Missed shares books and stories free download online pdf in Marathi

चुकलेल्या वाटा

चुकलेल्या वाटा .
"जोशीसाहेब म्हणजे एकदम तत्वाचा माणूस..."
"इथले सगळे सुपरवायझर चांगले आहेत, पण हा जोशी म्हणजे ना एकदम खडूस!"
नोकरीला नवीनच लागलो होतो आणि पहिल्याच दिवशी तेथील सुपरवायझरबद्द्ल जुन्याजाणत्या कर्मचाऱ्यांच्याकडून अनाहूतपणे माहीती दिली जात होती. कुणाबरोबर कसे वागायला हवे,कसे आणि किती बोलायला हवे याच्या नकळत टीप्स मिळत होत्या.
माझ्या लक्षात आले की बाकी सगळ ठीक आहे,पण सर्वसाधारणपणे या जोशींबद्दलचा मात्र विचित्र रिमार्क पास होताहेत आणि जोशी एकदम खडूस आहे असेच सगळेजण बोलत होते.ते कडक शिस्तीचे असल्याने त्यांच्यापासून कायमच सावध रहावे असा सल्लाही मिळत होता.
ते सगळ ऐकल्यावर नाही म्हटल तरी या माणसाबद्दल थोडी आदरयुक्त भीतीही वाटायला लागली होती...
दुसऱ्याच दिवशी नेमकी या जोशींची आणि माझी ड्युटी एकाच शिफ्टमध्ये आली आणि त्यांच्याबद्दल ऐकलेल्या एका एका गोष्टींची प्रचिती यायला लागली!
झाले काय की,माझी दहाची ड्युटी होती आणि मी साधारणपणे दहा वाजून दहा मिनिटानी आमच्या सेक्शनमध्ये गेलो. माझ्यानंतर दोन मिनिटांनी एकदम गोरेगोमटे,घारे डोळे,सहा सव्वासहा फूट उंच आणि तब्बेतीने थोडेसे किरकोळ असे वर्णन असलेले जोशी साहेब सेक्शनमध्ये आले.
आमची ही पहिली भेट होती.मी त्यांना खात्याच्या संकेताप्रमाणे नमस्कार करून माझी आजची कामाची पोझिशन विचारण्यासाठी गेलो.त्याकाळी टेलिफोन सुपरवायझरला मॉनिटर असेही संबोधले जायचे....
मी त्यांच्यासमोर गेलो त्यांनी माझ्यासमोर अटेंडस रजिस्टर ठेवले... रजिस्टरमध्ये मी माझे नाव शोधले. लक्षात आले की माझ्या नावासमोर आधीच एक रिमार्क लाल शाईत लिहिलेला होता - Late by ten minuits!
‘बोंबला,पहिल्याच दिवशी लेट मार्क! ‘ मी मनात विचार करत असतानाच माझे लक्ष रजिस्टरमधल्या जोशी साहेबांच्या नावाकडे गेले.मला एकदम आश्चर्य वाटले...साहेबांनी स्वत:च्या नावासमोरही रिमार्क लिहिला होता- late by twelve minuits!
स्वत:चा लेट मार्क स्वत: करणारे जोशी हे माझ्या अडतीस वर्षाच्या सेवेत भेटलेले एकमेव वरिष्ठ होते!
पुढे त्यांच्याबद्दल चर्चेत असलेल्या सगळ्या गोष्टी या केवळ अफवाच असल्याचे लक्षात आले...
सरकारी नोकरीतअसुनही हा माणूस सर्व्हीसच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने करत होता! टेलिफोन कर्मचार्यांना प्रथमच जाहीर झालेला प्रॉडक्टीव्हीटी लिंकड बोनस या माणसाने चक्क नाकारला होता!
त्या वेळी आमच्या सेक्शनमध्ये टेलिफोनबाबत एफआरएस अर्थात Fault registration and repair service बाबतीत कामकाज चालायचे.त्या काळात टेलिफोन घरात असणे ही चैनीची वस्तू मानली जात होती.सात आठ वर्षे वाट पाहिल्यावर टेलिफोन मिळायचा.श्रीमंत व्यक्ती,मोठे उद्योगपती व सरकारी उच्चाधिकारी यानाच टेलिफोन घेणे परवडू शकत होते.
इंडियन टेलिग्राफ ॲक्टखाली टेलिफोन धारक व या खात्यातील कर्मचारी येत असल्याने खात्यात कडक नियम व शिस्त पाळली जायची,आणि ही शिस्त आमच्या या जोशीसाहेबांच्या अगदी छोट्या छोट्या कृतीत दिसायची! कदाचित या अतिरेकी शिस्तीमुळेच त्याना लोक खडूस म्हणून ओळखत असावेत.
लवकरच माझे आणि त्यांचे चांगलेच सूर जमले,त्याचे कारण म्हणजे माझे हस्ताक्षर! त्यांना माझे अक्षर खूप आवडायचे! मी कविता लिहितो हे समजल्यानंतर तर हे संबंध अजूनच चांगले झाले.कुणाशी फारसे संबंध न ठेवणारे साहेब माझ्याबरोबर दिलखुलास गप्पाही मारू लागले.त्यांनाही वाचनाची आवड होती.ते त्या काळातले एम.ए. होते!
त्यांच्याबरोबर बोलताना एक विचार नेहमी माझ्या मनात यायचा...
'हा माणूस आमच्या पोस्ट ॲन्ड टेलिफोनसारख्या एकदम रूक्ष खात्याऐवजी एखाद्या नावाजलेल्या कॉलेजात प्रोफेसर असायला हवा होता!'
एकदा गप्पा मारताना त्यांना मी तसे बोललो, तर ते किंचित हसले आणि म्हणाले
" तुमचे बरोबर आहे ,मला प्रोफेसरच व्हायचे होते,पण परिस्थितीने मिळेल ती नोकरी करावी लागली,आणि अजून एक सांगतो - या पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात एकदा का माणूस चिकटला ना की तो कायमचा इथेच चिकटून रहातो आणि नंतर आलेल्या चांगल्या संधीही नाकारतो "
मी त्यावेळी त्यांचे म्हणणे फार गंभीरपणे घेतले नाही, कारण अशा रूक्ष खात्यात दुसरी चांगली नोकरी मिळाली तर कोण कशाला राहील?काहीतरीच मत आहे जोशींचे!
मी तरी माझी ही नोकरी तात्पुरती तडजोड म्हणून स्वीकारली होती,योग्य संधी मिळाली की दुसरी चांगली नोकरी पकडायची हे मी मनोमन पक्के ठरवले होते.कारण माझे शिक्षण रसायनशास्त्र विषयातले होते.आपल्याला केमिकल इंडस्ट्रीमध्ये चांगली मनासारखी नोकरी मिळून जाईल असा मला विश्वास वाटत होता,सध्याची नोकरी ही गरजेपोटी स्वीकारलेली होती ...पण ...
पण...पाचदहा वर्षात लक्षात आले की जोशी साहेब म्हणायचे ते बिल्कुल खरे आहे! इथे पंचाहत्तर टक्के कर्मचारी असे आहेत की त्याना आयुष्यात वेगळेच काही व्हायचे होते,पण वाट चुकून इथे पोस्ट आणि टेलिफोन खात्यात ते चिकटले ते चिकटले, अगदी कायमचे!
...हो s s हो s s हो अगदी माझ्यासहीत!
,,,,,,,©प्रल्हाद दुधाळ पुणे .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED