#ओळख
'काय ठरवले होते आपण आणि हे काय झाले!'
'आपल्याच वाट्याला हे भोग का?'
एक मोठा सुस्कारा टाकून नैराश्याने ग्रासलेला राहुल दादर मार्केट गल्लीतल्या नेहमीच्या दुकानाच्या कट्ट्यावर टेकला.आज रस्त्यावर जरा जास्तच वर्दळ होती..
अलीकडे खूपदा मन अस्थिर असले की तो इथे यायचा.मुंबईमधील रस्त्यांवरच्या गर्दीत आपल्याच तंद्रीत जाणाऱ्या येणाऱ्या गर्दीकडे तो एकटक बघत बसायचा.
प्रचंड घाईत धावणाऱ्या मुंबईतील माणसांच्या गर्दीकडे बघताना त्याच्या मनात विचार यायचे...
'इथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची एक ओळख आहे.प्रत्येकाला कुठे ना कुठे पोहोचण्याची घाई आहे...प्रत्येकाला ज्याचे त्याचे धेय्य आहे....जगण्याचे प्रयोजन आहे...'
त्याला प्रश्न पडायचा ' आपले काय?'
त्या गर्दीत शून्य नजरेने आपले आस्तित्व राहुल शोधत बसायचा!
आई वडिलांचा शहरात जायला विरोध असूनही शिक्षण घेण्यासाठी राहुल जेव्हा त्याच्या गावाकडून मुंबईत आला तेव्हा त्याला वाटायचे की इथे त्याला पदवी मिळाली की नोकरी लागेल आणि त्याच्या सगळ्या समस्या चुटकीसरशी सुटतील.
'देशाच्या कानाकोपऱ्यातून पोट भरण्यासाठी येणाऱ्या लाखो लोकांना सामावून घेणाऱ्या मुंबईत आपलेही बस्तान अगदी सहजपणे बसेल.'
त्याच्या कुटुंबाच्या इतिहासातला तो पहिला पदवीधर होता त्यामुळे राहुलला आपल्या आयुष्यात उल्लेखनीय असे काहीतरी करून दाखवायचे होते!
' इथे महानगरात आपल्याला स्वतःची एक वेगळी ओळख सहज निर्माण करता येईल,आपल्या आईबाबांच्या कष्टाचे उतराई होण्यासाठी आवश्यक असलेली संधी मुंबईत आपल्याला नक्कीच मिळेल असा त्याला आत्मविश्वास होता.'
भरपूर अभ्यास करून त्याने चांगल्या गुणांनी पदवी मिळवली होती......
आता आपल्याला चांगली नोकरीही सहज मिळेल असे त्याला वाटत होते;पण व्यवहारी जगातल्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात याची त्याला कल्पना नव्हती!
त्याने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले...
गेली दहा महिने नोकरी शोधण्यासाठी अनेक कंपन्यांचे उंबरे तो झिजवत होता,अनेकांना मिनतवारी करत होता;पण नशीब त्याला हुलकावण्या देत होते.
कॉलेज संपल्यावर एका मित्राच्या आधाराने तो मुंबईत कसाबसा रहात होता.नोकरीसाठी केलेल्या दिवसभराच्या दगदगगीनंतर बऱ्याचदा आपली अस्वस्थता लपविण्यासाठी तो या कट्ट्यावर बसायचा,तसाच आज तो इथे बसला होता.
आजकाल तो खूपच निराश झाला होता.
आपल्या कमनशिबी आयुष्याबद्दल विचार करत होता...
'स्वप्ने आणि वास्तव यात किती फरक असतो ना? इथे आलो त्यावेळी किती आत्मविश्वास होता ना आपल्याला? पण प्रत्यक्षात ?'
हलकेच राहुलला कॉलेजचे ते गॅदरिंग आठवले....
तो विचारात हरवला...
'माझीच हाक मजला
येते कधी कधी
गर्दीत शोध माझा
घेते कधी कधी
महाविद्यालयातील स्नेह संमेलनातल्या काव्य महफिलित एकाने ही कविता प्रस्तूत केली होती, त्यावेळी किती हसलो होतो आपण त्याला! आज जेंव्हा आपण सुद्धा या गर्दीचाच एक भाग होऊन चालत आहोत त्यावेळी वाटतं आपणच आपल्याला शोधतोय कुठेतरी.
आपलं अस्तित्व म्हणजे फक्त मुंबईतल्या गर्दीतला 'गर्दी' वाढवणारा एक चेहरा! एवढीच ओळख उरली आहे आपली? नाही म्हणता आपल्याला ओळखणारं एक कुटुंब या महानगरात आहे. ज्याच्या आजुबाजूचे दोन चार चेहरे नाही म्हणता ओळखतही असतील आपल्याला.पण जी ओळख निर्माण करण्यासाठी आपण जीवाचं रान करून, सगळ्यांना भांडून इथवर आलो होतो ती ओळख कुठे हरवली? '
राहुल प्रश्नांच्या गुंत्यात अडकत चालला होता
'कशी आणि कधी मिळणार आहे आपल्याला ती स्वप्नातली संधी? जमणार आहे का नाही आपल्याला आपली वेगळी ओळख निर्माण करायला?अजून किती दिवस इतरांवर ओझे होऊन जगणार आहोत आपण? इथे कोठून कोठून माणसे येतात.त्यांना नोकरी मिळते,कुणी आपला छोटेमोठे धंदे उभारतो, ही मुंबई म्हणे कुणाला उपाशी राहू देत नाही! मग माझेच असे नशिब का?'
आज सकाळपासून तो उपाशीपोटी वणवण करत होता त्यातच मनातल्या या प्रश्नांच्या काहुराने त्याचे डोके खूपच दुखायला लागले होते. त्याला ग्लानी यायला लागली दोन्ही हातानी आपले डोके गच्च पकडुन तो तिथेच कलंडला...बेशुध्द झाला...
आजूबाजूला गर्दी जमली...कुणीतरी त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत होते...
गर्दीत बाजूला कुणीतरी म्हणत होते...
'काय ना, दारू पिऊन कुठेही पडतात लोक आजकाल!'
------ ©प्रल्हाद दुधाळ पुणे.
(9423012020)