असंगाशी संग...
गोष्ट 1992-93ची आहे,त्यावेळी मी पुण्यातल्या कॅम्प भागात कार्यरत होतो. माझ्याकडे पुण्यातल्या काही पेठांमध्ये टेलिकॉम नेटवर्कउभारणी,देखभाल तसेच वेटिंगलिस्ट मधील लोकांना नवीन टेलिफोन जोड द्यायची जबाबदारी होती.त्या काळी केवळ लँडलाईन सेवाच आस्तित्वात होती शिवाय त्यासाठी चारपाच वर्षांची वेटिंग लिस्ट असायची. ग्राहकांना सेवा देताना त्यांच्या तक्रारींचे निवारण करत असताना त्या त्या भागातल्या छोट्यामोठ्या पुढारी मंडळींशी चांगले संबंध ठेवावे लागायचे.त्यातच खात्याची एक टेलिफोन एडव्हाईजरी कमिटी असायची.ही कमिटी म्हणजे राजकीय पक्षातल्या असंतुष्ट कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याची एक सोय होती.या कमिटीच्या मेम्बर्सकडून जी कामे सुचवली जायची त्यातली नियमात असलेली कामे त्वरीत करावीत असा संकेत होता त्यामुळे या लोकांची मर्जी सांभाळावी लागायची.पुण्यातल्या एका पेठेत असेच एक कमिटी मेंबर होते आपण त्यांचे नाव चव्हाण आहे समजू .तर या माननीय चव्हाण साहेबांना मी कधीच पाहिले नव्हते, पण दररोज ते मला फोन करून विविध कामे सांगायचे आणि ती कामे माझ्याकडून विनाविलंब केली जायची.दररोज होणाऱ्या संपर्कामुळे तसेच त्यांना माझ्याकडून मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे लवकरच आमची त्या काळातली आभासी म्हणता येईल अशी मैत्री झाली.
ही मैत्री एवढी वाढली की नंतर ते मला रात्री गप्पा मारायला घरच्या फोनवरही कॉल करू लागले...
चव्हाण जी कामे मला सांगायचे ती तशी किरकोळ स्वरूपाची असायची आणि ती करण्यासाठी मला विशेष काही करावे लागायचे नाही, पण ग्राहकांमध्ये त्यामुळे त्यांचे राजकीय वजन अर्थात वट नक्कीच वाढले असावे! ते नक्की कोणत्या पक्षात काम करतात ,एरवी त्यांचा व्यवसाय काय आहे किंवा ते कसे दिसतात यात मी कधीच इंटरेस्ट दाखवला नव्हता.एकंदरीत चव्हाण माझ्यावर चांगलेच खुश होते...
एक दिवस मी माझे काम आटोपून सहा वाजताच घरी पोहोचलो होतो.पाच दहा मिनिटेच झाली असतील, तोच घरच्या फोनची घंटी वाजली, मी फोन उचलला तर पलीकडून चव्हाणसाहेब बोलत होते...
" नमस्कार साहेब, पोचला वाटतं घरी!"
" हो आत्ताच..."
" संध्याकाळी काय प्रोग्रॅम?"
" काही नाही , का हो?"
" काही नाही हो, तुम्ही आमची एवढी वर्षे सेवा करताय, एकदा तुम्हाला भेटावं म्हणतोय, चला आज जेवायला जाऊ या ..बरं मला सांगा, तुम्ही कुठे रहाता?'
" धनकवडीला"
" बरं एक काम करा सात वाजता एलोरा पॅलेससमोर उभे रहा, माझी 4444 नंबर असलेली काळी सुमो गाडी आहे, बरोबर सात वाजता काय?"
मला हो नाही म्हणायची संधी न देता चव्हाणांनी फोन बंद करून टाकला!
मी घरी सांगून सात वाजता एलोरा पॅलेससमोर येऊन उभा राहिलो.
इतके दिवस फक्त फोनवरून बोलत होतो ते चव्हाण नक्की कसे दिसतात ते आज दिसणार होते !
बरोबर सात वाजता माझ्यासमोर ती काळी सुमो येऊन उभी राहिली...
ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटकडचा दरवाजा उघडून कडक खादीधारी एक पैलवान व्यक्तिमत्व उतरले...
" दुधाळ साहेब ना? नमस्कार, मी चव्हाण .."
मी हात मिळवला...
" बसा चला..."
त्यांनी मला ड्रायव्हरसीटच्या बाजूच्या सीटवर बसवले आणि स्वतः मागच्या सीटवर बसले....
" कोणत्या हॉटेलात जायचं? किती वेळ लागेल?" हे प्रश्न माझ्या मनातच राहिले कारण गाडी सुसाट कात्रज घाटाने निघाली होती ...
इथे जवळच एखाद्या हॉटेलमध्ये चव्हाण घेऊन जातील, त्यांच्याशी गप्पा मारत जेवण होईल आणि साडेनऊ दहापर्यंत आपण घरी पोहोचू असे समजून मी घराबाहेर पडलो होतो, पण गाडीने तर कात्रजचा बोगदा ओलांडला होता!
मी मागे वळून पाहिले तर गाडीत चव्हाणांचे जोडीदार शोभतील असेच भरभक्कम शरीरयष्टीचे अजून तीनजण मागच्या सीटवर होते आणि हळू आवाजात त्यांच्या गप्पा चालू होत्या!
अर्धा तासानंतर गाडी एका ढाब्यासमोर थांबली.आम्ही सगळे खाली उतरलो. सगळ्यांनी माझ्याशी हात मिळवला. त्या धिप्पाड चौघांच्यासमोर माझा सत्तेचाळीस किलो गुणिले पाच फूट तीन इंचाचा देह अगदीच किरकोळ वाटत होता!
आता अंधार बऱ्यापैकी झाला होता, आपण पुण्यापासून नक्की किती लांब आलोय हे समजत नव्हतं....
आम्ही आत जाऊन एका टेबलाभोवती बसलो.ते लोक नेहमीच इथे येत असावेत कारण बसल्याबरोबर ढाबा मालकाने त्यांचे नेहमीचे ड्रिंक्स न सांगता टेबलावर हजर केले...
" साहेब तुमचा ब्रँड?" चव्हाण विचारू लागले ...
" न, नाही मी पीत नाही ..." मी कसंबसं सांगितलं ...
" एक लिम्का दे रे साहेबांसाठी..." चव्हाण.
" साहेब, निवांत बसा... , मी ओळख करून देतो ...."
मग ड्रिंक्स घेता घेता त्यांनी एकेकाची ओळख करून दिली ....
" साहेब हे सोनटक्के,पाच वर्षांपूर्वी बघा अमक्याचा गेम झाला होता? तो यांनी केला, सध्या जामिनावर आहेत..., आणि बर का हे दुधाळ साहेब; टेलीफोन अधिकारी,एकदम सच्चा माणूस, अर्ध्या रात्री काम सांगा दुसऱ्या दिवशी काम झालंच समजायचं!"
आता पुढची ओळख . .
" हे साळुंके, तळेगावात दहा वर्षांपूर्वी राडा झाला होता त्याचे शिल्पकार ,पाच वर्षे आत राहून आलेत!"
एकेकाची ओळख ऐकून मला थंड लिम्का पीत असूनही घाम फुटला होता ...
तिसराही टोळी युद्धात काही वर्षे तडीपार होता....
" काय साहेब तुम्ही काहीच खात नाही, घ्या घ्या तंदुरी घ्या अजून ..."
माझ्या मनात मात्र फुल टेन्शन आणि आत कुठे तरी कुठल्याशा गाण्याची ओळ परत परत वाजत होती ...
" ये कहा आ गये हम...."
त्या चौघांचं पिणे आणि नंतर खाणे चांगलेच रंगात आले होते! त्यांच्या सगळ्या गप्पा गुन्हेगारी व राजकारण या भोवती फिरत होत्या...
गेम,राडा,गॅंग,पक्षासाठी फंड असले काही काही शब्द पुन्हा पुन्हा गप्पात डोकावत होते आणि न पिताही माझं डोकं बधीर झालं होतं....
मधून मधून मला " हे खा,ते खाऊन बघा, हे काय, तुम्ही नुसतेच बसलाय साहेब, घ्या घ्या..." असा खाण्याचा आग्रह होत होता...
मला मात्र मी कधी एकदा या चौकडीच्या कचाट्यातून सुटून सहीसलामत घरी पोहचतो असे झाले होते!
एकदाचे रात्री साडेअकराच्या दरम्यान त्यांचे खाणे संपले आणि पान खाऊन आम्ही गाडीत बसलो ...
रात्रीच्या एक वाजता मी एलोरा पॅलेससमोर गाडीतून उतरलो तेव्हा एकदाचा जीवात जीव आला ...
बाप रे, टेरिफिक अनुभव!
© प्रल्हाद दुधाळ.