“श्री संत एकनाथ महाराज”
“भक्ती महात्म्य”
श्लोक ४४
ततोऽन्तर्दधिरे सिद्धाः, सर्वलोकस्य पश्यतः ।
राजा धर्मानुपातिष्ठन्नवाप परमां गतिम् ॥४४॥
यापरी ते भागवतश्रेष्ठ । नवही जण अतिवरिष्ठ ।
समस्तां देखतांचि स्पष्ट । झाले अदृष्ट ऊर्ध्वगमनें ॥९३॥
ते भागवतधर्मस्थितीं । अनुष्ठूनि भगवद्भक्ती ।
राजा पावला परम गती । पूर्णप्राप्ती निजबोधें ॥९४॥
भावें करितां भगवद्भक्ती । देहीं प्रगटे विदेहस्थिती ।
ते पावोनि नृपती । परम विश्रांती पावला ॥९५॥
श्लोक ४५ वा
त्वमप्येतान्महाभाग, धर्मान् भागवतान् श्रुतान् ।
आस्थितः श्रद्धया युक्तो, निस्सङ्गो यास्यसे परम् ॥४५॥
सकळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती ।
ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती क्रीडत ॥९६॥
वसुदेवा तुझेनि नांवें । देवातें 'वासुदेव' म्हणावें ।
तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे निरसती दोष ॥९७॥
येवढ्या भाग्याचा भाग्यनिधि । वसुदेवा तूंचि त्रिशुद्धि ।
तुवां भागवतधर्माचा विधि । आस्तिक्यबुद्धीं अवधारिला ॥९८॥
श्रद्धेनें केलिया वस्तुश्रवणा । मननयुक्त धरावी धारणा ।
तैं निःसंग होऊनियां जाणा । पावसी तत्क्षणा निजधामासी ॥९९॥
जया निजधामाच्या ठायीं । कार्य कारण दोन्ही नाहीं ।
त्या परम पदाचे ठायीं । निजसुखें पाहीं सुखरूप होसी ॥५००॥
श्लोक ४६ वा
युवयोः खलु दम्पत्योर्यशसा पूरितं जगत् ।
पुत्रतामगमद्यद्वां, भगवानीश्वरो हरिः ॥४६॥
तुम्हां दांपत्याचिये कीर्ती । यशासी आली श्रीमंती ।
तुमचे यशें त्रिजगती । परमानंदें क्षिती परिपूर्ण झाली ॥१॥
ज्यालागीं कीजे यजन । ज्यालागीं दीजे दान ।
ज्यालागीं कीजे तपाचरण । योगसाधन ज्यालागीं ॥२॥
जो न वर्णवे वेदां शेषा । जो दुर्लभ सनकादिकां ।
त्या पुत्रत्वें यदुनायका । उत्संगीं देखा खेळविसी ॥३॥
जो कळिकाळाचा निजशास्ता । जो ब्रह्मादिकांचा नियंता ।
जो संहारकाचा संहर्ता । जो प्रतिपाळिता त्रिजगती ॥४॥
जो सकळ भाग्याचें भूषण । जो सकळ मंडणां मंडण ।
षडूगुणांचें अधिष्ठान । तो पुत्रत्वें श्रीकृष्ण सर्वांगीं लोळे ॥५॥
श्लोक ४७ वा
दर्शनालिङगनालापैः शयनासनभोजनैः ।
आत्मा वां पावितः कृष्णं, पुत्रस्नेह प्रकुर्वतोः ॥४७॥
परब्रह्ममूर्ति श्रीकृष्ण । सादरें करितां अवलोकन ।
तेणें दृष्टि होय पावन । डोळ्यां संपूर्ण सुखावबोधु ॥६॥
कृष्णमुखींचीं उत्तरें । प्रवेशतां कर्णद्वारें ।
पवित्र झालीं कर्णकुहरें । कृष्णकुमरें अनुवादें ॥७॥
आळवितां श्रीकृष्ण कृष्ण । अथवा कृष्णेंसीं संभाषण ।
तेणें वाचा झाली पावन । जैसें गंगाजीवन संतप्तां ॥८॥
नाना यागविधीं यजिती ज्यातें । तेथ न घे जो अवदानातें ।
तो वारितांही दोंहीं हातें । बैसे सांगातें भोजनीं कृष्ण ॥९॥
दुर्लभु योगयागीं । तो वेळ राखे भोजनालागीं ।
मुखींचें शेष दे तुम्हांलागीं । लागवेगीं बाललीला ॥५१०॥
तेणें संतप्त संतोखी । तोही ग्रास घाली तुम्हां मुखीं ।
तुम्हां ऐसें भाग्य त्रिलोकीं । नाहीं आणिकीं अर्जिलें ॥११॥
तेणें कृष्णशेषामृतें । रसना विटों ये अमृतातें ।
मा इतर रसा गोड तेथें । कोण म्हणतें म्हणावया ॥१२॥
तेणें श्रीकृष्णरसशेषें । अंतरशुद्धि अनायासें ।
जें नाना तपसायासें । अतिप्रयासें न लभे कदा ॥१३॥
देतां कृष्णाशीं चुंबन । तेणें अवघ्राणें घ्राण पावन ।
चुंबितांचि निवे मन । स्वानंद पूर्ण उल्हासे ॥१४॥
तुम्हां बैसले देखे आसनीं । कृष्ण सवेग ये धांवोनी ।
मग अंकावरी बैसोनी । निजांगमिळणीं निववी कृष्णु ॥१५॥
तेणें श्रीकृष्णाचेनि स्पर्शें । सर्वेंद्रियीं कामु नासे ।
तेणें कर्मचि अनायासें । होय आपैसें निष्कर्म ॥१६॥
सप्रेमभावें संलग्न । देतां श्रीकृष्णासी आलिंगन ।
तेणें देहाचें देहपण । मीतूंस्फुरण हारपे ॥१७॥
शयनाच्या समयरूपीं । जना गाढ मूढ अवस्था व्यापी ।
ते काळीं तुम्हांसमीपीं । कृष्ण सद्रूपीं संलग्न ॥१८॥
योगी भावना भावून । कर्म कल्पिती कृष्णार्पण ।
तुमचीं सकळ कर्में जाण । स्वयें श्रीकृष्ण नित्यभोक्ता ॥१९॥
पुत्रस्नेहाचेनि लालसें । सकळ कर्में अनायासें ।
स्वयें श्रीकृष्ण सावकाशें । परम उल्हासें अंगीकारी ॥५२०॥
तुमची पवित्रता सांगों कैसी । पवित्र केलें यदुवंशासी ।
पुत्रत्वें पाळूनि श्रीकृष्णासी । जगदुद्धारासी कीर्ति केली ॥२१॥
नाम घेतां 'वसुदेवसूनु' । स्मरतां 'देवकीनंदनु' ।
होय भवबंधच्छेदनु । ऐसें पावनु नाम तुमचें ॥२२॥
तुम्ही तरा अनायासीं । हें नवल नव्हे विशेषीं ।
केवळ जे का कृष्णद्वेषी । ते वैरी अनायासीं विरोधें तरती ॥२३॥
श्लोक ४८ वा
वैरेण यं नृपतयः शिशुपालपौण्ड्रशाल्वादयो गतिविलासविलोकनाद्यैः ।
ध्यायन्त आकृतधियः शयनासनादौ, तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किम् ॥४८॥
शिशुपाल दंतवक्र । पौंड्रक-शाल्वादि महावीर ।
कृष्णासीं चालविती वैर । द्वेषें मत्सरें ध्यान करिती ॥२४॥
घनश्याम पीतांबर कटे । विचित्रालंकारीं कृष्णु नटे ।
गदादि आयुधीं ऐसा वेठे । अतिबळें तगटे रणभूमीसी ॥२५॥
ऐसें वैरवशें उद्भट । क्रोधें कृष्णध्यान उत्कट ।
ते वैरभावें वरिष्ठ । तद्रूपता स्पष्ट पावले द्वेषें ॥२६॥
कंसासी परम भयें जाण । अखंड लागलें श्रीकृष्णध्यान ।
अन्नपान शयनासन । धाकें संपूर्ण श्रीकृष्ण देखे ॥२७॥
कंसासुर भयावेशें । शिशुपाळादिक महाद्वेषें ।
सायुज्य पावले अनायासें । मा श्रद्धाळू कैसे न पावती मोक्ष ॥२८॥
तुम्ही तरी परम प्रीतीं । चित्तें वित्तें आत्मशक्तीं ।
जीवें वोवाळां श्रीपति । पायां ब्रह्मप्राप्ति तुमच्या लागे ॥२९॥
पूर्ण प्राप्ति तुम्हांपासीं । ते तुमची न कळे तुम्हांसी ।
बालक मानितां श्रीकृष्णासी । निजलाभासी नाडणें ॥५३०॥