Hirve Nate - 12 books and stories free download online pdf in Marathi

हिरवे नाते - 12 - काळी माय

                                                                                     काळी माय : 13

 मिल मधली नोकरी सुटली आणि शंकरला बायको मुलाला घेऊन गावी यावं लागलं. गावी वाटण्या झाल्या होत्या. आपापले हिस्से घेऊन तिघेही भाऊ जमिन कसत आणि इतर जोडधंदेही करत  होते. आई वडील वडिलोपार्जित घरात त्यांचे हातपाय हालतात तोपर्यंत तिथेच रहाणार होते. त्यांच्या पश्चात घराच्या वाटण्या होणार होत्या. शंकरने आपले बस्तान चांगलं बसलय म्हणून तिघा भावाना मोठेपणाने चांगली जमिन देऊन आडरानातली जमिन स्वतःला असू द्यावी म्हणून ठेवली होती. आता काय करावं त्याला सुचत नव्हतं. रोजीरोटीचा प्रश्न होता. मुलाचं शिक्षण होतं. भंडावून गेलेल्या जीव तगमगत होता. बायको, आईबापाला त्याची तगमग कळत होती.

    एका संध्याकाळी तिघेही भाऊ वाड्याकडे येताना दिसले. जमनाने बाजलं टाकून त्यावर वाकळ अंथरली आणि पाण्याचं तांब्या भांडं आणून ठेवलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर दादाने विषय काढला.

  “ शंकर, आता नोकरी बंद म्हटल्यावर काय करणार आहेस ? किती दिवस नुसता बसून रहाणार? नुसता विचार करून कधी काही हाती येतं होय ?”

  “ अरे दादा, मग आता काय करू? जमवलेले पैसे कशात घालून बसलो आणि ते ही डुबले तर कसे होईल ?” शंकर

  “ अरे भाऊ पैसे कशाला गुंतवतोस ? आहे त्यात बघ की हात घालून.” छोटू म्हणाला.

 “ भाऊ तुला समोरचं दिसेनासं झालयं. सृष्टी बदलली की माणसाने दृष्टी बदलावी. तू अजूनही मुंबईत काय करता येईल हाच विचार करतो आहेस. इथेही तुला काम करता येईल की.”

 “ लक्ष्मणा, खरं बोलत आहेस बाबा. पण मी इथे काय काम करणार ? शंकर म्हणाला. त्याच्या मनाला धुमारे फुटू लागले. भाऊ काहीतरी तोडगा काढतील असं दिसू लागलं. बापही सावरून बसला. दराआडची जमना कोपऱ्यात येऊन बसली.

  दादा म्हणाला “ छोटू, लक्ष्मणा, त्याला जास्त भांबवू नका. शंकर तुझ्या वाटची शेती तशीच पडून आहे. तूच ती आडरानातली शेती मागून घेतली आणि चांगली आम्हाला दिली. हे आम्ही जाणतो बाबा. आडरानातली असली तरी कसदार जमिन आहे ती. त्यावर चांगली मशागत करावी लागेल एव्हढच. तिथे एक बुजलेली विहीरही आहे. ती खणून घेतली की पाण्याचा प्रश्नही सुटेल.”

 तसा बाप बोलू लागला “ शंकरा, खरच ती जमिन चांगली आहे आणि इथून काही फार दूर नाही. तूझी इथे पडलेली मोटरसायकल दुरुस्त करून घे. मग अर्ध्या तासाचही अंतर नाही तिथे जायला. रहायला हे घर आहेच. शिवाय तिथेही तीन खोल्या आहेत. पाहिजे तेव्हा, पाहिजे तसं तुला रहाता येईल. विहीर खणायला मी तुला पैसे देतो.”

  “ शंकरा, सुरवातीला आम्ही तिघेही तुला मदत करू. तुला त्याचं ओझं वाटत असेल तर नंतर तुला जमेल तेव्हा तू आमचे पैसे परत करू शकतो. खरं तर त्याची काही गरज नाही. पण तुझ्या मनावर ओझं रहायला नको. आम्ही आपल्या शेतातले गडीही तुझ्या जमिनीच्या मशागतीला देतो. नेहमी तिघात मिळून ट्रॅक्टर आणतो त्यात आता तू चवथा. तुला सवय नाही तोपर्यंत जरा जड जाईल. पण एकदा का तू यात डोकं घातलं, की ही काळी आई तुला भरभरून देईल. याबरोबरच जोडधंदेही लक्षात येतील. सारखं मुंबई मुबई काय करतोस ? काय दिलं तुला मुंबईने ?” दादा

  “ काय दिलं मुंबईने ? जग दाखवलं. गरीबी श्रीमंती दाखवली. कष्ट, सुख, चैन स्वार्थीपणा दाखवला. रंगीन दुनिया व त्यामागचे दुःखं दाखवलं. ते तीन वर्ष म्हणजे आयुष्याची पुंजी होती. मुंबई त्याचं प्रेम होतं. पण गावाकडे माया होती. हे सर्वजण मायेपोटी त्याला जगायची वाट दाखवत होते. आता त्यालाही झडझडून उठायचं होतं. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालता येणार होतं. पण जमना ? ती तयार होईल का ? तिला तर मुंबईचा नवरा हवा होता. तिथे कशी फॅशनचे कपडे घालून मेकप करून मिरवायची. नाना वस्तुंनी घर आधुनिकतेने सजलं होतं. त्याने जमनाकडे बघितलं.

  “ अहो मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे. मी पण करेन तुम्हाला मदत. काही काळजी करू नका. सगळे म्हणताहेत तसं हात घाला शेतीत. जिथे जसं आहे तिथे त्याप्रमाणे वागावं आणि जशी वेळ येईल त्याप्रमाणे साजरी करावी.”

  जमनाने जणू त्याच्या मनातले विचार ओळखून त्याप्रमाणे उत्तर दिले. शंकर आनंदला. तिढा सुटलेला पाहून सगळेच खुश झाले. जमना शिरा चहा करायला आत गेली.

  दादा म्हणाला “ तुला काही पैसे हवे आहेत का ? आपण जरी वाटण्या करून वेगळे राहिलो असलो तरी मनाने एक आहोत. आपल्या बायकाही एकमेकींना जीव लावतात. येऊन जाऊन सासू सासऱ्यांचं सगळं करतात. नंतर वाईटपणा येऊ नये म्हणून बापानेच डोळ्यासमोर वाटण्या करून दिल्या हे महित आहे ना तुला. माझा कुक्कुट पालनाचा धंदा चांगला चालू आहे. त्यातल्या आठ दहा कोंबड्या तुझ्या शेतावर ठेव. छोटुकडे पण गाई म्हशी खूप झाल्या आहेत. त्यातल्या काही तो विकायच्या म्हणत होता तर त्यातली एक दुभती म्हैस आणि एक गाय वासरू तुला देतो म्हणतोय तो. लक्ष्मणकडे भैरू कुत्रा आहे. मोठं उमदं जनावर. या सगळ्यांकडे लक्ष ठेवायला बरा राहिल. त्याची बायको भाज्या फुलांचा धंदा करते. ती ते सगळं जमनाला शिकवेल. भरपूर पैसा आहे त्यात.”

