संत एकनाथ महाराज ८ भक्ती महात्म्य Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संत एकनाथ महाराज ८ भक्ती महात्म्य

संत एकनाथ महाराज ८ भगद्भक्ती

श्लोक ४१ वा


देवर्षिभूताप्तनृणां पितृणां, न किंकरो नायमृणी च राजन् ।

सर्वात्मना यः शरणं शरण्यं, गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तुम् ॥४१॥

शरणागता निजशरण्य । मुकुंदाचे श्रीचरण ।

सद्भावें रिघाल्या शरण । जन्ममरण बाधीना ॥४६०॥

जेथ बाधीना जन्ममरण । तेथें देव-ऋषि-आचार्य-पितृगण ।

यांच्या ऋणांचा पाड कोण । ते झाले उत्तीर्ण भगवद्भजनें ॥६१॥

जो विनटला हरिचरणीं । तो कोणाचा नव्हे ऋणी ।

जेवीं परिसाचिये मिळणीं । लोह काळेपणीं निर्मुक्त ॥६२॥

सकळ पापांपासूनी । सुटिजे जेवीं गंगास्नानीं ।

तेवीं विनटल्या हरिचरणीं । निर्मुक्त त्रैऋणीं भगवद्भक्त ॥६३॥

भावें करितां भगवद्भक्ती । सकळ पितर उद्धरती ।

ऋषीश्र्वरां नित्य तृप्ती । भगवद्भक्ति-स्वानंदें ॥६४॥

स्वानंदें भगवद्भक्ती । तेणें सर्व भूतें सुखी होती ।

पुत्रें केल्या भगवद्भक्ती । आप्त उद्धरती मातापितरें ॥६५॥

सकळ देवांचा नियंता । अतिउल्हासें त्यातें भजतां ।

देवऋणाची वार्ता । भगवद्भक्तां बाधीना ॥६६॥

ज्यांसी अनन्य भगवद्भजन । ते कदा नव्हती कर्माधीन ।

कर्म ज्याचे आज्ञाधीन । त्या हरीसी शरण जो झाला ॥६७॥

तो नव्हे कर्माचा सेवक । नव्हे देवांचा पाइक ।

नव्हे प्राकृताचा रंक । अनन्य भाविक हरिभक्त ॥६८॥

जो हरीचा शरणागत । तो कोणाचा नव्हे अंकित ।

कर्माकर्मीं तो अलिप्त । नित्यमुक्त ऋणत्रयासी ॥६९॥

वासुदेव सर्वां भूतीं । हे दृढ ठसावे प्रतीती ।

यालागीं अलिप्त कर्मगती । सकळ ऋणनिर्मुक्ती भगवद्भक्तां ॥४७०॥

श्लोक ४२ वा


स्वपादमूलं भजतः प्रियस्य, त्यक्तान्यभावस्य हरिः परेशः ।

विकर्म यच्चोत्पतितं कथंचिद्‌, धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः ॥४२॥

सांडूनि देहाच्या अभिमाना । त्यजूनि देवतांतरभजना ।

जे अनन्य शरण हरिचरणां । ते कर्मबंधना नातळती ॥७१॥

यापरी जे अनन्य शरण । तेचि हरीसी पढियंते पूर्ण ।

हरिप्रियां कर्मबंधन । स्वप्नींही जाण स्पर्शों न शके ॥७२॥

राया म्हणसी 'भगवद्भक्त । विहितकर्मीं नित्यनिर्मुक्त ' ।

ते जरी विकर्म आचरत । तरी प्रायश्र्चित्त न बाधी त्यांसी ॥७३॥

जेवीं पंचाननाचें पिलें । न वचे मदगजांचेनि वेढिलें ।

तेवीं हरिप्रियीं विकर्म केलें । त्यांसी न वचे बांधिलें यमाचेनि ॥७४॥

स्मरतां एक हरीचें नाम । महापातक्यां वंदी यम ।

मा हरीचे पढियंते परम । तयां विकर्में यम केवीं दंडी ॥७५॥

आशंका ॥ 'वेदाज्ञा विष्णूची परम । वेदें विहिलें धर्माधर्म ।

भक्त आचरतां विकर्म । केवीं वेदाज्ञानेम न बाधी त्यांसी ' ॥७६॥

जेवीं रायाचा सेवक आप्त । तो द्वारपाळां नव्हे अंकित ।

तेथ रायाचा पढियंता सुत । त्यांचा पंगिस्त तो केवीं होय ॥७७॥

हरिनामाचें ज्यासी स्मरण । वेद त्याचे वंदी चरण ।

मा जो हरीचा पढियंता पूर्ण । त्यासी वेदविधान कदा न बाधी ॥७८॥

भक्तापासूनि विकर्मस्थिती । कदा न घडे गा कल्पांतीं ।

अवचटें घडल्या दैवगतीं । त्या कर्मा निर्मुक्ति अच्युतस्मरणें ॥७९॥

बाधूं न शके कर्माकर्म । ऐसा कोण भागवतधर्म ।

ते भक्तीचें निजवर्म । उत्तमोत्तम अवधारीं ॥४८०॥

त्यजूनि देहाभिमानवोढी । सर्वां भूतीं हरिभक्ति गाढी ।

तो कर्माकर्में पायीं रगडी । मुक्ति पाय झाडी निजकेशीं ॥८१॥

तो ज्याकडे कृपादृष्टीं पाहे । त्याचें निर्दळे भवभये ।

तो जेथ म्हणे राहें । तेथें लाहे मुक्तिसुख ॥८२॥

त्याचेनि अनुग्रहकरीं । देव प्रगटे दीनाच्या अंतरीं ।

त्याच्या कर्माकर्माची बोहरी । स्वयें श्रीहरी करूं लागे ॥८३॥

जेवीं प्रगटल्या दिनमणी । अंधार जाय पळोनी ।

राम प्रगटल्या हृदयभुवनीं । कर्माकर्मधुणी सहजचि ॥८४॥

भगवंताची नामकीर्ति । याचि नामें परम भक्ति ।

भक्तीपाशीं चारी मुक्ति । दासीत्वें वसती नृपनाथा ॥८५॥;

ऐकोनि भक्तीची पूर्ण स्थिती । रोमांचित झाला नृपती ।

आनंदाश्रु नयनीं येती । सुखावलिया वृत्तीं डुल्लतु ॥८६॥

सांगतां वैदेहाची स्थिती । नारदु सुखावे निजचित्तीं ।

तो उल्हासें वसुदेवाप्रती । सांगे समाप्ति इतिहासाची ॥८७॥

श्लोक ४३ वा


श्रीनारद उवाच-धर्मान्भागवतानित्थं, श्रुत्वाऽथ मिथिलेश्वरः

जायन्तेयान् मुनीन् प्रीतः, सोपाध्यायो ह्यपूजयत् ॥४३॥

नारद इतिहास सांगतु तेवींच आनंदें डुल्लतु

तेणें आनंदें बोलतु भक्तीचें मथितु वसुदेवाप्रती ॥८८॥

यापरी जयंतीसुतीं भगवंताची उद्भट भक्ती

सांगितली परम प्रीतीं मिथिलेशाप्रती निजबोधें ॥८९॥

ऐकोनि त्यांचिया वचना सुख जाहलें विदेहाचिया मना

मग अतिप्रीतीं पूजना जयंतीनंदनां पूजिता झाला ॥४९०॥

श्रवणें जाहली अतिविश्रांती तेणें पूजेलागीं अतिप्रीती

विदेहा उल्हासु चित्तीं स्वानंदस्थितीं पूजिता झाला ॥९१॥

पूजेचा परम आदरु जयंतीनंदना केला थोरु

उपाध्याय जो अहल्याकुमरु तेणेंही अत्यादरु पूजेसी केला ॥९२॥