a different type of doctor books and stories free download online pdf in Marathi

डॉक्टर असाही असतो. !

डॉक्टर असाही असतो !

 

दिनांक १६.०१.१९८०  शहर  नागपूर.

गंगाधरराव, स्टेट बँकेच्या किंग्सवे शाखे मधे कार्यरत होते. त्या दिवशी नेहमी प्रमाणे काम संपवून ते घरी जायला निघाले. बँकेच्या समोरच बस स्टॉप होता. त्या बसने ते  नेहमी प्रमाणे सीताबर्डी ला आले. सिताबर्डी हून त्यांनी लक्ष्मी नगर ची बस घेतली. बसला त्या दिवशी खूप गर्दी होती त्यामुळे त्यांना बसायला जागा मिळाली नाही. बस शंकर नगर चौकात आल्यावर बरेच लोकं उतरले आणि बसायला जागा झाली. रिकाम्या जागेवर जाण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं, आणि काय झालं ते त्यांनाच कळलं नाही. त्यांच्या पायातली शक्तीच गेल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी उजव्या हाताने वरचा दांडा घट्ट पकडला होता, पण पाय लटपटत होते. सगळी बस गरगर डोळ्यापुढे फिरत होती. इतक्या चकरा येत होत्या, की त्यांना उभं राहणं अवघड झालं. डोळ्यापुढे अंधारी आली, त्यांचा वरचा दांडा धरलेला हात सुटला, आणि ते उभे च्या उभे खाली कोसळले.

पडता पडता सीट च्या लोखंडी बार वर त्यांचं डोक आपटलं. डोक्याला खोक पडली आणि रक्त वाहायला लागलं. शेजारच्या सीट वर एक बाई बसली होती, तिच्या खांद्यावर गंगाधररावांच डोक आपटल्या मुळे ती जोरात किंचाळली. तिची किंचाळी ऐकून बस मधले उरले सुरले लोकं बघायला लागले. एक माणूस पडलेला पाहून दोघं जण धावले, त्या दोघाजणांनी आडव्या तिडव्या पडलेल्या गंगाधररावांना नीट झोपवलं. गंगाधररावांची डोक्यावर बसलेल्या मारामुळे शुद्ध हरपली होती. बस थांबवा, बस थांबवा असा एकच गलका झाला. ड्रायव्हरने मागे वळून बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली आहे म्हणून, त्यानी बस, डाव्या बाजूला घेऊन थांबवली. कोणी तरी आपल्या बॉटल मधलं पाणी गंगाधर रावांच्या चेहऱ्यावर शिंपडलं, पण काहीच उपयोग झाला नाही.

“ह्यांना ताबडतोब हॉस्पिटलला न्यायला  पाहिजे.” कोणी तरी म्हणालं.

“बरोबर आहे. अरे तबडतोब रिक्शा थांबवा आणि त्याला सांगा, ह्यांना घेऊन जायला.” तिसराच कोणीतरी म्हणाला.

“रिक्षाच भाडं तुम्ही देणार आहात का?” अजून एका जणांनी आपल्या अकलेचे तारे तोडले.

पण बाकीच्या लोकांना हे मान्य नव्हतं.

एकजण संतांपून ओरडला “अरे, गप्प बसा. वेड  लागलय का तुम्हाला, कंडक्टर, बस वळवा, नागरिक सहकारी रुग्णालय इथून जवळच आहे, तिकडे बस घेऊन चला. तिथे यांना अॅडमिट करू.”

ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनी थोडी चर्चा केली आणि बस हॉस्पिटलला न्यायला ठाम नकार दिला. म्हणाले “आम्हाला रूट सोडता येत नाही. तुम्ही यांना रिक्षाने घेऊन जा.”

त्यांचं हे उत्तर ऐकून एकजण खूपच संतापला म्हणाला “S. T. चं ब्रीद काय आहे माहीत आहे का ? “प्रवाशांच्या सेवे साठी”, हा माणूस इथे बेशुद्ध पडला आहे, आणि तुम्ही बस हॉस्पिटलला न्यायला नकार देता आहात, हे तुमच्या मनाला तरी पटतंय का ? तुमच्या अश्या आडमुठ्या वागण्याने, ह्या माणसाचं बस मधे काही बरं वाईट झालं, तर आई शप्पथ, तुमची नोकरी तर आम्ही खाऊच, पण तुम्हाला कोर्टात खेचून तुमच्यावर खुनाचा आरोप ठेऊ. मग आयुष्यभर कोर्टात चकरा मारत रहा आणि निकाल लागल्यावर तुरुंगात जा. ही सगळी मंडळी माझ्या बरोबरीने तुमच्या विरोधात  लढतील.” इतकं आवेश पूर्ण भाषण ऐकल्यावर बाकीचे लोकं सुद्धा “हो, हो आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत.” असं म्हणाले.

एवढा पाठिंबा बघितल्यावर ड्रायव्हर कडे काही इलाज नव्हता. तो म्हणाला, “साहेब, आम्हाला रूट बदलण्याची परवानगी नसते. तसं केलं तर आमच्यावर कारवाई होईल. पण तुम्ही जर मला लिखित मधे दिलं, की कुठल्या परिस्थितीत बसचा मार्ग बदलला तर आमच्या वर कारवाई होणार नाही. मी बस नेतो पण तुम्ही सविस्तर लिहून सगळ्यांच्या सह्या द्या.” सर्वांनाच त्यांच म्हणण पटलं. त्यांच्यावर कारवाई व्हावी असं कोणालाच वाटत नव्हतं. सर्वांनी एकमुखानी त्यांच म्हणण मान्य केलं. त्याने बस वळवली आणि नागरिक सहकारी रुग्णालयात नेऊन उभी केली.

एका माणसाने धावत जाऊन स्ट्रेचर आणि वॉर्डबॉय ला बोलावून आणलं. बसमधल्या त्या चिंचोळया जागेतून अतिशय काळजीपूर्वक गंगाधररावांना बाहेर आणणं हे सवय नसलेल्या लोकांसाठी, खूपच कष्टाचं  काम होतं. शेवटी एकदाचं इमर्जनसी वॉर्ड मधे आल्यावर डॉक्टरांनी त्यांचा ताबा घेतला. “काय झालंय ? मारामारी झाली असेल तर पोलिसांना बोलवावं  लागेल.” डॉक्टरांनी विचारलं. मग प्रवाशांनी सगळी कथा सांगितली. “काही नाव गाव पत्ता आहे का यांचा ?” – डॉक्टर.

“नाही, आम्ही कोणीच ओळखत नाही यांना.” एक जण उत्तरला.

“म्हणजे आता अंदाज बांधतच उपचार सुरू करावे लागणार” – डॉक्टर. यावर कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

आता गंगाधररावांना हॉस्पिटल मधे अॅडमिट केल्या नंतर इतर लोकांचं काहीच काम नव्हतं. आता जे काही करायचं ते डॉक्टर करतील, असा विचार करून, लोकांनी हळू हळू काढता पाय घ्यायला सुरवात केली. ज्याने कंडक्टरला धमकी दिली होती तोच फक्त थांबला.

दोघं डॉक्टर आपसात चर्चा करत होते. कसलीच माहिती नसतांना उपचार सुरू करायचे होते. त्यांच्या पद्धती नुसार त्यांनी ते सुरू केले. डोक्याची जखम स्वच्छ करून बँडेज लावलं. सलाईन सुरू केलं. अॅडमिनिसट्रेशन ऑफिसर ने पोलिसांना कळवलं, आणि मग येऊन विचारलं की काही नाव पत्ता कळलं का म्हणून. डॉक्टरांनी नकारार्थी मान हलवली. “मग आता ?” अॅडमिनिसट्रेशन ऑफिसर ने विचारलं. “आता ते शुद्धीवर येई पर्यन्त वाट बघायची, तो पर्यन्त प्राथमिक उपचार सुरू केले आहेत, ब्लड घेऊन, लॅब मधे पाठवलं आहे, दोन – तीन तासात त्याचा रिपोर्ट येईल, मग शुगर किती आहे ते बघून, तसे उपचार करू. अॅडमिनिसट्रेशन ऑफिसर ने मान हलवली आणि तो निघून गेला. सलाईन लावल्यामुळे पेशंट ची तब्येत झपाट्याने सुधारत होती.

थोड्या वेळाने, गंगाधररावांना शुद्ध आली, आणि त्यांनी डोळे उघडले. ते काही तरी बोलायचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या ओठांची डावी बाजू ओघळली होती डावा गाल पण आता लोंबायला लागला होता. डोळा वाकडा झाला होता आणि जीभ अडखळत होती. शब्दांची सरमिसळ होत होती आणि ते काय बोलताहेत, हे काहीच कळत नव्हतं. दोघा डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या पैकी जे  ज्युनिअर होते, डॉक्टर शशांक, ते म्हणाले, paralysis चा अटॅक आलेला दिसतो आहे. ते गंगाधररावांच बोलणं लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करत होते पण काही समजत नव्हतं. आता ओळख कशी पटवायची, हा एक गहन प्रश्न होऊन बसला होता. ओळख पटली असती, तर घरी कळवून, त्यांची फाइल मागवता आली असती आणि केस हिस्ट्री समजली असती. मग उपचारात सुसूत्रता आली असती.

डॉक्टर शशांक जरा विचारात पडले. मग त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी विचार केला की हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. मग ते पेशंट कडे वळले, आणि म्हणाले “काका, तुम्हाला माझं बोलणं समजत असेल तर माझं हे बोट दाबा, असं म्हणून त्यांनी आपलं बोट त्यांच्या उजव्या हातात दिलं.” ही मात्रा लागू पडली. गंगाधररावांनी डॉक्टरांचं बोट दाबल. आता प्रश्न आणि उत्तरांची मालिका सुरू झाली.

“मी आता A,B,C,D म्हणणार आहे. तुमच्या नावाचं पहिलं अक्षर आलं की माझं बोट दाबा.” उत्तर म्हणून बोट दाबल्या गेलं.

“A” उत्तर नाही. “B” उत्तर नाही. “G” म्हंटल्यांवर उत्तर मिळालं.

असं करत करत GAN पर्यन्त पोचले.

“गणेश ?” – डॉक्टर शशांक  

“गणपती ?” – डॉक्टर शशांक

“गजानन ?” - डॉक्टर शशांक 

शेजारी नर्स उभी होती, ती  म्हणाली “गंगाधर ?” आणि बोट दाबल्या गेलं.

आता सगळ्यांना हर्ष वायुच होणं बाकी होतं. ही एक अफलातून आयडिया डॉक्टरांच्या डोक्यात आली होती आणि ती काम करत होती.

“काका, तुमचं नाव गंगाधर आहे हे कळलं. आता याच पद्धतीने आडनाव शोधूया.” डॉक्टर म्हणाले, आणि  असंच एक एक अक्षर बोलून काकांचं आडनाव देशमुख आहे हे कळलं.

आता डॉक्टर शशांक, बस मधला जो माणूस अजूनही थांबला होता त्यांच्याकडे वळून म्हणाले

“ हे काका कुठे राहतात हे माहीत आहे का ?” त्या माणसांनी नकारार्थी मान हलवली.

“ काका कुठे उतरणार होते माहीत आहे का ?” – डॉक्टर शशांक.

“नाही.”

“ओके, बस रूट कोणचा होता ?” – डॉक्टर शशांक.

“सीताबर्डी ते लक्ष्मीनगर” – तो माणूस उत्तरला.

‘म्हणजे,’ आता डॉक्टर विचार करत होते. ‘काका शंकर नगर चौकात पडले म्हणजे त्याच्या अगोदरच्या एरिया बद्दल विचार करून उपयोग नाही.’ मग काकांकडे वळून म्हणाले “तुम्ही कुठे राहता हे मी आता विचारणार आहे.”

“शंकर नगर ?” – डॉक्टर शशांक.

उत्तर नाही.

“बजाज नगर?” – डॉक्टर शशांक.

उत्तर नाही.

“लक्ष्मी नगर ?” – डॉक्टर शशांक.

काकांनी बोट दाबलं.

“लक्ष्मी नगर चौका जवळ ?” - डॉक्टर शशांक.

उत्तर नाही.

“आठ रस्ता चौका जवळ ?”- डॉक्टर शशांक.

काकांनी बोट दाबलं.

“लक्ष्मी नगर चौक ते आठ रस्ता चौक, रस्त्याच्या डाव्या बाजूला ?” – डॉक्टर शशांक.

उत्तर नाही.

“लक्ष्मी नगर चौक ते आठ रस्ता चौक रस्त्याच्या उजव्या बाजूला ?” – डॉक्टर शशांक.

काकांनी बोट दाबलं.

“आठ रस्ता चौकातली गल्ली नंबर  १ ?” – डॉक्टर शशांक.

उत्तर नाही.

“गल्ली नंबर २ ?” - डॉक्टर शशांक.

काकांनी बोट दाबलं.

“आता पहिलं घर ?” – डॉक्टर शशांक.

असं करत करत, काकांचा पूर्ण पत्ता मिळाला.

गंगाधर देशमुख, डाव्या बाजूचं पाचवं घर, दुसरी गल्ली, आठ रस्ता चौक, लक्ष्मी नगर.

हॉस्पिटल चे डीन इतका वेळ पाठी मागे उभे राहून हा सगळा प्रकार बघत होते, ते आता समोर आले. त्यांनी डॉक्टर डॉक्टर शशांकच्या पाठीवर शाबासकी ची थाप दिली. पाठीवर थाप मिळाल्यामुळे, डॉक्टर शशांकला  झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

डीन शशांकला म्हणाले “ डॉक्टर तुम्ही एवढे कष्ट घेतले आहेत तर आता तुम्हीच जाऊन यांच्या फॅमिलीला कळवा. तुम्ही वसंत नगरात राहता तेंव्हा हे घर काही दूर नाहीये, आणि तुमची ड्यूटि पण संपत आली आहे, कराल ना एवढं ?”

“हो सर.” आणि असं म्हणून डॉक्टर शशांक निघाले.

***समाप्त***

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

 

 

 

 

 

इतर रसदार पर्याय