपली..जानू अस काही करणार नाही खात्री आहे मला..काय जानू बरोबर न" जयश्री ताई म्हणाल्या..

"हो बघतेय तुमची काय प्रतिक्रिया येतेय त्यावर म्हणून.." जानकी म्हणाली..

संध्याकाळी पुरुषमंडळी घरी आल्यावर अण्णांनी त्यांनाही या विषयी सांगितलं.. सगळ्यांच मत पडलं की पहिले संपूर्ण चौकशी करू आणि मगच पाहण्याचा कार्यक्रम.. अमरावतीला नातेवाईक राहत असल्याने अण्णांनी कधीच त्यांना चौकशी करायला सांगितलं सुध्दा असते..रात्रीचे जेवण आटपून गप्पा मारायला सगळे गच्चीवर जमले ..विषय तोच जानकीच्या लग्नाचा ..

" दादा अरे आपण आपल्या जानू च स्वयंवर ठेवलं तर..म्हणजे बघ सारख सारख जानूला त्या कांद्या पोह्याच्या कार्यक्रमला समोर जायला नको..आपण घातलेल्या अटी ज्याला मान्य असेल,जानू च्या योग्य असेल त्यांना यात भाग घ्यायला लावायचा आणि त्यातील जो मुलगा जानूला आवडेल त्याच्यासोबत लग्न करून द्यायच" जयंतराव मस्करीने म्हणाले..आणि सगळे हसायला लागले..

" ए काका ..हे अस सगळं अण्णांसमोर नको बोलू नाहीतर ते खरच माझं स्वयंवर लावतील" जानकी म्हणाली..

" पण कल्पना भारी आहे जयंता तुझी" अनंतराव म्हणाले..

"बाबा तुम्ही पण ना..इकडे मला टेन्शन आलय अन तुम्ही सगळे मस्करी करत आहात माझी..जाऊदे जातेच मी इथून" जानकी चिडत जायला लागली..चैतन्य ने तिला थांबवलं..

" कुणीही मस्करी नाही हं करायची माझ्या सोनूलीची.." चैतन्य जानकीची बाजू घेत म्हणाला..

" जानू अन तू काय म्हणालीस की आतू सारखा प्रेमविवाह करायचा म्हणे मला..हे काय नवीन खूळ घेतलंय डोक्यात.." अनंतराव म्हणाले..

" काय!! जानू काय ऐकतेय मी ..अस्स म्हणाली तू??काही नाही हं ,माझ्या हातून एक चूक घडली आता तुला तशी चूक मी करू देणार नाही.." मीनाक्षी ताई म्हणाल्या..

"आतू ते मी सहज म्हणाले ग ..सारख सारख अस नटून थटून पाहुण्यांसमोर जाणं जीवावर येते मला म्हणून म्हणलं मी तस" जानकी म्हणाली..

" अनंता अरे तुझ्या अण्णांनी तर महेशला फोन करून सांगितलं सुध्दा मुलाची माहिती काढायला ..त्याचा मित्र आहे म्हणे रघुवीर च्या बँकेत उद्याच माहिती देतो म्हणे सगळी.आणि मोबाईल वर जन्मपत्रिका पाठवली होती न रघुवीर ची ती पण नेणार आहेत उद्या सबनीस गुरुजींच्याकडे..काय करायच पुढे उद्या कळेलच" माई म्हणाल्या..

खूप वेळ गप्पा मारून सगळे झोपायला निघून गेले..दुसऱ्या दिवशी सकाळीच अण्णा गुरुजींकडे पत्रिका दाखवायला गेले..आले तेंव्हा चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता..जानकी आणि रघुवीर चे एकोणतीस गुण जुळले होते..हे लग्न जमण्याचे शुभ संकेत सुध्दा गुरुजींनी दिले होते..संध्याकाळी अनंतरावांच्या मामे भाऊ महेश यांनी मुलाची सविस्तर माहितीही काढून आणली ..सगळंच अगदी चांगलं होत..नाव ठेवायला कुठेही जागा नव्हती म्हणून सगळ्यांच मत घेऊन शेवटी वर पक्षाला रविवारी गोकुळात जानकीला बघायला यायच आमंत्रण दिल्या गेलं.. सगळे आनंदी होते पण जानकी मात्र बिलकुल खूष नव्हती ..

वरपक्षाकडे काय अशीच परिस्थिती असेल की वेगळं घडत असेल??कस असेल देव कुटुंब जाणून घेऊया पुढच्या भागात..

क्रमशः..