   “ अरे दादा, आता अजून वेगळा पैसा कशाला पाहिजे. एव्हढं तुम्ही माझ्यासाठी करता, अजून काय पाहिजे ?” शंकरला भरून आलं. दादानी त्याला जवळ घेत म्हटलं “ तू तेव्हा आमचा विचार केलास. आता आम्ही तुझा करतो. चांगलं केलेलं कधी वाया जात नाही. उद्या सकाळी ट्रॅक्टर घेऊन येतो. आपण सगळेच शेताकडे जाऊ.”

  जमनाने आणलेला शिरा, चहाचा आस्वाद घेऊन सगळे भाऊ बाहेर पडले. कसं होईल ? काय होईल? या विचारात शंकरला नीट झोपच लागली नाही. सगळ्यांच्या दिलाशाने त्याचं मन हलकं झालं होतं. पहाटवारा अंगावर येताच त्याने डोळे उघडले. आज त्याच्या आयुष्याची नवीन सुरवात होती. जमना बरीच आधी उठली होती. तो उठलेला पहाताच जमनाने चहा ठेवला. आवरून शंकर स्वैपाकघरात आला. तिघेही तिथे चहा घेत बसले होते. आई म्हणाली “ शंकरा, शेतीची पूजा करून काम सुरू करा. त्या पिशवीत सगळी पूजेची तयारी करून ठेवली आहे. जमनालाही सगळं सांगितलं आहे. पेढ्याचा पुडा त्यात आहे. झुणका भाकऱ्या करून ठेवल्याय. पूजा झाल्यावर, थोडी कामं आटोपले की न्याहारी करून घ्या. उपाशीपोटी कामं सुचत नसतात. लवकर आवरून ये. गुळपोळीचे लाडू तुम्ही तिघेही खाऊन घ्या.”

  “अगं आई, एव्हढं सगळं कधी केलं ?” शंकर

  “ काल रात्री दोघींनी मिळून ठरवलं आणि सकाळीच कामं आटोपून टाकली.” आई

  शंकरला बायकोचं कौतुक वाटू लागलं. तिच्याकडे पहाताच ती पण आनंदाने हसली. जीवन झोपलेलाच होता. त्याला अजून कशाचीच खबरबात नव्हती. शंकर भराभर आवरून तयार झाला. आबांनीही पूजा आवरून आपली तयारी केली. दूध आणि पोळीचा लाडू खाताना आईनी जमनलाही बसवले.

   सात वाजता ट्रॅक्टरचा दुरवरून आवाज येऊ लागला. तसे जमनानी चहाचे कप भरायला घेतले. शंकर सामान घेऊन बाहेर आला. बघतो तर काय ट्रॅक्टर भरून माणसं.

  “ हे रे काय दादा ?” शंकर

 “ चल रं मर्दा तू . जास्त चौकशा करू नये.” दादा मायेने म्हणाला. आत येऊन तिघांनी चहा पीला. शंकर, जमनाने बाहेर गड्यांना चहा नेऊन दिला. मग देवाचा, आई आबांचा, आशिर्वाद घेऊन सगळे निघाले. आबा समोर बसले. बाकी सगळे मागच्या ट्रॉलीत चढले. गप्पांच्या नादात दहा मिनिटात पोहोचल्यासारखं शंकर, जमनाला वाटू लागलं. ट्रॅक्टर थांबल्यावर दणदण उडया मारत गडी माणसंही उतरली. बायकाही सराईतपणे उतरल्या.

  शंकर भारावून समोरच्या शेतजमिनीकडे पहात होता. आता काळी आई त्याला आसरा देणार होती. सध्या तरी तिचं रूप, तेल पाणी नसलेल्या रुक्ष केसांसारखं होतं. ठिकठिकाणी बाभळी, काटेरी झाडं वाढली होती. खडकांची संख्याही बरीच जाणवत होती. एव्हढं मोठं रान आ वासून उभं होतं. पण हे साफ कधी आणि कसं होणार ? शंकर भिऊन गेला. जमनाही बावरली. समोरचं चित्र निराशाजनक होतं. पडीक खोल्यामध्ये उंदीर, घुशी यांच साम्राज्य होतं. आबांनी त्यांची दशा ओळखली.

  “ अरे एव्हढं बावरायला काय झालं ? आठ दिवसांनी हीच का ती जमिन तुला ओळखू येणार नाही. पावसाळ्याला दोन महिने टेम हाए, तवर बघ हा बरफीचा तुकडा तयार होतो का न्हाई.” शंकरला हसू आलं. जमनाही सावरली. सासुबाईनी सांगितल्याप्रमाणे मोकळी जागा जरा साफसुफ करून देव ठेवले. शंकरनी दिवा उदबत्ती लावली. हळदी कुंकू वाहून पेढ्याचा नेवेद्य दाखवला. भूमातेच्या पाया पडून, आता मागे हटायचं नाही हा निश्चय केला. प्रसाद वाटप झाल्यावर दादा जवळ आला. त्याने सांगितले

 “ आज आपण फक्त शेतजमिनीतले सगळे झाडं तोडणार आहोत. कडेने असलेले झाडं तसेच रहातील. काटयाकुट्या तिथेच नंतर जाळू. जपून आतमध्ये कामं करा. पायाखाली कुठले जिवाणू नाही ना याची खात्री करून मगच कामाला भिडा. चल शंकर उचल ती कुऱ्हाड.”

