Itnisi baat books and stories free download online pdf in Marathi

इतनीसी बात.

इतनीसी बात....
डेंटीस्टच्या वेटींग रूममधे माझा नंबर येण्याची मी वाट पहात बसलो होतो. टाईमपास म्हणून हातात मोबाईल घेतला.बाईकवरून जाताना फोन वाजलेला समजला नव्हता,दोनदा कुणाचे तरी कॉल येऊन गेले होते.दोन्हीही नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधे नव्हते म्हणून त्यातल्या एकाला उलट कॉल केला.एक रिंग वाजेपर्यंतच समोरून उत्तर आले....
"हॅल्लोss कोण?"
"अरे काय साहेब, अर्धा तास तुम्हाला ट्राय करतोय, कुठे आहात तुम्ही?"
मला समोरच्या व्यक्तीचा आवाज ओळखता आला नव्हता...
"कोण बोलताय आपण?"
"अरे ओळखलं नाही का,मी साळवे बोलतोय, मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय, कुठे आहे तुम्ही? "
आमच्या कंपनीतला फारसा माझ्या संपर्कात नसलेला साळवे नावाचा अधिकारी बोलत होता.
"या माणसाचं माझ्याकडे असं काय अर्जंट काम असावं बरं..." मी थोडा विचार करुन त्याला कटवायच्या दृष्टीने त्याला म्हणालो...
" बोला की, मी दवाखान्यात आलोय..."
" किती वेळ लागेल तुम्हाला? मला अर्जंट भेटायचंय तुम्हाला, मला पत्ता सांगा मी रिक्षा करुन तिथे येतो!"
त्याला मला भेटायची भलतीच घाई झाली होती....
"अहो, मला इथे एक तास तरी लागेल आणि मी आता लांब कोंढव्यात आहे, फोनवर सांगा की काय बोलायचं ते."
"नाही हो फोनवर नाही बोलता येणार, समक्ष भेटायचंय तुम्हाला, अर्जंट आहे...."
" असं करा दोन तासांनी बस डेपोजवळ या, मी घरी पोहोचलो की फोन करतो..."
"हो साहेब, नक्की करा फोन रात्री दहा अकरा वाजले तरी चालतील...., आजच भेटू!"
मी त्याला होकार दिला;पण चांगलाच विचारात पडलो....
या माणसाचं माझ्याकडे एवढं अर्जंट काय बरं काम असेल? साळवे आणि मी जरी एकाच कंपनीत एकाच केडरमधे काम करत असलो तरी एका युनिटला कधीच नव्हतो.आमचे दोघांचे काही कॉमन मित्र होते आणि त्यांच्याकडून जे समजले होते त्यावरून तरी माझे त्याच्याबद्दल फारसे चांगले मत नव्हते...
माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की तो सतत कोणत्या ना कोणत्या बँका व पतपेढ्याकडून कर्ज घेत असतो आणि मग एका बँकेची थकबाकी भरायला नवीन बँकेचे कर्ज घेतो.आत्तापर्यंत बरेच मित्र त्याला कर्जासाठी जामीन राहून अडचणीत आलेले आहेत!
अशा या साळवेचे माझ्याकडे अर्जंट काम आहे हे ऐकून मी खरंच काळजीत पडलो होतो. हा 'एखाद्या कर्जाला जामीन हो असं म्हणून गळ्यात तर पडणार नाही ना? ' अशी शंकाही मनात येत होती.तसं असेल तर त्याला कसा कटवायचा याचाही विचारही मनात चालू होता.अशा माणसाला घरी कशाला बोलवायचे, म्हणून मी त्याला बस डेपोजवळ भेटतो असे सांगितले होते....
माझं डेंटीस्टकडचे काम आटोपून मी घरी पोहोचलोच होतो तो याचा कॉल...
" आलात का घरी?"
" नाही अजून अर्धा तास तरी लागेल!" मी सरळ खोटं बोललो...
"कुणाचा फोन होता?"माझ्या सौभाग्यवतीने विचारलेच!
" ऑफिसातला एक मित्र आहे, त्याला मला अर्जंट भेटायचंय म्हणतोय...."
" अहो कोण आहे तो? एवढं काय अर्जंट काम आहे त्याचं?आणि कधी आणि कुठे भेटणार आहात त्याला?"
बायको चांगलीच काळजीत पडली....
" मलाही तोच प्रश्न पडलाय ग, चल जेवायला वाढ, आपल्या सोसायटीच्या बाहेरच बोलावतो त्याला..."
जेवायला वाढता वाढता तिचे प्रश्न चालूच होते.'कोण आहे तो माणूस?' 'कसा आहे?' 'ओळखता ना तुम्ही त्याला?'वगैरे वगैरे...
जे प्रश्न बायकोला पडले होते तेच मलाही पडलेले होते त्यामुळे मी गुपचिप जेवण केले आणि त्याला फोन केला.तयार होऊन लगेच सोसायटीबाहेर आलो....
बाहेर फुटपाथवर साळवे माझी वाटच पहात होते.त्यांच्या बरोबर शेवाळे नावाचे अजून एक गृहस्थ्य होते, मी त्यांनाही थोडाफार ओळखत होतो....
" बोला साळवे, एवढं काय अर्जंट काम काढलत?" मी डायरेक्ट विषयालाच हात घातला...
"मला तुमची थोडी मदत पाहिजे,मी चार तास झालं फिरतोय,आत्ताच वकिलाकडेही जाऊन आलो..."
मी प्रश्नार्थक चेहऱ्याने दोघांकडे बघत होतो....
शेवाळेंनी बोलायला सुरवात केली...
"काय आहे ना, म्हटलं तर एकदम छोटी गोष्ट आहे, यांना मी सकाळपासून सांगतोय मिटवून टाकू; पण हे ऐकायला तयारच नाहीत!"
शेवाळेंच्या या वाक्यामुळे तर माझा गोंधळ अजूनच वाढला होता...उगीच अंदाज करत बसण्यापेक्षा हे दोघे नक्की कशासाठी माझ्याकडे आलेत ते समजणे माझ्यासाठी महत्वाचे होते.
" नक्की काय झालंय मला नीट सांगा की...!"
मग साळवे बोलू लागले.त्यांनी एक लांबलचक कहाणी मला सांगितली, ती अशी...
गेली वीस वर्षें ते कंपनीच्या क्वाटर्समधे राहात होते आणि सुरवातीची काही वर्षें सोडली तर ते ज्या ऑफिसमध्ये काम करत होते त्या ऑफिसच्या कंपाऊंडमधेच असलेल्या पाच मजली बिल्डिंग मधील क्वाटर्सचे इन्चार्ज ते स्वतःच होते.थोडक्यात त्या ऑफिसच्या सगळ्या परिसराची दैनंदिन देखभालीची जबाबदारी त्यांच्यावरच होती.एका सरकारी कंपनीच्या एका ऑफिसचा इतके वर्ष असलेला अधिकारी अर्थातच काही मर्यादेपर्यंत स्वतःला त्या परिसराचा मालक समजायला लागतो आणि साळवेंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं.अनेकदा बदली होऊनही ती तब्बेतीची कारणे सांगून रद्द करुन घेतली होती आणि एकाच ऑफिसात ठाण मांडून ते बसले होते.या बिल्डिंगमधेच उच्च अधिकारी वर्गासाठी असलेल्या काही क्वाटर्स होत्या तिथे एक नवा अधिकारी राहायला आला आणि हा मॅटर त्या अधिकाऱ्यासंबंधात होता!
साळवे इथे वीस वर्षें राहात होता शिवाय तो या कॅंपसचा इन्चार्जसुद्धा असल्याने त्याची मनमानी चालायची.त्याने अनेक वर्षापासून बिल्डिंगमध्ये काही भटकी मांजरे पाळली होती व त्यांना नियमितपणे तो खायला द्यायचा.त्या बिल्डिंगमधे या मांजरांचा मुक्त वावर होता ती कुठेही घाण करायची रहिवाश्याना त्यांचा त्रासही व्हायचा;पण अद्यापपर्यंत कुणी तक्रार केली नव्हती.या नव्या अधिकाऱ्याने मात्र ते मनावर घेतले.सुरुवातीला त्याने साळवेला या मांजरांना खायला घालायचे बंद करा म्हणून विनंती केली;पण साळवेनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.मग तो अधिकारी काठी घेऊन या मांजरांच्या मागावर राहू लागला.त्यांना हाकलायला लागला.एवढ्या वर्षांचा मांजरांचा वावर असा थोडाच थांबणार होता? हाकलले तरी ती परत येत होती, घाण करत होती.साळवे त्यांना खायला घालत होता.शिवाय त्याचे समर्थनही करत होता.आता त्या उच्च अधिकाऱ्याने प्रश्न प्रतिष्ठेचा केला आणि साळवेला कारवाईची धमकी दिली.साळवेनी crualty against animal कायद्याची भीती घालून त्या अधिकाऱ्याला धमकावले.आता दोघेही चांगलेच पेटलेत.साळवेने वकिली सल्ला घेतलाय.त्याचा मित्र शेवाळे त्याला सबुरीचा सल्ला देतोय;पण साळवेला त्या अधिकाऱ्याला धडा शिकवायचाय आणि त्यासाठी त्याला माझा सल्ला हवा होता! आता तुम्ही म्हणाल माझाच का? ते मात्र मी सांगू शकणार नाही, कारण मलाही ते माहीत नाही..
थोडक्यात काय "खोदा पहाड निकली बिल्ली!" अशी ही केस होती....
मी साळवेला विचारले "या मांजरांना तुम्ही पाळले आहे का? "
"नाही, मी फक्त त्यांना खायला देतो!"
"तुम्ही खायला देता म्हणून त्या तुमच्याकडे येतात, बरोबर?"
"हो."
" मला एक सांगा, तुम्ही खायला दिले नाही तर त्या उपाशी मरतील? का त्या तुमच्या दरवाजासमोर आत्महत्या करतील?"
" नाही."
" अजून एक सांगा ही सरकारी क्वाटर्र माणसांसाठी आहे की मांजरांसाठी?"
" अर्थात माणसांसाठी!"
" म्हणजे इथे माणूस महत्वाचा आहे! तुमचे मांजरप्रेम समजू शकतो;पण तुमच्या हेकेखोरपणामुळे इतराना त्रास होतो आहे हे तुम्ही समजून का घेत नाही?"
" पण कायद्याप्रमाणे तो मला मांजराला खायला घालायला रोखू शकत नाही, मांजरांना हाकलणे हा सुद्धा गुन्हा आहे!" साळवे आपलं म्हणणं पुढे रेटतच होता...
" मला एक सांगा तुम्हाला काय काय आजार आहेत?"
"बीपी, शुगर, एन्जोप्लास्टीसुद्धा झालीय, का?"
" साळवे साहेब जरा आत्मपरीक्षण करा, हे सगळे आजार तुमच्या विचित्र स्वभावामुळे तुम्हाला झालेत!तुमच्या हेकेखोरपणामुळे इतराना त्रास होतोय हे तुम्हाला समजत नाही.माफ करा तुम्ही माझ्याकडे सल्ला मागायला आलात म्हणून सांगतोय, आयुष्यात स्वतःच्या मन:शांतीपेक्षा काहीच महत्वाचे नाही तेव्हा जरा विचार करा.तुमच्या प्राणी प्रेमाखातर माणसांना त्रास देऊ नका.मांजरांना बाहेर जाऊन खायला घालायची सवय लावा,ती तिथे तुमची वाट बघतील.माणसांना माणसासारखे वागवा.प्राण्यांवर प्रेम करा हो पण त्यांमुळे जवळच्या माणसांना तोडू नका!"
मला उगीचच तत्ववेत्त्याच्या भूमिकेत जावे लागले.
साळवेना बहुतेक माझे म्हणणे पटले असावे, कारण निरोप घेताना
उद्याच साहेबाना सांगतो की मांजरांना मी बाहेर नेऊन खायला देत जाईन!
इतनीसी बात को बतंगड बना देते है लोग!
.....(c)प्रल्हाद दुधाळ, पुणे ( 9423012020)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED