स्वप्नस्पर्शी - 16 Madhavi Marathe द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नस्पर्शी - 16

                                                                                          स्वप्नस्पर्शी : १६

   राघवांचा आता उठल्यावरचा चिंतनकाळ कमी झाला होता. शेतीविषयक कामं जेव्हढी सकाळी कराल तेव्हढी चांगली, काकांच्या या विचाराने दोघही पहाटेच चहा पिऊन शेतात जात असत. मोटर चालू करुन पाण्यानी जमिन मऊ करायचं काम चालू होई. उन्हात पाणी सोडलं तर त्याची वाफ होऊन जाते आणि जमिनीला पाणी कमी मिळतं, म्हणुनच पहाटेच आणि सुर्यास्ताच्या वेळेला पाणी सोडणं चालू होतं. पंप सुरू झाला की त्या धो धो पडणाऱ्या पाण्याचा ओघ छोट्या हौदाची सीमा ओलांडून खणलेल्या चरांमधुन झुळूझुळू वाहू लागला, की दोघं ते पाहूनच तृप्त होतं असे. कुठे पाणी अडतय का ? पोहोचत नाहीये का ? याची पहाणी ते करत.  तास दीड तास पाणी पिऊन जमीन तृप्त होत असे. आज काकांनी सांगितलेल्या जागा कोरड्या ठेवायच्या होत्या म्हणुन राघवांनी विटा ठेऊन त्या जागेवर पाणी अडवून टाकलं. पाणी काम आटोपतं घेऊन दोघांनी नाष्टा केला. स्वरूपाने सगळ्यांसाठी चहा पोहे केले होते, एकदा काम सुरू झाले की सगळे संपल्यावरच दम घेणार होते. सात वाजता मजुर व काका आले व चहा नाष्टा आटोपून सगळे कामाला लागले. बांधावर आणि जमिनीच्या कडेने साधारण पन्नास नारळांची लागवड करण्याचे ठरले. तसेच सुपारीच्या दोन झाडांमध्ये केळीसाठी खड्डे करायच्या खुणा आखून ठेवल्या. मग ८ x ८ मीटर अंतरावर १ x १ x १ मीटर आकाराचे खड्डे करण्याचे काम चालू झाले. काकांनी आणि राघवांनी मिळून पाला पाचोळयांच्या पिशव्या शेतात आणल्या. गडी जसजसे खड्डे खणून पुढे जात तसतसे दोघं मिळून पालापाचोळयानी तो अर्धा खड्डा भरुन ठेवू लागले. राघवांनी काकांना तुम्ही नका करू मी करतो असं कितीदा विनवलं पण काका हाडाचे शेतकरी नुसती देखरेख करणं त्यांना जमणार नव्हतं. तो पाला पाचोळा उडून जाऊ नये म्हणुन त्यावर थोडे थोडे शेणखत टाकणं चालू झालं. हवेत ऊनही जाणवत होते. कोकणातल्या दिवस रात्रीच्या तापमानात फार फरक नसल्याने झाडांना तापमान बदलाचा फार ताण सहन करावा लागत नाही. दमट हवा जवळपास वर्षभर रहाते. त्यामुळे नारळी पोफळी इथे वर्षभर व्यवस्थित वाढतात. जेवायची सुट्टी देऊन नंतर परत काम चालू राहिले. दिवसभरात पन्नास खड्डे खणुन ते पाळापाचोळयाने व शेणखताने अर्धे भरून झाले. आता ते पाण्याने भिजवत रहाणं हे काम महिनाभर करायचं होतं. “ राघवा, परवा दहा वाजता घरी ये. आपण टेम्पो घेऊन रोपवाटिकेत जाऊ आणि तिथुन पंचवीस केळीची रोपं घेऊन येऊ. बांधावरची पंधरा आंब्याची झाडं, पंचवीस नारळं यांनी चांगला आडोसा तयार होईल.” राघव आनंदले. उद्या त्यांच्या काळ्या तांबड्या शेतजमिनीवर थोड्या स्वरूपात का होईना कोवळी हिरवळ दिसणार होती. शिवाय शेतात आधीच असलेला हिरवागार आंबा तर चहू अंगाने कैर्यांनी लगडुन डुलत होता. राघवांच्या लक्षात आले “ काका, ह्या एवढ्या कैर्यांचा आंबा तर भरपुर होईल. त्याचं काय करायचं ?”

  “ राघव, मला वाटतय आपण यातली दहा झाडं ठेकेदाराला द्यावी. नीलम जातीची झाडं आहेत ही. पाच झाडांची फळं त्याच्याकडून काढून घेऊ. ती पण तुला भरपुर होतील. मधुरला पाठवले तरी तुम्ही एव्हढे खाऊ शकणार नाही. पाच झाडांचे गळून, सडून, पाखरांनी खाऊन, मुलांनी दगडं मारून पाडले तरी तुझ्या हातात पाचशे ते हजार फळं येतील. थोडे तुला खायला ठेव, मधुरला पाठव, काही आंब्याच्या वड्या कर. तुला पाहिजे असेल तर आपण त्या बाजारात विकू. तिथे कायम मागणी असते. बाकी रस आटवून हवाबंद डब्यात साठवून ठेव. नील आल्यावर त्यालाही खाता येईल. दहा झाडांच्या फळांचे तुला कमीतकमी चाळीस पन्नास हजार तरी येतील आणि वड्यांचे पाच हजार. तुझा घरगुती उद्योगही सुरू होईल.” काका म्हणाले. राघव मात्र घरगुती उद्योगामधे फारसे इंटरेस्टेड नव्हते. बायकोनी आता कष्टाची कामं करावी हे त्यांच्या मनात नव्हते. राघवांनी स्वरुपाला विचारून सांगतो असे गुळमुळीत उत्तर दिले. ठेकेदाराशी बोलून घ्यायचं ठरलं.

    दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन काका आले. आंब्यांनी लगडलेली झाडं पाहून त्याने फळाची प्रत, गुणवत्ता बघितली. संख्येचा अंदाज घेऊन पंचावन्नचा आकडा सांगितला. काकांनी त्याच्याशी घासाघीस करून साठ हजार आणि पाच झाडांची फळे उतरवून देण्याचे त्याच्याकडून कबुल करून घेतले. शेतीवर नजर टाकत ते म्हणाले

  “ अंतर्भागात केळी लावून त्याचा आडोसा तयार झाला की पुढच्या सप्टेंबरला सुपारीची लागवड करता येईल. मग तुझी वाडी लावून तयार होईल.” राघवांनी पण चहुबाजूने नजर फिरवली. त्यांना जाणवलं गर्भार जमीन बाळाच्या आगमनासाठी उत्सुक झाली आहे, आणि बाप या नात्याने ती जाणिव आपल्यालाही भिडत आहे.

    आता आंब्या संदर्भात स्वरूपाशी बोलायचं होतं. एका मागोमाग एक प्रक्रिया चालू होती. अस्मिता, तिची आई मुलांना सुट्टी असल्याने इकडे आल्या होत्या. राघवांनी आंब्या वड्यांचे बेत त्यांच्या कानावर घातले पण आपल्याला पैशाची एव्हढी काहीच गरज नाही त्यामुळे हे काही करावं हे माझ्या मनात नाही हे ही त्यांनी सांगितलं. बायकांना तर हा घर बसल्या उद्योग आवडला होता. पण राघवांचेही बरोबर होते. एव्हढया उस्तवारीची सवय कोणाला नव्हती. पण गंमत म्हणुन करून बघूया असे सर्वानुमते ठरले. तीन कामावरच्या बायका आणि या तिघी मिळून सगळं पार पाडणार होत्या. वनिताला या सगळ्याची सवय होती. राघवांनी काकांच्या कानावर हे घातले. त्यांना लक्षात आलं राघव पैशापेक्षा माणसांना महत्व देतो. मग ते म्हणाले “ राघवा, माझ्याकडे वड्यांची नेहमी मागणी असते. त्याला मी पुरे पडत नाही. तर तू वड्या मला दे. तू माझ्याकडून पैसे घेणार नाही मला माहित आहे. त्याबदली आंतरपिकातल्या वेलदोडा, मिरी, व्हॅनिला शेंग, यांची रोपं मी तुला देतो. हा सौदा राघवांनी मान्य केला. यात सगळ्यांचेच काम झाले. स्वरुपा म्हणाली “ आम्ही तर वड्या करून पाच हजार कमावले असते पण आता तर वड्या करून आम्ही लाखों कमवणार.” “ ते कसे काय ?” सगळेच विचारात पडले. “ तुम्ही वड्यांचे पैसे न घेता रोपं घेतली त्या मसाल्याच्या उत्पन्नाचे पैसे कितीतरी पट होतील. ती रोपं कितीतरी वर्ष उत्पन्न देत रहाणार, म्हणजे आम्ही आता वड्या करणार त्याची फळं कितीतरी वर्ष चाखत रहाणार.” स्वरूपाचे लॉजिक एकून सगळेच हसू लागले. पण ते ही बरोबर होते. शेतीतून कसे उत्पन्न वाढतच जाते त्याचा हा एक नमुना होता.

   मग शेतीच्या अवजारांना नीट रचुन त्या खोलीत गवताच्या आढ्या तयार केल्या गेल्या. ठेकेदाराने आंबा उतरवून दिल्यावर तो गवतात नीट लावून ठेवणे, खाली वर करणे, आंबा कुठे सडत नाही ना ? हे पहाणे ही कामं बायकांना पुरू लागली. आंबे तयार झाले हे बघून एके दिवशी सकाळी आंबावडी प्रोग्राम सुरू झाला. स्वच्छ धुतलेले आंबे माचुन काढलेला रस एक मोठ्या पातेल्यात आटवायला ठेवला. रस आटवताना तो हलवायला ताकद लागत होती. वनिताला याची सवय असल्याने ती  झटपट कामं उरकू लागली. शेवटी त्यात थोडा रंग, साखर, व मॅंगो ईसेन्स टाकला. त्यामुळे वडीची चव अगदी बाजार सारखी लागू लागली. मग मोठ्या ताटांना तूप लावून आटत आणलेला रस त्यात ओतून थंड व्हायला ठेवला. नंतर त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून झाल्या. जास्ती कंटाळवाणं न होता. तीन ते चार तासात कामं पुर्ण झाली. राघव केळीचे रोपं आणायला गेले होते तोपर्यंत बायकांची कामे पुर्ण झाली. ते पाहून राघवांना आश्चर्यच वाटले. स्वरूपाने पुढे केलेल्या आंबावडीची चव घेऊन ते खुष झाले. घरच्या आंबावड्या हा विषय कौतुकाचा झाला होता.

   मग त्यांनी टेंपोतून आणलेली केळीची रोपं उतरवून घेतली. दुसऱ्या दिवशी केळी लावायचं ठरलं होतं. खड्डे आधीच खणून झालेले. काकांनी दमदार चार ते पाच पानं असलेल्या रोपांची निवड केली. आज संध्याकाळी पाणी सोडून खड्डे चांगले ओलसर करून ठेवायचे होते. अधुन मधुन डोकावणारं आभाळ पहात आजची कामं संपवली. राघवांना कुठेतरी शांततेची ओढ लागत होती. पण मनाशी ते म्हणत थोडेच दिवस, एकदा का रोपं लावून झाली की पाणी घालणं, गड्यांकडून तण काढून घेणं, अधुन मधून कीड प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन किटकनाशकं टाकणं, एव्हढच करावं लागेल. अशी मनाची समजूत घालुन ते काम उपसत होते. शेतजमिनीवरचे झाडं कापून आलेले चाळीस हजार, आंब्याचे साठ हजार, असे आत्ताच त्यांच्या हातात लाखभर पैसे आले होते. पण हिरव्या स्वप्नांच्या उस्तवारीत त्यांनी फक्त मनाची शांती पकडली होती, पैसा नाही. दुसऱ्या दिवशी आल्या आल्या गडयांनी कार्बनडाजिम १० ग्रॅम, आणि मोंनोक्रोटोफॉ १५ मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून त्याचे द्रावण केले व त्या द्रावणात केळीचे कंद अर्धातास बुडवून ठेवले. तोपर्यंत सगळ्यांनी चहा नाष्टा करून घेतला, त्यानंतर सुरू झाली लागवड प्रक्रिया. १x१x१ च्या खड्ड्यात मातीच्या गोळ्यासह ते रोप ठेऊन त्यात १० ग्रॅम फॉरेट मिसळून दिले. रोपभोवती थोडे शेणखत, कंपोस्ट खत, माती घालुन योग्य त्या रितीने त्यावर दबाव दिला. जसजशी झाडांची लावणी होऊ लागली तसतसे एकेक चर थोडे मोकळे करून हळुवारतेने पाणी देण्याची प्रक्रिया सुरू केली. दुपारपर्यंत ते काम पुर्णही झाले. संध्याकाळच्या शांततेत अंगणात बसुन जमिनीवरची हिरवी कोवळी नक्षी निरखताना सगळे हरखून गेले. राघवांच्या हिरव्या स्वप्नाला सुरवात झाली होती. त्यांच्या मनाचा आनंद सगळं कुटुंब भरभरून घेत होतं. प्रत्येकाच्या बोलण्यात शेतीचा, घरच्या घडामोडीचा उहापोह असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वानुसार एखादी सुचना, कल्पना असायची. राघवांचे स्वप्न सगळे जगत होते. थोडा वेळ होता तेव्हा वासू आणि वीणाही इकडे येऊन पाहून गेले. त्या दोघांचा संसार सुरळीत मार्गी लागला होता. वासुनी गावात सामुहिक विवाह खुप धुमधडाक्यात लावून दिला त्यामुळे आबांची इच्छा पुर्ण झाली होती. गावात त्यांना वासुला अजुनच मानाचे स्थान मिळाले, या सगळ्याचे श्रेय वासू न चुकता आपल्या दादाला देत होता.

    सुट्टी संपत आली तशी अस्मिता मुलांना घेऊन पुण्याला गेली. परत दोघांचं आयुष्य सुरू झालं. मधल्या सगळ्याच गडबडीत त्यांना एकमेकांशी धड बोलायलाही मिळालं नव्हतं. हळुहळू पावसाचा रंग चढू लागला. काकांनी इथे साप निघतात याची कल्पना देऊन ठेवली असल्याने, शेतात फिरताना राघव गमबुट घालुन फिरू लागले. एक दोन रोपांनी वगळता सगळ्या रोपांनी आता जीव धरला होता. हवेत हात फैलावून डुलणाऱ्या पानांचं दृश्य मनोवेधक वाटत होतं. जुनच्या मध्यावर मग नारळांच्या रोपांचीही लागवड केली. आता तर वाडीला रंग, रूप, आकार सगळच आलं. टी x डी या जातीच्या रोपांची काकांनी निवड केलेली. ही कमी उंचीची आणि लवकर फळ धरणारी जात होती. या नारळाच्या झाडाला ४ ते ५ वर्षात फळं येतात. यापासून जवळपास १०० ते १२५ नारळं मिळतात असे त्यांनी सांगितले.

    काळ पुढे सरकत होता. एक एक गोष्ट जशी सुरू झाली तशी पुर्णही होत गेली. किरकोळ अडचणीनंतर घरही बांधून पुर्ण झालं. नारळ, आंबा, केळींनी वाडी फुलली होती. डोलत होती. तुफान वाऱ्या पावसाच्या नव्या अनुभवाने राघव, स्वरुपा कधी दडपत होते तर कधी त्या हवेचा आस्वाद घेत होते. गडगडाटाने सुरू होणाऱ्या पावसाची नांदी वेगवेगळ्या सणांच्या आगमनाच्या सूचना देत होती. आषाढात कोसळणाऱ्या गजधारा पावसाचं रूप पाहून कोंकणी पावसाची करामत कळली. एके दिवशी डोंगराकडे बघत असताना राघवांना एक झरा वहाताना दिसू लागला. डोंगरावरचे पाणी खाली झेपावत होते. पावसाचं पाणी पिऊन तृप्त झालेला डोंगर ध्यानस्थ मुनींसारखा उभा असलेला वाटत होता. निसर्गाच्या क्रिया प्रतिक्रिया चक्राला पाहून राघव स्थंभित झाले. धुवाधार पावसाने सगळी सृष्टी धुवून काढली. नवीन लागवडी मूळ धरून जोमाने वाढत होत्या. आषाढ संपुन श्रावणसरींचा ऊनपावसाचा खेळ सुरू झाला. शहरात न दिसणारे इंद्रधनुष्याचे तेजस्वी रंग इथे मनसोक्त पहायला मिळाले. प्रत्येक सण तितक्याच नित्यानेमाने, भक्तीभावाने करणाऱ्या लोकांना पाहून राघवांना त्यांचे कौतुक वाटले. व्याडेश्वरला श्रावणात चालणारे कार्यक्रम, नवरात्रात देवीचा होणारा जागर सगळ्यांचा भक्तीभाव वाढवत होता. असाच वाढला होता प्रेमाच्या वर्षावानी जयाकाकू, प्रकाशकाका, वसुधा मधला एकोपा. आजुबाजूच्या ओळखी होऊन घट्ट बनत चाललेली वीण अशाच नात्यांना समृद्ध करणारी, आनंद उत्साहाने भारलेली दिवाळी अनुभवावी तर खेड्यांमध्येच. मधुर सगळ्यांना घेऊन दिवाळीला इकडेच आला होता. राघवांचं जसं काम सुरू झालं तसे ते गावाबाहेर फारसे गेलेच नाही. दिवाळीत मग डिसेंबरच्या वास्तुशांतीचे प्लॅन ठरू लागले. घर आता पुर्ण झालं होतं. टुमदार, सुंदर घरानी आता सगळ्यांनाच ओढ लावली होती. तिथली बाग छानपैकी फुलून आलेली. मधुरला तर वाडीत जाऊन ते हिरवं वैभव न्याहाळायची चटकच लागली होती. एक दोन महिन्यांनी आला की झाडं किती मोठी झाली ? कुठल्या झाडाला नवी पालवी फुटली. हे पहायचा छंदच लागला होता.

    डिसेंबरमधे नील मुंबईहून सरळ इकडे येणार असे ठरले. मधुर अस्मिता तयारीसाठी एक आठवडा आधीच येणार होते. वासू, वीणा, आई आबांना आणि काकांना घेऊन येणार होता. बोलक्या राघवांचं आता सगळं गावच ओळखीचं झालं होतं. कशाच्या ना कशाच्या निमित्ताने ते जवळपास प्रत्येकाच्या घरी जाऊन आले होते. आता वास्तूच्या निमित्ताने सगळ्यांना आमंत्रण द्यायचं ठरलं. डिसेंबर उजाडला. स्वरुपाला मुलांचे वेध लागले तर राघवांना आई आबांचे. मधुरनी आल्यावर तयारी सुरू केली. अस्मिता, स्वरुपा कामाला लागल्या. राघव भराभर फोनवर कामं उरकत होते. एक फोनसरशी घरात सामान येऊन पडत होतं. घरावर लाइटींग झाली. अंगणात मोठा मांडव घातला गेला. केटरर्सला मनपसंत मेनूची ऑर्डर देऊन झाली. देवीच्या मंदिरातले पुजारी वास्तुपूजा सांगणार होते. तयारी जवळपास सगळी झाली. नील आल्यावर तर प्रेमाच्या भरतीचा, आनंदाचा सोहळा पहाण्यासारखा होता. जानकी नीलने जमिनीचं मुळ स्वरूप पाहिल्यावर आजच पहिल्यांदा पुर्णत्वाचे रुप ते पहात होते. प्रशस्त सर्व सोईनी युक्त, कलात्मक घर आणि समोर राघवांच फुलत असलेलं हिरवं स्वप्न. नीलला आई बाबांचा अभिमान वाटला. आई आबांना आपला पोरगा या क्षेत्रातही मागे नाही याचं कौतुक वाटलं. राघव मात्र इदं न मम उक्तीप्रमाणे वावरत होते. सगळं श्रेय त्यांनी आबा आणि प्रकाशकाकांना दिलं होतं.

    जोरदार पुजा झाली. गाव तृप्त होऊन जेऊन गेलं. आई आबा, काका आशिर्वाद देऊन गेले. नील मधुरनी घराच्या शिफ्टिंगला मदत केली. आई बाबांचं सगळं रांगेला लागलेलं बघून तृप्त मनानी आपापल्या स्वप्नांना साकार करायला मुलं आपापल्या विश्वात परतली. नंतर उरले राघव, स्वरुपा आणि त्यांचं हिरवं स्वप्न. त्या स्वप्नात प्रकाशकाका नावाचा कायमचा झुळझुळता वारा वहात होता. जयाकाकू नावाचा घट्ट साथीचा दिवा तेवत होता. सगळे आपापल्या कामात मग्न होते. नील, मधुरने इथे बरच काही करायचं ठरवलं पण ते आरामात पार पाडणार होते.

   सगळे बंध आपापल्या जागी स्थिरावल्यावर राघव शांत मनाने आपल्या हिरव्या जगात रमले. यातून त्यांना कुठलाही फायदा नको होता. केवळ जीवन प्रक्रिया साखळीचा अनुभव घ्यायचा होता. निसर्गाची प्रत्येक कडी कशी एकमेकात गुंतली आहे हे ते साक्षीभावाने पहात होते. पहाट वाऱ्याच्या चैतन्याने उजळत जाणाऱ्या जगाचं नंतर एका अखंड हालचालीत परिवर्तन व्हायला लागते आणि संध्याकाळनंतर तेच चैतन्य अगम्य गुढ रात्रीच्या चंद्र चांदण्यांच्या तेजात लुप्त होऊन मानवालाही आपल्या शरीरापासून लुप्त करतं. एकदा झोपल्यावर आपल्या शरीराचं भान नाहीसं होतं, म्हणजे आपण रोज रात्री मृत्यू अनुभवतो. पण आपल्याला त्या मृत्यूचं भान रहात नाही. तर आयुष्यभर जीवनाअखेरी येणाऱ्या मृत्यूच्या सावटाची चिंता किंवा कुतुहल यात काळ घालवतो. खरं तर किती सहज आहे जीवनमृत्यू. याची जाणिव निसर्गाच्या सान्निध्याने करून दिली होती. रुजणं, उमलणं, फुलणं, कोमेजणं आणि गळून पडणं. हा नियम सुक्ष्मापासून स्थुलांपर्यंत सगळ्यांना लागू पडत होता. मग फुलतानाच मानवाच्या मनात कोमेजण्याची भिती का डोकावत रहाते ? व्यक्ती जीवन सहजतेने घेत नाही म्हणुन ? जीवन जसं आहे तसं स्वीकारलं की सहज सोपं होऊन जातं. पण आहे त्या परिस्थितीला बदलायची सारखी धडपड केली तर त्यातून वैफल्य, उद्विग्नता वाट्याला येते. निसर्गातही बदल घडतात म्हणुन तुफान, वादळ, दुष्काळ, भुकंप या नाशातही एक सृष्टी रचना लपलेली असते. तिची उद्विग्नता बाहेर पडून सृष्टीने स्वीकारलेले असते, एक फिनिक्स चक्र. राखेतून पुर्ननिर्मितीचं. घराच्या चारही बाजुंनी वेढलेलं हिरवं रंगीबिरंगी जग. राघवांना हिरव्या वलयातल्यासारखं वेढून उभं होतं. त्या वलयातुन त्यांना कुणाचीही साद नको होती. त्यांच्या मनानी हिरवं जग पहाण्याच्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणुन दिलेल्या उत्तरात ते सळसळत स्तब्ध झालं. विशाल जगातला आपण एक सुक्ष्म बिंदु ही भावना त्यांना अनुभवायला येऊ लागली. याच स्वप्नाची ते वाट पहात होते. त्यांनी खऱ्या अर्थाने आता आपल्या स्वप्नाला स्पर्श केला होता. जे बाह्य नव्हते. आंतरिक होते. अंतर्मनात होते. आतल्या सुरू झालेल्या प्रवासाचे ते दार होते. त्या अंतरद्वाराच्या प्रवेशाने लख्ख दिशा उजळल्या आणि ते बनले एक स्वप्नस्पर्शी.

                                ……………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

                                                                                                   समाप्त