अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग १०) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग १०)


रागिणीला रात्रभर झोप आली नाही.रघुवीर आणि जानकीचे फोटो सारखे तिच्या डोळ्यांसमोर येत होते.सकाळी ती लवकर उठली आणि आज काहीही करून रघुवीर ला बँकेत जाऊन भेटायचं अस तिने ठरवलं..पण रघुवीर चा ब्रेक टाइम दुपारी दोन चा असतो हे तिला माहिती होत त्यावेळी ती बँकेत पोहचली .
रघुवीर कँटीनमध्ये त्याच्या सहकार्यांसोबत होता..सगळे त्याच अभिनंदन करत होते..रघुवीर चा बेस्ट फ्रेंड असलेला दिनेश जाधव हा सुद्धा तीन महिन्याच ट्रेनिंग आटपून बँकेत परतला होता..त्याच लक्ष अचानक रागिनीकडे गेले..

"रघु ..समोर बघ ,रागिणी" दिनेश म्हणाला..

रघुवीर ने रागिणी कडे पाहिलं ती रागात होती.ती रागारागाने त्याच्या कडे गेली..

" अभिनंदन रघुवीर" रागिणी खोचकपणे म्हणाली..

" थँक्स..पण तुला कस कळलं" रघुवीर म्हणाला..

"ते महत्वाचं नाही.. इतक्या लवकर मूव्ह ऑन करशील अस वाटलं नव्हतं" रागिणी म्हणाली..

" मग काय करू रागिणी घरचे सगळे अगदी हात धुऊन माझ्या लग्नाच्या मागे लागले होते आणि तुही नाही म्हणाली होतीस.काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार होता न मला,शेवटी जानकीसोबत लग्नाला हो म्हणालो ..खूप छान मुलगी आहे ती पुन्हा घरच्यांना हवी तशीच आहे" रघुवीर मुद्दाम हे सगळं बोलत होता जेणेकरून रागिणीची प्रतिक्रिया त्याला कळेल.

"आणि तुझ्या आवडीचं काय रघुवीर तू आनंदी राहणार आहेस का तिच्यासोबत" रागिणीच्या बोलण्यात ईर्षा होती..

" माझ्या आवडीचं काय ग,जी मला आवडते तिला कुठे मी आवडतो " रघुवीर म्हणाला..

"अरे तस नाही पण.." रागिणी बोलता बोलता थांबली..

" पण काय ??" रघुवीर म्हणाला.

" काही नाही.. निघते मी " रागिणी तरातरा निघून गेली..

" असा हसतोय काय तिच्याकडे बघून" जाणाऱ्या रागिणीकडे हसत असलेल्या रघुवीरला दिनेश म्हणाला

" बघतोय की किती जळफळाट झालाय रागिणीचा माझं लग्न जमल्याच कळून" रघुवीर हसत म्हणाला..

"म्हणजे काय म्हणायचं आहे तुला" ? दिनेश म्हणाला..

" अरे म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी आहे पण ती व्यक्त करत नाही आहे ..माझे अन जानकीचे फोटो बघून जेलसी निर्माण झाली तिच्या मनात म्हणून तर इथपर्यंत आली न ती" रघुवीर म्हणाला..

" रघ्या हे बघ तुझं लग्न जमलंय आता हिचा विचार सोड ,आगाऊचे काम नको करू" दिनेश म्हणाला..

"जाऊदे दिन्या तुला नाही कळणार सांगेल कधीतरी निवांत" रघुवीर मनातल्या मनात खूष होऊन तिथून निघून गेला..त्याचा वार वर्मी लागला होता.इतक्या वर्षात जे त्याला जमलं नव्हतं ते आता साध्य होतांना दिसून येत होतं..

रागिणी आहे तरी कोण हा प्रश्न पडला असेल सगळ्यांना , ही आहे रागिणी वागळे रघुवीर ची शाळे पासूनची मैत्रीण. दिसायला सुंदर, हुशार,स्वावलंबी.. पण एकलकोंडी,अहंकारी..तिच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही तर आकांत तांडव करणारी.लग्नाच्या बाबतीत ही तिच्या खूप काही अपेक्षा होत्या त्यामुळे तिने आजवर अनेक मुलांना नकार दिला होता. रघुवीर ला मात्र ती शाळेच्या पहिल्या दिवशी पासूनच प्रचंड आवडायची..शाळा ते कॉलेज असा संपूर्ण प्रवास दोघांनीही एकत्र केला होता.. रागिणीसोबत लग्न व्हावं अशी रघुवीरची प्रचंड इच्छा होती..मोठी हिंमत करून तिला प्रपोज ही केलं होतं पण तिने ते साफ धुडकावून लावलं होत.रघुवीर त्यावेळी मनातून खूप तुटला होता..त्याच्या घरी रागिणीचा स्वभाव सगळ्यांना ठाऊक होता त्यामुळे घरूनही त्याला विरोध होता. रघुवीर च्या मनात मात्र रागिणीबद्दल प्रेम अजूनही कायम होत.तिच्याही मनात त्याच्या बद्दल प्रेम असेल आणि ती एक दिवस कबूल करेल अशी त्याला खात्री होती.. म्हणून तो कायम प्रयत्नात होता की तिच्या मनातलं ओठांवर आणावं आणि यावेळी काही प्रमाणात का होईना पण रागिणीच्या मनातली रघुवीर बद्दल असलेली प्रेमाची भावना जागृत झाली होती .रघुवीरला ही तेच हवं होतं म्हणून तिला जास्तीत जास्त जळवण्याचा प्रयत्न करणार होता.यासाठी तो जानकीचा वापर करणार हे नक्की होत बिचारी जानकी या सगळया गोष्टींपासून अनभिज्ञ होती..

साखरपुड्या नंतर आता दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती..लग्न बस्ता खरेदी साठी अग्निहोत्री महिला मंडळ चैतन्य सोबत अमरावतीला पोहचले होते .तिकडे परस्परच रघुवीर,जिजी,रमाताई,गौरीताई आणि राधा ताई सुध्दा खरेदी च्या ठिकाणी पोहचल्या.
जानकीने पांढऱ्या रंगाचा त्यावर रंगबिरंगी बारीक फुलं असलेला घेरदार असा लाँग टॉप घातला होता..ती अशी दिसत होती की,जणू काही आकाशातून परी अवतरली..जानकी ला बघितल्यावर रघुवीर ला रागिणीचा विसर पडायचा..लग्नाची खरेदी सुरू होती आणि अचानक त्याच दुकानात रागिणी रघुवीरला दिसली.त्याच्यासाठी चांगली संधी चालून आली.तो जानकी ला घेऊन रागिणी जवळ जातो.

" अरे रघुवीर कुठे नेतोय मला" जानकी म्हणाली.

" चल एका व्यक्तीसोबत ओळख करून द्यायची आहे..हॅलो रागिणी " रघुवीर म्हणाला.

रागिणीने वळून मागे पाहिले..रघुवीर आणि जानकीला अचानकपणे समोर बघून तीही थोडी दचकली..

"हॅलो" रागिणी नाराजीच्या सुरातच म्हणाली..

" हिला भेट ही जानकी ..माझी होणारी बायको आणि जानकी ही माझी मैत्रीण रागिणी" रघुवीर म्हणाला..

" हॅलो रागिणी ..नाईस टू मिट यू" जानकी हसत म्हणाली..

" हॅलो जानकी...तुम्ही इकडे कसे?? " रागिणी म्हणाली..

" आम्ही आमच्या लग्नाची शॉपिंग करायला आलो होतो..सोबत घरचे लोकं पण आहेत.." रघुवीर म्हणाला..

"अरे वा छान" रागिणी म्हणाली..

"मग कशी दिसतेय आमची जोडी आहे की नाही मेड फॉर ईच अदर" रघुवीर हे सगळं मुद्दाम म्हणत होता..

" अ हो आहात की.." रागिणी मनात नसतांना म्हणाली.

खरतर रागिणीचा चेहरा त्या दोघांना बघून पडला होता. तिच्या मनात जानकी बद्दल आपसूक ईर्षा निर्माण झाली होती. त्या दोघांना एकत्र बघणं तिच्याने होत नव्हतं..काही दिवसांपूर्वी आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा ,त्याला हो म्हणावं म्हणून धडपडणारा आज एका दुसऱ्या मुलीबरोबर आहे हे तिला सहन होत नव्हतं..तिला रघुवीरला नाही म्हणण्याचा पश्चात्ताप होत होता..रघुवीर तिला आणखीन जळवायचा प्रयत्न करत होता..जानकीचा मात्र यात विनाकारण बळी पडत होता.. आता रागिणी तिच्या मनातल्या भावना व्यक्त करते का नाही हे कळेल लवकरच..

क्रमशः..