अशीही जमते जोडी Dilip Bhide द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अशीही जमते जोडी

अशीही जमते जोडी

 

हॉल चांगलाच गजबजला होता. हॉल मधे बरेच तरुण तरुणी एकत्र आले होते. आपसात जोडीने जोडीने गप्पा चालल्या होत्या. जोड्या बदलल्या जात होत्या, एका वधू - वर सूचक संस्थेने आयोजित केलेला वधू - वर मेळावा होता तो. वातावरण तसं भारलेलं होतं. थोडी उत्सुकता, थोडा संकोच आणि ओळख, गप्पा, चर्चा चालू होत्या, खूप सारा उत्साह, अश्या संमिश्र वातावरणात आयुष्याचा जोडीदार कसा असावा यांच्या चर्चा रंगल्या होत्या. काही जण टेबल वर बसले होते तर काही जण उभ्यानेच  बोलत होते. एका बाजूला खिडकी पाशी मंगेश एकटाच कॉफी पित बसला होता. थोडा वेळ तसाच गेला. कावेरी कॉफी पित पित हिंडत होती, तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं.

“तुम्ही कोणाची वाट पाहता आहात का ?” कावेरीने विचारलं.

“नाही.” – मंगेश

“मी इथे बसले तर चालेल ?” – कावेरी.

“शुअर” – मंगेश.

कावेरी बसली. थोडा वेळ जरा शांततेतच गेला. कदाचित कुठून सुरवात करावी यांचा विचार करत असावेत.

“बोला” कावेरीनेच शेवटी सुरवात केली.

“मी ?, अहो तुम्हीच बोला.” – मंगेश.

“नको, तुम्हीच सुरवात करा.” – कावेरी.

“अहो तो वाक्प्रचार माहित आहे ना, “लेडिज फर्स्ट” मग तुम्हीच बोलायचं.” – मंगेश

“नको. या बाजारात पुरुषांनीच बोलायचं असतं. तसा प्रघात आहे.” – कावेरी.

“बाजार ?” मंगेशची प्रश्नार्थक मुद्रा.

“बाजारच नाही तर काय ? शेयर मार्केट, इथे प्रत्येक जण स्वत:ला विकायला आला आहे.” – कावेरी.

“अहो काहीतरीच काय बोलताहात ? हा वधू वर मेळावा आहे. जर कोणाला एकमेकांचे विचार पटले तर त्यांचं लग्न जुळेल. काय वाईट आहे हो या पद्धतीत ? आणि तुम्ही सुद्धा याच कारणांसाठी इथे मेळाव्यात आला आहात ना ? मग ?” – मंगेश.

“मला मुळी यायचंच नव्हतं.” – कावेरी.

“तरी तुम्ही आलात ? कमाल आहे.” – मंगेश. आता मंगेशचं कुतूहल जागं झालं होतं.

“काय करणार ? इलाजच नव्हता.” – कावेरीचा उद्वेग स्पष्ट दिसत होता.

मंगेश नुसताच प्रश्नार्थक मुद्रा करून पाहत राहिला. नजरेनेच काय झालं ? असं त्यांनी विचारलं.

“मावशी आली आहे.” – कावेरी.

मंगेशला कळेना की मावशीचा आणि मेळाव्याचा काय संबंध आहे ते. म्हणून तो म्हणाला “बरं मग ?”

“मावशी आल्यामुळे आईला  सपोर्ट मिळाला आणि मग तिने एकदम माझ्या लग्नाबद्दल उचल खाल्ली आणि नाव नोंदवलं.” – कावेरी.

“म्हणून आज इथे येणं झालं ?” – मंगेशला आता गंमत वाटायला लागली होती.

“नाही. मी साफ सांगितलं होतं की मी दाखवून घेण्याचा कार्यक्रम मुळीच करणार नाही. मी काय वस्तु आहे का ?” कावेरी.

“बरोबरच आहे. पण स्वत:ला वस्तु का म्हणता ?” – मंगेश.

“दाखवण्याच्या कार्यक्रमात मुलीला छान नटवून बसवतात, का ? समोरच्या मंडळींनी हो म्हणावं म्हणूनच ना ? मग असा फरक काय राहिला वस्तु आणि मुली मधे ? सांगा ?” कावेरी म्हणाली.

“अहो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण असं केल्या शिवाय लग्न कशी जुळतील ? आणि ही जशी वधू परीक्षा असते, तशीच ती वर परीक्षा पण असतेच ना. नकार द्यायचा अधिकार सम समान असतो आजकाल.” मंगेशनी बाजू मांडली.

“हेच, अगदी हेच मावशी म्हणत होती. म्हणाली तुझ्या पसंती शिवाय आम्ही पुढे जाणारच नाही.” कावेरी म्हणाली.

“अहो मग बरोबरच म्हणाल्या की तुमच्या मावशी. चूक काय आहे त्यात ?” – मंगेश

“हो, पण माझी तयारी नव्हती. बरं ते जाऊ द्या, तुमचं नाव काय आहे ?” – कावेरी.

मंगेश एकदम बॅक फुट वर आला. जो काही संवाद चालला होता त्यात त्याच्या नावाचा संबंध त्याला कुठेच दिसत नव्हता. तो जाम कन्फ्युज झाला. पण थोडा वेळ काढण्यासाठी  तो म्हणाला   “मी अजून एक कॉफी घेऊन येतो. चालेल ना ?” कावेरीने होकारार्थी मान डोलावली. कॉफी आल्यावर कावेरी पुन्हा म्हणाली “अहो नाव सांगताय ना ?”

मंगेशनी थोडा विचार केला आणि म्हणाला “असं बघा, इथे आलेली मंडळी आपले विचार कोणाशी जुळताहेत, आणि कोणाशी आपलं जमू शकतं, हे आपसातल्या चर्चेतून समजून घेताहेत. आपलं तसं काहीच नाहीये. तुमच्या बोलण्यावरून मला इतकाच अंदाज आला आहे की तुम्हाला लग्नच करायचं नाहीये. मग अश्या परिस्थितीत तुम्हाला माझं नाव कशाला हवंय ?”

“ती एक गंमतच झाली.” आणि कावेरी खुदकन हसली.

“मी खूप गंभीरपणे बोललो. तुम्हाला ती गंमत का वाटावी हे समजत नाही.” – मंगेश च्या आवाजाचा टोन आता बदलला होता.

“अहो, तसं नाहीये, मी जे म्हणाले, ती तुमच्या बोलण्यावरची प्रतिक्रिया नव्हती. सॉरी”- कावेरी.

“मग काय होतं ते ?” – मंगेश.  

“मी दाखवून घेण्याला नकार दिला ना, त्यावेळी, मावशी वेबसाइट वर मॅचिंग स्थळांची लिस्टच बघत होती. तेवढ्यात मेळाव्याचा न्यूज फ्लॅश आला. मावशीने ती बातमी वाचली आणि म्हणाली की, तिथे एकदम मोकळं वातावरण असेल, तुला वाटेल त्या मुलांशी तू बोल, आम्ही काही म्हणणार नाही. पण तू जावून ये. आमच्या साठी जा. आणि तिने माझं रजिस्ट्रेशन पण करून टाकलं.” कावेरीने एका दमात सांगून टाकलं.

“म्हणून तुम्हाला यावच लागलं.” – मंगेश.

“हो, म्हणजे इलाजच नव्हता. बहुमत त्यांच्याकडे होतं, मग काय करणार ? मी तयार झाले. पण आईला विश्वास नव्हता म्हणून ती म्हणाली की ज्यांच्याशी बोलशील त्यांची नावं लिहून आण. म्हणजे आमची खात्री पटेल की तू मेळाव्याला नक्की गेली होतीस म्हणून.” कावेरी म्हणाली.

“असं आहे तर, म्हणून तुम्हाला माझं नाव पाहिजे आहे.” – मंगेश.

“किमान चार तरी नावं आण असं मावशी म्हणाली. तिघांची मी लिहून घेतली आहेत. तुम्ही चौथे. बस. तुमचं नाव लिहिलं की माझं काम झालं.” – कावेरी.

मंगेश एकदम स्पीचलेस, तो विचार करत होता, ही मुलगी म्हणजे भलतंच तिरपागडं काम दिसतंय, आता तो तिच्याकडे लक्षपूर्वक बघायला लागला. गव्हाळ रंग, गोल चेहरा, सरळ नाक, टपोरे डोळे, आणि एकंदरीतच आकर्षक चेहरा, या संपूर्ण वेळेत ती एकदाच  हसली होती. आणि त्याला जाणवलं की हसतांना ती अजूनच छान दिसते म्हणून. मनात विचार आला, काय हरकत आहे एक स्टेप पुढे जायला, आतापर्यंत तो फक्त ऐकत होता आता त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे असं त्याला वाटलं. तो काही बोलणार, त्याच्या आधीच कावेरीने त्याच्या शर्टाची बाही खेचली. मंगेशनी एकदम चमकून तिच्या कडे पाहिलं.

“अहो, कुठे हरवला होता तुम्ही ? नाव सांगताय ना ?” असं म्हणून कावेरीने  कागद आणि पेन काढला. मंगेशनी पाहिलं, कागद कोरा होता, बाकीची तीन नावं लिहिलेली

दिसत नव्हती. तो हसला.

“का हो, हसायला काय झालं ?” – कावेरी.

“काही नाही, असंच.” – मंगेश.

“असं कसं ? कारणाशिवाय कोण कशाला हसेल ?” – कावेरी.

“आम्ही हसतो. आम्ही “हसतमुख माणसं” या प्रकारात मोडतो.” – मंगेश.

“म्हणजे मी रडकी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आलं लक्षात. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये.” कावेरी आता चिडली होती.

“मग आता ?” -मंगेश

“मी निघतेय. बाय” – कावेरी.

“माझं नाव लिहून घेताय ना ?” – मंगेश.

“काही नको, नाव न सांगता, नुसत्याच वायफळ गोष्टी करता आहात तुम्ही.” – कावेरी.

“आता मात्र कमाल झाली.” – मंगेश.

“कमाल ? सगळे पुरुष सारखेच. टोमणे मारण्यात वस्ताद.” – कावेरी.

“अहो गेला अर्धा तास तुम्हीच बोलत आहात. चीड चीड तुम्ही केली, मी फक्त ऐकतो आहे. आणि तुम्ही म्हणता मी वायफळ बोलतो, काय प्रकार आहे हा ?” – मंगेशनी तक्रार केली.

“तुम्ही मघाशी हसलात म्हणून मला राग आला.” – कावेरी.

“कमाल आहे, मी जेंव्हा गंभीरपणे काही सांगत होतो, तेंव्हा तुम्ही सुद्धा हसलात, तेंव्हा मी कुठे चिडलो ? पण खरं सांगू, तुम्ही हसल्यावर खूप छान दिसता.” – मंगेश.

“अहो, काहीही काय ?” आणि कावेरी पुन्हा एकदा मस्त हसली. मंगेश खुश.

“माझं नाव मंगेश”

“मी कावेरी”

“छान आहे नाव, मला आवडलं.” – मंगेश.

“काय करता तुम्ही ?” – कावेरी.

....

....

...

अर्ध्या तासानंतर कावेरी आणि मंगेश हातात हात घालूनच बाहेर पडले.

“आधी माझ्या घरी जाऊ, तुझी आई बाबांशी ओळख करून देतो जेवू, आणि मग तुझ्या घरी जावू. ओके ?” – मंगेश

“ओके.” – कावेरी.

पुढे काय ? पुढे सर्व काही नेहमी सारखंच. मंगेशच्या राज्याचा द एंड. इथून पुढे नारिवादी कथा. इलाजच नाही.

 

दिलीप भिडे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.