संत एकनाथ महाराज - 16 Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संत एकनाथ महाराज - 16

संत श्री एकनाथ महाराज १६

श्रीकृष्ण उध्दव संवाद

काम ईहा मदस्तृष्णा सतम्भ आशीर्भिदा सुखम् । महोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥३॥

काम म्हणिजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू । तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामअसोसू पैं वाढे ॥७७॥ या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण । झाले विद्येचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥७८॥ झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती । चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥७९॥ अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा । या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥८०॥ अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें । प्रापंचिक सुख मागणें । आशा म्हणणें या नांव ॥८१॥ भिदा म्हणिजे भेद जाण । स्फुरद्रूप प्रपंचभान । माझें तुझें प्रपंचवचन । भिदालक्षण या नांव ॥८२॥ राजसुखाचा नवलभाग । विषयसुखभोग जो साङग । तेंचि सुख मानिती चांग । सुखप्रयोग या नांव ॥८३॥ रणीं उत्साह शूरासी । कां पुत्रोत्साह नरासी । विवाहोत्साह सुहृदांसी । महोत्साह त्यासी बोलिजे ॥८४॥ शास्त्रविवादीं जयो घेणें । कां युद्धीं शूर पराभवणें । तेणें ख्याति वाढविणें । यश मिरवणें या नांव ॥८५॥ बंदिजनांहातीं कीर्ती । स्वयें वाखाणवी दिगंतीं । या नांव यशःप्रीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८६॥ ऐकोनि वचनोक्ति छंदोबद्ध । उपहासीं अतिविनोद । तेथ राजसा हास्य विशद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥८७॥ वीर्य म्हणिजे केवळ । बलाढयता अतिप्रबळ । दाखवणें शारीरबळ । या नांव शीळ वीर्याचें ॥८८॥ राजबळें उद्यमव्यवहार । आंगदट जो व्यापार । न्याय सांडूनि स्वार्थ फार । बलोद्यमप्रकार या नांव ॥८९॥ हीं पंधराही लक्षणें । ज्यापें नांदती संपूर्णें । तो राजस वोळखणें । जीवेंप्राणें निश्चित ॥९०॥ केवळ अविवेकसंपत्ती । तामसाची तमोवृत्ती । सोळा लक्षणें त्याची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥९१॥

क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याञ्चा दम्भः क्लमः कलिः । शोकमोहौ विषादार्ती निद्राशाभीरनुद्यमः ॥४॥

क्रोध कामाची पूर्वावस्था । लोभ म्हणिजे अतिकृपणता । अनृत म्हणिजे असत्यता । हिंसा ते तत्त्वतां परपीडा ॥९२॥ याञ्चा म्हणिजे लोलंगता । दंभ म्हणिजे अतिमान्यता । क्लमनामें अतिआयासता । व्यर्थ कलहता कलि जाण ॥९३॥ शोक म्हणिजे हाहाकारु । मोह म्हणिजे भ्रमाचा पूरु । विषाद म्हणिजे दुःखसंचारु । अभ्यंतरु जेणें पोळे ॥९४॥ आर्ति म्हणिजे अतिसंताप । निंदा म्हणिजे असदारोप । आशा म्हणिजे अतिलोलुप्य । महाभयकंप भीशब्दीं ॥९५॥ ऐक निद्रेचें निजवर्म । जें आळसाचें निजधाम । जाडयता सोलींव परम । ते निद्रा निःसीम तामसी ॥९६॥ सांडूनियां सर्व कर्म । स्तब्धता राहे परम । या नांव अनुद्यम । सुखावलें तम ते ठायीं वसे ॥९७॥ या तमोगुणाच्या सोळा कळा । ज्याचे अंगीं बाणती सकळा । तो तमोरात्रींची चंद्रकळा । अविवेक आंधळा तामसू ॥९८॥ सत्वरजतमोगुण । यांचे ओळखीलागीं जाण । केलें भिन्नभिन्न निरुपण । अतां मिश्रलक्षण तें ऐक ॥९९॥

एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

सत्त्वस्य रजसश्चैतास्तमसश्चानुपूर्वशः । वृत्तयो वर्णितप्रायाः सन्निपातमथो शृणु ॥५॥

सांगीतली त्रिगुणस्थिती । त्या एकएकाच्या अनंत वृत्ती । त्याही अनंतप्राय होती । जीवासी गुणगुंती येथेंचि पडे ॥१००॥ मस्तकीं केश चिकटले होती । ते ज्याचे त्या नुगवती । तेवीं त्रिगुणांची गुणगुंती । जीवाहातीं उगवेना ॥१॥ मिळोनि सख्या मायाबहिणी । हातीं घेऊनि तेल फणी । उगविती चिकटल्या केशश्रेणी । तेवीं त्रिगुणांची वेणी जीवासी ॥२॥ त्रिगुणांची विभागवृत्ती । जीवसामर्थ्यें जरी होती । तरी शुद्धसत्वीं करुनि वस्ती । गुणातीतीं प्रवेशता ॥३॥ ऐसा निजागुणांचा उगवो । जीवाचेनि नोहे निर्वाहो । यालागीं गुरुचरणीं सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥४॥ जे सभाग्य भाग्यवंत जनीं । ज्यांसी सद्गुरु सखी जननी । विवेक-वैराग्य घेऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥५॥ ज्यांची उगविली गुणगुंती । पुढती गुंती पडे मागुती । यालागीं ते महामती । मुंडूनि सांडिती संन्यासी ॥६॥ एकाची नवलगती । उद्धट वैराग्याची स्थिती । गुंती उगवाया न रिघती । मुळींचि मुंडिती समूळ ॥७॥ विवेकफणीचेनि मेळें । ओढितां वैराग्य बळें । जो अशक्त भावबळें । तो मध्येंचि पळे उठूनी ॥८॥ अशक्तें पळतां देखोनि दूरी । एकें पळालीं मोहअंधारीं । एकें गुंती राखोनि शिरीं । गुंतीमाझारी रिघालीं ॥९॥ एकें अत्यत करंटीं । नव्हेचि गुरुमाउलीसी भेटी । ऐशीं संसारीं पोरें पोरटीं । गुणदुःखकोटी भोगिती ॥११०॥