स्वप्नस्पर्शी - 12 Madhavi Marathe द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्वप्नस्पर्शी - 12

                                                                                          स्वप्नस्पर्शी : १२

       सकाळी ठरल्याप्रमाणे भराभर आवरून सगळे निघाले. अस्मिताचा नुसता जीव जात होता. माझ्याशिवाय तुम्ही खरेदीला कसे चालले. पण फोनवरून नुसतेच खोटे भांडत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. गाडीत गप्पा, हसणे खिदळणे याला नुसता ऊत आला होता. वासुचं हे चहू अंगाने फुललेले रूप पाहून मनात प्रत्येकाला बरं वाटत होतं. खरं तर वीणालाही बरोबर घ्यायची इच्छा होती पण स्वरूपाने तो विचार आवरता घेतला. कोल्हापूरला पोहोचल्यावर आधी अंबाबाईचे दर्शन घेऊन कार्याचे आमंत्रण देवीला देऊन तिची पुजा केली. मंदिराबाहेर पडल्यावर आधी सगळ्यांनी स्पेशल मिसळपाव खाल्ला आणि मग आबांच्या मित्राच्या दुकानात कपडा खरेदीसाठी गेले. नाना प्रकारचे रंग, पोत, डिझाईन असलेले शालू उलगडले जाऊ लागले. स्वरुपा खरीदारीमध्ये चोखंदळ आणि चटपटीत होती. ठरल्याप्रमाणे १० शालू, त्यावर वेलवेटचे डिझाईनर ब्लाऊज आईने व तिने पसंत केले कारण आता ब्लाऊज शिवत बसायला वेळच नव्हता. वीणाचा खास भारीवाला शालू वासू आणि स्वरूपानी पसंत केला. मग कामवाल्याबायांच्या सहा डिझाईनर साड्या निवडून झाल्या. वीणाकडच्यांना द्यायच्या मानापानाच्या साड्या खरेदी नंतर पुरुषांकडे मोर्चा वळला. आठ शेरवान्यांमध्ये वासूची भारी शेरवानी पुरुषवर्गाने पसंत केली. पाच सहा शर्ट लागले तर राहू द्यावे म्हणून ते घेतले गेले. मुलांच्या हातात पैसे द्यायचे ठरले होते, कारण त्यांच्या मापाचा प्रश्न होता. दुकानदाराच्या नोकरानी मधे मधे दिलेले चहा, कोल्ड्रिंक, आइसक्रीम खात पित सहा सात तास खरेदी चालू होती. वेळेचं भान कुणालाच नव्हतं. खरेदी संपली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजल्याचे लक्षात आले.

       थकल्या शरीराने पण तृप्त मनाने सगळे गाडीत बसले. एक दोन तासांनी एक धाब्यावर जेऊन घेतलं. आई हे बाहेरचं जग किती वर्षांनी एन्जॉय करत होती. घरी पोहोचेपर्यन्त दहा वाजत आले होते. दुरूनच घरावरची लाइटींग झगमगताना दिसू लागली. गडयांनी गरम पाणी तयार ठेवले होते. कपडे बदलून गरम पाण्याने हातपाय धुवून लवकरच सगळे झोपेच्या स्वाधीन झाले.

           हळूहळू फराळाचे खमंग वास दरवळू लागले. चकाकतं घर लग्नासाठी सज्ज झालं. अधून मधुन राघव वासुचे कॉन्सलिंग करत होते. मधे विशालने व्याही भोजनाचे आमंत्रण दिलं. तिथला जेवणाचा प्रोग्राम झाला. सगळेच सगळ्यांच्या ओळखीचे असल्याने मस्त गप्पा, खाणे, पिणे त्यात नवीन भर म्हणजे  वीणा, वासुला चिडवणे यात व्याहीभोजन पार पडले. नंतर स्वरूपाने मेहंदीवाली, बांगडीवाली यांचे वार लावून दिले. राघवांचा एनजीओचा मित्र येऊन देणगी घेऊन गेला. त्याच्या कडून बऱ्याच नवीन उपक्रमाची माहिती कळाली. लोकं काय काय करत असतात आणि किती प्रकारची उपलब्धी आता त्यासाठी झाली आहे यावर बऱ्याच चर्चा झाल्या. आबांना भेटून त्यालाही छान वाटले. एक एक काम संपवून राघव आतून समाधान अनुभवत होते. दिवस कसे गेले काही कळाले नाही. धुमधडाक्यात दिवाळीची पहाट आली. मानाची चार बोटे तेल लावायला आईनी स्पर्श केल्यावर राघवांना खुप बरं वाटलं. तसेच हे ही लक्षात आले की दिवाळीला आपण बरेचदा आलो पण तेव्हा आई बसल्या बसल्या सगळ्यांना उत्साहाने सुचना देत असे. पण आता किती वर्षांनी ती परत हे जग अनुभवतीये. तेल उटण्यांच्या आंघोळी, फटाक्यांचे आवाज, झगमगतं घर, वासुने आणलेला मोठा आकाशकंदील, दारासमोर मोठी रंगीबिरंगी रांगोळी, अंगणात तेवत असलेल्या पणत्या, सजलेली बाया माणसे, झोपाळ्यावर बसुन राघव ते सगळे निरखत राहिले. आज थोडा निवांतपणा होता. उद्यापासून पाहुण्यांची धामधुम सुरू होणार होती. लग्नाआधी एकेक विधी सोडमुंज, देवब्राम्हण पार पडत होते. घरच्या घरी सगळे असल्याने कुणावर ताण नव्हता. दिवस तरीही गडबडीतच गेला. दुसऱ्या दिवशी एकेकजण येऊ लागले. मधुर, अस्मिता, मुलं, नानाकाकांकडचे सगळे जमले. मग काय नुसतं गप्पा, खाणे पिणे, कामं, वासुला चिडवणे यातच वेळ जात होता.

         नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन थाटात पार पडलं. मग उरलेले पाहुणे बहिणी, जावई, मुलं आले. घर उत्साहाने फुलून गेलं होतं. पाडव्याचा दिवस उजाडला. सगळे सजुन धजून वधुघरी जायला निघाले. तिथल्या तिथेही वासूच्या मित्रांनी बॅन्ड लावून नाचून घेतलं. सगळ्यांना नाचायला लावलं. वाजत गाजत वऱ्हाड नानी मावशीच्या घरी आलं. तिथे वाजंत्रीच्या सुरात वऱ्हाडाचं स्वागत झालं. एकेक विधी पार पडू लागले. वधुवेशात सजलेली वीणा आणि वरवेषातला वासू अतिशय सुंदर दिसत होते. आईने आधी त्या दोघांची नजर काढायला लावली. जोडा फारच शोभत होता. सगळे विधी झाल्यावर पंचपक्वान्नाच्या भोजनाची पंगत बसली. एकमेकांना आग्रहाच्या, घास भरवणे, उखाणे, विहीणीगाणे या सरबराईत पंगत पार पडली. लग्न अगदी थोडक्यात पण संपन्नतेने पार पडले. वरगृही जाताना हमसून रडणारी वीणा पाहून सगळ्यांनाच भरून आले. संध्याकाळी लक्ष्मी घरी आली. तिचे पुजन करून गावातली मंडळी आपापल्या घरी गेली. पाडव्याचा ओवाळण्याचा कार्यक्रम भाऊबीजेला ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण होऊन वीणाकडच्या सगळ्यांना तीर्थप्रसादाला व जेवायला आमंत्रण होते. साग्रसंगीत पुजा पार पडून घाईगडबडीत दिवस संपला. संध्याकाळ होऊ लागली तशी वासूची मनःस्थिती बदलू लागली. राघव त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. सतत त्याला धीर देत होते. वीणा नजरेने काळजी करू नको म्हणून सांगत होती. त्याच्या मित्रांनी फुलांची सजावट करून खुप छान रूम तयार केली. मित्रांच्या चिडवचिडवीत वासू अडकला. त्याचं कसनूसं हसू पाहून राघवांनी त्याला बाजूला नेलं. “ वासू, असा अस्वस्थ नको होऊस. मनावर ताणही नको घेऊ. तू फक्त आता वीणा तुझ्याबरोबर कायमची साथ द्यायला आहे याचा भरभरून आनंद घे. खुप गप्पा मारा. भविष्यकाळाची स्वप्न रंगवा. मनाची जवळीकता अनुभवा. तू  तिच्यापासून काही लपवून ठेवलेले नाहीयेस की एव्हढं अस्वस्थ वाटावं. उलट सगळं आकाश आता मोकळं आहे. त्यात तुला पाहिजे ते रंग भरू शकतोस.”

        “ खरय दादा, उगाच घाबरत होतो मी. वीणा पण नजरेने कधीची धीर देत आहे.” राघवांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि परत मित्रांमध्ये त्याला पाठवलं. आता तोही मित्रांच्या चिडवण्याला पलटवू लागला. हसण्याच्या कल्लोळात वासू वीणाला खोलीत सोडून सगळे निघून गेले.   

     लग्न थोडक्यात पण छान पार पडले. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करून सगळे आपापल्या गावाला जायला निघणार होते. आबांनी सकाळी सगळ्यांना हॉलमधे एकत्र जमायला सांगितलं होतं.

    दुसऱ्या दिवशी नाष्टा झाल्यावर सगळे एकत्र आले. आबा म्हणाले “ वासुचं लग्न झालं आणि आता आम्ही सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो. आम्ही तिघा भावांनी मिळून घर आणि जमिनीच्या बाबतीत असे ठरवले आहे की, इथे वासू एकटा रहाणार आहे. बाकी कुणी गावाकडे येऊन राहू इच्छित नाही, तर हे वडीलोपार्जित घर त्याच्या नावावर करून देत आहोत. जमिनीमध्ये वासू खुप मेहनत घेत आहे तर तो शेती करून दरवर्षी ठराविक रक्कम आणि धान्य आपल्या भावंडांना देईल आणि त्याच्या अडीअडचणीला तुम्ही सगळे मदत कराल. असे आम्ही ठरवले आहे. कुणाला काही आक्षेप ?” ठराविक रक्कम आणि धान्य वर्षाला काही न करता मिळणार म्हंटल्यावर कोणीच त्यांना विरोध केला नाही. वेळ पडली तर वासुला सगळेच मदत करायला एका पायावर तयार असत. तो सगळ्यांचा फार लाडका होता. आबा पुढे बोलू लागले “ आता तुम्हाला एक बॉक्स देणार आहे. त्यात आईनी आपली आठवण म्हणून एक गिफ्ट प्रत्येकाला दिली आहे, आणि एक माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना भेट आहे. राघव आणि वासुनी लग्नाचा आहेर व ओवाळणी म्हणून आधीच शालू, शेरवान्या दिल्या आहेत.” सगळ्यांनी माना डोलावल्या. आबा एकेकाचे नाव घेऊ लागले, आई तो बॉक्स त्याच्या हाती देऊ लागली. जसजसे बॉक्स उलगडू लागले तसतसे आनंदाचे चित्कार बाहेर पडू लागले. आबांनी दिलेली घसघशीत लाखाची व आईच्या भरीव दागिन्यांची भेट पाहून सगळेच भारावले. या भेटीमागे आई आबांची जीवनातली आवराआवर लक्षात घेऊन सगळेच गलबलले. या भेटीपेक्षा आबा आई म्हणजे सगळ्यांसाठी शंभर नंबरी सोनं होतं. वातावरण गंभीर होतय पाहून राघवांनी थट्टामस्करी सुरू केली. मग परत सगळे त्यात गुंगून गेले. तृप्त मनाने निरोप घेऊन पाहुण्यांची पांगापांग झाली. त्यानंतर गड्यांना भेटी दिल्या गेल्या. त्यांनी स्वप्नातही लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा केली नव्हती. त्यांच्या त्या खुशीच्या अश्रूंमधे आई आबा बुडून गेले. त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रमणाऱ्या लोकांना दिलेल्या भेटीने नोकर वर्गातून जे दुवे बाहेर आले ते अंतःकरणातून होते. तप्त धरतीवर पावसाचे थेंब पडणाऱ्या सुखद अनुभूतीचे होते. ज्यांच्याकडे काही नसतं त्यांना अचानक झालेल्या धनलाभाचे मोल अनमोल असते. गळ्यात पडलेल्या कामवाल्यांचे अश्रु आई आबा पुसत असतानाचे दृश्य सगळ्यांच्या मनावर कोरले गेले.

    राघव, मधुर बरोबर दुसऱ्या दिवशी जायला निघणार होते. आई आबांबरोबर तुळजाभवानीचे दर्शन करून घेऊन वासू वीणा केरळला फिरायला जाणार व ते आल्यावर राघव, आई आबांना घेऊन साऊथ ट्रीप करणार असे ठरले. राघव  जायची वेळ आली तशी आई आबांच्या मनाची चलबिचल झाली. राघवांनी केव्हढी मोठी कामं मार्गी लावली होती. मायेने, अभिमानाने राघवांना त्या वृद्ध जीवांनी भरभरून आशिर्वाद दिला. प्रेमाने पोटाशी धरून त्यांचे थरथरते हात पाठीवरून फिरले आणि राघव तृप्त झाले. जड मनानी निरोप घेऊन राघव स्वरुपा निघाले. मधुरला पुढे पाठवून चार दिवस स्वरूपासह खंडाळ्याला रहाणार होते. किती महिन्यांनी ते दोघेच निवांतपणे रहाणार होते. त्यांच्या हिरव्या स्वप्नासह.

                                                                                        .................................................