विनाश काले विपरीत बुद्धी Kalyani Deshpande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विनाश काले विपरीत बुद्धी

अर्थ:- जेव्हा एखाद्याचा विनाश जवळ आलेला असतो तेव्हा त्याला बरोब्बर चुकीची बुद्धी होते आणि तो चुकीचे निर्णय घेऊन चुकीच्या मार्गाला लागतो.

त्यावर आधारित कथा:-

"विभा उठ! लवकर,आज आकाशवाणी वरचा सुगम संगीताचा कार्यक्रम तुला होस्ट करायचाय, तयारी झाली का तुझी,उशीर व्हायला नको,मला पण बातम्या एकदा recall कराव्या लागतील,चल उठ!",प्रभा विभाला ढोसत म्हणाली.

"काय यार! मी कशाला आली होती ह्या मुंबईत, हिरोईन बनायला आणि काय करतेय तर सुगम संगीताचं anchoring, तूझं उगीच ऐकलं मी,किती सकाळी उठावं लागते शी:", विभा म्हणाली.

"व्वा गं! हिरोईन! म्हणजे हिरोईन ला फक्त झोप काढायचं काम असते का दिवसभर असं वाटते की काय तुला! हिरॉईनला तर कायम फ्रेश राहावं लागते आणि director जेव्हाही म्हणतात तेव्हा टेक साठी तयार राहावं लागते,अगदी भल्या पहाटे सुद्धा! कळलं! मी वाचलंय मासिकात",प्रभा म्हणाली.

"बरं बाई उठते! ",असं म्हणून विभा मोठ्या अनिच्छेनेच उठली. नेहमीप्रमाणे त्या दोघीही आकाशवाणी केंद्रात गेल्या काही कार्यक्रमांचं निवेदन केलं, बातम्या दिल्या आणि काम आटोपल्यावर संध्याकाळी घरी आल्या, संध्याकाळी इमेल्स चेक करताना विभा ओरडतच प्रभाला म्हणाली,

"ऐ! प्रभे! हे बघ एका ऍड ची ऑफर आलीय मला, उद्या जायचंय जुहूला ऑफिस आहे त्यांचं त्यामुळे मी येऊ शकणार नाही उद्या आकाशवाणी केंद्रात"

"अरे वा! कोणत्या प्रॉडक्ट ची जाहिरात आहे",प्रभाने उत्साहाने विचारलं

तशी विभा जरा शांत झाली. "काय झालं ग? का शांत झाली?",प्रभाने विचारलं तसा तिने त्या प्रॉडक्ट चा फोटो असलेला ई-मेल दाखवला,ते बघून प्रभाला लाजल्यासारखं झालं, तिने म्हंटल,

"विभा लगेच रिजेक्ट कर ही ऑफर, काहीच अर्थ नाही"

"असं कसं काय एकदम रिजेक्ट करू? बरयाच दिवसांनी कुठे आता मला ही ऑफर आली, ही ऑफर जर रिजेक्ट केली तर मला कोणीच कुठलीच जाहिरात ऑफर करणार नाही मग बॉलीवूड मध्ये जाण्याचं स्वप्न कसं पूर्ण होईल?"

"अगं पण जातेच कशाला बॉलिवूड मध्ये? आपल्या सारख्या साध्या सरळ लोकांचं ते फिल्ड नाही,मृगजळ आहे ते विभा! प्रसिद्धी पैशासाठी धावत राहावं लागतं आणि शेवटी हाती काहीच लागत नाही, तू ते वेड डोक्यातून काढून टाक,तुला हवं तर जाहिराती कर पण त्याही चांगल्या,शाम्पू,energy ड्रिंक, टूथपेस्ट वगैरे या प्रॉडक्ट्स च्या कर, ह्या ई-मेल मधल्या प्रॉडक्ट च्या चुकूनही करू नको.",प्रभा पोटतिडकीने म्हणाली.

"मी थोडा विचार करेन आणि मगच निर्णय घेईन", विभा म्हणाली.

त्यादिवशी प्रभाच फक्त आकाशवाणीकेंद्रात गेली,विभा घरीच राहिली,तिने दिवसभर विचार केला,आणि एक निर्णय घेतला. संध्याकाळी प्रभा घरी आल्यावर तिने विभाला विचारलं,

"काय गं विभा काय ठरवलंय?"

"प्रभे! तुला काहीही वाटो पण मी ती जाहिरात करण्याचं ठरवलंय,मला हिरोईन व्हायचं आहे आणि त्यासाठी मला जे जे करावं लागेल ते मी करणार, मी असं तुझ्यासारखं काकूंबाई आयुष्य नाही जगू शकत."

प्रभाला तीच म्हणणं काही पटलं नाही पण ती काही बोलू शकली नाही, तिने फक्त एवढंच म्हंटल,

" ठीक आहे विभा जे काही तू ठरवलं ते तू कर, कारण जे काही चांगले वाईट परिणाम होतील ते शेवटी तुलाच भोगायचे आहे”

विभा दुसऱ्या दिवशी ऍड agency मध्ये स्क्रीन टेस्ट ला गेली, प्रभा नेहमीप्रमाणे आकाशवाणी केंद्रात गेली. विभाने, प्रभाला संध्याकाळी आनंदाने तिचं सेलेक्शन झालं, ऍड चं शूटिंग झालं आणि पुढच्याच आठवड्यात ती ऍड टेलिकास्ट होणार असं सांगितलं.

प्रभा नि तिला औपचारिक पणे अभिनंदन केले. विभा ला त्या ऍड शूट चे खूप पैसे मिळाले होते,त्यामुळे आकाशवाणीचे काम तिने सोडले व ऍड मिळवण्यावरच तिने लक्ष केंद्रित केले. इकडे प्रभा नियमित पणे तिच्या कामाला जात होती. एका आठवड्याने विभाची ती जाहिरात सर्वत्र प्रसारित झाली,आणि सर्वत्र देशभर वादळ उठलं,सगळीकडून चांगल्या वाईट प्रतिक्रिया येऊ लागल्या,विभाचा फोन सारखा खणखणू लागला,तिच्या परिचितांचे,मैत्रिणींचे,नातेवाईकांचे तिला चांगली वाईट प्रतिक्रिया देणारे फोन येऊ लागले.

तिच्या आईवडिलांनी आमचं आडनाव लावू नको आणि आम्हाला ओळख ही दाखवू नको तुझं आमचं नातं संपलं असं निक्षून सांगितलं. त्या जाहिरातीने एवढा मोठा तहलका होईल असं तिला वाटलंच नव्हतं,आईवडिलांची,नातेवाईकांची प्रतिक्रिया बघून ती जरा हबकलीच पण तिच्या ऍड एजन्सी च्या लोकांनी तिला धीर दिला,अशा प्रतिक्रियांची तुला हळूहळू सवय होईलच आणि यामुळेच तुझ्यासाठी बॉलीवूड चा दरवाजा उघडेल असं सांगितलं.

तिची ती जाहिरात एवढी प्रसिद्ध झाली की एका इंटरनॅशनल मासिकाने सुद्धा त्याची दखल घेतली आणि फ्रंट पेज वर तिचा फोटो छापला. तिला सिनेमाच्या बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या. कुठला सिनेमा स्वीकारायचा या विचारात ती पडू लागली,मग एक बिग बजेट सिनेमा करायचा तिने ठरवला.

मदन चोपडा या प्रसिद्ध प्रोड्युसर चा सिनेमा तिने साइन केला,त्याची साइनिंग अमोउंट मिळाल्या-मिळाल्या ती जुहूला एका फ्लॅट मध्ये रेंट ने राहू लागली,प्रभाचा फ्लॅट तिने कधीच सोडला होता.

प्रभा आता आकाशवाणी बरोबरच दूरदर्शन वर सुद्धा बातम्या द्यायची.

विभाच्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं,वेगवेगळे इमोशनल,लव्ह, सीन्स करणे, टेक घेणे, वेगवेगळे डायलॉग म्हणणे, वेगवेगळ्या हैरस्टाईल्स,वेगवेगळ्या भूमिके नुसार costume परिधान करणे, एकूण कॅमेरा लाईट ऍक्शन मधेच तिची दिवसाची रात्र होऊ लागली.

एकदा डायरेक्टर ने तिला अत्यंत कमी कपड्यांमध्ये एक सीन करण्यास सांगितला, त्याला ती आढेवेढे घेऊ लागली, तेव्हा ही भूमिकेची गरज आहे,आपण कलाकार आहोत भूमिकेसाठी आपल्याला हे करावं लागतं असं वगैरे म्हणून त्याने तिला तो पोशाख घालण्यासाठी राजी केलं.

डायरेक्टर च्या गोड बोलण्यामुळे विभा त्याच्यावर इम्प्रेस होऊ लागली,डायरेक्टर चा सुद्धा तिच्यातला इंटरेस्ट वाढू लागला,हळूहळू त्यांची घसट वाढली. रात्रीबेरात्री ते एकमेकांसोबत राहू लागले, ती त्याच्यासोबत अनेक पार्ट्यांना जाऊ लागली,एकदा अशाच एका पार्टीला गेली असताना एका अभिनेत्री ने तिला तिच्या नकळतच ड्रग मिश्रित ड्रिंक पाजलं, त्यामुळे तीला खूप गरगरायला लागलं,तिने तिचा डायरेक्टर बॉयफ्रेंड ला सांगितलं, त्याने तिला तिथल्या एका खोलीत नेऊन झोपायला सांगितलं.

दुसऱ्यादिवशी सकाळीच तिला जाग आली तेव्हा ती तिच्या फ्लॅट मध्ये होती,तिच्या बाजूला तिचा डायरेक्टर बॉयफ्रेंड बसला होता,तो तिला म्हणाला की तुला सवय नसल्याने गरगरल्या सारखं झालं होतं,हळूहळू होईल सवय. आणि ब्रेकफास्ट वगैरे आटोपून ते दोघेही सिनेमाच्या सेट वर पोचले. काही महिन्यांनी फिल्म चं पूर्ण शूटिंग झालं, फिल्म रिलीज ही झाली आणि प्रेक्षकांनी ती फिल्म अक्षरशः डोक्यावर घेतली,बॉक्स ऑफिस वर तिने करोडोंचा गल्ला कमावला. तिला नवपदार्पण अभिनेत्री चे अवॉर्ड पण मिळाले.

विभाला फारच आनंद झाला, तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. प्रभाने तिला अभिनंदनाचा फोन केला तेव्हा विभा तिला म्हणाली सुद्धा "प्रभा मी तेव्हा ती ऍड केली म्हणून आज मला हा दिवस बघायला मिळतोय, आज मी खूप खुश आहे" त्याच प्रोड्युसर मदन चोपडा यांच्या तिने आणखी दोन फिल्म्स साइन केल्या, आता तिने जुहूला स्वतःचा एक स्टुडिओ फ्लॅट विकतच घेतला होता.

एका दिवशी संध्याकाळी तिला प्रोड्युसर च्या ऑफिसमधून मीटिंग साठी बोलावलं म्हणून फोन आला,ती लगेच तिथे पोचली. थोड्यावेळ reception ला थांबून तिला मदन चोपडाच्या केबिन मधून बोलावणं आलं,ती आत गेली तर तिथे मदन चोपडा तिचा डायरेक्टर बॉयफ्रेंड बसलेले होते,त्यांनी येऊ घातलेल्या फिल्म बद्दल चर्चा केली आणि तिला डिनर साठी थांबायला सांगितलं.

तिघांचेही डिनर झाल्यावर तिचा डायरेक्टर बॉयफ्रेंड काही महत्वाचं काम आहे असं सांगून निघून गेला,ही पण निघणारच होती की मदन चोपडाने तिला थांबवलं,तिला कळेना सगळी चर्चा झाल्यावर आता का थांबवलं असेल? लवकरच तिची शंका दूर झाली,मदन तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागला,तिने विरोध केल्यावर त्याने तिला तिचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक विडिओ दाखवला,तो बघून तिला तीव्र धक्का बसला.

तो विडिओ कोणी आणि कधी काढला ह्या चा तिला संभ्रम झाला, मदन नी तिच्या हतबल अवस्थेचा तिच्याशी गैरवर्तन करून फायदा उठवला. जेव्हा तिला कळलं की तो विडिओ तिच्या डायरेक्टर बॉयफ्रेंड नेच काढला आणि मदन ला दिला तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला,त्या धक्क्यातच ती घरी आली. मदन ने तिला ब्लॅकमेल करून करून तिचं जिणं हराम केलं.

आणि एक दिवस न्यूज चॅनेल्स वर सर्वत्र हीच ब्रेकिंग न्यूज झळकत होती. प्रभाला जेव्हा आजचे बातमीपत्र सादर करण्याची वेळ आली तेव्हा ही बातमी बघून तीला शॉक बसला.

ही बातमी ती वाचू शकेलही की नाही याची तिला शंका वाटू लागली,पण ऐनवेळी दुसरं कोणी बातम्या वाचायला उपलब्ध नसल्याने तिलाच ती बातमी मोठया जड अंतःकरणाने वाचावी लागली.

'प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी यांची विष प्राशन करून आत्महत्या' प्रभाला तिच्या फ्लॅटवरचे आणि आकाशवाणी केंद्रातले त्यांचे जुने खेळीमेळीचे दिवस आठवले. हिरॉईन होण्याच्या हव्यासापायी विभाने तिचं बहुमूल्य आयुष्य गमावलं होतं. एका मृगजळाच्या मागे धावून तिचा विनाश झाला होता. विनाशकाले विपरीत बुद्धी ही उक्ती तिने सार्थ केली होती. तिने ती जाहिरात स्वीकारणे ही तिच्या विनाशाची नांदीच होती.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

वाचकांनो कथा आवडल्यास अभिप्राय जरूर द्या

वाचकांचा अभिप्राय हीच लेखकांची प्रेरणा