  शंकराला हे नवीनच होतं, कारण आतापर्यंत त्याला लोकांकडून कामं करून घ्यायची सवय होती. स्वतः करायची नव्हती. काही न बोलता त्यानी कुऱ्हाड उचलली. आबा म्हणाले “ शंकरा, अजून तुला सवय नाही. तू छोट्या फांद्या तोड.” जमनाही एक कुऱ्हाड घेऊन निघाली. क्षणभर तिला वाटून गेलं, या बायकांनी जशी नऊवारी घातली आहे तशीच आपणही घालायला हवी होती. काम करताना किती सोईचं होतं ते. साडीचा पदर खोचून तिनी कामाला सुरवात केली. दोन घावातच लक्षात आलं हे काही येर्या गबाळ्याचं काम नाही. पण निश्चयाने ती घाव घालू लागली. प्रश्न तिच्या संसाराचा होता. दोन तासानी आबांनी सुट्टी दिली. जमनाने आणि दोघींनी एका झाडाखाली बसून दुरडीतल्या भाकऱ्या आणि त्यावर झुणका, लोणचं ठेऊन प्रत्येकाच्या हातात दिल्या. तासाभराच्या विश्रांती नंतर परत कामं  सुरू झाली. गड्यांचा वेग झपाट्याचा होता. झाडांचे ओंडके एका बाजूला रचले गेले. तोडलेल्या फांद्या दुसऱ्या बाजूला रचल्या गेल्या. नंतर दोन बायकांनी आणि जमनानी मिळून शेतावरच्या त्या दोन खोल्या साफ केल्या. घुशींनी केलेली घरं रिकामी आहेत हे पाहून सिमेंटनी लिंपून टाकली. खिडक्यांच्या बिजागिरीं मध्ये तेल घालून त्या सहजतेने उघडझाप होत आहेत ना ते पाहून घेतलं. सासुबाईंनी तिला हे सगळं विचारपूर्वक सांगितलं होतं, आणि सामानही दिलं होतं. खोल्या स्वच्छ झाल्यावर तिघींनी आजूबाजूचं आवार झाडून स्वच्छ केलं. घरामागच्या बाजूला चार गडी दणकट झाडाचे बुंधे घेऊन आले. हे कशासाठी विचारायच्या आतच गडी म्हणाला “ वहिनी गुरं बांधायला गोठा करायला हवा.” वाघाची गती असलेल्या भीमप्पाने दणदण चार बाजू खणून ते ओंडके त्यात रोवले. एक मोठा ओंडका मधे रोवून ट्रॅक्टरमधे आणलेल्या झाप्यांचं छप्पर तयार केलं. दादा येताना काय काय घेऊन आला. शंकरला कौतुक वाटलं. रखमाने एका मोठ्या टोपलीत थैलीतले शेणगोळे काढले व ते पाण्यात भिजवू लागली. खोलीत तर फरशा होत्या मग हे कशासाठी ? जमनाला प्रश्न पडला. रखमा टोपलं घेऊन गोठ्यात गेली. उभं अंगण तिने सारवून काढलं. चार वाजले. तसा आबांनी काम थांबवायचा इशारा दिला. बरोबर आणलेले रिकामे ड्रम, बाजूच्या शेतातून पाणी भरून आणून ठेवले होते. सगळयांनी हातपाय धुतले. शेजारच्या शेतमालकाने सगळ्यांना चहा आणला होता. दुपारीच दादाने शंकर व जमनाची ओळख करून दिली होती. दिलदार जीवा आणि कमळा वहिनी दोघांनाही आवडून गेले. आता तेच त्यांचे खरे सोबती रहाणार होते. रान बरच मोकळं झालं होतं. छोटे छोटे झाडं कापून झाले. पालापाचोळा, काटक्या लक्ष्मणाने पेटवून दिला. उद्या सकाळी परत सगळे येईपर्यंत ते जळून जाऊन त्यातले जिवाणू निघून जाऊ शकणार होते.

     दादानी सगळ्यांची रोजगारी दिली. तसा शंकर कसनुसा झाला. छोटू म्हणाला “ भाऊ, तुला महित आहे, ते ओंडके जे तोडून ठेवले आहेत आणि उद्या अजून जी झाडं कापली जातील, ते केव्हढयाला विकले जातील ? किमान पन्नास साठ हजार तरी येतील तुला.”  

 “एव्हढे  ?” शंकर

“ हो. त्यात तुझी कितीतरी कामं भागून जातील. कितीतरी आवश्यक सामान येईल. शिवाय बाकीच्या फांद्या सरपण म्हणून घेतात तेही दहा हजारात सुटेल.” शंकर ऐकतच राहिला. आबांनी त्याला आधीपासूनच शिक्षणात हुशार म्हणून तालुक्याला ठेवला. त्यामुळे शेतीच्या बऱ्याच गोष्टींपासून तो वंचित राहिला. बाकी तिघे मात्र आबांच्या हाताखाली तयार झाले.

   ट्रॅक्टरमधे सगळे बसले. दिवसभराच्या कामाने दमले होते. शंकर, जमना, आबाना सोडून ट्रॅक्टर निघून गेलं. त्यांना पहाताच जीवन धावतच बाहेर आला. त्याला पाहून शंकर, जमनाचा जीव सुखावला. याच्याच तर साठी सगळं करायचं होतं. शंकरच्या मनात आलं. आपल्या बापानी पण तर आपल्यासाठी कष्ट उपसले आणि या वयातही उपसावे लागत आहे. तेव्हढ्यात आईचा आवाज आला “ ताक पिऊन घ्या रे सगळेजणं. ,मग कढत पाण्याने आंघोळी करा. जेवण तयार आहे.” जीवन थंडगार ताकाचे पेले घेऊन आला. ते पिऊन एकएक करत तिघांनी गरम पाण्यानी अंग शेकून काढली. आंघोळी करताच बरं वाटायला लागलं. जमनानी तोपर्यंत स्वैपाकघरात पानं घेतली होती. जीवन मधे मधे करत मदत करत होता. दोघी सासवा सुनांच्या दिवसभराच्या अहवालाच्या गप्पा चालल्या होत्या. मेथीची भाजी भाकरी,बाजरीचा खिचडा, त्यावर शंकरच्या आवडीची खूप मोहरी, हिंग. जिरे, कढीपत्ता, घालून केलेली फोडणी, गूळ, त्यावर साजुक तूप. हा बेत पहाताच शंकर खुप खुष झाला. आईच्या हातचं चवदार जेवण जेऊन तृप्त झाला.

   आबा म्हणाले “ उद्या विहीरीचा माहितगार येणार आहे. तो काय सांगतो ते बघू.”

 शंकराचे डोळे मिटायला लागले होते. आईचं जेवण होईपर्यंत त्यानी कसाबसा तग धरला. अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप लागली. जमना कधी आली ते ही त्याला कळाले नाही. जमना खोलीत आली तेव्हा गाढ झोपलेल्या शंकरला पाहून तिला कणव आली. पांढरपेशा जीवनातून बाहेर पडून आता रात्रंदिवस कष्टाचं जिणं स्विकारणं हे सोपं काम नव्हतं. पण यात सुरक्षितता होती. इथून कोणी उठ म्हणणारं नव्हतं. विचारतच जमनाही झोपी गेली.

   सकाळी सगळे परत शेतावर गेले. लक्ष्मणाने लावलेल्या आगीने बरच काम झालं होतं. काटे कुटे, वाळलेले गवत जळून साफ झालं होतं. आज मोठमोठ्या झाडांची कापकापी होती. दोन गडी बॅटरीवर चालणारी आरी घेऊन आले होते. अकरा वाजता विहीरीचा माणूस येणार होता. शंकरने मन भरून काळं रान पाहून घेतलं. कालच्या आणि आजच्या दृश्यात कितीतरी सकारात्मक फरक होता. दोन बायकांनी गोठ्यातल्या एका कोपऱ्यात तीन दगडांची चूल लिंपली. त्याला हळदीकुंकू वाहून त्यात वाळलेल्या काटक्या घातल्या व एक मोठं भांड तापायला ठेवलं. आज छोटूनी दोन किटल्या भरून दुध आणि मडकंभर दही आणलं होतं. आरीवले गडी एका झाडाजवळ जाऊन ते कापायची तयारी करू लागले. बटण दाबताच ती धडधडत सुरू झाली. दोघांनी दोन्ही बाजूनी झाडाच्या बुंध्यात कटर खुपसलं आणि सरर आवाज करत लाकडाचा भुसा वेगाने उडवत ते झाड कापलं जाऊ लागलं. शंकरला क्षणभर कसंतरी झालं. एव्हढी मोठी जिवंत झाडं कापायची ? त्यांना वाढायला किती काळ लागतो आणि कापताना दहा मिनिटही पुरत नाही. मुंबईतल्या झाडं जगवा, पाणी वाचवा. या मोहीमा त्याला आठवू लागल्या. पण आता त्याच्या पोटाचा प्रश्न होता. एकदा तो सुटला की परत झाडं लावून जगवू शकणार होता. चहाची फेरी होऊन सगळे कामाला लागले. त्या मोठ्या झाडावर कुऱ्हाडीचे हात पडू लागले. तोडलेल्या फांद्या बाजूला पडू लागल्या. अकरा साडे अकरा पर्यंत विहीरीचे पाणी बघायला माणूस आला. चहूबाजूनी पहाणी करून त्याने एक धातूची नळी काढली व तो फिरवू लागला. जिथे जिथे त्याला शंका वाटत होती. तिथे तिथे तो फिरत होता. अर्धा तास फिरून निरीक्षण केल्यानंतर त्याने आनंदाची बातमी दिली. विहीर जिवंत आहे. तिच्याखाली दोन झरे जिवंत असल्याची शक्यता वर्तवली. काही फूट खणल्यावरच पाणी लागेल असे सांगितले. तसा सगळ्याना आनंद झाला. मोठी झाडं आरीने कापून झाल्यावर ते गडी निघून गेले. बाकीचे दिवसभर फांद्या कापून ओंडके येस्तवार लावू लागले. आठवडाभर हेच काम चालू होतं. कुठे दिवस उगवत होता आणि कुठे मावळत होता कळत नव्हतं.

    संध्याकाळी दादा म्हणाला “ शंकरा, आता इथे उद्यापासून एव्हढे लोकं येणार नाही. ट्रॅक्टरचा एक माणूस आणि त्याला मदतीला दोघेजणं एव्हढेच येतील. सगळं रान ते नांगरून देतील. त्यातले दगड धोंडे बाजूला करतील. तू त्यांच्यावर नजर ठेव. तू पण गावातून एकटाच ये. दुपारी वखारवल्याला घेऊन मी येतो. तो एकदा लाकडं पाहून गेला, सौदा ठरला की ते सगळं घेऊन जाईल मग तुम्हाला ही जागाही मोकळी होईल.”

   शंकरने मान डोलावली. अजूनही स्वतःहून काही करायला त्याचं डोकं चालत नव्हतं. एकेक कामं आवरत गेले. नांगरणी झाल्यावर काळीशार माती आपलं सोंदर्य उलगडून वर आली. लाकडाला आवश्यकतेपेक्षा जास्त भाव मिळाला. ते पैसे आल्यावर दादानी रोजंदारीचे दिलेले पैसे त्याला वापस केले. विहीर दुरुस्तीही उरलेल्या पैशातून होऊ शकत होती. पण अजून बरीच कामं व्हायची आहेत तिथे तो पैका वापर म्हणत बापाने मोडता घातला. सर्वानुमते तिथे बोअर मारायचं ठरलं. एका संध्याकाळी बोरिंगचे धुड तिथे आले. हे काम शक्यतो संध्याकाळी करतात. त्या आलेल्या बायामाणसांनी आधी एका ठिकाणी चुली मांडल्या. तिथे खिचडीचा हंडा रटरटायला लागला. हे लोकं आधी जेऊन घेतात मग कामाला लागतात. अर्ध्या तासातच ते धुड धडधडायला लागलं. रानभर आवाज घुमू लागला. संध्याकाळ असल्याने जमना जीवनला घेऊन आली होती. कमरेवर हात ठेऊन मोठ्या उत्सुकतेने तो हे सगळं बघत होता. दोन तासातच पाण्याचं कारंज उसळून वर आलं. निसर्गाचा आणि मानवाचा हा चमत्कार पाहून तिघेही हरखून गेले. जमनाने पाण्याची पूजा केली. सर्वांनी ते पाणी थोडं थोडं पीलं. पाण्यावरच्या शेतीत शंकरला खूप काही करता येण्यासारखं होतं. पावसावर अवलंबून रहायची त्याला गरज उरली नाही. विहीरीच्या तिथे जुना हौद होता. आधी तिथे बैलाच्या मोटेने पाणी जमा केले जायचे. त्याची डागडुजी करून मोटारने बोअरिंगचं पाणी त्यात पडेल अशी सोय करून घेतली होती. हौदातून पाट काढून शेतीला पाणी पाजता येणार होतं.

    पावसाळा तोंडावर येऊन ठेपला. आता शंकर, जमनालाही कामं सुचू लागले होते. शंकरने आधी शाळेतल्या हेडमास्तरांना भेटून जीवनची अडमिशन करून घेतली. मास्टरांना जीवनकडे लक्ष ठेवण्याची विनंती केली. मास्तरही प्रेमळ वाटले. त्यांनीही काही काळजी करू नका, मी लक्ष ठेवेन असे आश्वासन दिले. आई आबांनी, शंकरला आता शेतातल्या घरात रहायला जा सांगितले तसे शंकर, जमनाच्या डोळ्यात पाणीच आले. “ अरे डोळ्यातून पाणी काय काढता ? आताच तर खरी शेतकऱ्यांच्या कामाला सुरवात होते. दादा, लक्ष्मण, छोटू तुम्हाला सगळं सांगतच रहातील. पण तुम्ही तिथे राहिलात तर तुम्हालाही हळूहळू गोष्टी सुचायला लागतील. शेतीची राखणही करायला लागते. जनावरं पिकं खायला येतात. तुडवून जातात. ते बघाव लागतं. जीवन तर भिवण्णा बरोबर रोज तिकडे चक्कर मारेल. मधे मधे आम्ही पण येऊ. शंकरला तर हे आण, ते आण करत एक दिवसाआड गावात चक्कर मारावी लागेल.” हे ऐकून दोघांचं मन हलकं झालं.

  “ उद्या त्या घरी एक चक्कर मारून काय काय सामान लागेल तिथे रहायला ते बघून घेऊ.” शंकर

 “  अहो, आपलं मुंबईचं सगळं तर सामान पडलं आहे. ते आधी लावू मग काही लागलं तर विकत आणू.” जमना म्हणाली.

   दुसऱ्या दिवशी दादाने पाठवलेल्या ट्रॅक्टरमधे सगळं सामान चढवलं गेलं. दोन्ही वेळचं जेवण सासुबाईंनी बरोबर दिलं होतं. घर लावून झालं की जीवनची शाळा सुरू होईपर्यंत आई, आबा, जीवन शेतावर रहायला येतील असं ठरलं.

   ट्रॅक्टर मधून सामान उतरवून गडी निघून गेले. शंकर, जमना मग कामाला भिडले. बॉक्सवर कुठलं सामान आहे ते लिहिले होते. त्यानुसार खोल्यांमध्ये विभागून ठेवलं. जमनाने हौसेने फ्रीज, टीव्ही घ्यायला लावला होता. फ्रीज तर स्वैपाकघरात नीट लागला. टीव्हीचं नंतर पाहू म्हणून माळ्यावर ठेऊन दिला. गॅसची शेगडी ओट्यावर ठेऊन सिलेंडर लावून दिला. आधी त्या नव्या जागेत छान चहा कर असे फर्मान सोडून शंकर बाहेर आला. तीनही खोल्या मोठ्या ऐसपेस होत्या स्वैपाकघराला मधे, मागे दारातून बाहेरच्या अंगणात जाण्याचीही सोय करून दिली होती. शंकरने तोपर्यंत बाहेरच्या खोलीत घडीच्या खुर्च्या मांडल्या. टिपॉय नीट पुसून ठेवला. एक शोकेस होतं ते मांडून भिंतीवर खिळे ठोकले. एकावर घडयाळ, देवाचा फोटो लावून बाकी ठिकाणी जमना म्हणेल तसे तिचं कलाकुसर टांगलं. चहा बिस्किटं घेऊन आल्यावर अंगणातल्या सावलीत शेताकडे बघत त्यांनी चहा पिला. किती आनंदाचे क्षण वाटले त्या दोघांना. असे क्षण मुंबईत दुर्मिळ होते. शंकरच्या मनातून अजूनही मुंबई जात नव्हती.

   “ अहो, या अंगणाच्या बाजूनी बरीच जागा मोकळी आहे. कमळा वहिनी म्हणतात तसं तिथे भाजीपाला आणि फुलझाडं लावली तर ?” जमना

 “ खरच की ग. घर लागलं की तुला वाफे करून देतो. ते आता मला जमायला लागलय.” यावर दोघेही हसू लागले. त्यांना निवांत बसलेलं पाहून जिवाप्पाने म्हणजे त्याच्या नवीन शेजाऱ्याने दूरवरून हाळी दिली. तसे शंकरनेही हात हलवत साद घातली. संध्याकाळी भेटू असे म्हणत दोघेही कामाला लागले. जमनाने स्वैपाकघरातल्या फडताळात सगळी भांडी लावली. मिक्सरला जागा केली. फोल्डिंगचा डाइनिंग टेबल कोपऱ्यात लावून ठेवला. पिण्याचे भांडे पाणी भरून ठेऊन दिले. माठ भरला. स्वैपाकघर लागल्यावर ती बाहेर आली. हॉलचही काम झालं होतं. आतल्या खोलीत शंकर कपाटात कपडे लावून ठेवत होता. मुंबईचे कपडे आता इथे कामी येणार नव्हते. शेतात राबायला पँट शर्ट चालणार नव्हते. त्यामुळे त्यानी बरमुडा घालून काम करायचं ठरवलं. जमनलाही सहावार साडी घालून भराभर कामं उरकता येत नव्हती. तसं तिनी पंजाबी ड्रेस घालून कामं करायची ठरवली. सुदैवानी सासू सासऱ्यांची कशालाच आडकाठी नव्हती. कपडे वर्गवारी लावून झाले. शंकर डबलबेडचे पार्ट जोडायला बसला. जमना खिडक्यांना पडदे लावू लागली. दोघेही कामं करता करता गप्पा मारत होते. बेड लावून झाल्यावर त्यावर गादी घातली व चादर पसरवून त्यांनी काम संपवले. मोठं मोठं सामान सगळं लावून झालं होतं. बाकी बॉक्स हळूहळू उघडले तरी चालणार होतं. दोघांनी नवीन लागलेल्या घरातून चक्कर मारली. खिडक्यातून दिसणारं शेतीचं दृश्य डोळ्यात साठवून घेतलं. कुठले फुलझाडं, फळझाडं लावायचे याची  लिस्ट केली. तिला काही कुंड्याही हव्या होत्या.

   मग अंघोळी केल्या. जेवण केलं. थकले भागले जीव एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. दूरवरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या आवाजाने त्यांना जाग आली. साडेचार वाजून गेले होते. बराच वेळ झोपलो हे जाणवून दोघेही ताडकन उठले. शंकर दार उघडून बाहेर आला. ट्रॅक्टर घेऊन दादा आला होता. त्यातून उडी मारत तो म्हणाला “ काय म्हणतो राजा राणीचा संसार ?” तशी जमना लाजून पाणी आणायच्या निमित्ताने आत गेली. शंकर बघू लागला दादाने एक म्हैस, एक गाय वासरू, १० कोंबड्या, भैरू कुत्रा आणला होता. या सगळ्यांना लागणारं सामान म्हणजे दावण, कोंबडयाचं डालं, दोन तीन मोठे टब, गुरांचा चारा, भैरूची थाळी, आबा आल्यावर ते अंगणातच झाडाखाली बाज टाकून बसतात म्हणून एक बाजही आणली होती. तिघांनी मिळून सामान खाली उतरवले. दादानी म्हसरं गोठ्यात नेऊन बांधली. कोंबड्यांना गोठ्याच्या एका कोपऱ्यात मोठ्या डाले खाली घातलं. कुत्र्याला मोकळं केलं. भैरू इकडून तिकडे हुंदडू लागला. शंकराचा त्याला लळा असल्याने तो तिथे राहिल असं वाटत होतं. नाहीतर दादा निघाला की हा ही पळत सुटला असता. भैरूची थाळी जमनाला देत म्हणाला “ हे बेनं या थाळीशिवाय जेवत नाही बघ.”

  गाय वासरांची पूजा करून जमना सुखावली. आता तिचा संसार विस्तारला होता. मुंबईच्या आम्ही दोघं राजाराणी, राजकुमार अशा संसारपेक्षा या सगळ्यांमधे तिला जिवंतपणा, आनंद वाटू लागला. आतून घर पाहून दादा एकदम खुष झाला. “ लई भारी की रं गड्या. तू तर एकदम फार्म हाऊस करून टाकलस.” शंकर सुखावला. गाई म्हशींना चारा किती घालायचा, कोंबड्याना कुठलं आणि किती धान्य घालायचं, भैरूला जेवायला काय लागतं. हे सगळं सांगून थोडे दिवस गडी धारा काढायला येईल, कारण  नवीन माणसाला लगेच जनावरं हात लावू देत नाही. त्यांच्याशी हळूहळू ओळख झाली की तुझे तू सगळे कर. असे दादानी समजावून सांगितले. चहा पिऊन दादा निघाला. तसा शंकर म्हणाला “ दादा, उद्या एखादा गडी लावून देतो का इकडे ?”

“ का रं ?” दादा. “ तो आणि मी मिळून अंगणाच्या बाजूने भाजीचे आणि फुलांचे वाफे करून घेतो.”

“ बरं धाडून देतो. वाफे तयार झाले की गंगा वहिनीना घेऊन येतो. कुठल्या भाज्या, फुलं घेणार     तुम्ही?  म्हणजे तशा बिया पण बरोबर घेऊन येतो.” शंकरने दुपारी केलेली लिस्ट दाखवली. पीएचडी केलेल्या माणसाला शाळेतल्या मुलानी लिहिलेलं दाखवल्यावर तो कसा हसेल तसं हसत दादा म्हणाला “ बरं. गंगावाहिनी पण काही बिया, रोपं घेऊन येईल.”

    दादा निघून गेला. दूरवरून मावळतीला सूर्य केशरी होत होत डोंगराआड नाहीसा झाला. अशा अद्भुत दृश्यांची दोघांनाही सवय नव्हती. भारावलेल्या नजरेने ते तसेच बसून राहिले. गार वाऱ्याच्या झुळुका अंगाला स्पर्शून जात होत्या. भैरू शंकरा जवळ बसून होता. अंधार जाणवायला लागला तशी  जमना उठली. घरातले दिवे लावून देवाजवळ निरांजन लावलं. उदबत्ती सगळ्या घरात ओवाळली आणि मनोभावे देवाला नमस्कार केला. सकाळच उरलेलं जेवण गरम करून शंकरला हाक मारली. भैरूच्या थाळीत दूधपोळीचा काला ठेवला. शंकरने गाई म्हसरांना वैरण घालून त्यांच्यावरून मायेने हात फिरवला. मुक्या जनावरांनाही नवीन वातावरणात बावरल्यासारखं होत असावं. कोंबड्यांच्या डालीखाली थोडे दाणे सरकवून दिले. मग जेवायला घरात गेला. जेवण झाल्यावर दोघांनी आवारात चक्कर मारली.  आकाश चांदण्यांनी गच्च भरलं होतं. मुंबईला मोठ्या मुश्किलीनी चंद्र दिसायचा. इथे चंद्राच्या साक्षीने चांदण्या आपल्या वैभवानिशी झगमगत होता. रात्रीला जणू त्यांची भूल पडली होती. काळी जमिन ती चांदणी रात्र पिऊन घेत होती.

   मागे कसला आवाज आला म्हणून चमकून दोघांनी तिकडे पहिलं, तर जिवाप्पा आणि कमळा आले होते. “ अरे ये बैस. झाली का जेवणं ?” शंकर म्हणाला. कमळाने पुढे होऊन एक पिशवी जमनला दिली व म्हणाली “ पांढरे कवठं आहेत.” जमनाने पिशवीत पहिले तर त्यात सहा गावरान अंडे होते. अंड्याला कवठं म्हणतात हे तिला आजच कळाले. फ्रीजमधे अंडे ठेवून तिने कमळाला घर दाखवले. गावाकडच्या कमळाला ते घर म्हणजे अप्रूप वाटलं. काय नव्हतं त्या घरात. थोड्याफार गप्पा मारून ते दोघे गेले. जाताना अंधारात जास्त इकडे तिकडे फिरू नका आणि रात्री दारावर थाप पडली तरी दार उघडू नका म्हणून बजावून सांगितले. ते ऐकून दोघेही घाबरून गेले. दारं खिडक्या नीट बंद आहेत ना बघून मगच झोपी गेले.

   सकाळी जाग आली ती गाईच्या हंबरण्यानी, कोंबड्यांच्या आरवण्यानी. इतकी सुंदर सकाळ त्यांनी फक्त पुस्तकात वाचली होती. चहा ठेऊन दोघेही बाहेर अंगणात आले. दुधासाठी वासरू आसुसलं होतं. पण किती वेळ दूध पिऊ द्यावं ? परत त्याला काढायच कसं तिथून ? याबाबत साशंकता असल्यामुळे त्याने तो विचार सोडून दिला. कोंबड्यावरची दालं उचलली, तश्या सगळ्या क्वकक्वक् करत बाहेर उधळल्या आणि त्यांचा दाणे टिपण्याचा कार्यक्रम चालू झाला. भैरू इकडून तिकडे उड्या मारत होता. शहरी कुत्र्यांसारखं त्यांना फिरायला न्या. हा प्रकार इथे नव्हता. दादाने आणलेले कुत्र्याची बिस्किटे भैरूला देऊन दोघ बाजल्यावर चहा पीत बसले. मग जमनला एक एक लक्षात येऊ लागलं. इथे अंगण झाडावं लागतं. मग सडा रांगोळी करतात. तुळशीला पाणी घालतात. आई काय काय करायची ते आता जमना आठवू लागली. शंकरला पंपावरून पाणी आणायला पाठवून ती अंगण झाडायला लागली. सकाळच्या कोवळ्या उन्हानी घर न्हाऊन निघालं. सडा घालून झाल्यावर आई काढायची तशी रांगोळीची चार बोटं रेखली. शंकरही ते कौतुकाने पाहू लागला. पण त्याला हे पाणी आणण्याचं काम कटकटीचं वाटू लागलं. लवकरच एक टाकी बसवून घेऊन पाइप लाइन टाकून द्यायचा विचार त्याने पक्का केला.

   तेव्हढ्यात ट्रॅक्टरचा आवाज येऊ लागला. त्यामधे गंगा वहिनी, एक गडी, आणि बाकी बरच सामान दिसत होतं. दाराशी आल्यावर वहिनी हसतच उतरल्या. “ काय भाऊजी कसं वाटतय गावात ?” त्याला चिडवत आत गेल्या. गडी म्हणाला आधी दूध काढतो. गाय वासरू खोळंबले असतील. मग हे सामान काढू. शंकरही त्याच्या बरोबर गेला. गड्याने बादली आणि तांब्याभर पाणी घेतलं. गाईला थोपटून तिच्या आंचळवर पाणी मारलं आणि तो दुध काढू लागला. शंकर तिला थोपटत होता. जणू स्वतःची ओळख करून देत होता. लवकरच गड्याने वासराला सोडून द्या म्हणून सांगितले. मग वासरू दुध पिऊ लागलं. दुधाने भरलेली बादली चरवीत ओतत गडी म्हणाला “ हे धारोष्ण दुध पित चला. खणखणीत तब्बेत राहिल बघा.” त्याने दुध आत नेऊन दिले.

   “ भाऊजी चला चहा नाष्टा करून घ्या. तुमची आवडीची थालपीठं आणली आहेत बघा. ह्यावर लोण्याचा गोळा.” गंगा वहिनी ताटली वाढून देत म्हणाली.

 “ अरे वा !” म्हणत शंकर आणि गडी मांडी मारून बसले. चौघेही खाऊन घेत होते. नंतर त्यांना कामाला लागायचं होतं. अंगणाच्या चारही बाजूनी दहा बाय दहाचे वाफे तयार केले. मधून घराला यायला आणि जायला रस्ता सोडला. एक एक वाफा तयार झाल्यावर गंगा आणि जमनाने ते पाण्यानी शिंपून घेतले. गाई म्हशींचे शेण घालून ते खताचे बेड कसे तयार करायचे ते गंगा वहिनीनी समजावून सांगितले. या वाफ्यांमधे ठिबक सिंचन किवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी घालायची पद्धत दाखवली. यामधे पाणी वाया न जाता पिकाला योग्य त्या प्रमाणात पाणी मिळतं. भाजी, फुलांच्या बिया लावायचं काम ते आजही करू शकत होते. त्यांना पावसाची गरज नव्हती. पण गंगावहिनीनी आठवडाभर त्या वाफ्यांना शेणकाल्याचं, चहा पत्तीचं खत त्यात टाकायला सांगितलं. गड्याला  मागे चार बाय चार फुटाचा खड्डा करायला सांगितला. यामधे सगळा ओला कचरा टाकायचा. जमना म्हणाली

“ भाजीपाल्याची देठं, साली तर गाई म्हशी खातील मग बाकी काय कचरा जमा होणार ?”

  “ ते ही आहे म्हणा. पण एक करता येईल. समोरच्या रस्त्यावर एक मोठं देऊळ दिसतय ना ? त्यांनी देवावर वाहिलेली फुलं, निर्माल्य झाल्यावर तुम्ही मागून आणली तर ते देतीलही. त्याबदल्यात तुम्ही देवासाठी फुलं देण्याचे ठरवून घ्या. गांडूळखताला खूप मागणी असते. ते बाहेर विकून खूप पैसा मिळतो. डबीत घालून थोडी गांडूळही आणली आहेत. जमना शहारली. तशा वहिनी म्हणाल्या “ अग तुला काय ते हातात घेऊन कुरवाळायचे आहेत का ? पडले रहातील त्या खड्ड्यात. घराच्या कितीतरी मागच्या बाजूला आहे ते. पावसाळ्यात मात्र त्यावर झाकण ठेवा नाहीतर तरंगून बाहेर येतील.”

  वहिनींनी भाज्या फळं बियाण्यांच्या पिशव्या दिल्या. काही कंपनीची खतं दिली. विशिष्ट पध्दतीनी बिया कशा लावायच्या त्या लावून दाखवल्या. हे सगळं करण्यात संध्याकाळ झाली. दुपारी वहिनींनी आणलेली भाजी भाकरी खाऊन परत काम सुरू केलं होतं. गडयानी दुधाच्या धारा काढल्या की ते निघणार होते. जमनाने तोपर्यंत तिखट सांजा केला. गडी परत चरवीभर दुध घेऊन आला तेव्हा आता एव्हढ्या दुधाचे काय करायचे असा प्रश्न शंकरला पडला. आईकडे पाठवावे तर छोटू आधीच तिच्याकडे भरपूर दुध पाठवत होता. गडी म्हणाला “ कशाला काळजी करता ? आता दोन गिर्हाइक तुम्हाला जोडून देतो. प्यूअर दुधाचे पन्नास रुपये, आणि थोडे पाणीवाले दुध चाळीस रुपये.”

 “ वा, जमलं तर मग. पण आता एव्ह्ढ्या दुधाचे काय करायचे ?” शंकर

 “ ही किटलीच घेऊन जातो आणि बाजारात विकून टाकतो. यात सहा शेर दुध आहे. उद्या पैसे देतो आणि काय झालं ते ही सांगतो.” गडी म्हणाला.

 सगळयानी तिखट सांजा खाऊन लस्सी पिली. सकाळचं दुध विरजत लावून जमनाने लस्सी केली होती. “ अगं जमना, अशी लस्सी पाठवत जा की भोलाच्या हॉटेलवर.”

“ घेईल का तो ?” जमना.

“ अगं न घ्यायला काय झालं ? छान झाली आहे. मी सांगते त्याला.” वहिनी म्हणाल्या

शंकर, जमनाचा विश्वासच बसेना. एकामागून एक उद्योगधंदे बाहेर येत होते. वाटा उलगडल्या जात होत्या. गडी म्हणत होता “ दादा, गुरांना चरायला घेऊन जावं लागतं. त्याशिवाय अन्न पचत नाही त्यांना. उद्यापासून थोडं फिरवून आणत जाऊ. नंतर एक मुलगा पाठवतो रानातून गाईम्हशी फिरवायला.”

   निरोप घेऊन दोघं निघून गेले. शारीरिक कामाची सवय नसलेले ते दोघे जीव आताच थकून गेले. ट्रॅक्टर मधून काढलेलं सामान बाजूला पडलं होतं. त्यात जमनाने सांगितलेल्या काही कुंड्या, दहा वेगवेगळ्या रंगाचे गुलाब, जाई जुई, बोगनवेल, मोगरा, पारिजात, तगर, अद्रकाच्या कुड्या, गवती चहा, गलांडे, झेंडूची रोपं, शेवंती अशी सगळी झाडं दादानी पाठवली होती. ते बघतच त्यांना झोप यायला लागली. शेतकरी लवकर का झोपतात याचं रहस्य त्यांना आता कळालं होतं. दोघं झोपायला गेले.

    चक्र चालू राहिलं. व्यवसायाचे एकेक पदर उलगडत जाऊन शंकर जमनाचा जम बसू लागला. भावांच्या सहाय्याने नांगरणी पेरणी करून उभं पीक तरारून येतानाचे क्षण पाहून दोघं थरारून गेले. पोपटी क्षणांची ती पहिली आठवण दोघेही विसरू शकणार नव्हते. उगवत्या सूर्यात न्हालेली रंग सृष्टी, निळ्याभोर आकाशात उडणारी पाखरं, पहाटेचे पक्षांचे सुरू होणारे विविध आवाज, पहाटवरा, मातीचे स्पर्श, गाई वासरांशी झालेली जवळीक, आनंदात कलकलणाऱ्या कोंबड्या, सतत पाठीशी रहाणारा भैरू, जिवाभावाची माणसं सगळच कसं जुळून आलं होतं.

   जमनाचे वाफे तरारून फुलले होते. त्यात भेंडी, दुधी भोपळे, कारले, टोमॅटो, मिरच्या, पालक, कोबी फ्लॉवरचे गडडे, लगडले होते. फुलांचे रंगीबेरंगी ताटवे डोळ्यांचे पारणं फेडत होते. गवती चहा, कढीपत्ता, हळदीची पण चांगली वाढ झाली होती. कुंड्यांमधून खास शोभेची झाडही तिने हौसेने लावली होती. जाई जुई, कुंदा, शेवंती सीझनमध्ये जमना दोऱ्याच्या गाठीत गुंफून सुंदर गजरे करत असे. त्यामधे पिवळी बटन शेवंती, लाल गुलाबाच्या पाकळ्या, ओवून रंगसंगती साधत असे. तिच्या गजऱ्यांना खूप डिमांड होती. गजरे करण्यासाठी तिने दोन बायकाही ठेवल्या होत्या. एक पोरगा बाजारात ते गजरे विकायचा. पैशाचा ओघ चांगलाच वाढला होता. काळ्या आईची अपार माया आता त्या दोघांना चांगलीच उमगली होती.

   शाळेला सुट्ट्या लागल्या की जीवन इकडेच असायचा. शेतातल्या घरात रहायला त्याला फार आवडायचं. एक तर तिथे आई बाबा होते आणि एक वेगळं विश्व त्याच्या समोर उलगडायचं. सकाळी डोळे उघडले की खिडकीतून रंगीबिरंगी आकाश दिसायचं. आकाशात कधी रांगेने तर कधी एकटेच उडत जाणारे पक्षी पाहून तो हरखून जायचा. मुंबईच्या खोलीत तर फक्त घरच एका नजरेत सामावून जायचं. इथे तर किती बघू नी काय काय बघू असं त्याला व्हायचं. आई सूर्य उगवतीला आला की त्याला हाक मारायची. तो जागाच आहे. आकाशाकडे बघत आहे हे तिला महित असायचं. आईचा आवाज ऐकताच तो बाहेर यायचा. गोल गोल भिंगोऱ्या घेत अंगणात फिरायचा. कोंबड्याचं डालं मोकळं करून त्यांना सोडायचा. गाईची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवायला त्याला फार आवडायचं. वासरू आता मोठं दिसायला लागलं होतं. त्याच्या पाठीवरून हात टाकून गळ्याभोवती कुरवाळून घ्यायला त्याला फार आवडायचं. उगवती कडून सूर्य वर येतानाचा सृजन सोहळा पहाताना त्याचं भान हरपायचं.

इतके विविध रंग आपण मुंबईला खेळण्याच्या दुकानात पहिले आहेत हे आठवायचं. सुर्योदय होईपर्यंत बाबांच्या धारा काढून व्हायच्या. तोंड धुवून निरशा दुधाचा ग्लास तोंडाला लावून गटगट दूध संपवायचं मग बांधावरून दादा काकानी लावलेल्या चिंचा, आंब्याच्या झाडाना पाणी घालायला आई त्याला पिटाळायची. पंप चालू केलयावर धो धो पाण्यात हा नाचायला लागला की आजूबाजूची पोरंही यायची. मग त्या पाण्यात सगळ्यांची मस्ती चालायची. वहातं पाणी छोट्या छोट्या कालव्यामधून खळखळत शेतीतल्या रोपापर्यंत पोहोचायचं. पाणी पोहोचताच रोपांचं आनंदानी डोलणं जीवनला बेभान करायचं. पाण्यात डुंबायच्या आधी तिथली एक बादली भरून बांधावरच्या झाडांना पाणी घालत त्याच्या खेपा चालायच्या. ते काम जरा जिकिरीचं होतं. कारण ही झाडं म्हणजे शेतीची हद्द असलेल्या खाणाखुणा होत्या. त्यामुळे लांबवर बादली घेऊन जावं लागत असे. त्याचे खांदे भरून येई. पण बाबा म्हणायचे यामुळे तुझे खांदे मजबूत होतील. तू हनुमंतसारखा  डोंगर हातात उचलू शकशील. हनुमान द सुपर मॅनच्या कितीतरी कथा आजीकडून ऐकल्या होत्या. टीव्हीवर पहिल्या होत्या. त्यामुळे न कुरकुरता हे काम तो करत रहायचा. उन्हानी लाल झालेला चेहेरा, घामाने डवरलेलं अंग घेऊन हौदाच्या गार पाण्यात कितीतरी वेळ पडून रहायचा. थोड्याच वेळात मंग्या, रुपेश, किशोर, जयंती यायचे मग काय नुसता धिंगाणा. तासभर मस्ती केली तरी संपायची नाही. बाबांची घराकडून हाळी यायची मग सगळे पांगायचे. तो तसाच बांधावरून पळत घरी जायचा. ओले कपडे काढून, अंग पुसेपर्यन्त आईचा नाष्टा तयार व्हायचा. इथे आई बरेच वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायची. मुंबईला ब्रेडचेच प्रकार जास्ती खावे लागायचे. खाऊन झालं की बाबा त्याला अंगणातल्या वाफ्यांमध्ये काम करायला शिकवायचे. आपण जसं शेतीच्या बाबतीत अडाणी राहिलो तसं तसा आपला मुलगा राहू नये. त्याला शिक्षण, शेती दोन्ही करता आली पाहिजे. याबाबत तो जागरूक होता. आळं कसं करायचं, बी कसं लावायचं, खत पाणी कसं घालायचं कुठल्या रोपाना आधार द्यावा लागतो, किडीची पानं कशी काढून टाकायची, त्यावर ओषधं कशी फवारायची याची सगळी माहिती जीवनला झाली होती. त्याचं सगळ्यात आवडीचं काम म्हणजे तोडणीचं. शाळा चालू असली तरी तो त्यावेळेस यायचा. टोमॅटो, शेंगा, मिरच्या, पालेभाज्या, कोबीचे गडडे, वांगे तोडताना त्याला खूप आनंद व्हायचा. द्राक्षाच्या वेलीवर लटकणारे घोस लागले की त्या झुंबरावर नजर गाडून बसायचा. फुलेही त्यालाच तोडायचे असायचे. त्यामुळे जीवन असला की जमनाचं काम हलकं व्हायचं. फुलांच्या वासाने धुंद होऊन फुलं काढणं, मग ओलसर कपड्यात गुंडाळून ठेवणं, त्याचे गजरे करायला आई बसेल तेव्हा निवडक फुलं तिच्या हाती देणं असं त्याचं चालू असे. पहिल्यांदा खुराड्यात कोंबडीला अंड देताना त्याने पहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावार राहीला नाही. आपण जे अंड खातो ते कोंबडीच्या पोटातून बाहेर येतं याची त्याला मजा वाटत होती. कोंबडीने दिलेले ते सहा अंडे एका दुरडीत गोळा करून आईला दाखवायला जाताना त्याला केव्हढा आनंद झालेला. दुध देणाऱ्या गाई म्हशी पाहूनही मजा वाटली होती.

   मुंबईचं आणि इथलं जग याची सांगड घालताना आधी तो बावरून गेला होता. त्या खोट्या आणि दिखाऊ दुनियेपेक्षा गावकडचं वेगळं विश्व त्याला आवडून गेलं होतं.

   परत मिल सुरू झाली आणि सगळ्याना परत कामावर बोलावलय या बातमीने शंकर अस्वस्थ झाला. पण क्षणभरच. मुंबईत मेहनत करून कमावता आलं नसतं तेव्हढं त्याने दीड वर्षात कमावलं होतं. सुखचैनीच्या वस्तूंबरोबर रहाण्यापेक्षा त्याला आता जीवंत काळ्या आईची माया लागली होती. जीवनही आजीआजोबा बरोबर छान रमला होता. त्या वृद्ध जीवांना त्याच्यामुळे जगण्याची उमेद आली होती. भावांचे सगळे पैसे चुकते करून लवकरच शंकरने शेतावर माडीचं घर बांधलं. काळ पुढे सरकत होता. काही अडचणी आल्या तशा गेल्या पण. अव्याहत चालू राहिलं राहिलं ते शंकर, जमना, जीवनचं काळ्या आईवरचं प्रेम.

                                                                    .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. ..

                   

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED