अनाकलनीय Dilip Bhide द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनाकलनीय

अनाकलनीय

आपल्या आयुष्यात कधी कधी अश्या गोष्टी घडतात, की ज्याचा कार्य कारण भाव लावताच येत नाही. असाच एक प्रसंग मा‍झ्याही आयुष्यात घडला.

साधारण दोन एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, बायकोची खूप इच्छा होती म्हणून आम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जायचं ठरवलं. घरचीच गाडी आणि ड्रायव्हर असल्याने चिंता नव्हती. संध्याकाळी कोल्हापूरला पोचलो आणि एका हॉटेल मधे मुक्काम केला. सकाळी सगळं आटोपून, मंदिरात निघालो. हॉटेलवाल्याने सांगीतले की आज काही विशेष आहे म्हणून खूप गर्दी असणार आहे आणि देवळा पर्यन्त गाडी जाणार नाही, मग आम्ही ऑटो रिक्शा करून मंदिरात पोचलो. तुफान गर्दी, गेट वरच्या पोलि‍साने सांगीतले की दुसऱ्या दरवाज्याने जा. कसा बसा आम्ही मंदिरात प्रवेश तर केला, पण गर्दी इतकी होती की रांग कुठून सुरू होते आहे हे कळायलाच मार्ग नव्हता. बसायला प्रांगणात कुठेच जागा नव्हती. माझी बायको माझा आधार घेऊन उभी होती. कोणी तरी आम्हाला ओलांडून पुढे गेला, आणि थबकला, मागे वळून आमच्याकडे आला.

“वहिनींना काय झालंय?” – अपरिचित माणूस.

“पॅरालिसिस” – मी.

“उभं राहायला पण त्रास होत असेल न?” – अपरिचित.

“हो, या परिस्थितीत दर्शन तर कठीणच दिसतंय.” – मी

“वहिनींना इथे पारावर बसू द्या, आपण जाऊन व्हील चेअर घेऊन येऊ. मग त्यांना त्रास होणार नाही.” – अपरिचित.

मग बायकोला पारावार बसवून, आम्ही मंदिराच्या ऑफिस मधे गेलो. त्यांना सांगितलं की व्हील चेअर हवी आहे म्हणून.

“सगळ्या गेल्या, तुम्हाला उशीर झाला.” – कारकुन

“असं कसं, तळघरात १० नवीन खुर्च्या आल्या आहेत, त्याचं काय लोणचं घालणार आहात काय?” – अपरिचित.

“आमच्या माहितीत तरी, कुठल्याही नवीन खुर्च्या आलेल्या नाहीत. उगाच काही बोलू नका.” – कारकुन

कारकुनाने त्या माणसा बरोबर बरीच हुज्जत घातली शेवटी वैतागून कारकून त्या माणसा बरोबर तळघरात गेले, तिथे खुर्च्या होत्या, त्यासटलीच एक खुर्ची त्यांनी आम्हाला तळघरातून आणून दिली.

“१०० रुपये भाडं पडेल” – कारकून. मी मान डोलावली.

“वहिनींना बसू द्या. मीच खुर्ची घेऊन चालतो, तुम्हाला सवय नसेल. तुम्ही बरोबर चला.” – अपरिचित.

तो माणूस आम्हाला मंदिराच्या बाजूच्या दरवाज्यापाशी घेऊन गेला. दरवाजाला कुलूप लावलं होतं, आणि वॉचमन बाहेर बसला होता.  आमच्या बरोबरच्या अपरिचित माणसाने वॉचमनला दरवाजा उघडायला सांगितलं. त्यांच्या बोलण्यात जरबच इतकी होती की मला सुद्धा आश्चर्य वाटलं. त्याने घाईघाईने दारवाज्याचं कुलूप काढलं आणि आम्हाला आत जायला वाट मोकळी करून दिली. आम्ही सरळ गाभार्‍यापाशी. गर्दी प्रचंड होती, त्यामुळे गाभार्‍यांत जाता आलं नाही, ओटीचं सामान पूजाऱ्या जवळ देऊन  भागवलं.

बाहेर येऊन आधी बायकोला मुख्य दारापाशी सोडलं आणि खुर्ची वापस करायला ऑफिस मधे गेलो. पैसे देई पर्यन्त हा माणूस माझ्या शेजारी उभा होता, पेमेंट केल्यावर त्या माणसाला धन्यवाद देण्या साठी मान वाळवून पाहीलं तर कोणीच नाही. ऑफिसच्या बाहेर येऊन बघितलं, तर कोणीच दिसलं नाही. वापस येऊन कारकुनाला विचारलं की “आत्ता माझ्याबरोबर होते, ते कुठे गेले?”

“तुमच्या बरोबर कोण होतं? तुम्ही एकटेच तर आहात.” – कारकून.

“अहो असं काय करता, मघाशी खुर्ची देण्यावरून त्यांनी तुमच्यासोबत वाद नाही का घातला?” – मी

“साहेब, वाद तुम्हीच घालत होता, मला हेच समजत नाही, की जी गोष्ट आम्हालाच माहिती नव्हती, ती तुम्हाला कशी कळली? आमच्या रेकॉर्डस मधे त्या खुर्च्यांची नोंदच नाहीये.” – कारकुन

मी मंत्रमुग्ध होऊन त्यांच्याकडे बघतच राहिलो. मनोमन अंबाबाईला हात जोडले. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाचा चेहरा पण मला आठवत नव्हता.

या घटनेचा अर्थ काय लावणार? बायकोची दुर्दम्य इच्छा होती म्हणून अंबाबाईनेच सर्व व्यवस्था केली, असंच म्हणायचं.

 

शत शत नमन.

 

दिलीप भिडे.