पॉवर ऑफ अटर्नी - भाग 12 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 12

पॉवर ऑफ अटर्नी

भाग  १२

भाग ११   वरुन पुढे  वाचा

“हुश्श, जीव गुदमरला की माझा. किती जोरात आवळलं ?” विभावरी किंचाळली.

“अग पहिलीच वेळ आहे माझी. मला सवय नाहीये, खूप जोरात झालं का ? ओके. आता हळुवार पणे करतो.” किशोरनी सफाई दिली.

“नको नको, धाप लागली मला शहाण्या. तू दूरच ठीक आहेस. आणि आत्ता माई देवळातून येतील, तू बस इथेच,” मी चहा करते.

विभावरी चहाच्या बहाण्याने किचन मधे धावली, किशोर तिच्या मागे, मागे. पण तेवढ्यात कॉल बेल वाजली, मग किशोरचा नाईलाज झाला. विभावरीने तेवढ्यात त्याला चिडवलं त्याला अंगठा दाखवला, आणि खळखळून हसली.

माई आल्या होत्या. आता चॅप्टर संपला होता. किशोर जरा हिरमुसला झाला. म्हणाला

“हे काय आई, इतक्या लवकर आलीस ? आज कोणी महिला मंडळ भेटलं नाही वाटतं ?”

माईंनी किशोर कडे  पाहीलं आणि त्या सर्व समजल्या. म्हणाल्या

“का रे, अजून थोडा वेळ देवळात थांबायला हवं होतं का ?”

“नाही हो माई, बरं झालं तुम्ही लवकर आल्यात ते. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. पण किशोर म्हणाला की तुम्हाला की वेळ लागणार आहे, म्हणून मग मी चहा करायला घेतला.” विभावरीने किल्ला लढवला.

विभावरीनी बाजू उचलून धरली. पण तिचा चेहरा माईंना खरं काय ते सांगून गेला. त्या गालातल्या गालात हसल्या, आणि  म्हणाल्या

“हो, अग, आज कोणीच भेटलं नाही म्हणून जरा लवकरच यावं लागलं. पण बरं झालं तू चहा करते आहेस ते. आयता चहा मिळेल मला.” मग हळूच विभावरीला म्हणाल्या

“जरा, लवकरच आले का ग मी ?”

विभावरी म्हणाली “नाही हो माई, काही तरीच काय? आणि लाजलीच.” माई समाधानाने हसल्या.

चहा पिता पिता विभावरीनी ती बँकेत कशा करता गेली होती ते सांगितलं.

माईंना पण ते जरा खटकलंच. त्या म्हणाल्या

“एवढा मोठा निर्णय कसा घेतला तू, अग आम्हाला विचारायचस तरी. अशी कशी परस्पर ठरवून मोकळी झालीस.”

“माई, एवढी मोठी रक्कम किशोर कशी उभी करणार होता ? किशोर नी नाही का बँकेत घराचे कागद ठेवलेत, घर तर आपल्या जवळच आहे. आपण राहात आहोतच की या घरात.” विभावरीने तिला काय वाटतं ते सांगितलं.

“अग पण किशोरची गोष्ट वेगळी आहे. तुझी वेगळी. तू काकांना विचारलं का ? त्यांचा सल्ला घे बाई, नाही तर त्यांना राग येईल. असं नको व्हायला.” माईंनी वेगळाच मुद्दा मांडला.

“माई त्यांना राग तर येणारच आहे. पण आपण त्याला काय करू शकतो ?” विभावरी नी उलट माईंनाच प्रश्न केला

“आपण हेच करू शकतो की तू त्यांचा सल्ला घ्यावास.” अर्थात हे माझं मत आहे. माई म्हणाल्या.

“हो आई, बरोबर आहे तुझं म्हणण.” किशोरनी दुजोरा दिला.

“काकांना हे अजिबात मान्य होणार नाही. परक्या लोकांसाठी आणि विशेषत: किशोर साठी असं काही केलेलं, कारण  किशोरनीच सानिकाशी संगनमत करून माझं घर बळकावलं आहे अशीच त्यांची समजूत आहे ना. आणि हे मला माहीत असतांना मी त्यांना विचारायचं, म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेण्या सारखं होईल.” विभावरीनी तिची अडचण सांगितली.

“अग पण नंतर जेंव्हा त्यांना हे कळेल तेंव्हा ते कदाचित तुझ्याशी बोलणं पण टाकतील. त्यामुळे हे बरोबर नाही. नाते संबंध असे तोडायचे नसतात, तर ते जपायचे असतात. अग किती झालं तरी ते तुझे सख्खे काका आहेत, अडी अडचणीला तेच मदतीला येतील ना, जसे त्या दिवशी धावत आलेच होते ना. बघ बाई तूच ठरव.” माईंनी पुन्हा त्यांच्या मनातलं बोलून दाखवलं.

विभावरी विचारात पडली. मग म्हणाली

“माई, अजून ह्या सगळ्या गोष्टींना बराच वेळ आहे. तो पर्यन्त किशोरला काही अडचण येणार नाही असं ते साहेब लोकं म्हणत होते. तेंव्हा, जेंव्हा वेळ येईल तेंव्हा बघू काकांना काय सांगायचं ते.”

“ठीक आहे. तुला जे योग्य वाटेल तसं कर.” माई म्हणाल्या.  एक महिना असाच काही विशेष न घडता गेला. विभावरीचा दर शनिवारी आणि रविवारी किशोर कडे मुक्काम असायचा. सुलभा काकूंना पण आता त्यांच्या बद्दल कळलं होतं आणि त्यांना पण आनंद झाला होता. म्हणाल्या

“अगदी अनुरूप जोडी आहे. माई, लवकरच बार उडवून द्या. आजिबात भिजत घोंगड ठेवू नका. शनिवार, रविवार तुमच्या कडे राहते, उगाच गवगवा व्हायच्या आधीच शिक्का मोर्तब करून टाका.” आणि माईंनी हसून मान डोलावली होती. म्हणाल्या

“खरयं तुमचं म्हणण, एकदा विभावरीला विचारते आणि मग तिच्या काकांना भेटायला जाऊ.  मलाही असाच वाटतं की आता जास्त वेळ वाट पाहाण्यात काही अर्थ नाहीये म्हणून.” 

त्याच दिवशी संध्याकाळी विभावरी आली. तिला पाहून माईंनी विचारलं

“काय ग अशी आडवारी कशी? तब्येत तर बरी दिसते आहे.” माईंनी जरा काळजीच्या स्वरात विचारलं.

“हो माई, मी एकदम बरी आहे. एक बातमी सांगायची होती म्हणून आले. पण माई या वेळेला तुम्ही घरी कशा? देवळात नाही गेल्या का? मला तर वाटलं होतं की कुलूपच मिळेल पाहायला”. – विभावरी

“नाही गेले आज. जरा पाय दुखताहेत.” माईंनी कारण सांगितलं.

“अरे, कशाने दुखताहेत ? मी चेपून देऊ का? चहा झाला का तुमचा? नसेल तर करते मी. तुम्ही बसा स्वस्थ.” विभावरीच्या आवाजात कळकळ होती.

“अग नाही, इतकं काही नाहीये, बाकी तुला हवा असेल तर कर चहा, मी पण घेईन अर्धा कप. कदाचित तो पर्यन्त किशोर पण येईल.” असं म्हणून माई डायनिंग टेबलावर बसल्या. 

“काय सांगणार होतीस ग तू ?” माईंनी विचारलं.

“आज न दुपारी उत्तम काकांचा फोन आला होता.” – विभावरी

“काय म्हणत होते ते ? लागला का तपास तुझ्या मैत्रिणीचा ?” माईंची उत्सुकतेने पृच्छा.

“तपास तर नाही लागला अजून, पण काही धागे दोरे मिळाले आहेत असं म्हणत होते, आणि आता तपासाला वेग आला आहे आणि लवकरच ती पकडल्या जाईल असं म्हणत होते. पण अजून एक गोष्ट सांगितली त्यांनी. ती म्हणजे सानिकाने जे अधिकार पत्र केलं होतं माझ्या नावाने, ते खोटं आहे हे सिद्ध झालं आहे. नंदुरबार च्या रजिस्ट्रार ऑफिस मधून कळवण्यात आलं आहे की असं कुठलंही अधिकार पत्र त्यांच्या ऑफिस मध्ये रजिस्टर झालं नाही म्हणून. आणि आता पोलिस कोर्टात केस टाकणार आहेत.” विभावरीने सांगून टाकलं.

“म्हणजे, आता बँक कर्जाची वसूली चालू करणार.” माईंची चर्या जरा गंभीर झाली.

“माई, तुम्ही काळजी करू नका. मी त्याच दिवशी सांगितलं न, की मी बँकेत घराचे कागद जमा करीन म्हणून. मग का एवढा विचार करता आहात ?” विभावरीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

“अग पण किशोरची गोष्ट वेगळी आहे. तुझी वेगळी. तू काकांना विचारलं का ? तू त्यांचा सल्ला घ्यायला हवा होता, तो घेतलास का ? विचारलं का त्यांना ? नाही तर त्यांना राग येईल. असं नको व्हायला. नुसत्या साध्या ओळखीवर तू एवढं मोठं पाऊल उचलते आहेस हे त्यांना कदाचित पटणार नाही.” माईंनी पुन्हा तोच  मुद्दा मांडला.

विभावरीचे डोळे भरून आले ती म्हणाली “मला एका फटक्यात परकं केलं माई तुम्ही,  माई, मी तुम्हाला आवडत नाही का ?”

माईंनी तिला मायेने जवळ घेतलं. म्हणाल्या 

“अग काय बोलते आहेस ? किशोर पेक्षा सुद्धा जास्त आवडतेस. पण शेवटी घरची आणि बाहेरची असा फरक असतोच ना ? येतेस का आमच्या घरी कायमची ? मग हा फरक पण मिटून जाईल.”

आता विभावरीला स्वत:ला आवरता आलं नाही. तिने माईंच्या खांद्यावर डोकं ठेवल. आणि अश्रु वाहू दिले. माईंना जाणवलं की त्यांचा खांदा ओलसर झाला आहे, त्या नुसत्याच विभावरीला थोपटत राहिल्या. त्याच वेळेला किशोर आला, किशोर बघत होता, त्याला आधी काय बोलणं झालं त्यांच्या मधे हे माहीत नव्हत. तिला रडतांना पाहून तो हतबुद्ध झाला होता. माईंनी त्याला तिथून जाण्याची खूण केली. त्यामुळे तो बाहेरच्या खोलीत येऊन बसला, कान मात्र किचन कडेच होते.

थोड्या वेळाने माईंनी विभावरीला सावरलं. म्हणाल्या

“आता रडायचं नाही. कसा झालाय चेहरा तुझा, जा फ्रेश होऊन ये. मी आता स्वयंपाकाला लागते.”

पण विभावरी फ्रेश होऊन आली आणि माईंच्या मदतीला थांबली. ती बाथरूम मध्ये गेली त्या वेळेला किशोर किचन मध्ये आला. म्हणाला

“काय झालं आई ?”

“अरे काही नाही. थोडं थांब. तिला जरा स्वत:ला सावरू दे. सर्व सांगते तुला.” – माई

जेवणाच्या टेबलावर तिघंही होते. आता विभावरी बरीच सावरली होती. किशोरनी लगेच विषयाला वाचा फोडली.

“अरे कोणी सांगेल का मला, काय झालंय ते ? विभावरी तू का रडत होतीस ?”

मग विभावरीनी त्याला अपडेट दिलं.

“बापरे, म्हणजे आता आपण डेंजर झोन मध्ये शिरलो. उद्या बँक काय अॅक्शन घेते ते बघावं लागेल.” किशोर ची प्रतिक्रिया.

“काही होणार नाही, मी सांगितलं नाही का, की मी आधीच बोलून आले आहे, म्हणून.” विभावरीचं उत्तर. “ते सांगतील तेंव्हा प्रॉपर्टी चे पेपर सबमिट करून टाकू म्हणजे झालं.”

“विभावरी तू पुन्हा एकदा विचार करावास हे उत्तम.” – किशोर 

“किशोर, हे तू म्हणतो आहेस ?” विभावरीनी त्यालाच उलट प्रश्न केला.

“मीच म्हणणार. अजून कोण ? मलाच तुझी सगळ्यात जास्त काळजी आहे. आमच्या बद्दल च्या जिव्हाळ्या मुळे तू आपलं नुकसान करून घेऊ नयेस असं मला वाटतं.” किशोरनी विभावरीला समजावण्याचा प्रयत्न केला.

“माई, अजूनही हा आमचं तुमचं करतोय. याला, असं करतांना काहीच कसं वाटत नाही म्हणते मी. सांगा न त्याला.” विभावरीनी माईकडे तक्रार केली.

“किशोर आता लगेच काही करायचं नाहीये तेंव्हा आपण या विषयावर नंतर बोलू.” “विभावरी, मी सांगेन त्याला सर्व समजावून, मग तर झालं ?” माई म्हणाल्या.

जेवण झाल्यावर माई किशोरला म्हणाल्या की विभावरीला तिच्या हॉस्टेल वर पोचवून ये.

“पोचवून येऊ? ते कशाला? मला तर वाटलं की आज राहते आहे म्हणून. पण जायचंच असेल तर, ती जाईल की एकटी. नेहमीच तर जाते.” – किशोर

“हो माई, जाईन मी एकटी, उगाच कोणाला त्रास नको.” विभावरीचा स्वर जरा चिडकाचं होता.

“ओके, ओके येतो मी, कायमच राग कसा असतो ग तुझ्या नाकावर ? चल.” किशोर नी असं म्हंटल्यांवर विभावरीचा चेहरा फुलला. आणि मग दोघेही बाहेर पडले. हॉस्टेल वर पोचल्यावर, खाली थोडा वेळ गप्पा मारतांना विभावरी म्हणाली

“किशोर,”

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.