आरोपी - प्रकरण १२ Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

आरोपी - प्रकरण १२

दुपारी चार ला पाच मिनिटे असतानाच पाणिनी ने क्रिकेट क्लब च्या मैदानात प्रवेश केला. मुद्दामच तो उभा राहून मैदान न्याहाळत उभा राहिला. जणू काही अनेक वर्षांनंतर तो तिथे आला होता आणि आपल्या आठवणीना उजाळा देत आपल्या डोळ्यात ते वातावरण साठवत होता. हळू हळू चालत तो क्लब च्या ऑफिस च्या दिशेने निघाला. पायऱ्या चढून तो वर आला आणि थोडा घुटमळला. त्याला बघून एक माणूस बाहेर आला.
“ यस ? कोण हवय? ”
“ मी पटवर्धन. मी फोन वर इथल्या सिनियर कोच शी बोललो होतो.” पाणिनी म्हणाला.
“ कशा बद्दल?”
“ आम्हाला क्रिकेट खेळायचंय, मैदान बुक करायचं होत.” पाणिनी म्हणाला.
“ सालढाणा ?”
“ असंच काहीतरी नाव होतं, लक्षात नाही आता.”
“ सिनियर कोच तेच आहेत.”
तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून सालढाणा बाहेर आला. “ यस ? कोण हवय? ” त्याने विचारलं.
“ मी पटवर्धन.” पाणिनी म्हणाला.
“ अरे तुम्ही उद्या येणार होतात ना खेळायला?”
“ कालच आपलं बोलणं झालं होतं, आम्ही उद्याच येणार आहोत, पण मी विचार केला कि एकदम उद्या येण्या पेक्षा आज जरा जाऊन सराव करावा, तुमचं जरा मार्गदर्शन घ्यावं. मुख्य म्हणजे क्रिकेट किट अंगावर घालून खेळता येतंय का ते बघावं ! आम्ही पूर्वी खेळायचो ते किट अंगावर न घालताच. ”
“ फोन वर बोलताना माझ्या लक्षात नाही आलं, पण आता तुम्हाला पाहिल्यावर कळलं की, तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात ! तुमचे फोटो पाहिलेत मी अनेकदा,पेपरात.हुशार वकील म्हणून तुमचा मोठा नाव लौकिक आहे.” सालढाणा म्हणाला.
“ माझ्याकडे काही अवघड प्रकरण आली. सुदैवाने मी त्यात आरोपींना, म्हणजे माझ्या अशिलांना निर्दोष मुक्त करण्यात यशस्वी ठरलो.” पाणिनी म्हणाला.
“ चला, जरा तुम्हाला कितपत जमतंय बघतो.”-सालढाणा म्हणाला आणि पाणिनी ला घेऊन मैदानात एका नेट मधे घेऊन गेला.
“ बॉलिंग की बॅटिंग? ” त्याने पाणिनी ला विचारलं.
“ सुरुवात बॅटिंग ने करू.” पाणिनी म्हणाला.
सालढाणा ने नेट मधे एका मुलाला बोलावून पाणिनी ला बॉल टाक म्हणून सांगितलं. पाणिनी चे हात बॉल लागून सडकून निघाले.
“ ग्लोव्ज न घालता उगाच खेळलो. हात पायाला लागलंय खूप.” पाणिनी म्हणाला.
“ चला पटवर्धन , आपण ऑफिस मधल्या शॉप मधे जाऊ. तुम्हाला हवं ते किट घ्या.” सालढाणा म्हणाला.
“ माझ्या मापाचे मिळेल का?” पाणिनी ने विचारलं.
“ पाहू या.”
सालढाणा पाणिनी ला घेऊन शॉप मधे आला. तिथे मोठया बॅगेत बॅट, स्टम्प, पॅड असे सामान ठेवलं होतं.
“ नवीन सेट नको. जुने कोणी वापरलेले किट नाही का? आम्ही एकदाच खेळणार ! नवीन किट चा खर्च कशाला? भाडयाने दिल्यात तरी चालेल ! ”
“ आमच्याकडे काही जुन्या वस्तू आहेत. ”
“ हे किट बघा, एका जुन्या टेस्ट प्लेअर चं आहे, हे दुसरं बघा, आमच्या एका सभासदाचे आहे. इथे खेळतानाच गेला तो, हार्ट अॅटॅक ने गेला, खेळतानाच.”
“ अरे बापरे ! काय नाव त्याचं? ”
“ ग्रीष्म महाजन.”
“ त्याच्या घरच्यांनी नेलं नाही ते घरी? ”
“ नाही अजून तरी नाही.”
“ किती दिवस ठेवणार तुम्ही ते इथे?” पाणिनी म्हणाला.
“ फार दिवस नाही ठेवणार. कोणीतरी घेईलच ते. थोडया वेळापूर्वी एक माणूस ते बघायला आला होता.त्याच्या मनात होतं विकत घ्यायचं.पण त्याचं तेवढं बजेट नव्हतं.त्याच्या अपेक्षेहून त्याची जास्त किंमत आहे.” सालढाणा म्हणाला.
“ म्हणजे? ते विकायला ठेवलंय? केवढ्याला?”पाणिनी ने विचारलं.
“ नक्की किंमतीचा मला अंदाज नाहीये अजून,त्याच्या पत्नीने मलाच विचारलंय कितीला विकावं असं”
“ कितीला खरेदी करावं मी?” पाणिनी ने विचारलं.
“ तुम्हाला का खरेदी करायचं आहे ते, पटवर्धन?” –
“”सालढाणा
“ मी आमच्या दोस्त मंडळी बरोबर खेळेन तेव्हा हे किट घालून खेळेन तेव्हा मला इतरांवर किती इम्प्रेशन पाडता येईल ! ”
“ सकृत दर्शनी ठीक आहे. पण शेवटी चांगला खेळ केल्यावर जी छाप पडेल ती महत्वाची.”
“ मला त्या किट ची बॅग सुध्दा फार आवडल्ये. साधारण अशा प्रकारचं किट केवढ्या पर्यंत असतं?” पाणिनी ने विचारलं.
“ माझं मत आहे कि त्या बाईला दहा हजार तरी मिळावेत. ”
“ फार होतात. जुन्या वस्तू आहेत या. सात हजार ला फायनल करा. मी लगेच अत्ता पाच हजार देतो. बाकीचे उद्या देतो.”पाणिनी म्हणाला.
“ मला काही अधिकार नाहीत तसे किंमत ठरवायचे. तुम्ही जरा मैदानात सराव करा, मी तो पर्यंत त्या बाईला फोन करतो. ”
पाणिनी ने त्याच्या म्हणण्या प्रमाणे सराव केला.पुन्हा ऑफिसात आला. सालढाणा ला विचारलं, “ काय म्हणत्ये मिसेस महाजन?”
“ तुमची ऑफर मान्य नाही तिला. ”
“ ठीक आहे मी वाढवतो रक्कम. तिला किती हव्ये?” पाणिनी ने विचारलं.
“ तिला विकायच नाहीये म्हणत्ये. नवऱ्याची आठवण म्हणून. मी तिला शब्द दिलाय की ते मी तिच्या घरी पोचवीन म्हणून.”-सालढाणा
“ काही हरकत नाही. मी दुसरं किट घेतो, माझ्या बजेट मधे बसणारं, पण खरं तर मला हे आवडलं होतं.”
“ त्यात काय होतं एवढं आवडण्याजोगे? दुसरी याहून चांगली आहेत ना.”-सालढाणा म्हणाला आणि त्याने पाणिनी ला दुसरे किट घेऊन दिलं आणि पाणिनी कडून चेक घेतला.पाणिनी ते घेऊन निघाला. गाडी जवळ आल्यावर कनक ओजस भेटला.
“ तुला जमलं ना त्या किट च्या बॅगेत आपलं पत्र ठेवायला?” पाणिनी न विचारलं
“ काहीच नाही अडचण आली. मी खूप कमी ऑफर दिली त्याला. मला ते हवंच आहे, आवडलं आहे असं भासवण्या करता, त्या बॅगे वरून प्रेम भराने हळूवार हात फिरवला. आणि पटकन ते पत्र बोळा करून आत टाकलं. त्यावर नाव होतं त्यामुळे शोधायला काहीच अडचण नाही आली. पण पाणिनी, पत्र तर मीच टाकलं बॅगेत , मग तू काय केलंस नेमकं तिथे जाऊन? ”—कनक
“मी त्या बाईचा संशय वाढवला.मी त्यात पत्र टाकलं हा संशय तिला येणार नाही पण मी तिथे तिच्या नवऱ्याचे किट खरेदी करायला आलो होतो हे तिला समजेल अशी व्यवस्था केली.म्हणूनच तिने , मी खरेदी करतोय म्हंटल्यावर, विकायचं नाही असा निर्णय घेतला.आता आपोआपच ते पत्र किट च्या बॅगेतून सालढाणा मार्फत तिच्या घरी पोचेल.”
“ पण समजा तिने तुला खरेदी करायला परवानगी दिली असती तर? मग तिच्या घरी ती बॅग कशी पोचली असती?”
“ मी बॅग घेणार म्हंटल्यावर त्यामागे माझा डाव असणार असं तिला वाटलं असणार त्यामुळे कोणत्याही स्थितीत मला ती घेऊन द्यायची नाही असं तिनं ठरवलं. त्यात आपलाच फायदा झाला.”
कनक ओजस ने पाणिनी च्या या खेळीला दाद दिली.
“ म्हणजे आता आपण पिंजऱ्यात आमिष लावलंय पाणिनी.”
“ तुझे सगळे नजर ठेवणारे लोक काढून घे.” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे आपण दोघे स्वतः जातीने नजर ठेवणार आहोत?”
“ म्हणजे आपण स्वतःत्या घरात राहणार आहोत.” पाणिनी म्हणाला.
“ एक मिनिट... एक मिनिट...असलं काहीही करणार नाहीयेस तू.”—कनक
“ मी नाही करणार ” पाणिनी म्हणाला.
“ गुड ! थँक्स ”
“ आपण दोघं जण राहणार आहोत.” पाणिनी म्हणाला.
“ नाही... नाही... आपल्याला असलं काहीही करायचा अधिकार नाही.”
“ वेडेपणा करू नकोस कनक. आपण क्षिती चे वकील म्हणून प्रतिनिधित्व करतोय.तिच्याकडे मुख्य दरवाजाची किल्ली आहे.तिची स्वतःची खोली आहे त्या घरात, तिच्या वस्तू आहेत.आणि मधुरा ने ,म्हणजे तिच्या आत्याने क्षिती ला कधीही घरी यायला आणि हव्या त्या वस्तू न्यायला परवानगी दिल्ये.”
“ वस्तू न्यायला परवानगी असणे म्हणजे तिथे रहायला मान्यता आहे असं नाही होत.”—कनक
“काळजी करू नको. आपल्याला मध्य रात्री नंतर थांबावं लागणार नाही तिथे.”
“ माझी काल नीट झोप झाली नाहीये.” कनक ने सबब सांगितली.
“ माझी पण नाही झाली झोप. आपण एक आड एक तिथेच झोप काढू. ”
“ आपण आत व्यवस्थित जाऊ शकू ना?”—कनक
“ नक्कीच.माझ्या कडे क्षिती ची किल्ली आहे. पोलिसांनी घर मुक्त केलंय.आणि...”
“ समजा पोलिसांनी आपल्यासाठी तो सापळा लावला असेल तर?”—कनक
“ तर असं समज की आपण त्यांच्यासाठी आमिष लावलंय.” पाणिनी म्हणाला.
(प्रकरण १२ समाप्त)