Propose Day(Missed) books and stories free download online pdf in Marathi

प्रपोज डे...फसलेला

प्रपोज डे... फसलेला...

"हॅल्लो, अग ऐकतेयस ना? "
" हं, ऐकतेय बोल ना... "
" उद्या भेटायचं का आपण ड्युटी संपल्यावर? "
" उद्या माझी फोर्टीन आहे त्यामुळे नाही जमायचं, काय घाई आहे भेटायची? भेटू की सावकाश... '
" हो घाईच झालीय मला, एवढ्या सुंदर आवाज लाभलेल्या मुलीला केव्हा एकदा भेटेल असं झालंय मला! खरंच सांग ना कधी भेटशील? किती दिवस असं बोर्डावरून एकमेकांशी बोलत राहायचं? ठरव ना की कधी भेटूयात..."
ती विचारात पडली.दोन महिन्यापुर्वी नाईटला असताना बोर्डवर कॉल इंडिकेटर लागला.शहराच्या दुसऱ्या टोकाच्या एक्स्चेंज कडून आलेला तो कॉल होता.रात्री सहसा असे कॉल येत नसायचे.काहीतरी अर्जंट असेल असा विचार करून तिने त्या कॉलला रीस्पॉन्ड केलं...
" नमस्कार, सिटी टू... '
अत्यंत गोड आवाज ऐकून थोडा वेळ त्याला काय बोलावे ते सुचेना...
" हॅल्लो सिटी टू हियर....'
तो भानावर आला...
" नमस्कार, मॅडम मला 4222 टेस्ट करून सांगता का, एकजण खूप वेळ झाला कॉल करतोय त्या नंबरला;पण लागत नाही म्हणतोय...."
" हो करते टेस्ट, होल्ड करा थोडावेळ....'
तिने नंबर डायल करून टेस्टिंग सर्किटवर घेतला.बहुतेक नंबर बिझी होता.ती ट्रंक ऑफरवर गेली.त्या फोनवर मस्त गुलुगुलु गप्पा चालू होत्या! त्या फोनवर चालू असलेल्या शृंगारिक गप्पा ती ऐकत राहीली.थोडावेळ त्या तोतामैनाच्या रंगात आलेल्या गप्पा ऐकत राहण्याचा मोह तिला झाला पण तिकडे त्याला होल्डिंगवर ठेवले होते त्यामुळे नाईलाजाने तिने ती लाईन सोडली आणि त्याच्या लाईनवर परतली...
" हॅल्लो...."
" बोला मॅडम...." तो तिचा तो आकर्षक आवाज ऐकण्यासाठी कान टवकारून वाट पहात होता.
" नंबर ओके आहे.बोलणे चालू आहे..."
" थँक्स, तुम्ही नेहमी नाईटच करता का?"
" हो ना, दिवसा कॉलेज आणि रात्री ड्युटी,काय करणार.... " ती खळाळून हसली....
तिचे बोलणे जेवढे गोड होते तेव्हढेच हसणेही गोड अगदी ऐकत रहावे असे होते.
आज खरं तर त्याची सकाळी ड्युटी होती;पण एकाने ड्युटी एक्स्चेंज मागितली म्हणून तो नाईटला आला होता.तो स्वतःवर खूष झाला होता.तिच्या त्या जादूभऱ्या आवाजाने त्याच्यावर मोहिनी टाकली होती! त्याने मनोमन ठरवून टाकले- "हिच्याशी ओळख वाढवायची! इतका सुंदर आवाज लाभलेली ती मुलगी नक्कीच खूप सुंदर असणार! त्याने दुसऱ्या दिवशीसुद्धा नाईट ड्युटी घेण्यासाठी रिक्वेस्ट लिहून ठेवली.तसंही कुणालाच नाईट ड्युटी नको असायची त्यामुळे त्याचे काम सोपे झाले होते....
दुसऱ्या दिवशी त्याने उगाचंच तिला कॉल केला.काहीतरी कारण हवे म्हणून एक नंबर टेस्ट करून घेतला या निमित्ताने त्याला तिचा तो सुमधुर आवाज ऐकू आला!
आता हे रोजचं झालं होतं.तिला ते नवीन नव्हतं, तिचा आवाजच इतका गोड होता की प्रत्येकजण तिच्याशी फोनवर बोलण्यासाठी धडपड करायचा! फोनवर सगळे अगदी गोड गोड बोलायचे, भेटण्यासाठी गळ घालायचे;पण ती मात्र कधी कुणाला भेटायची नाही!
तो तर आता दररोज काही ना काही कारण काढून तिला नाईट ड्युटीत कॉल करायचा.तिच्याशी बोलत राहायचा.तिच्या आवाजाचं, तिच्या हसण्याचं कौतुक करत राहायचा.गेले दोन महिने हा खेळ चालू होता.आता तो तिच्या आवाजाबरोबरच तिच्याही प्रेमात पडला होता.तिला भेटण्यासाठी तो उतावीळ झाला होता.आज तर तो भेटीची गळ घालत होता;पण ती मात्र थंडपणे प्रतिसाद देत होती!
मध्ये दोनतीन दिवस गेले तो तिला भेटण्यासाठी तिची मनधरणी करतच होता.शेवटी आज तिने त्याच्या आग्रहासमोर हार मानली आणि त्याला भेटण्याची तयारी दाखवली!
तिच्याकडून येत्या रविवारी संध्याकाळी पाच वाजता शहरातल्या प्रसिद्ध मंदिराच्या मागच्या गेटवर भेटायचं तिने कबूल केलं, त्याला प्रचंड आनंद झाला.
त्या सुंदर आवाजाच्या मालकिणीला तो आता प्रत्यक्ष भेटणार होता....
"जमलंच तर आजच तिला प्रपोज करून टाकू "
तो स्वप्न पाहू लागला होता....
रविवारी तो चार वाजताच मंदिराच्या मागच्या गेटवर गेला.गेटपासून थोडं लांब एक उसाच्या रसाचं गुऱ्हाळ होतं.तो पावणेपाच वाजता त्या गुऱ्हाळाच्या आतल्या बाजूला गेटकडे नजर ठेवून बसला.ती तिथे आल्यावरच तिला जाऊन भेटायचं, तिला थोडी वाट पाहायला लावायची असा विचार करून तो गुऱ्हाळात दबा धरून बसला!
पाच वाजले तरी त्या ठरलेल्या ठिकाणी कुणीच आले नव्हते त्यामुळे तो चांगलाच संभ्रमात पडला होता.त्याची नजर त्या गेटवर खिळून राहिली होती.मनात विचारांचे काहूर होते....
" नक्की येईल ना ती? "
" दिसायला कशी असेल? तिचा आवाज इतका छान आहे, ती सुद्धा तशीच सुंदर असेल!"
" अजून कशी काय आली नाही बरं, ठिकाण तर हेच ठरलंय, मग अजून कशी काय आली नाही? "
तो आता तिला बघायला आणि भेटायला उतावीळ झाला होता!
बरोबर पाच पाच ला त्या पायरीवर एक वयाने तिशीच्या आतबाहेर दिसणारी, निळ्या साडीतील काळीसावळी मुलगी येऊन उभी राहिली.
" आता ही बाई कशाला कडमडली इथे? आणि ती सारखी घड्याळात काय बघतेय?
हिलाही नेमकं इथंच कुणीतरी बोलावलंय की काय भेटायला?"
तब्बल अर्धा तास तो त्या गुऱ्हाळातून त्याच्या स्वप्नातल्या परीच्या वाटेकडे डोळे लाऊन बसला होता.
पायऱ्यांवर उभी असलेली ती मुलगी बराच वेळ इकडे तिकडे बघत राहिली आणि काही वेळाने निघून गेली. जाताना ती चांगलीच वैतागलेली दिसत होती! ती गेली तरी याची स्वप्नपरी काही अजून तिथे उगवली नव्हती!
वैतागून सात वाजता तोही तिथून निघून आला!
दुसऱ्या दिवशी नाईटला गेल्यावर त्याने तिला कॉल लावला...खरं तर तो खूप चिडला होता...
" नमस्कार, सिटी टू.... "
" काय.... शेवटी कबूल करून चुना लावलास ना? यायचं नव्हतं तर तसं सांगायचं, तीन तास फुकट घालवले माझे!पुतळा झाला माझा वाट पाहून पाहून.... "
" हैल्लो, काहीही काय बोलतोयस, उलट तूच आला नाहीस, अर्धा तास वेड्यासारखी उभी होते मी पायऱ्यांवर! लोक किती विचित्रपणे बघत होते माझ्याकडे माहीत आहे?, कंटाळून शेवटी निघून आले, वर तूच म्हणतोय मी आले नाही म्हणून...."
" काय सांगतेस? तू तिथे आली होती! मला सांग तू कोणत्या रंगाचे कपडे घातले होतेस? आली होतीस तर मला कशी काय दिसली नाहीस? "
" निळी साडी घातली होती मी...."
" सॉरी हां, काहीतरी घोळ झालेला दिसतोय, मी चुकून पुढच्या गेटजवळ वाट बघीतली बहुतेक!'
त्याने कसंबसं बोलणं आवरलं आणि कॉल कट केला !
" बाप रे, त्या नाजूक साजूक गोड आवाजाची मालकीण जी कोणी होती तीच तिथे उभी होती!"
"आपण तर तिला आज प्रपोज करणार होतो!"
"ती पहिली भेट झाली नाही तेच बरं झालं!"
आता तो चुकूनही तिला कॉल करणार नव्हता...
त्याने त्यानंतर नाईट ड्युटीचा कायमचा धसकाचं घेतला...
......© प्रल्हाद दुधाळ, पुणे
9423012020.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED