Swpnasparshi - 14 books and stories free download online pdf in Marathi

स्वप्नस्पर्शी - 14

                                                                                                   स्वप्नस्पर्शी : १४

जसजश्या बॅगा भरणं सुरू झालं तसतश्या न्यायच्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या. अगदी ताटं, वाट्या, चमचे, ग्लास, तांबे भांडे, स्वैपाकघरात लागणारे सामान, प्राथमिक किराणा, सुई दोरा, पासुन आठवून आठवून बॅग भरली. त्या घरात फर्निचर तर सगळं होतं पण बाकी जरूरी सामान तर घ्यावच लागणार होतं. उद्या सकाळी सातला निघायचे होते. रात्री झोपताना राघवांना वाटले आपली या घरातली कदाचित शेवटची पण रात्र असू शकेल. या विचाराने ते दचकलेच. पण हे ही खरं असेल एकदा का तिकडची कामं सुरू झाली की इकडे आपण येणार ते काही कारणापुरतच. दोन, चार, फार तर दहा दिवस. आता हे मधुरचे घर होणार. हौसेने बांधलेल्या घराचा, तारुण्याचा, मुलांच्या प्रगतीचा काळ अनुभवलेल्या घराचा निरोप घ्यायचा या विचाराने राघव गलबलले. डोळे मिटून पडलेल्या स्वरूपाचीही तीच अवस्था होती. इतक्या वर्षांचे जोडले गेलेले संबंध सोडून जायचं अवघड झालं. स्वरुपा सोडून चालली म्हणुन किती वेगवेगळ्या मैत्रिणींच्या पार्ट्या झाल्या. आठवण म्हणून प्रत्येकीनी काही ना काही भेटवस्तु दिलेल्या होत्या. अश्रु भरले निरोप झाले. नेहमी फोनाफोनी, व्हॉटस अपवर टचमधे रहायचे वायदे झाले. पण स्वरुपाही जाणत होती, या सगळ्यांमधून केवळ दोन तीन संबंधच नेहमीसाठी रहातील. पण ठीक आहे तिथेही तर नवीन संबंध जोडले जाणार होते. प्रकाशकाकांचं कुटुंब तर आत्ताच जोडलं गेलं होतं. विचारातच तिलाही झोप लागली.

    सकाळी चहा नाष्टा करून चौघे निघाले. दोन गाड्या घेतल्या होत्या एक राघवांची, जी तिथेच ते वापरणार होते आणि एक मधुरची तो त्यानेच वापस येणार होता. दोन गाड्यांमुळे सामान नीट मावले. स्वरुपा, राघवांना भावपूर्ण नजरेने घराचा निरोप घेताना बघून मधुर अस्मिताच्या मनात कालवाकालव झाली. दोघांनाही हुंदका आवरेना. चौघेही भरल्या डोळयांनी, भरल्या मनानी एकमेकांच्या कुशीत विसावले. क्षणभरानी लगेच सावरत राघव म्हणाले “ चला, लांबचा टप्पा गाठायचा आहे. निघायला हवं.” कालच मुलांना त्यांची आजी येऊन घेऊन गेली होती. नाही तर मुलांनी निघायच्या वेळेस गोंधळ घातला असता. अस्मिताच्या आईलाही राघव स्वरूपाचा निरोप घेताना जड गेलं होतं. आपलसं करणारं कुटुंब कुणालाही हवं असतं.

    रस्त्यानी जाताना दोघंही ओळखीच्या खुणा पहात आठवणी जागवत राहिले, नंतर जसं पुणं पुर्णपणे सुटलं तसं दृष्टीआड सृष्टी होऊन त्याविषयी संवेदनशील बनलेलं मन हळूहळू बाहेर आलं व नवीन अनुभव घ्यायला सज्ज झालं. नाविन्याची ओढ आता मनाला वाटू लागली. त्या ओढीने दोघांना एकप्रकारचा उत्साह जाणवू लागला. मग त्या आनंदात गप्पा रंगू लागल्या. मधे थांबून चहा भजे खाणं, एखाद्या सुंदर सृष्टिसौंदर्याच्या तुकड्याचा, थांबून फोटो काढणं, असा प्रवास चालू होता. प्रकाशकाकांनी आधी त्यांच्या घरी जेवण करून मग नवीन घरी जाऊया असे सांगितले होते. एक एक टप्पा सुरळीत पार पडत साधारण ते तीन वाजता गुहागरला पोहोचले. स्वरूपाच्या म्हणण्याप्रमाणे आधी व्याडेश्वराचे आणि दुर्गादेवीचे दर्शन घेतले. देवीच्या मंदिरामागे थोड्या अंतरावर समुद्र होता मग तिथेही जाऊन मन भरून त्याचेही दर्शन घेतले. आयुष्याच्या शेवटच्या मुक्कामाला आशिर्वाद मागून ते काकांच्या घरी जायला निघाले.

    प्रकाशकाकांच्या घरी पोहोचल्यावर जिवलग भेटावा तसा आनंदाचा कल्लोळ उसळला. जयाकाकूंनी तर स्वरुपाला मिठीच मारली. नवं नातं इतक्या आपुलकीने लगेचच जोडलं गेल्याने, स्वरूपाचे जुन्या सोडलेल्या नात्यांचे बंध हळुवारतेने विरघळून गेले. उद्या सकाळी इथे राकेशही पोहोचणार होता. सगळी प्रोसिजर तयार होती. त्या दोघांच्या सह्या कागदावर झाल्या की बाकी सगळ्याची पूर्तता होऊन जमिनीचा व्यवहार पुर्ण होणार होता. थकलेले चौघं फ्रेश होईपर्यंत जयाकाकूंनी पानं वाढली. त्या गरम गरम जेवणाच्या वासाने त्यांची भुक खवळली. “ मधुर आज तुझ्यासाठी नारळाची खीर केली आहे बरका.” जयाकाकू आणि मधुरची चांगली गट्टी जमली होती. राघवांनी हसतच विचारले “ मग आम्ही खायची की नाही खीर.” थट्टा मस्करीत जेवणं झाली. स्वरूपानी त्यांच्यासाठी आणलेली बाखरवडी, अंजिरबर्फी, चिवड्याचे पाकीट वसुधाच्या हातात दिले. थोडावेळ थांबून ते नवीन घरात जाण्यासाठी निघाले. प्रकाशकाका आणि वसुधाही बरोबर येणार होती. जयाकाकूंनी थरमास भरुन चहा दिला आणि एका कॅन मधे दुध दिले. चार दिवसाची भाजी, फळं, रात्रीच्या जेवणाचा डब्बा असे सगळे त्यांच्या बरोबर दिले. घरी गेल्या गेल्या कामाला लागू नका. जरा विश्रांती घ्या असे सांगुन उद्या जेवायला इकडेच या असेही बजावले.

    आपण घर न पहाताच भाड्याने घेतले याबद्दल राघव व स्वरुपा यांच्या मनात साशंकता निर्माण झाली होती. पण ते काकांच्या घराजवळ होते आणि मुख्य म्हणजे जी शेतजमीन ते विकत घेणार होते ते ही अगदी जवळ असल्याने बाकी गोष्टींकडे त्यांनी कानाडोळा केला होता. पण आता जेव्हा घरात जायची वेळ आली तेव्हा ते दोघे साशंक झाले. बंगल्यावर पोहोचल्यावर बाहेरून तर घर अगदी सुस्थितीत दिसलं. स्वच्छ साफसफाई केलेली नजरेत भरत होती. बाहेरचं आवार पुर्ण मोकळं होतं. कुणी रहात नसल्याने झाडांचा प्रश्न नव्हता, पण गुलमोहर आणि कडुलिंबाची चार झाडं बंगल्याला थंडावा देत होती. वर्षभर बागेची हौस भागवता येईल. स्वरुपाच्या मनात आलं. प्रकाशकाका दार उघडून आत गेले आणि खिडक्या उघडू लागले. उघड्या दारं खिडक्यातून आत चैतन्य उसळलं. खोल्या मोठ्या आणि हवेशीर सर्व सुखसोईंनी युक्त होत्या. ते पाहून सगळ्यांना समाधान वाटलं. मधुर एकदम आनंदाने म्हणाला “ बाबा, तुम्हाला सुर्योदय, सुर्यास्त दोन्ही पहायला मिळणार.” मधुरला सुर्याचं फार वेड होतं. पुण्याच्या घरातून दोन्ही पहाणं शक्य नसायचं तर तो सुट्टीच्या दिवशी पर्वतीवर जाऊन दोन्ही पैकी एक तरी एन्जॉय करून यायचा. “ खरच की.” स्वरुपलाही आनंद झाला. तिलाही सौन्दर्याचं वेड होतं. स्वच्छ सुंदर हवेशीर घर पाहून तिला खुपच हुरूप आला. नव्या नव्या कल्पना तिच्या मनात घोळू लागल्या. वोर्डरोब, सोफासेट, डाइनिंग टेबल, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन, गॅससकट सगळं तिथे होतं. प्रकाशकाकांनी सांगितलं. घरमालकाचा मुलगा वीकएंडला कधीतरी चक्कर मारत होता पण तोही दोन वर्षासाठी परदेशात गेला असल्याने घर पडून होते. आतापूरतं सगळच काम भागलं होतं. नवीन घरातच वस्तुंची खरेदी करायची असे ठरले. अस्मिताने भाज्या, फळं, दुध फ्रीजमध्ये ठेवून दिलं. कुठली बेडरूम राघवांची, कुठली स्वतःची हे आधी मधुरने ठरवून घेतले आणि मग त्याप्रमाणे बॅगा त्या त्या रुममध्ये ठेवून दिल्या. मागचा भाग बघायचा राहिला म्हणुन स्वरुपा आणि अस्मिता स्वयंपाक घराचं दार उघडून मागच्या अंगणात आल्या आणि पहातच राहिल्या. अंगणातच डोंगर असल्यासारखा तो समोर दिसत होता. ही मावळतीची बाजू होती. संध्याकाळ होत आल्यामुळे डोंगराआड जायच्या तयारीत असलेला तो शेंदरी सुर्य पाहून अस्मिताने घाई घाईने मधुर आणि राघवांना हाक मारली मग सगळेच घाईत बाहेर आले आणि भान हरपुन बघू लागले. शेंदरी रंगाची किरणं समोर नारळा पोफळींच्या वाडीवर पसरून त्यावर मावळतीच्या उन्हाचे रंग चमकत होते. पक्षी घराकडे चालले होते. भान हरपुन त्या शेंदरी रंगात सगळेच हरपुन गेले. सुर्य डोंगराआड गेल्यावर वातावरण स्तब्ध झाले. आतून एक प्रकारची शांती अनुभवाला येऊ लागली. त्यातून भानावर यायला सगळ्यांनाच जरा वेळ लागला.

    नंतर प्रकाशकाकांनी समोर नारळा पोफळींची वाडी पसरली होती तिथेच एक टुमदार बंगली दाखवत सांगितले तिथे आपण नंतर जावू. शेजारपाजार ओळखीचा असलेला केव्हाही चांगला. जिथे नजर टाकाल तिथे हिरवाई पाहून राघव हरखून गेले, पण त्यांच्या मनात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. तसे काका म्हणाले “ अरे! काळजी करू नको. आतापर्यंत तर चोऱ्या अश्या कधी झाल्या नाही आणि घराला चांगली मोठी कंपाऊंड वॉल, दारं खिडक्या भक्कम लाकडी, व लोखंडी ग्रील असताना भीती कशाची ? शिवाय एक दोन दिवसात तुझा कुत्रा पण येईल. समोरच माझी वाडी आहे. मागे ही वाडी, समोर माझी आणि या बाजूला तुझी. पाहिजे तर एखादा पहारेकरी ठेव.” खरच की हे तर आपल्या लक्षातच आले नाही. राघव मनाशीच हसत आपल्या होणाऱ्या शेत जमिनीकडे पाहून, तिथला भावी हिरवा नजारा मनाशीच न्याहाळू लागले. “ घर लावणं झाल्यावर घराचं अग्रिमेन्ट दाखवून लँड लाइनसाठी बी एस एन एल ऑफिसमध्ये अर्ज देऊन येऊ.” राघवांना प्रकाशकाकांचं खुप कौतुक वाटत होतं. कसं पद्धतशीरपणे हळूहळू उलगडत नेतात हे. मागच्या आवारात काही मोठी झाडे आहेत हे त्यांनी टिपलं. एक तर आंबा होता पण बाकी झाडे त्यांना ओळखू येईना. मग काका सांगू लागले हा काजू, रातांबा, निरफणस, फणस. निरफणस हा फक्त कोंकणी लोकांनाच माहित असतो. अस्मिता, वसुधा चहाचा ट्रे घेऊन आल्या. निवांतपणे त्या हिरवाईत बसुन आसमंत न्याहाळत, गप्पा मारत चहाचा आस्वाद सर्वांनी घेतला. मधुर म्हणाला “ बाबा, मी पण इथेच रहातो. किती छान वाटतय इथे.”  असं निवांतपणे म्हातारपणी रहायचं असतं. आता तुमचे मेहनत करायचे दिवस आहेत. भरपुर मेहनत करा. श्रमाचा आनंद घ्या. तेव्हाच झोपेचं सुख कळतं. शिवाय म्हातारपणी जेव्हा आपण मागे बघतो तेव्हा आयुष्यात खुप काही केलं आहे याची जाणिव होऊन मनात कृतार्थतेची भावना येते. ती फार महत्वाची असते. नंतर तर तुला इथे यायचच आहे.” राघव म्हणाले. मधुर काही न बोलता समोर अगम्य भावाने पहात राहिला.

    अंधार पडू लागला. तसे काका आणि वसुधा जायला निघाले व उद्या सकाळी सामान लावायला येतो अशी त्यांनी तयारी दाखवल्यावर राघवांनी फार सामान नाहीये आम्ही लावून टाकू असे सांगितले. तुला आता इथे काय काय लागेल, काय आणायचं राहिलं हे एकदा बघून घे आणि लिस्ट कर. आपण बाजारात जाऊन घेऊन येऊ. दहा वाजता येतो मी. असे सांगुन ते निघून गेले. काळोख्या रात्रीच्या आकाशात चांदण्या डोकावू लागल्या असं दृश्य शहरी वातावरणात लाभणं अवघड होतं. चौघही अंगणातच शांत बसुन राहिले. एखाद दोन डास कानाशी गुणगुणतही होते, पण एकदा का हे दृश्य रोजचेच झाले की  आजच्या एव्हढा मनातून आनंद घेता येणार नव्हता, कारण नाविन्य असतं तोपर्यंतच त्याचा आनंद जास्त असतो.

    कुणालाही बॅगा उघडून सामान लावायची इच्छा होत नव्हती. उद्या बघू म्हणून ते तिथेच गप्पा मारत बसले. बऱ्याच वेळाने उठून अस्मितानी प्लेट्स आणि जयाकाकूंनी दिलेला डबा आणला. त्यात आलू पराठे, चटणी, चित्रान्न आणि शिरा होता. काकूंच्या समजदारपणाला दाद देत मधुरने प्लेट्स भरणे सुरू केले. तितक्यात स्वरूपाच्या लक्षात आले आपण नवीन घरात आलो आणि देवसुद्धा मांडले नाही. मग उठून तिने आधी देवाचा डब्बा काढला. घरात देवघराची एक वेगळी खोली होती, तिथे संगमरवरी चोथर्यावर वेलवेटचे कापड घालुन कुलदेव,देवी, पंचायतन मांडले. दिवा उदबत्ती लावली. बरोबर आणलेल्या केशरी पेढ्याचा पुडा उघडून तिने नैवेद्य दाखवला. सगळ्यांनी पाया पडून सर्व काम सुरळीत पार पडू दे. घरात सुखशांती लाभू दे अशी प्रार्थना केली. मग बाहेर अंगणात जेवणं सुरू केली. जयाकाकूंच्या हाताला फारच छान चव होती. जेवण झाल्यावर दिवसभराच्या प्रवासनी थकलेले शरीरं झोपण्यासाठी वाट पाहू लागले,  पण मन मात्र अजुन तिथेच थांबू पहात होतं. इतकी निस्तब्ध शांतता तर शहरात तर शक्यच नव्हती. इथे शांततेला नाद होता. कितीतरी वेळाने अस्मिता उठली. कपडे बदलायचे, अंथरूणं पांघरुणं काढायची तर बॅगा उघडाव्या लागणारच होत्या. हळूहळू सगळेच आत गेले. राघवांनी घरच्या दारं खिडक्या बंद केल्या. मधुरनी दोन्ही बेडवर चादरी घातल्या. कपडे बदलून चौघे झोपायला गेले. स्वरुपा, राघव समाधानानी नवीन घरातल्या झोपेचे सुख अनुभवू लागले. कालची रात्र तर कातर होती. अनिश्चिततेच्या जाणिवेने आणि प्रियजनांच्या विरहाने बेचैन होती, पण आज त्या अनिश्चिततेत प्रवेश केल्यावर स्थिरता आली. नाविन्याची गोडी वाटू लागली. नवीन प्रियजन जुळू लागले आणि काही करण्याच्या स्वप्नांनी या नवीन जगाचा भाग होण्यासाठी दोघं आले होते. त्या कर्तृत्वाला सामोरा जायचा हुरूप योग्य त्या परिस्थितीनी वाढवला होता. त्यामुळे भावी हिरव्या स्वप्नांच्या गुंगीत दोघेही निवांत झोपले.

                                                                .........................................................................

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED