निर्णय. - भाग २२ - अंतिम भाग Meenakshi Vaidya द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्णय. - भाग २२ - अंतिम भाग

निर्णय भाग २२

मागील भागावरून पुढे…



"मिहीर तु,मी आणि शुभांगी आज संध्याकाळी शरदकाकांकडे जाऊ.मी काकांना फोन करून कळवते."


" कशाकरता जायचयं?"


"माझं महत्वाचं काम आहे त्यावर तुम्हा दोघांचं आणि काका काकूंचं मत घ्यायचं आहे.."


"ठीक आहे.किती वाजता?"


"पाच वाजता निघू.कुठे जातोय हे बाबांना. सांगायचं नाही." इंदिरा


"ठीक आहे."


आईला काय एवढं महत्वाचं बोलायचं आहे ज्यात आम्ही दोघं आणि काकूंचं मत घ्यायचं आहे हे मिहीरच्या लक्षात येतं नव्हतं.

***

संध्याकाळी इंदिरा, मिहीर आणि शुभांगी तिघही शरद कडे आले. मिहीरप्रमाणेच शरद आणि प्रज्ञालापण उत्सुकता होती की इंदिरा एवढं महत्वाचं काय बोलणार आहे.


" तुम्ही सगळे विचारात पडला असाल की मला एवढं महत्वाचं काय बोलायचं आहे. मी एक निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यासंबंधीचे कोणतेही निर्णय आजवर मी घेऊ शकले नाही. पण आता खूप मोठा निर्णय मी घेतला आहे. तो पूर्ण करण्यासाठी मला तुमची थोडी मदत लागेल.


हा निर्णय मी आज नाही घेतला किंवा काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी पण नाही घेतला. हा निर्णय मी दहा वर्षांपूर्वी घेतला होता. फक्त मिहीर आणि मेघना दोघांच्या लग्नासाठी थांबले होते.


मेघनाचं लग्नं झालं. तिचे सगळे सणवार झाल्यावर मी या घरातून बाहेर पडायचं ठरवलं आहे."


" काय! घराबाहेर पडणार म्हणजे काय करणार? कुठे जाणार? " मिहीर ने गोंधळून विचारलं.


"एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात जाईन.‌तिथे अगतिक होऊन जायचं नाही तर तिथे राहून मला माझ्या मनासारखं जगता येईल." इंदिरा


" वहिनी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा.त्यासाठी घर कशाला सोडायला हवं?" शरद



"भाऊजी तुम्ही लग्नानंतर काही महिन्यातच वेगळे का झाले? माझंही घरातून बाहेर पडण्याचं तेच कारण आहे." इंदिरा


"काका तुम्ही का वेगळे झालात.?" मिहीर


"अरे मंगेशच्या विचित्र वागणूकिला कंटाळलो. मला लहानपणापासून मंगेशचा स्वभाव माहिती असल्याने मी त्याच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. पण प्रज्ञाला हे सगळं जमेना.मंगेशसाठी मारून मुटकून या घरात राहून आमचा संसार जर तुटला तर काय करायचं? कधीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतात.म्हणून आम्ही वेगळे झालो." शरद


" भाऊजी माझंही तेच कारण आहे.मुलं लहान असल्याने घराबाहेर पडण्याचा निर्णय मी घेऊ शकत नव्हते कारण त्या निर्णयामुळे मूलांचं भविष्य अंधारात गेलं असतं. हे होऊ नये म्हणून मी इतकी वर्ष शांत राहिले. हा निर्णय पूर्णत्वाला जाण्यासाठी तुमची मदत हवी."


" कशी मदत करायची सांग?" मिहीर


"मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हाच माझ्या भावांना सांगीतलं की मला साडी किंवा कोणतीही वस्तू भेट म्हणून देऊ नको. मला पैसे द्या. तेव्हापासून मी ते पैसे बाजूला ठेवत गेले. थोडेफार पैसे जमले तरी मिहीरला मदत करावी लागेल. भावजी तुम्ही आणि मिहीर मिळून एका चांगल्या वृद्धाश्रमाची माहिती काढा. मी तिकडे गेले तरी तुम्हाला भेटणारच नाही असं नाही. तुम्ही मला बोलावलं तर थोडे दिवस येईन पण आता फिरून घरी जाणार नाही. तुम्ही चांगलं वृद्धाश्रम शोधण्यासाठी वेळ घ्या.‌तेवढ्या वेळात मेघनाचे सणवार होतील."


" आई तुला त्या घरात जायचं नाही तर बंगलोरला चल." मिहीर


" हो आई. तुम्ही आमच्या बरोबर चला.आम्ही असताना वृद्धाश्रमात कशाला?" शुभांगी.


"तुमची तळमळ कळतेय मला.आजवरचं उभं आयुष्य मी दुस-यांच्या म्हणण्याने जगले.आता वृद्धाश्रमात राहून इतर वृद्धांची मदत करता आली तर ती करेन. ती नोकरी नसेल.मला जे काम जमेल तेच करीन. मिहीरला त्यांचे दरमहा पैसे भरावे लागतील. मला खर्चाला पैसे नकोत." इंदिरा.


तिच्या बोलण्याने ते चौघेही सुन्न झाले.इंदिरा असा काही निर्णय घेईल असं या चौघांना वाटलच नव्हतं.


"आई मी शोध घेतो.काही महिने तिथे राहून बघ नाही तुला जमलं तिथे राहणं तर सरळ बंगलोरला ये." मिहीर



"मी वृद्धाश्रमात आले आता परत कशी मिहीरकडे जाऊ असं तुम्ही मनात अजीबात आणू नका. माझं लग्न होऊन दोनच वर्ष झालीत पण तुमच्याकडून जे आईचं प्रेम मिळालं ते मला आयुष्यभर हवं आहे.तुम्ही आत्ताच जाऊ नये असं मला वाटतं आहे." शुभांगी


" मंगेशला कळलं तर तो कसा रिअॅक्ट होईल कळत नाही." शरद


" भाऊजी आता यांची रिअॅक्शन माझ्यासाठी महत्वाची नाही.माझं उरलेलं आयुष्य माझ्यासाठी महत्वाचं आहे. ते हा निर्णय ऐकल्यावर कसेही व्यक्त होऊ दे मला आता कशाची फिकीर नाही." इंदिरा


इंदिरा आता आपल्या निर्णयापासून मागे हटणार नाही हे या चौघांच्या ही लक्षात आलं.



" वहिनी तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा नाही.मी तुमच्या जागी असते तर कदाचित मी खूप आधी ते घर सोडलं असतं. तुम्ही मुलांची लग्न होईपर्यंत मुस्कटदाबी सहन केली. मी एक स्त्री आहे म्हणून तुमचा कोंडमारा समजू शकते.शुभांगी तूआत्ता या घरात आली आहे आणि तू इथे रहात नाहीस म्हणून तुला मंगेश भावजींचा स्वभाव कसा आहे माहित ‌नाही. वहिनी तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. कधी तुम्हाला असं वाटलं की आता घरी परतावं तर इकडे या आम्हाला खूप आनंद होईल." प्रज्ञा


" वहिनी प्रज्ञा बोलली ते अगदी खरं आहे." शरद


" माझ्या निर्णयामुळे तुम्ही सगळे विचलीत आणि अस्वस्थ झालात त्याबद्दल क्षमस्व. मिहीर आजच्या आपल्या बैठकीचा परीणाम घरी व्हायला नको. नेहमी वागतोस तसाच वाग. भावजी निघतो आम्ही." इंदिरा


" वहिनी जेऊन जा." प्रज्ञा


" नको.यांना सांगीतलं नाही. जोपर्यंत मी ते घर सोडत नाही तोपर्यंत माझं कर्तव्य करत राहणार. चल मिहीर" इंदिरा.


इंदिरा,मिहीर, शुभांगी तिघं गेल्यानंतर शरद आणि प्रज्ञा सुन्नपणे पुतळा झाल्यागत बसले.


_____________



स्वयंपाकघरातलं काम करत असतानाच मंगेशचा तापलेला स्वर इंदिरेच्या कानावर पडताच इतक्या वेळ भूत काळात रमलेली इंदिरा खाडकन भानावर आली.


"कोणाच्या सल्ल्याने घर सोडून चाललीस?" मंगेशचा स्वर तापलेला होता.



"कुणाच्या सांगण्यावरून मी वागावं हे माझं वय नाही."


इंदिरानी उत्तर दिलं आणि ती बगीच्यात गेली. तिच्या मागोमाग मंगेशही बगीच्यात गेला.



इंदिरा मागील दारी तिनं लावलेल्या बगीच्यात जात असे. हा तिचा रोजचा शिरस्ता होता. बगीच्यात तिचं मन खूप रमत असे. खोदकाम करताना मधूनच ती हळुवारपणे झाडांना स्पर्श करत असे आणि त्यांच्याशी बोलत असे. त्यांची ख्याली खुशाली विचारत असे.



बगीच्यातली झाडं म्हणजे तिचे मित्र मैत्रीणीच होते. प्रत्येक झाडांशी ती संवाद साधायची आणि आपलं मन मोकळं करायची. आपली सुखदुःख सांगायची.हे तिचे मित्र मैत्रीणी तिचं दु:ख,तिची भावना कोणालाच सांगणार नाही याची तिला खात्री होती.


"कोणाच्या सल्ल्याने घर सोडून चाललीस?" मंगेश ने पुन्हा विचारलं.



"कुणाच्या सांगण्यावरून मी वागावं हे माझं वय नाही. हे मी मगाशीच सांगीतलं." इंदिरा शांतपणे बोलली.



इंदिरा खुरपी हातात घेऊन झाडांचं आळं नीट करण्याकरता खाली बसली. तिचा तो शांतपणा आता मंगेशच्या डोक्यात जायला लागला होता.



"कुणी सांगीतलं नाही तर तुला हे कसं सुचलं? हे सुचण्याची हिम्मत तुझ्यात कुठून आली?"मंगेश



"ही गोष्ट मला आज नाही सुचली. हे असं करायचं हे मला दहा वर्षाआधीच सुचलेलं होतं. पण मुलांचं लहान वय, मुलांची शिक्षणं आणि लग्न होईपर्यंत मी थांबले. आता माझ्या मागे पाश नाही. मी आता माझं आयुष्य मला हवं तसं जगणार." इंदिरा



आपल्या बोलण्यावर मंगेश काय बोलेल कसा वागेल याबद्दल जराही दडपण न घेता इंदिरा शांतपणे आपलं काम करत होती.मंगेश हाताच्या मुठी आवळून रागानी तिच्याकडे बघत होता.



मंगेशला धक्का बसला होता की इंदिरानी हे पाऊल उचलण्याचं दहा वर्षापूर्वी ठरवलं होतं. याची आपल्याला पुसटशी शंकासुद्धा आली नाही.त्याच्या कपाळाची शीर रागानी ताडताड उडायला लागली.



मंगेश आजपर्यंत समजत होता की इंदिरेवर त्याची हुकूमत चालते. म्हणून ती गप्प असते. पण आता सगळंच चित्र वेगळं दिसतंय. मंगेशला राग आला होता अणि तो गोंधळलाही होता.



"वृद्धाश्रमात फुकट राहू देत नाहीत माहिती आहे नं?" मंगेश



"माहिती आहे. त्याची तुम्ही काळजी करू नका." इंदिरा



हे बोलतानाच ती उठली आणि बाजूच्या तगरीच्या म्हणजे पांढ-या स्वस्तिकाच्या झाडाची पिवळी पानं खुडून लागली.



"कुठून आणणार तू पैसे ?"मंगेश



"आहेत माझ्याजवळ." इंदिरा



" मीच दिलेले पैसे असतील." मंगेश



" नाही." इंदिरा



"अच्छा मग कुठे दरोडा टाकला का? मॅडम आपण कुठे नोकरी करत होता?" मंगेशनी उपहासाने विचारलं.



"माझ्या माहितीप्रमाणे तर तू नोकरी करत नाहीस मग कुठुन आणले पैसे?आणि कोणत्या कारणासाठी घर सोडून चाललीस?" मंगेशनी पुन्हा विचारलं.



"तुमचा विचीत्र स्वभाव, विचीत्र वागणं हे मला कधीच पटलं नाही. ऑफीसमधल्या मुलींशी तुमच्या वागण्याची पद्धत मला कधीच आवडलं नाही."



"अच्छा! माझ्या मागे मुली येतात म्हणून तुला हेवा वाटतो का?" छद्मीपणे हसत मंगेश म्हणाला.



"शी: काहीतरी बोलणं तुमचं. मला तुमचा हेवा नाही वाटत तुमची लाज वाटते. आपल्याला एक मुलगी आहे हे विसरून तुम्ही त्या मुलींचा गैरफायदा घेता."



"काहीतरी बोलू नकोस.त्या मुलीचं माझ्या गळ्यात पडतात.मी त्यांचा गैरफायदा घेत नाही."



"एकुण एकच आहे. तुमची पोस्ट बघून त्या तुमच्या जवळ येतात. तुम्ही सांगू शकता त्यांना दूर रहा." इंदिरा मंगेशकडे न बघताच बोलली.



" होका.मला नाही तसं जमलं." चिडून मंगेश म्हणाला.



"जमलं का नाही कारण तुम्हाला सुद्धा त्या तरूण मुलींचं आकर्षण वाटलं." इंदिरा



"भलते सलते आरोप करू नको माझ्यावर. मी शांतपणे ऐकतोय म्हणून माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नकोस.कळलं?" मंगेश



इंदिरा काही न बोलता मंगेशकडे फक्त बघते आणि दुस-या झाडांची मशागत करायला वळते.


___________


मंगेशचं आता डोकंच फुटायची वेळ आली होती.इंदिरा जराही त्याची दखल न घेता आपलं काम करत होती. मंगेशला तिचा हा शांतपणा आता असह्य होत चालला होता.कंटाळून दोन्ही हातांच्या मुठी आवळून मंगेश दणदण पावलं आपटत आत गेला.



मंगेश रागानी आत गेला याचीसुद्धा इंदिरानी दखल घेतली नाही.ती तिचं बगीच्यातलं काम शांतपणे करत होती.आज हे काम करताना इंदिरा चक्क गाणं गुणगुणत होती.



मंगेशचं खिडकीतून सहज बाहेर लक्ष गेलं तर त्याला इंदिरा चक्क गाणं गुणगुणतांना दिसली. आता तर तो ठार वेडा झाल्यागत बगीच्यात एका तिरीमीरीतच गेला.



"मला खिजवण्यासाठी तू गाणं म्हणतेय का?"


"मी कशाला तुम्हाला खिजवू? मला बगीच्यात काम करतांना आनंद मिळतो.त्या आनंदामुळे मला गायला सुचतं. म्हणून मी गाणं म्हणतेय.हे रोजचं आहे. तुम्हाला आज कळलं."



मंगेशनी तिचा दंड धरला तसा त्याचा हात जोराने झटकत इंदिरा उभी राहिली आणि आवाजाची पट्टी जरा वाढवून बोलली



" खबरदार माझ्या अंगाला हात लावला तर. इथून पुढे अशी हिम्मत केली तर काय होईल याचा विचार करा.मी आता पुर्वीची इंदिरा राहिलेली नाही." इंदिरा मंगेशच्या डोळ्याला डोळा भिडवून ठामपणे बोलली.



मंगेशला आता खात्री पटली की इंदिरा नावाची बाहुली त्याच्या हातून निसटली आहे.त्याचा चेहरा रागानी लालबुंद झाला. पण काही न बोलता मंगेश घरात गेला. इंदिरा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. तेव्हाच तिच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. ती वळून पुन्हा झाडांची मशागत करू लागली.




इंदिरानी खूप मोठा निर्णय घेतला होता. त्याचा मंगेशला चांगलाच धक्का बसला. आपल्या आयुष्यात असंही घडू शकेल असा त्यांनी कधी विचार केला नव्हता.


___________


या प्रसंगानंतर दुस-या दिवशी ची सकाळ उजाडली. तेव्हा इंदिरा नी आपली बॅग भरली होतीच पण जाता जाता गृहिणी धर्म निभावून जायचं हा तिचा निर्धार होता. त्यानुसार ती सकाळीच आपली आंघोळ आटोपून स्वयंपाकघरात शिरली. सकाळचा चहा नाश्ता तयार केला.



चहा आणि नाश्ता डायनिंग टेबल वर ठेवला. नंतर स्वयंपाक करून झाल्यावर तिनी ओट्याला हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाली



"अन्नपूर्णे आजपर्यंत तुझी सेवा मनोभावे केली. माझ्या नकळत काही चूक राहिली असेल तर क्षमा कर. यापुढे मी या घरात राहणार नाही म्हणजे तुझी सेवा करता येणार नाही पण तू मात्र या घरात राहणा-या माझ्या नव-याला काही कमी पडू देऊ नकोस. त्यांना उपाशी ठेऊ नको. हिचं विनंती आहे." अन्नपूर्णेच्या आठवणींनी दोन अश्रू तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून बाहेर पडले.



देवघरातील देवांची पूजा करून त्यांना पण अशीच विनंती केली. इंदिरा आता एका वेगळ्याच भावस्थितीत होती. या संसाराचे, या घराचे पाश तिने पूर्ण पणे तोडून टाकले होते. एक वेगळच तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.



इंदिरा स्वतःचं आटोपत असतांनाच तिचा लहान दिर शरद आणि त्याची बायको प्रज्ञा घरी आले. दोघांना अचानक आलेलं बघून मंगेशला आश्चर्य वाटलं.



"अरे तुम्ही दोघं कसे किती आले?" मंगेश नी विचारलं.


त्यांनी काही ऊत्तर द्यायच्या आधीच इंदिरा म्हणाली

"हे दोघं मला सोडायला येणार आहे." आत्ता मंगेशला कळलं.



"अच्छा म्हणजे तू या दोघांच्या जीवावर उड्या मारते आहे. तेच मला आश्चर्य वाटलं की इतकी वर्ष तोंडाला चिकटपट्टी लावलेली बाई इतकं कसं बोलायला लागली." मंगेश



मंगेशचा स्वभाव माहिती असल्याने शरद आणि प्रज्ञाची काही बोलण्याची हिम्मत झाली नाही.



"मी जो निर्णय घेतला आहे तो या दोघांनी माझ्या डोक्यात भरवलेला नाही.हा माझा निर्णय आहे. आणि तो कुठल्याही परीस्थिती आता बदलणार नाही. तुमचा स्वयंपाक, नाश्ता करून ठेवला आहे." इंदिरा नी शांतपणे बॅग उचलली.



"मुलं काय म्हणतील याचा विचार केला कधी?" हेटाळणीच्या स्वरात मंगेश तिला म्हणाला.


"मुलांना माहिती आहे माझा निर्णय. त्यांनीच त्या वृद्धाश्रमाची फी भरली आहे.चला शरद भावजी."



"शरद तू आपल्या सख्ख्या मोठ्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसला हे चांगलं नाही केलंस." मंगेश



"दादा मी काही केलं नाही. मी फक्त वहिनींना सोडायला जाणार आहे." शरद चाचरतच बोलला.



"कारणं देऊ नकोस.मला सांगू शकत होता तू.का नाही सांगीतलं?" मंगेश नी ओरडून विचारलं.



"मीच सांगितल होतं त्यांना तुम्हाला सांगायचं नाही म्हणून. मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर? भावजी चला. माझा इथला मुक्काम संपला आहे. तिकडे पोचायला उशीर होईल."



शरद नी निमुटपणे इंदिरा ची बॅग घेतली. इंदिरा घराचा उंबरठा ओलांडणार तेवढ्यात मंगेश म्हणाला



"अजूनही विचार कर.एकदा का तू या घराचा उंबरठा ओलांडलास की तुला पुन्हा या घरात येता येणार नाही."



" तुमच्या घरातील एकही वस्तू मी माझ्या बरोबर घेतली नाही. गळ्यातल्या या मंगळसूत्राशिवाय."


" ते तरी कशाला घेतलंस?"


" नवरा जिवंत असेपर्यंत मंगळसूत्र बाईंच्या गळ्यात असायला हवं म्हणून घातलं आहे. तुमची इच्छा नसेल तर ते ही घ्या."


असं म्हणत इंदिरा नी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून समोरच्या टीपाॅयवर ठेवलं. म़गेशला तिच्या या धीटपणाचं आश्चर्य वाटलं.



इंदिरा नी एकदाही मंगेशकडे न बघता घराचा उंबरठा ओलांडला आणि चालू लागली. मंगेशला वाटलं एकदातरी इंदिरा मागे वळून बघेल किंवा परत येईल.पण दोन्हीपैकी काहीच घडलं नाही.



मागे वळून बघण्यासारखं काही ऊरलय असं इंदिराला वाटत नव्हतं. तिच्या मागे शरद आणि प्रज्ञा ही निघाले. शरदनी गाडीच्या डिकीत इंदिरा ची बॅग ठेवली आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला.गाडी स्टार्ट करून ते निघाले.




शरदची गाडी दिसेनाशी होईपर्यंत मंगेश दारात उभा होता. गाडी गेल्यावर तो कसाबसा हेलपाटत सोफ्यावर येऊन बसला.



मंगेशचा श्वास ही जड झाला होता. त्यांचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या मंगळसूत्राकडे गेलं आणि एक हतबलता त्याला जाणवली.



ज्या स्त्रीला आपण आयुष्यभर गृहितच धरलं.ती खरं या घराची शान होती. तिच्यामुळे घरात चैतन्य होतं. घराला एक तेजोवलय होतं.आपणच आयुष्यात इंदिराची किंमत केली नाही.



पण आता उपयोग नव्हता.इंदिरा घरातून गेल्यावर मंगेशला घर घर नाही तर उजाड माळरान वाटू लागलं. आणि डोळ्यातून येणारं पाणी न पुसता तो ढसाढसा रडू लागला.



--------------------------------------------------

समाप्त

लेखिका... मीनाक्षी वैद्य