पॉवर ऑफ अटर्नी - भाग 13 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 13

पॉवर ऑफ अटर्नी

भाग १३

भाग १२  वरुन पुढे  वाचा

जेवण झाल्यावर माई किशोरला म्हणाल्या की विभावरीला तिच्या हॉस्टेल वर पोचवून ये.

“पोचवून येऊ ? ते कशाला ? मला तर वाटलं की आज राहते आहे म्हणून. पण जायचंच असेल तर, ती जाईल की एकटी. नेहमीच तर जाते.” – किशोर

“हो माई, जाईन मी एकटी, उगाच कोणाला त्रास नको.” विभावरीचा स्वर जरा चिडकाचं होता.

“ओके, ओके येतो मी, कायमच राग कसा असतो ग तुझ्या नाकावर ? चल.” किशोर नी असं म्हंटल्यांवर विभावरीचा चेहरा फुलला. आणि मग दोघेही बाहेर पडले. हॉस्टेल वर पोचल्यावर, खाली थोडा वेळ गप्पा मारतांना विभावरी म्हणाली

“किशोर,”

“हूं”

“मघाशी माई म्हणत होत्या की कायमची येतेस का राहायला आमच्या कडे.” विभावरी नी सुरवात केली.

“काय सांगतेस काय ? तू काय म्हंटलस मग ?” किशोरनी उत्सुकतेने विचारलं.

“मी काय म्हणणार ? मी म्हंटलं की तुमच्याच लेकाला विचारा, त्याचंच अजून ठरत नाहीये. अजूनही तुझी लेवल, माझी लेवल करतोय.” विभावरीनी चिडवलं.

किशोर चा चेहरा पडला. म्हणाला “तू असं सांगीतलस माईला ? हात जोडले तुझ्या पुढे.”

“मग काय करणार ? मला काही खोटं बोलता येत नाही. मी आपलं खरं खरं सांगून टाकलं. तू आणि वेगळं काय म्हणाला होतास ? इतके दिवस झालेत पण तू तर काहीच बोलत नाहीयेस. शेवटी गाईंनाच पुढाकार घ्यावा लागला लेकाच्या प्रेमा खातर.” विभावरी म्हणाली.

किशोरचा, हे ऐकल्यावर, गळा भरून आला. म्हणाला

“विभावरी, माझं भाग्य थोर म्हणून तू हे सगळं करते आहेस. पण मला अजूनही असंच वाटतंय की तू पुन्हा एकदा विचार करावास. माझी आणि तुझी कुठल्याही बाबतीत बरोबरी नाहीये. माझं आयुष्य नक्कीच उजळून जाईल तू आल्या मुळे, तू नसलीस तर माझं जीवन वैराण होईल, पण मी इतका स्वार्थी कसा होऊ ग ? तुझी काही स्वप्न असतील, माझ्याकडून काही अपेक्षा असतील, माझ्याकडून त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर तुझी फार घुसमट होईल. पहा विचार कर.” पुढे त्याला बोलवेना. तो गप्प बसला.

विभावरीनी त्याचा हात आपल्या हातात घेतला. म्हणाली, “किशोर, नको रे एवढी काळजी करूस. माझ्यावर विश्वास ठेव, एकदा मनं जुळली की की माणूस नेहमी दुसऱ्याचाच विचार करतो. मी तुझी अडचण दूर करण्याचा प्रयत्न करते आहे आणि तू मला नको म्हणतो आहेस, कशा साठी ? माझ्या काळजी पोटीच ना. अरे काही होणार नाही बघ. आपण दोघं बरोबर आहोत ना मग सगळं ठीकच होईल. आता फक्त माई काय म्हणाल्या त्याचाच विचार कर.”

किशोर काही बोलू शकला नाही. त्यांनी नुसतीच मान हलवली.

“मग ? केंव्हा येताय माझ्या काकांना भेटायला ?” विभावरीनी पुन्हा त्याला छेडलं.

“विभावरी, अग आधी या सगळ्या गोंधळातून मला बाहेर तर पडू दे.” -किशोर

“नाही. आजच घरी गेल्यावर माईंशी बोल. का असं करू, मीच येते आता तुझ्या बरोबर वापस घरी आणि मीच बोलते माईंशी.” -विभावरी.

“हात जोडले तुझ्या पुढे. ओके मी बोलतो आज मग तर झालं ?” – किशोर

“प्रॉमिस ?” – विभावरी

“प्रॉमिस.” – किशोर 

घरी गेल्यावर किशोर विचारच करत होता की आई समोर कसं विषय काढायचा ते, पण आईनीच बोलायला सुरवात केली.

“विभावरी तुला कशी वाटते ?”

“कशी म्हणजे ? चांगली मुलगी आहे. का ग ?” किशोर नी विचारलं.

“तुझा होकार असेल तर, म्हणजे तो आहेच असं धरून चालते मी. काय म्हणतोस, काय विचार आहे तुझा ?” आईने सरळ मुद्द्यालाच हात घातला.

“किशोर घुटमळला. तू विभावरीला विचारलं का ?” -किशोर

“ए, उगाच वेड पांघरून पेडगाव ला जाऊ नकोस. मला ती सून म्हणून आवडली आहे. आणि तुला ती आवडली आहे, आणि तिला तू, हे मला कळलं आहे. उगाच नाही ती आपला फ्लॅट बँके कडे तारण म्हणून द्यायला तयार झाली ? तेंव्हा तिच्या काकांना केंव्हा भेटायला जायचं ते सांग.” आईनी समारोप केला.

किशोर आपला गप्पच, आपल्या आणि विभावरी बद्दल आईला कसं सगळं कळलं याचाच तो विचार करत होता. आईने त्याला चुटक्या वाजवून भानावर आणलं तेंव्हा तो म्हणाला

“उद्या विभावरीला विचारतो आणि सांगतो.” किशोरनी आपलं मत सांगितलं.

“आता तिला काय विचारायचं आणखी. तूच सांग.” आईने किशोरला डिवचलं.

“अग तिचे काका आहेत, त्यांना केंव्हा वेळ आणि मूड आहे, हे तीच सांगू शकेल ना म्हणून.” किशोरची सरवा सारव 

“ठीक आहे उद्या विचार आणि ठरवा. पण आता वेळ वाया  घालवू नका.” माईंचा  फायनल निर्णय

दोन दिवस काही ना काही कारणांमुळे बोलणं झालं नाही पण तिसऱ्या दिवशी किशोरनी विभावरीला विचारलं की आई म्हणते आहे की केंव्हा काकांकडे जाणं ठीक राहील ?

“मी असं करते, आधी मीच या शनिवारी काकांकडे जाते आणि त्यांच्याशी बोलते मग त्यांचं काय म्हणण असेल ते तुम्हाला येऊन सांगते. चालेल ?” – विभावरी.

“ठीक आहे मग सांग तसं.” – किशोर 

किशोरनी घरी गेल्यावर आईला विभावरी काय म्हणाली ते सांगितलं.

पण त्या शनिवारी, विभावरीच घरी आली. किशोर आणि आई चहाच पित होते. विभावरीला पाहून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं.

“अग हे काय ? तू आज काकांकडे जाणार होतीस ना ? मग काय झालं ?” माईंनी विचारलं.

“काका नाहीयेत इथे, ते जबलपूर ला गेले आहेत. त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे. मुलगी जबलपूर ची आहे म्हणून लग्न तिकडे होणार आहे.” विभावरी ने माहिती पुरवली. “आता ते आल्यावर पुढच्या शनिवारी जाईन मी.”

किशोर हिरमुसला झाला. म्हणाला

“म्हणजे अजून आठ दिवस गेले.”

“इतके दिवस नको नको म्हणत होतास, आणि आता इतका उतावीळ झालास ?” माईंनी त्याला टोमणा मारला.

“हो माई, इतके दिवस माझा वारा सुद्धा सहन होत नव्हता एका माणसाला.” विभावरी नी मनातली बोच बोलून दाखवली.

“अरे हे काय चाललंय तुम्ही दोघी मिळून माझ्या विरुद्ध फळी उभारता आहात. आई हे बरोबर नाहीये. मी तुझा मुलगा आहे आणि तू माझ्या बाजूने बोलायला पाहिजे, पण तू तर सुनेच्याच बाजूने बोलते आहेस. हे सासू सून निमावलीच्या विरुद्ध आहे.” किशोरनी फिर्याद केली.

“ही माझी सून नाहीये, लेक आहे. आता बोल” माईंनी सर्विस परतवली.

“वा वा, माई तुम्ही तर एकदम षटकार मारला.” विभावरी म्हणाली आणि ती खळखळून हसायला लागली. हसणं हा एक संसर्ग जन्य प्रकार आहे त्या मुळे माई आणि किशोर पण त्यात सामील झाले.

गुरूवारी उत्तम काकांचा फोन आला विभावरीला, संध्याकाळी भेटायला बोलावलं होतं. विभावरीनी किशोरला फोन केला आणि संध्याकाळी कामिशनर ऑफिस मध्ये जायचंय तर येशील का म्हणून विचारलं.

“अग, नक्कीच येईन. पण कशा करता बोलावलंय ?” किशोरनी विचारलं.

“माहीत नाही. पण काही माहिती द्यायची असेल असं वाटतं.” – विभावरी

“ओके. पोचतो मी. साडे सहा पर्यन्त चालेल ?” – किशोर

“चालेल.”- विभावरी

ACP उत्तमराव निंबाळकरांच्या ऑफिस मध्ये किशोर आणि विभावरी गेले तेंव्हा उत्तमराव फोन वर बोलत होते. त्यांचं बोलणं होई पर्यन्त दोघंही त्यांच्या समोर बसले होते. फोन खाली ठेवला आणि उत्तमरावांनी बोलायला सुरवात केली.

“पोलिसांनी सानिकांचा ठाव ठिकाणा शोधून काढला आहे. दोघंही कर्नाटकात हुबळी शहरांमध्ये सापडले.”

“दोघंही ?” – विभावरी.

“हो सानिका आणि तिचा साथीदार मित्र. कोणी जे. रामकृष्णा नामक माणूस आहे. ते हुबळी ला होते. सानिकाचा फोन तिने दुसरं सीम टाकून चालू केला आणि IMEI नंबर वरून ते आम्हाला कळलं. आम्ही लगेच हुबळी पोलिसांना सांगितलं आणि त्यांनी दोघांनाही पकडलं आहे. आमची टीम हुबळी ला गेली आहे त्यांना आणायला. इथे आल्यावर चौकशी मध्ये काय बाहेर येतं ते कळेलच.”

“काका हे फार बरं झालं. पण आमचे पैसे मिळतील का हो ?” किशोरनी विचारलं.

“जितके पैसे शिल्लक असतील तेवढे मिळतील. पण शिक्षा नक्की होईल. सगळे पुरावे गोळा झाल्यावर आम्ही त्यांच्यावर चार्ज शीट  दाखल करू. आणि जे काही पैसे जप्त झाले असतील ते कोर्टा कडूनच तुम्हाला मिळतील. तुम्ही निश्चिंत रहा आता. सर्व ठीक होईल. जे पैसे मिळतील ते बँकेत भरून टाका म्हणजे तो ही प्रॉब्लेम सुटेल.” उत्तमरावांनी समारोप केला.

किशोर आणि विभावरी घरी आल्यावर त्यांनी माईंना पूर्ण अपडेट दिलं. त्यांनी सुटकेचा नी:श्वास टाकला. म्हणाल्या

“मी आता जाऊन देवापुढे साखर ठेवते. एक अरिष्ट टळलं. देवाचीच कृपा. उगाच किशोर वर बालंट आलं होतं. गेले सहा महीने चांगलाच मनस्ताप झाला पण सुटलो बाबा एकदाचे. आता सर्व ठीक होईल.”

माई साखर देवापुढे ठेवून आल्या आणि विभावरी आणि किशोरच्या हातावर पण चिमूट चिमूट ठेवली.

“माई, विभावरी म्हणाली, एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या “

“काय ?” – किशोर

“मला काकांशी बोलायची खूप भीती वाटत होती, ते नक्की नकार घंटा वाजवतील याची खात्रीच वाटत होती. पण आता तसं काही होणार नाही. किशोर फ्रॉड नाही हे त्यांना आता पटेल आणि ते तयार होतील.” विभावरीच्या  चेहऱ्यावरचा  आनंद लपत नव्हता.

“खरं आहे. ही सगळी त्याचीच कृपा.” – माई.

“आई,” किशोर खट्याळ पणे म्हणाला, “ह्या तर दोनच कृपा झाल्या. तिसरी कृपा पण झाली आहे त्याचा  उल्लेख नाही केलास ?”

“आता हे काय नवीनच ? तूच सांग.” माई म्हणाल्या. विभावरी सुद्धा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होती.

“अग तुझ्या लक्षात कसं येत नाहीये ? विभावरी सारखी इतकी सुंदर, गूणी आणि लोभस सून कशी मिळाली तुला ? हा गोंधळ झाला म्हणूनच न. आता ही कृपाच नाही का ?”  किशोर मिष्कील स्वरात म्हणाला.

हे ऐकून विभावरीच्या गालावर गुलाब फुलले नसते तरच नवल. किशोर तिच्याकडे अनिमिश नजरेने बघत होता आणि ते बघितल्यावर ती अजूनच लाजली आणि तिथून बेडरूम मधे पळूनच गेली. किशोर आणि माई यांना हसता हसता पुरेवाट  झाली.

क्रमश:......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.