escape from death books and stories free download online pdf in Marathi

काळ आला होता पण .......

काळ आला होता पण .......

 

देशमुखांच्या घरात  आज जरा गडबडच होती. आज मनीषा ला म्हणजे विलास देशमुखांच्या बायकोला भिशी लागली होती. आणि त्याच्याच साठी सगळ्या बायका जमल्या होत्या. मनीषा आणि तिची नणंद वसुधा दोघी किचन मधे फराळाची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. मनीषा चा मुलगा जेमतेम एक वर्षांचा होता आणि बाहेर सगळ्यांच्या मधे बसला होता आणि बायका त्याची गंमत बघत होत्या. त्यांच्या जवळ मनीषा ची धाकटी नणंद सुषमा बसली होती. हसत खेळत गप्पा चालल्या होत्या. बायका बाळाला हातोहात घेत होत्या आणि त्यांच्या बोबड्या  बोलाच  खूप कौतुक करत होत्या.

सगळ्या प्लेट भरून झाल्यावर देण्यासाठी मनिषाने सुशमाला आवाज दिला. ती बाळाला कोणाकडे तरी सोपवून आत गेली. सगळ्यांना फराळाच्या बशा देऊन झाल्या आणि खाणं पिण सुरू झालं सोबत गॉसिप चाललच होतं पार्टी आता रंगात आली होती. सर्व बायका खाण्यात आणि गॉसिप मधे मश्गुल  झाल्या होत्या. मनीषा सारबता चे ग्लास घेऊन बाहेर आली. टेबला वर ट्रे ठेवता ठेवता तिच्या लक्षात आलं की बाळ कुठेच दिसत नाहीये. तिने सुशमाला विचारलं. सुषमा किचन मधे होती, ती बाहेर आली.

काय ग वहिनी ?

अग बाळ कुठे दिसत नाहीये, कोणा जवळ खेळतो आहे ?

अग वहिनी, तू बोलावलं म्हणून इथेच सर्वांमध्ये सोडून गेले होती.

गप्पांमधे रंगल्या मुळे कोणाचंच बाळा कडे लक्ष्य नव्हतं. मनीषा आता घाबरली. ती लगेच बाजूच्या खोल्यांमध्ये धावली. बाळ  तिथेही नव्हतं. तिची आणि सुशमाची धाव पळ बघून बाकी बायका एकदम गप्प झाल्या. परिस्थितीची जाणीव झाल्यावर मग सगळ्याच उठल्या. अख्खं घर पुन्हा पुन्हा शोधून झालं. पलंगा खाली, कपाटाच्या मागे, अगदी फ्रीज मधे सुद्धा पाहिल्या गेलं. बाळ कुठेच नाही. सुशमा धावतच जिन्यांवरून खाली गेली, बाळ  कुठेही नाही. शेजारच्या काकू भिषितच होत्या. त्यांचं घर बंद होतं त्यामुळे तिकडे बाळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. आता मात्र मनीषा घाबरली. तिच्या पायातलं बळच गेलं. ती मटकन खालीच बसली. रडक्या सुरात तिने सुशमाला म्हंटलं की ह्यांना  फोन लाव.

विलास खालच्याच मजल्यावरच्या प्रसन्न कडे बसला होता. तो आणि प्रसन्न लगेच वर आले.

काय झालं ?

अहो बाळ कुठे दिसत नाहीये. मनीषाने रडत रडत सांगितलं.

अग घरातच असेल, कुठेतरी लपून बसला असेल. नीट शोधलं का ?

अहो, सगळीकडे शोधून झालं आहे. आता तुम्हीच लवकर काय ते करा. माझा बाळ मला  आणून द्या.

विलास आल्यावर मनिषाचा धीर सुटला होता. ती आता रडायलाच लागली होती. बाकीच्या बायका तिला धीर देत होत्या. पण त्याचा काही उपयोग नाही हे त्यांनाही कळत होतं. त्यांची पण अवस्था जवळ जवळ तशीच झाली होती. आता  काय करायचं, नाही नाही ते विचार डोक्यात येत होते. जिन्यांवरून पडला नाही हे पक्क, विलास खालीच होता त्यामुळे तो बाहेर पण गेला नाही, आणि एकदम विलास च्या मनात आलं की गच्ची वर तर गेला नसेल ? तेवढ्यात वसुधा वरून धावत  खाली आली तिला धाप लागली होती. तिने कसे बसे सांगितले की बाळ गच्चीवर आहे म्हणून.

अग मग एकटीच का आलीस ? त्याला घेऊन का आली नाहीस ?

बाळ गच्चीच्या टोकाला आहे.

आता सगळेच गच्चीवर धावले. आणि जे दृश्य बघितलं त्यांनी सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला. विलास ज्या बिल्डिंग मधे राहात होता ती तीन मजली होती. आणि विलास तिसऱ्या मजल्यावर राहात होता. त्यांच्या बिल्डिंगच्या  गच्चीचा  कठडा न बांधताच बिल्डर पळून गेला होता. त्यामुळे गच्चीला  कठडाच नव्हता. बाळ  गच्चीच्या  अगदी टोकाला उभा होता. बाळ जिथे उभा होता त्या बाजूला एक दुमजली घर होत. पण दोन्ही घरांच्या ऊंची मधे फरक होता. त्या घराचं उतरत कौलारू छप्पर होतं. आणि दोन्ही घराच्या मधे केवळ एक फुटाच अंतर होतं. विलास सगळ्यांना म्हणाला की कोणी बोलू नका. घाबरून बाळ आणखी समोर  जाण्याची शक्यता आहे. गच्चीवर आता पिन ड्रॉप शांतता पसरली होती. विलास ने हळूच बाळाला आवाज दिला. बाल वळला हसला आणि मजा वाटून तिथेच बसला.

विलास आता जमिनीवर झोपला आणि हळू हळू समोर जायला लागला. सगळे जीव मुठीत धरून बघत होते. विलास एकेक इंच समोर सरकत होता. कपाळांवरून घामाच्या धारा वाहात होत्या. विलास बाळापर्यंत पोचेल का आणि तों पर्यन्त बाळ तिथेच उभा असेल का ? सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आता पुढे काय होणार. काही बायकांनी मनातल्या मनात भीमरूपी म्हणायला सुरवात केली होती. मनीषा ने दोन नवस बोलून टाकले. एक टेकडीच्या गणपतीला आणि दूसरा संकट मोचन मारुतीला. नागपूरचे हे दोन्ही आराध्य दैवत आहेत. विलासला असा समोर येतांना पाहून बाळाला खूपच मजा वाटली. त्यानी टाळ्या वाजवायला सुरवात केली. आणि टाळ्या वाजवता वाजवता तो उभा राहिला. विलास हळूहळू समोर जात होता. त्याला येतांना बघून बाळाने टाळ्या वाजवायला सुरवात केली. इतर वेळी हे खूप मनोहारी दृश्य होतं, पण आता टाळ्या वाजवता वाजवता बाळ पडणार तर नाही ? अशी भीती प्रत्येकाला  वाटू लागली. विलास थोडा थांब, प्रसन्न ने हलक्या आवाजात विलासला सांगितलं.. आता अगदी थोडच अंतर राहिलं होतं.

विलास थांबला, बाळ पण टाळ्या वाजवायचा थांबला. सगळ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. विलास पुन्हा इंच इंच समोर सरकायला लागला. जेमतेम हात भर अंतर राहिलं असेल आणि विलास ने बाळाला धरण्यासाठी हात लांब केला. बाळाला वाटलं की तो त्याच्याशी पकडा पकडी खेळतो आहे म्हणून तो मागे सरकला. आणि बाळ खाली पडला.

मनीषाच्या तोंडातून एक किंचाळी निघाली आणि ती चक्कर येऊन पडली. कोणाच्याच तोंडून एकही शब्द निघत नव्हता.विलास तसंच झोपल्या झोपल्या काठांवर सरकला. काय दिसलं त्याला ? त्यांनी बाळाला पाहिलं, तो पर्यन्त प्रसन्न पण येऊन पोचला होता. आणि बाकी बायकांना त्यांनी हातानेच थांबावलं. बाळ  जवळ जवळ 15 -16 फुट खाली कोसळला होता. त्याचा शर्ट, बाजूच्या बिल्डिंग मधून एक पत्रा बाहेर आला होता, त्याच्या टोका मधे अडकला होता. बाळ अधांतरी लोंबकळत होता. आता  त्या अंधाऱ्या जागेत तो रडायला लागला होता. क्षणभर विलास आणि प्रसन्न श्वास रोखून बघत होते. मग उठून उभे  राहिले आणि सगळ्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली.

कोणालाच आता काय करावे हे समजत नव्हतं. सगळे किंकर्तव्य मूढ अवस्थेत उभे होते. अचानक प्रसन्नला  काही तरी सुचलं. तो म्हणाला

विलास मी पांच मिनिटांत येतो मला एक आयडिया सुचली आहे. आलोच.

विलास खाली वाकून बघत होता. बाळाच्या शर्टाला मानेपाशी भोक पडलं होतं आणि त्यातून पत्रयाचं टोक  बाहेर आल होतं. त्या पत्र्यामुळे बाळाला पाठीला जखम पण झाली होती आणि त्यातून रक्त ठिबकत होतं. विलासच्या काळजात चर्र झालं. आता बाळाला जखम दुखायला लागली होती आणि तो टिपेच्या स्वरात किंचाळायला आणि हात पाय झाडायला लागला होता. त्यांच्या हात पाय झाडण्यामुळे त्याचा शर्ट थोडा थोडा फाटायला लागला होता. लहान बाळाला मऊ असतात म्हणून जुनेच वापरलेले कपडे घालण्याची पद्धत आहे. बाळाच्या अंगात सुद्धा एक जुनाच शर्ट होता. त्यामुळे तो बाळाच्या वजनामुळे  हळू हळू फाटायला लागला होता. विलासचं  डोक फुटायची वेळ आली होती.

तेवढ्यात कोणीतरी शेजाऱ्यांपैकी फायर ऑफिस ला फोन केला होता आणि परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी लगेच 10 मिनिटांत पोचतो म्हणून सांगितलं. विलासला कळल्यावर त्याला थोडा दिलासा मिळाला. टर्र असा कापड फाटल्याचा आवाज आला, विलासने  पाहिले की शर्ट अजून थोडा फाटला होता. रडून रडून बाळ आता शांत झाला होता. पण तो काहीच हालचाल करत नाही हे बघून विलास तर रडायलाच लागला. तेवढ्यात प्रसन्न आला, त्यांच्या जवळ एक पोत होतं आणि त्याला पिशवीला जसे बंद असतं तसे लांब दोरीचे बंद घट्ट  बांधून त्यांनी आणले होते. तो विलासला म्हणाला –

विलास तू एक बाजू धर, दुसरी घेऊन मी खाली कौलारू छापरावर उतरतो. दोघ मीळून बाळाच्या खाली पोत घेऊ आणि बाळाला खेचून घेऊ. विलासला ते पटलं.

प्रसन्न गळ्यात पोत्यांची दोरी अडकवून खाली उतरला. दोन्ही घरांच्या मधे अगदीच चिंचोळी जेमतेम एक फुटाची जागा होती. त्या छापरावर उभ राहणं हे सुद्धा प्रसन्नला अवघड होत होतं पण पर्याय नव्हता. छापर उतरत होतं. आणि पाय टेकायला सुद्धा जागा नव्हती. प्रसन्न कसा बसा स्वत:ला अॅडजस्ट करत होता पण त्याचा पाय घसरला आणि तो त्या सापटी  मधे  फसला. खाली पाय लोंबकळत होते आणि शरीर सापटी मधे दोन्ही भिंतीत अडकलं होतं. जो बाळाला सोडवायला गेला होता तोच अडकला. मोठी कठीण परिस्थिती आली. पण अजून एक जण खाली उतरला आणि भिंतीचा आधार घेऊन स्वत:ला सावरत त्यांनी प्रसन्नला खेचण्याचा प्रयत्न चालू केला. प्रसन्न मध्येच अडकल्या मुळे बाळा पर्यन्त पोचणं अशक्य झालं होतं. पण पांच मिनिटांत प्रसन्न वरती आला आणि छापरावर पाय रोवून उभा राहिला. त्या प्रयत्नात चार पांच कौल फुटली.  पण त्यामुळे कौला खालचा  लाकडी दांडा वर आला आणि पाय ठेवायला प्रसन्न ला जागा मिळाली. ती पांच मिनिट सुद्धा गच्ची वरच्या जनतेला अनंत काळा सारखी भासली. शेजारची बाई सुद्धा गच्ची वरच होती. ती प्रसन्न ला म्हणाली.

प्रसन्न कौलांची चिंता करू नको बाळावरचं लक्ष हटवू नको. कौलांचं नंतर बघता येईल. हव तर आणखी तोड म्हणजे नीट पाय ठेवता येईल.

एका टोकाला आता विलास आणि दुसऱ्या टोकाला प्रसन्न, दोघ बाळाच्या खाली पोत नेण्याचा प्रयास करत होते. पण बाळ जवळ जवळ भिंतीला टेकला असल्याने ते जरा अवघडच दिसत होतं. क्षणा क्षणाला शर्ट थोडा थोडा फाटत होता. शर्ट कीती मजबूत आहे त्यावरच बाळाची वाचण्याची शक्यता होती. सगळे जीव मुठीत धरून हा सगळा प्रकार पहाट होते. जर शर्ट फाटला तर काय होईल याचं भविष्य वर्तवायला कोण्या ज्योतिष्याची जरूर नव्हती. विलास आणि प्रसन्न दोघही जीव तोडून पोत सरकवायच्या प्रयत्नात लागले होते पण यश मिळत नव्हतं. आता काय होईल हाच प्रश्न तिथे असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. आता सर्वांचं सामूहिक रामरक्षा म्हणण चालू झालं होतं. सुर रडकाच होता पण नेटाने आळवणी चालली होती. आणि फायर ब्रिगेड ची माणसं आली.

दोनच मिनिटांत त्यांना सर्व परिस्थितीचा अंदाज आला. त्यांचा कप्तान मागे वळून सर्व लोकांना उद्देशून म्हणाला की

आम्हाला एक 9-10 वर्षांच्या मुलाची आवश्यकता आहे जो कमरेला दोरी बांधून खाली उतरायला तयार आहे. कारण मोठा माणूस इतक्या छोट्या जागेत उतरू शकणार नाही. त्याला काही होणार नाही. आम्ही त्यांची काळजी घेऊ. तुम्ही निश्चिंत रहा.

पण त्या गर्दी मधे एका 8 वर्षांच्या मुली शिवाय इतकं बारीक कोणीच नव्हतं. सगळ्यांनी तिच्या आईला सांकड घातलं. ती बाई पण तयार झाली. घाबरलीच होती पण तिलाही दिसत होतं की दूसरा कुठलाही उपाय नाहीये. तिने मुलीला विचारलं –

काय ग यमे उतरतेस का खाली बाळासाठी.

आई पण मी आत पडले तर ?

अग ही माणसं आहेत ना ते तुला दोरीने बांधून धरून ठेवतील. मग तू पडणार नाहीस. तू जाऊन बाळाला घेऊन ये. आणि आईने तिच्या पाठीवरून हात फिरवला. आणि आपल्या तोंडात साडीचा बोळा कोंबून  मागे सरकली. तिच्यामधे  मुलीला सांपटीत उतरतांना पाहण्याची, एवढी हिम्मत नव्हती.

पण आश्चर्य म्हणजे ती मुलगी पण तयार झाली. मग तिच्या कमरेला आणि खांद्याला दोरीने बांधून तिला हळू हळू खाली उतरवलं. अर्ध्या वाटेवर प्रसन्न होताच त्यानी मुलीला धीर दिला. त्या मुलीने खाली जाऊन बाळाच्या खाली पोत सरकवलं. आणि त्याच क्षणी बाळाचा शर्ट पूर्ण फाटला आणि बाळ पोत्यात पडला. दोघंही जणांना वर खेचून घेण्या आलं. मुलगी सुखरूप होती हे पाहून तिच्या आईचा पण जीव भांड्यात पडला. बाळाला ताबडतोब हॉस्पिटल मधे नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर लगेच उपचार सुरू झाले. डॉक्टर म्हणाले की काळजीच काहीच कारण नाहीये. जखम आहे पण ती आठवड्या भरात भरून येईल. संगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

आठ दिवसांनी त्या मुलीच्या घरी स्वत: कमिश्नर साहेब आलेत आणि त्यांनी मुलीला भरभरून शाबासकी दिली. आणि म्हणाले की

तुमच्या मुलीने एवढ्या लहान वयात एक असामान्य कार्य केलं आहे. आम्ही तिचं नाव सरकार कडे पाठवणार आहोत. त्यांनी मुलीच्या आईची सुद्धा मुलीला परवानगी देण्याचं असीम धैर्य दाखवल्याबद्दल प्रशंसा केली.

जमलेल्या बायकांपैकी कोणीच ही भिशी आयुष्य भर विसरणार नव्हते.

पण म्हणतात ना, शेवट गोड तर सर्वच गोड.

 

*******

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

 

इतर रसदार पर्याय