advance books and stories free download online pdf in Marathi

आगाऊपणा

आगाऊपणा…
फारसा त्रास होत नसल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन मी बरीच वर्षे माझे हर्नियाचे ऑपरेशन करणे टाळले होते.आज उद्या करत निदान दहा वर्षे अशीच गेली होती.
आता रिटायर झालो असल्याने अशी चालढकल केलेली बरीच कामे करायला घेतली आहेत त्यात हे कामही करुन टाकू असे मनाशी ठरवले आणि एका प्रसिध्द सर्जनचा सल्ला घेतला. माझी तपासणी करुन त्यांनी पुढे काय काय करायचे याबद्दल मार्गदर्शन केले.
त्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ऑपरेशन करण्यापूर्वीच्या आवश्यक त्या टेस्ट्स मी करुन घेत होतो आणि त्याबरोबरच हॉस्पिटलायझेशनसाठी आवश्यक असलेली मानसिक तयारीही माझी मी करुन घेत होतो कारण आयुष्यात प्रथमच माझे एखादे ऑपरेशन करायचे होते!
माझ्या सर्जनने सांगितलेल्या टेस्टपैकी सोनोग्राफी केल्यावर अजून एका स्पेशालिस्टला( urologist) भेटण्याचा सल्ला मिळाला होता त्याप्रमाणे मी जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये संबंधित तज्ज्ञाला भेटलो आणि त्यांनी सांगितलेल्या दोन टेस्ट्सही केल्या एका टेस्टचा रिपोर्ट लगेच मिळाला, दुसऱ्या टेस्टचा रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता.
केलेल्या प्रत्येक टेस्टचा रिपोर्ट मिळाला की तो वाचायची मला घाई असायची.त्यातले काही कळत नसले तरी रिपोर्टमध्ये दिलेल्या रेफरंस पॉइंटच्या आत आकडा असला की आपली टेस्ट नॉर्मल आहे हे वाचून नाही म्हटलं तरी आनंद व्हायचा!
हे करत असताना एखादी टेस्ट अबनॉर्मल आली तर आपले काय होईल यावर मात्र मी विचार केलाच नव्हता!
तर झाले काय,की त्या विशिष्ट टेस्टचा रिपोर्ट आणायला मी संध्याकाळी हॉस्पीटलमध्ये गेलो.खिडकीतून रिपोर्ट घेतला आणि नेहमीच्या उत्सुकतेने लगेच तिथेच पाकिटातून रिपोर्ट काढून वाचला. माझा रिपोर्ट वाचला आणि समोर असलेली नॉर्मल रेंज वाचल्यावर हा रिपोर्ट अबनॉर्मल असल्याचे लक्षात आले. रिपोर्ट घेऊन मी रिक्षात बसलो आणि घराकडे निघालो.रिक्षात बसल्यावर माझा गंभीर झालेला चेहरा बघून बायकोला शंका आली तिने मला काय झाले म्हणून विचारले पण मी तिला ‘काही नाही’ म्हटले आणि शांत बसून राहिलो.
घरी आल्याबरोबर कपडे न बदलता सोफ्यावर बसून मी मोबाईलमध्ये गुगल उघडले आणि त्या टेस्ट बद्दल माहिती वाचू लागलो. माझे वाचन चालू असताना माझी बायको माझ्या चेहऱ्यावरचे बदललेले रंग बघून घाबरली होती.ती पुन्हा पुन्हा मला काय झाले म्हणून विचारत होती.मी फार काही नाही असे सांगत असलो तरी काहीतरी गंभीर बाब असल्याची शंका तिला आली होती…
इकडे मी त्या रिपोर्ट चे दुष्परिणाम, त्यावरचे उपाय, आहार, दिनचर्येतले बदल, होणारे आजार, भविष्यातले परिणाम यावर वाचन करुन बरीच डोकेफोड करुन घेतली होती . एकंदरीत माझा बराच अभ्यास झाला होता, ज्ञानार्जनही झाले होते आणि त्याबरोबर मनातल्या शंकाकुशंकाही वाढवल्या होत्या.चेहऱ्यावर खंबीरपणाचा आव आणला असला तरी मी आतून घाबरलो होतो!
खरच अज्ञानात सुख असते!
हाताशी गूगल नसते तर मला यातले काहीच कळले नसते माझ्यावर असे टेन्शन घ्यायची वेळ आलीच नसती!
माणूस आशावादी असतो आणि त्याने तसे असावेही..
अचानक मला वाटले की तो रिपोर्ट पुन्हा एकदा वाचावा.
मी टी पॉयवर ठेवलेला तो रिपोर्ट उचलून पुन्हा एकदा वाचला…
संबंधीत रिपोर्टमध्ये माझे रीडिंग होते ०.५६ आणि नॉर्मल साठी आकडा होता, ० ते ४ !
म्हणजे माझा रिपोर्ट नॉर्मल होता की!
माझी रिपोर्ट वाचण्यात चूक झाली होती, मी रिपोर्ट ५.६ असा वाचला होता आणि असा रिपोर्ट म्हणजे संभाव्य कॅन्सरचे लक्षण होते…बाप रे!
रिपोर्ट वाचण्याची माझी घाई आणि पुढे जाऊन आगाऊपणा करत गूगलवर जाऊन केलेल्या अभ्यासाने मला तीन चार तास चांगलेच टेन्शन दिले होते...
आता माझे हर्निया ऑपरेशन होऊन पाच दिवस झाले आहेत आणि उत्तम रिकव्हरीही आहे हे या पोस्टवरून लक्षात आले असेलच!
यातून एक धडा मात्र कायमसाठी शिकलो… “असला आगाऊपणा बरा नाही!”
.…..प्रल्हाद दुधाळ, पुणे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED