भाग्य दिले तू मला - भाग ८८ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ८८

सब कुछ बदल गया
तेरी मुस्कान देख के
कैसा जादू इसमे पता नही
हम भूल गये सारे दुःख तेरा दीदार पाके...

हे तीन चार दिवस स्वराच्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस होते. नकळत ती पुन्हा एकदा भूतकाळात पोहोचली होती. तिला पुन्हा तेच चेहरे, तेच लोक आठवत होते ज्यांनी तिला कधीतरी त्रास दिला होता, कधीतरी विचारलं होत तुला जगण्याचा नक्की काय अधिकार आहे? अन्वयच्या साथीने ती काही काळ सर्व विसरली होती पण अन्वयची साथ क्षणभर हरवली आणि पुन्हा एकदा तिला सर्व काही आठवू लागलं. त्या घृणास्पद नजरा जिवंत झाल्या. ते चेहरे त्रास देऊ लागले.

भूतकाळ आपली कधीच पाठ सोडत नाही. तो फक्त काही दिवस विसरता येतो पण जेव्हा तो पुन्हा आपल्यावर हावी होतो तेव्हा मात्र त्याला कस डील करायचं समजत नाही. विशेष म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी जर वर्तमानकाळात घडत असतील तर मग भूतकाळ जास्तच त्रास देऊ लागतो किंबहुना तो आपल्यासमोर जसाच्या तसा उभा होतो. सेम परिस्थिती स्वराची होती आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे स्वरालाही माहीत नव्हतं. तिने स्वतःचा आनंद बघितला असता तर कदाचित काही लोक सतत दुखावले गेले असते आणि जर लोकांचा विचार केला असता तर कदाचित तिच्या आयुष्यात पुन्हा कधीच आनंद राहिला नसता म्हणून हा निर्णय घेताना स्वराला सर्वात जास्त त्रास होत होता. आई म्हणते तस समाजाचा, लोकांचा विचार करणे गरजेचे आहे की आपला आनंद महत्त्वाचा ह्या गोष्टींमुळे स्वराचा गोंधळ उडाला होता.. कितपत सोपा असणार होता हा निर्णय स्वरासाठी...

तीन- चार दिवस झाले होते. स्वराच अन्वयशी बोलणं झालं नव्हतं किंबहुना तिला सुरुवातीचे दोन दिवस त्याच्याशी खूप बोलायची इच्छा होती पण नंतर तिच्या आवाजावरून त्याला तिची स्थिती समजेल म्हणून तीने स्वतःच कॉल केला नव्हता कारण अन्वयला तिची स्थिती समजली असती तर तो आहे त्या स्थितीत धावत- पळत तिच्याकडे आला असता आणि स्वरासाठी त्याने सर्व सोडलेले तिला अजिबात आवडल नसत मुळात त्याने आणखी एक गोष्ट तिच्यासाठी सोडली हा ठपका हा आरोप तिला आणखी सहन होणार नव्हता म्हणून कदाचित तिने त्याला कॉल केला नव्हता. आईचे ते शब्द की त्याला तुझी काळजी घेताना माझ्याकडे लक्ष जातच नाही, त्यालाही लोकांचा त्रास होत असेल पण तुला सांगत नाही तसेच जिवंत होते. तिने आता विचार केला असता तरीही ती त्यांना कधीच डोक्यातून बाहेर काढू शकणार नव्हती. म्हणून स्वराने काही दिवस त्याला निवांत राहू द्यायचा निर्णय घेतला होता. त्यात तिला त्रास होणार होता पण ती हा त्रास हसून सहन करायला तयार झाली होती.

ती सायंकाळची वेळ होती. स्वराच ऑफिस सुटलं आणि ती कॅब करून घराकडे यायला निघाली. नेहमीप्रमाणे कॅब रस्त्यावर भरधाव वेगाने धावत होती तर स्वराही आपल्याच विचारात भरधाव वेगाने धावत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता की साधं तेज नव्हतं. ह्या काही दिवसात तिची अशीच अवस्था होती आणि आजही त्यात काहिच बदल झाला नव्हता त्यामुळे आपली नजर बाहेरच्या वातावरनात गुंतवत ती आपला रस्ता पार करू लागली. जवळपास सायंकाळचे पावणे सात वाजले होते. स्वरा घरीं पोहोचली. ती काम करून बरीच थकली होती त्यामुळे केव्हा एकदा घरी जाते आणि बेडवर लोडत पडते अस तिला झाल होत. ती दारावर पोहोचली आणि तिने डोरबेल वाजवली. आईने काहीच क्षणात दार उघडलं. स्वरा आईकडे हलकीच नजर टाकत समोर जाऊ लागली. तिने बाजूला असलेल्या सोफ्यावर आपली बॅग फेकली आणि आईला हळुवार आवाजात म्हणाली," आई प्लिज एक चहा बनव ग. आज तुझ्या हातचा चहाच माझा थकवा काढू शकतो. खूप थकले मी प्लिज बनवशील का लवकर?"

ती बोलून गेली पण पुढे तिने आईकडे बघितलं नाही उलट फ्रेश व्हायला क्षणात वॉशरूमला पोहोचली. अगदी १० मिनिटांच्या जवळपास ती बाहेर आली आणि बघते तर आई निवांत सोफ्यावर बसून होती म्हणून स्वरा जरा चिडतच म्हणाली," काय ग चहा सांगितला होता ना? इतकं काम करून थकून जा जा आणि वरून स्वतःचे काम स्वतःच कर. बस, तुलाही कंटाळा आला असेल ना माझा? आलाच असणार, तू बस इथेच मीच बनवते माझं माझं."

स्वराचा हे काही दिवस स्वभाव असाच झाला होता. ती सहसा शांत राहणारी पण मागच्या काही दिवसात ती सतत चिडत होती. ती बोलून तिथेच उभी राहिली, आई काहीच बोलल्या नाही त्यामुळे स्वराला आईचा आणखीच राग आला. ती पाय आपटतच किचनमध्ये गेली आणि मधातच कुणाचा तरी आवाज ऐकून तिचे पाय थांबले. अन्वय म्हणाला," सॉरी मॅडम चहा बनवायला जरा उशीर झाला. आता बनवतो बघा पटकन. कडक चहा चालेल ना थकवा काढायला?"

त्याचा आवाज येताच जणू तिच्या डोळ्यात चमक आली. त्याने तिच्याकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर तिला बघून सुंदर हसू आलं होत. तो तिच्याकडे एकटक बघतच होता की स्वराने धावतच त्याला मिठी मारली. अन्वयनेही क्षणभर तिला घट्ट मिठीत ठेवले होते. आज स्वराने इतकी घट्ट मिठी त्याला मारली होती की त्याने सोडवायचा प्रयत्न केला असता तरीही ते शक्य नव्हतं. तो क्षणभर तिच्याकडे बघत होता आणि हळूच हसत म्हणाला," बायको तुम्ही इतक्या बेशरम झाल्या असणार ह्या चार दिवसात अस अजिबात वाटलं नव्हत हां? आईसमोरच आज मिठी? काय विचार करतील त्या आपल्याबद्दल? तुला तर काही बोलणार नाही पण जावई कसे आहेत म्हणून हसतील ना माझ्यावर?"

अन्वय हसत होता तर स्वराने त्याला मिठीत ठेवतच म्हटले," काही विचार करणार नाही आणि केला तरीही मला फरक पडत नाही. बस हे क्षण मला फक्त तुमच्या मिठीत राहू द्या. इतके दिवस दूर होतात आणि आताही दुसऱ्यांचा विचार करू का? ज्यांना जे समजायचं ते समजू द्या मला फरक पडत नाही."

तिने मिठी आणखीच घट्ट केली हे बघून अन्वय क्षणभर हसला आणि म्हणाला," क्या बात है बायको रोमँटिक मूड मध्ये दिसत आहात तुम्ही तर. स्वरा मग आज रात्री काही स्पेशल प्लॅन करायचा का? म्हणशील तर करूया? मीही काय विचार करतोय म्हणा एवढी रोमँटिक आहेस तर नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. चालेल ना?"

स्वरा आता हळूच त्याच्यापासून वेगळी झाली आणि रागावतच म्हणाली," हा बस तुम्हाला रोमांस दिसतो फक्त पण बायकोला इतक्या दिवसात एक फोन करता नाही आला ना तुम्हाला? बायको फक्त रोमांसच्या वेळी आठवते तुम्हाला बाकी वेळी बायकोची आठवण देखील येत नाही."

स्वरा त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती आणि अन्वय हसतच म्हणाला," बायकोला तर रोज बघतो पण तिकडच्या मुली रोज पाहायला थोडी मिळतात म्हणून म्हटलं त्यांच्यावरच लक्ष देऊ शेवटी काय तर घर की मुर्गी दाल बराबर ना?"

त्याच उत्तर ऐकताच ती तिथून जाऊ लागली आणि त्याने पटकन तिचा हात पकडत म्हटले.

कैसे बताऊ तुम्हे
कैसे जीये है तेरे बिन वो पल
आंखो से बेहते आसू को संभालना
इतना भी आसान नही..

स्वरा मॅडम तुमच्याविना एक-एक क्षण कसा काढला आहे माझं मलाच माहिती. सतत वाटत होतं की काम सोडुन तुझ्याकडे ह्याव. तुझ्या हसण्याची तुझ्या गमतीची सवय झाली आहे मला बस तुला सांगू शकत नाही. तुझा सुंदर चेहरा बघत नव्हतो ना तर माझा दिवसच जात नव्हता म्हणून आता ठरवलं आहे बाबा की कुठेही जाईन तर बायको सोबत नाही तर कुठेच नाही. ह्यावेळी वेळ काढला कसा तरी पण आता पुढे तुझ्याविना मला कुठेच जायचं नाही अगदी कुठेच नाही."

त्याच उत्तर ऐकताच तिच्या डोळ्यातून पटकन अश्रू बाहेर आला. तिने ते पुसले, ती काही बोलणार त्याआधीच अन्वयने तिला आपल्या मिठीत ओढून घेतले. त्याने तिला मिठीत ओढताच तिच्या चेहऱ्यावरचे ते शांत वातावरण कुठेतरी गायब झाल. तीच हृदय मोठ्याने धडधड करत होत. तिची नजर त्याच्या नजरेत स्थिरावली होती. त्यात तिला असंख्य प्रेम दिसत होत. हळूच त्याने तिच्या कमरेला हाताने घट्ट धरलं होत आणि तो स्पर्शही तिला मनातून सुखावून जाऊ लागला. ती त्याच्यात आणि तो तिच्यात क्षणातच हरवले होते. एकमेकांच्या नजरेत बघताना आता कुणालाही कुठल्याच उत्तराची गरज वाटत नव्हती. ते एकमेकांना बघतच होते की आई मध्ये येत म्हणाल्या," मला वाटलं इथे चहा बनत आहे पण इथे तर काही वेगळंच सुरू आहे. सॉरी हा मी उगाच मधात आले. तुम्ही चालू ठेवा तुमचं काय ते.."

आईच्या आवाजाने स्वरा-अन्वय वेगळे झाले पण स्वराच हृदय अजूनही धडधड करत होत फक्त ह्यावेळी तिच्या चेहऱ्यावर जरा लाजेचे भाव आले होते. अन्वयच्या चेहऱ्यावरही काहीशी हलकीच स्माईल होती. त्यांची ती गोंधळयुक्त स्थिती बघून आईच म्हणाल्या," मी नाही बघितलं हो काहीच, तुमचा चहा झाला बनवून की घेऊन या. मी आहे बाहेरच वाट बघत आणि लवकर यायची गरज नाहीये. छान चहा उकळू द्या मगच घेऊन या."

आई हसतच बाहेर निघून गेल्या तर स्वराने अन्वयकडे बघितले. तो तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. ती त्याला बघतच होती की तो तिच्या बाजूने एक-एक पाऊल टाकू लागला आणि ती एक-एक पाऊल मागे सरकू लागली. त्याच अस वागणं बघून तिच्या चेहऱ्यावर क्षणातच पुन्हा लाजेचे भाव जागे झाले. त्याला जवळ येताना बघून ती क्षणभर वेगळ्याच जगात पोहोचली. तो अगदी जवळ पोहोचला आणि ती पैंजनाचा छनछन आवाज करत त्याच्यापासून पळ काढत बाहेर पळाली. जाताना अन्वयचे ते शब्द तिच्या कानावर पडले होते " अग अजून चहा कुठे झालाय? आई म्हणाल्या ना की चहा झाल्यावर या."

त्याचे ते शब्द ऐकूनही ती काही थांबली नाही पण हे खास की तिच्या चेहऱ्यावरची ती उदासी, तिच्या डोक्यात असलेले ते विचार क्षणात नाहीसे झाले होते आणि पसरल होत ते निखळ हसू..सर्वाना आनंदी करणार..

काही क्षण गेले. स्वरा- आई बाहेर सोफ्यावर बसुन होत्या. तेवढ्यात अन्वय चहा घेऊन बाहेर पोहोचला. ट्रे समोर ठेवून तोही सोफ्यावर बसला आणि सर्व आपापले कप हातात घेऊ लागले. अन्वय अजूनही स्वराकडे बघतच होता त्यामुळे तिने आपली नजर काही त्याच्या बाजूने केली नव्हती. खर तर ती हेच सर्व मिस करत होती. अन्वय सतत आपल्याकडेच बघतोय म्हणून तिच्या चेहऱ्यावरची ती लाली अजूनही तशीच होती. ह्यांचा आपला वेगळाच रोमांस सुरू होता आणि आई चहाचा पहिला सिप घेत म्हणाल्या," जावई बापू, चहात फार गोडवा आलाय पण नक्की कुणाच्या प्रेमाच आहे ते समजेना?"

अन्वय एका सेकंदात उत्तरला," अफकोर्स तुमच्या मुलीच्या. ती सोबत असली की साखरेची पण गरज पडत नाही इतकी गोड मुलगी जन्माला घातली तुम्ही."

त्याच उत्तर ऐकून क्षणभर आई हसू लागल्या तर स्वरा नजर खाली करून, चेहऱ्यावर हसू ठेवून चहा घेउ लागली. ती आज त्याला फेस करणार नाही अस वातावरण त्याने तयार केलं होतं म्हणून ती आपल्या लाजण्यात व्यस्त होती. काही सेकंद झाले आणि आई पुन्हा म्हणाल्या," जावई बापू चहा वगैरे ठीक आहे पण रोमांस किचनमध्ये? मला सांगायचं होत मी बाहेर चक्कर मारून आले असते. पण माझ्यासमोरच? घरी म्हातार माणूस आहे ह्याचाही जरा विचार करावा म्हटलं.."

आई त्यांची गंमत उडवत आहे हे अन्वयला माहिती होत म्हणून अन्वय लगेच म्हणाला," आई तरीही मी म्हटलच स्वराला की आई आहेत बाहेर तर म्हणे मला फरक पडत नाही. नवरा खूप दिवसाने आला तर त्याच्या मिठीत राहू की लोकांकडे लक्ष देऊ. ह्यात माझी काहीही चूक नाही हा आई. तुमच्या मुलीलाच विचारा खोट वाटत असेल तर? बोल ग स्वरा.."

अन्वय- आई दोघेही गालातल्या गालात हसू लागले आणि स्वरा नजर खाली करूनच हसत राहिली तेवढ्यात आईनेच म्हटले," स्वरा हे काय ऐकतेय मी?"

स्वराने आता पहिल्यांदा आईच्या नजरेला नजर दिली आणि पुढच्याच क्षणी पुन्हा तिने नजर खाली केली. त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते बघून तिची त्यांना नजर द्यायची हिम्मत झाली नाही तेव्हाच अन्वय म्हणाला," विचारा विचारा!! बघा ना चोर कसा शांत बसला आहे. तुम्हाला वाटत असेल जावइ बेशरम आहे पण तुम्हाला सांगतो खरी चोर तुमची मुलगी आहे. माझं मन चोरल आणि आता स्वता शांत राहून सर्व माझ्यावर ढकलत आहे."

आईही आता हसतच उत्तरल्या," जावइ बापू हे बरोबर नाहीये हा. माझ्याच समोर माझ्या मुलीची गंमत उडवत आहात तुम्ही. मी ओरडणार हा तुमच्यावर."

आई त्याला ओरडत आहेत हे बघून ती म्हणाली," हो बघ ना आई हे असेच करतात, कायम मला फसवतात आणि स्वता मात्र वेगळे राहतात. आज पण मलाच म्हणत आहेत. मिठी काय मी एकटीनच मारली होती, ते पण सहभागी आहेत ना ह्यात.."

आईने पटकन हसत विचारले," ते ठीक आहे पण तुझी नसते का इच्छा? फक्त तेच अशा स्वभावाचे आहेत की तू पण??"

तिला समजलच नाही की अन्वय नाही तर आईच तिची उडवत होत्या. तीची नजर बरच काही सांगत होती आणि आई म्हणाल्या," मिळालं हा मला उत्तर. मला वाटत मीच कबाब मे हड्डी आहे जाते हा मी फिरायला."

आई बाहेर जाणारच की स्वरा त्यांच्या कुशीत शिरत म्हणाली," आई बास ना आता किती गंमत घेणार आहेस माझी? नाही राहवत मला त्याच्याविना तुला तर माहिती आहे ना? आणि तस पण आम्ही काहीच करत नव्हतो. फक्त मिठीत होतो."

आणि आई हसून म्हणाल्या," खर की काय? मला तर काही वेगळंच दिसलं?"

स्वराने तर आता नजर आईच्या कुशीत लपवली. तिला स्वतःचीच लज्जा येऊ लागली होती. तस करत असतानाही ती लपून अन्वयकडे बघत होती. तोही तिला सतत बघत होता म्हणून ते लाजेचे भाव आज तिच्या चेहऱ्यावरून जात नव्हते जणू त्यांनी तिच्या चेहऱ्यावर हक्काच स्थान मिळविल होत आणि ती पुन्हा एकदा नॉर्मल झाली. हसणे तिच्या आयुष्याचा पुन्हा एकदा भाग झाला.

आज अन्वय आला आणि सर्व काही क्षणात बदललं. त्याच्यासोबत असताना तिला क्षणभरही हसण्यातून फुरसद मिळाली नव्हती. त्याने येताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा बहर आणला आणि जणू मागे तीन- चार दिवसात काही झालं होतच हे स्वरा विसरून गेली. ती त्याचा स्वभाव त्याच प्रेम अनुभवण्यात अशी मग्न झाली की पुन्हा एकदा जगाचे विचार क्षणात नाहीसे झाले. काय होत माहिती नाही अन्वयमध्ये पण तो बाजूला असला की स्वराला कशाचीच चिंता नसे. आपण दिसायला कुरूप आहोत हे त्याच्यासोबत असताना कधीच जाणवत सुद्धा नसे उलट जेव्हा तो तिच्या चेहऱ्याकडे सतत बघत असायचा तेव्हा तिच्यापेक्षा सुंदर ह्या जगात आणखी कुणीच नाही अस वाटून जायचं. एकीकडे सर्व जग ज्यांना तिच्या चेहऱ्याचा फक्त बघून त्रास होत होता आणि एकीकडे एकटा अन्वय जो तिच्या इतक्या जवळ असायचा तरीही त्याच्या नजरेत भीती नव्हती की घृणा नव्हती म्हणूनच कदाचित त्याच्यासोबत असताना ती क्षणात जगाचे विचार विसरून जायची आणि आपण घेतलेला निर्णय तिला क्षणात योग्य वाटायचा. अशी जादू होती अन्वच्या असण्याची.

तुम नही तो जिंदगी विरानसी लगे
तुम पास हो तो जन्नतसी
फरक सोच का अच्छे दिलं का है
उन्हे मै शैतान तो तुम्हे भगवान लगी..


ती रात्रीची वेळ होती. स्वरा अन्वयच्या मिठीत झोपली होती. ही एकमेव अशी जागा होती जिथे तिला सर्वात जास्त सुरक्षित वाटत होतं म्हणून तो येताच तिने आपल्या जागेवर कब्जा मिळविला. त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकले की ती जगाच्या सर्व चिंतेतून मुक्त व्हायची आणि आजही तसच झालं. तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता आणि स्वरा म्हणाली," अन्वय सर का सोबत नाही घेऊन गेलात मला? तुम्हाला माहिती आहे किती मिस केलं मी तुम्हाला? एक-एक क्षण कसा काढला माझं मला माहिती? तुम्ही तर खूप एन्जॉय केलं असेल ना त्या गोऱ्या बायांसोबत?"

अन्वयने हसतच विचारले," तुला कस माहिती मी गोऱ्या बायांसोबत एन्जॉय करत होतो ते?"

स्वरा जरा नाटकेच्या स्वरात म्हणाली," सर्व पुरुष तसेच असतात !! लग्नाआधी प्रेयसीपासून क्षणभर दूर जात नाहीत, तिच्यासाठी काहीही करतात पण लग्नानंतर तिलाच विसरून जातात. ते काय म्हणता तुमच्या भाषेत घर की मुर्गी दाल बराबर. बरोबर ना?"

ती त्याच्याकडे बघत होती आणि अन्वय हसतच उत्तरला," ते गमतीत बोलत होतो. खर सांगू तर तू तिथेही माझ्यासोबतच होतीस. मी जेव्हा बाहेर जायचो तेव्हा मला रुमाल आणून द्यायचीस. आल्यावर मला चहा द्यायचीस. कशी झाली मिटिंग म्हणून सतत विचारपूस करायचीस आणि रात्री अशीच माझ्या मिठीत झोपून माझा पूर्ण थकवा काढायचिस त्यामुळे मला क्षणभर पण वाटलं नाही की तू सोबत नाहीस आणि तुला सोबत का घेऊन गेलो नाही त्याच कारण अस की माझ्या मागे आईबाबांना सांभाळणारे भरपूर लोक आहेत पण तुझ्या बाबांना सांभाळणार कुणीच नाहीत. ह्या शहरात त्यांचं कुणीच नाही आपल्याशिवाय. तू आहेस इथे म्हणून मला काळजी नव्हती नाही तर सतत काळजी लागली असती. नाही तर तुझ्याशिवाय मला कुठे जायला स्वतालाच आवडणार नाही."

स्वरा जरा आणखीच कुशीत शिरत म्हणाली," ते सर्व ठीक आहे पण मला आवडलं असत तुमच्यासोबत फिरायला. ते क्षण मी मिस केले ना!! त्याची भरपाई कशी करणार बर नवरोबा?"

अन्वयने हसतच उत्तर दिले," बस एवढंच ना!! त्याची काळजी नको, आहे काहीतरी माझ्या डोक्यात."

स्वराने लगेगच त्याला विचारले," काय आहे बर?"

अन्वयही हसतच म्हणाला," हुशार आहेस. मी कशाला सांगू? मला कस सरप्राइज दिलं होतंस वाढदिवसाला मग हे पण सरप्राइजच आहे. सो तू फक्त वाट बघ."

ती जरा रुसतच म्हणाली," अन्वय सर सांगा ना. मी तुमची बायको आहे ना मग सांगायला काय जात? प्लिज सांगा ना."

स्वरा त्याच्याकडे बघत होती आणि अन्वय हसत होता पण त्याने काही उत्तर दिले नाही म्हणून स्वराच उदास स्वरात उत्तरली," नेहमी असच करता खडूस कुठले!!"

अन्वय काही वेळ तिचा रुसलेला चेहरा बघून हसत होता तर ती अजूनही त्याच्या कुशीत शांत झोपून होती. काही वेळ तसाच गेला आणि अन्वयने हसणे थांबवत विचारले," स्वरा तू ह्या चार दिवसात आपल्या घरी गेली होतीस का?"

हा प्रश्न येताच स्वराचा जरा गोंधळ उडाला. तिने त्याच्याकडून नजर वळवतच विचारले," अस का विचारत आहात?"

अन्वयचा चेहरा आता शांत जाणवत होता आणि तो हळुवार शब्दात बोलून गेला," नसेल गेली तर बरं आहे कारण मला भीती होती की आई तुला बरच काही बोलेल. आजपर्यंत मी तिच्याशी बोललो नाही त्याचा राग ती नक्कीच काढणार तुझ्यावर हे माहिती आहे मला म्हणून विचारत होतो. कधी कधी ना ती जास्तच वागून जाते. त्याचा राग येतो मला पण मी काहिच करू शकत नाही. सतत ती तीच कशी योग्य हे ओरडून सांगते आणि ह्या नादात सर्व विसरून जाते. ती आपला मुद्दा पटवायला काहीही करू शकते ह्याचा अनुभव आलाय मला. मला कुणी काही बोलल ना स्वरा तर मी एक शब्द तोंडून काढणार नाही पण तुला कुणी काही बोललं तर मला नक्किच आवडत नाही. मग ती माझी आईअसेल तरीही... खर तर मला तिलाही बोलायच असत पण बायकोची बाजू घेतोस कायम अस बोलायलाही ती मागे पुढे बघणार नाही, आम्हाला वेगळं केलंस बोलायलाही मागे बघणार नाही म्हणून जरा भीती वाटते. तिथेही तीच चिंता मला जाणवत होती म्हणून विचारतोय गेली होतीस का?"

स्वराला त्याच्या शब्दावरून समजलं की त्याला घडलेल सर्व सांगणं योग्य नाही आणि तिलाही खोटही बोलायच नव्हतं म्हणून ती विषय वळवित म्हणाली," तुम्ही ना खूप बोलता अन्वय सर. आज काहीच बोलायच नाही. आज फक्त मला शांतपणे मिठीत घेऊन झोपायचं. तीन- चार दिवस तुमच्याविना नीट झोप आली नाही. आता मला मिठीत घेऊन झोपायचं तर नुसत्या गोष्टी सांगत आहात मला?"

अन्वय तीच लहान मुलांसारखं बोलणं बघून हसला आणि त्याने तिच्याभोवती मिठी घट्ट केली. तिला मिठीत घेतानाही त्याचा तो हळूवार स्पर्श तिला सुखरूप असण्याची जाणीव करून देत होता म्हणून कदाचित ती आज काहीच वेळात झोपी गेली. ती झोपली तर अन्वय तिच्या झोपलेल्या शांत चेहऱ्याकडे बघत म्हणाला," पागल.. किती सुंदर दिसते आहेस ना? अशी लहान मुलांसारखी जेव्हा बोलतेस ना तेव्हा मला आणखीच प्रेम येत तुझ्यावर आणि वेडाबाई तुला नाही माहिती पण मलाही तुझ्या मिठीतच आल्यावर सुखरूप वाटत. इतर स्त्रियांचा मोह मला शक्यच नाही, मग ती चेहऱ्याने कितीही सुंदर असो कारण मनाने सुंदर बायको कदाचित मला दुसरी कुणीच मिळणार नाही. लव्ह यु बायको!! मी पण मिस केलं तुला खूप. मुली हजार मिळाल्या तिथे पण माझी स्वरा एकच आहे, त्यांना सर नाही माझ्या बायकोची.."

तो आज सतत तिच्या शांत चेहऱ्याकडे बघत होता आणि त्याच तिच्यावर आणखीच प्रेम वाढत होत. त्याने न बोलताही सिद्ध केलं की आपल्या लोकांचा त्रास होत आणि जर त्रास होत असेल तर तो मुळात आपला नाही आणि त्याच्या गोष्टी मनावर सुद्धा घेऊ नये..

तेरी बाहो मे भूल गया मै सब कुछ
इतना आसान लगता है मुझे सुखो की खोज करना..

स्वराच्या आयुष्यात अगदीच मोजक्या अशा सकाळ यायच्या जेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं त्यातली ही एक सकाळ. काल अन्वयच्या मिठीत तिला शांत झोप लागल्याने आज ती जरा लवकरच उठली होती तर अन्वय अजूनही झोपूनच होता. तो खूप थकला असेल म्हणून आज तिने त्याला उठविण्याचा प्रयत्नही केला नाही. तो झोपून राहिला आणि स्वरा फ्रेश व्हायला वॉशरूमला गेली. तिला ऑफिसला जायचं असल्याने ती पटापट तयारी करत होती. अगदी अंघोळ करून ती आईला कामात मदत करू पाहत होती. सकाळचा नाश्ता आणि ऑफिससाठी डब्बा बनवून झाल्यावर ती बेडरूममध्ये पुन्हा पोहोचली. तेव्हा जवळपास ९.३० वाजत आले होते. ती पोहोचली आणि अन्वय अजूनही तिला झोपूनच असल्याचं जाणवलं. त्याचा चेहरा इतका शांत जाणवत होता की ती त्याच्याजवळ जाऊन त्याला बघण्यापासून स्वतःला आवरू शकली नाही. ती त्याच्या बाजूला जाऊन त्याला बघू लागली. त्याचा सौम्य चेहरा बघून तिच्याही चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल आणि ती मनातल्या मनात म्हणाली," बरोबर म्हणतो स्वयम. तुम्ही मी फक्त क्षणभर हसावं म्हणून किती मेहनत घेता मग तुम्हाला मी कशी हरू देऊ. नाही हरणार मी पण आणि तुम्हालासुद्धा हरू देणार नाही. जसे तुम्ही मला हसवायला काहीही करू शकता ना तसच मी कुणाचंही बोलणं सहन करू शकते मग त्या तुमच्या आई का असेना. लव्ह यु नवरोबा!!"

ती स्वतःवरच हसली आणि उठून बाजूला जाऊ लागली. तेवढ्यात अन्वयने तिचा मागून हात पकडला. स्वरा क्षणभर हसलीच आणि मागे वळून बघू लागली. ती त्याला सतत लाजून बघत होती आणि अन्वय हळूच हसत म्हणाला," काय मॅडम, मला वाटलं की मस्त किस्सी वगैरे देणार तुम्ही म्हणून झोपच नाटक करत होतो पण तुम्ही तस काही केलंच नाही. कधी कधी तुम्हीही घ्या हो पुढाकार."

स्वरा हसतच उत्तरली," घेतेच आहे ना नवरोबा. ऑफिसला उशीर होतोय म्हणून तर तिकडे जायला पुढाकार घेते आहे. तुम्हाला किस्सी देत बसले तर मला नाही वाटत की माझं ऑफिसला जाण होईल. मग बॉस ओरडणार नाही का माझ्यावर?"

स्वराने निखळ हसतच उत्तर दिले आणि अन्वय घड्याळाकडे बघत म्हणाला," स्वरा तुला ते बायकोसारख अंघोळ करून आल्यावर माझ्या चेहऱ्यावर पाणी उडवून उडवायला नाही आवडत का? मी तर वाटच बघत असतो पण तू कधीच काही करत नाहीस. अस का बरं?"

स्वरा हसतच उत्तरली," कारण तुमचा रोमांस मग मला महागात पडतो नवरोबा. किती घाई होते मला माहित आहे जायला शिवाय ते चेहऱ्यावर सतत दिसत तर मग माही चिडवत बसते मला. तुम्हाला काय आहे बर म्हणायला?? आणि बर का तुम्हाला वाटत नाही का दिवसेंदिवस जास्तच रोमँटिक होत आहात ते. इतकाही रोमांस बरा नाही हा नवरोबा. आता तर आई पण चिडवायला लागली. पुढे काय होईल विचार केलात कधी??"

अन्वय बेडवरून उठला आणि तिला मागून मिठीत घेत म्हणाला," काय करणार बायको आहेच माझी इतकी सुंदर तर?? नजरच जात नाही दुसरीकडे. रोमांस आपोआपच बाहेर येतो. आता मनाला कोण समजवणार ना?"

स्वराने त्याची गंमत उडवायला म्हटले," अच्छा!! लोक तर काही वेगळच म्हणतात. कुणी भूत तर कुणी काय काय!!"

अन्वय हसतच उत्तरला," कस आहे ना स्वरा त्यांचे डोळे खराब झाले आहेत. मला वाटत त्यांना चष्मे द्यायला हवेत आणि सुरुवात माझ्या घरापासून व्हायला हवी. स्वरा तू बघत राहा एक दिवस ना मी सोसायटीमध्ये खरच चष्मे वाटणार आहे."

त्याच बोलणं ऐकताच स्वरा खळखळून हसू लागली आणि अन्वय आताही तिला मिठीत घेऊन होता. स्वराने हसता- हसताच म्हटले," पागल आहात तुम्ही. काय काय करणार माझ्यासाठी. लोकांचे विचार थोडी बदलणार आहेत त्याने. मी कुरूप ती कुरुपच.."

अन्वय विचार करत म्हणाला," अ… त्यांचे विचार कुणाला बदलायचे आहेत मॅडम फक्त मला माझ्या बायकोला खुश ठेवायचं आहे आणि त्यासाठी चष्मा वाटप केंद्र सुरू करावच लागेल. काही वेळ का असेना त्याची नजर बदलेल आणि नाही बदलली तर पॉईंट वाढवून घेऊ मग काहीच दिसणार नाही."

स्वराला काही क्षण त्याच प्रेम बघून मन भरून आलं होतं. इतकं प्रेम कुणी कुणावर करू शकत का क्षणभर तिच्या मनात विचार येऊन गेला होता. तिला खर तर आताही त्याच्या मिठीतुन बाहेर पडायच नव्हतं पण ऑफिसची वेळ होऊ लागली होती म्हणून ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली," नवरोबा इच्छा नाहीये माझी तुमच्या मिठीतुन बाहेर पडायची पण ऑफिसला उशीर होईल सो सोडा मला. मी ऑफिसला जाते, तुम्ही निवांत आराम करा. सायंकाळी येईल तेव्हा बोलू."

ती म्हणाली तर होती पण अन्वय तिला सोडतच नव्हता म्हणून ती हसतच राहिली. काही क्षण फक्त ते मिठीत होते. कुणाशी बोलायची गरज त्याक्षणी वाटत नव्हती आणि बाहेरून आवाज आला," तुमचा रोमांस वगैरे सुरू नसेल तर मध्ये येऊ का?"

आईच्या आवाजाने स्वरा दचकली आणि अन्वय हसतच उत्तरला," सुरूच आहे थोड्या वेळा नंतर आले तर नाही जमणार का?"

तो बोलून गेला आणि आई बाहेरच हसू लागल्या. स्वराला क्षणभर त्याच्यावर हसू आलं होतं पण आई पुन्हा तिला चिडवेल म्हणून ती त्याचा हात सोडवत म्हणाली," आई ये ग. काहीही बोलतात अन्वय सर."

स्वराच्या चेहऱ्यावरून अजूनही हसू गायब झाल नव्हतं आणि आई मध्ये येत म्हणाल्या," सॉरी हा जावई बापू उगाच व्यत्यय आणला पण हेच सांगायला आले होते की नाश्ता बनवून झालाय, गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या."

आईच बोलणं ऐकताच स्वरा बाहेर जाऊ लागली आणि अन्वय म्हणाला," स्वरा मलाही आज ऑफिसला यायचं आहे, मिश्रा सरांकडे जरा काम आहे सो माझी वाट बघ. मी आलोच फ्रेश होऊन."

ती बाहेर गेली तर अन्वय पटापट आवरू लागला. अन्वय गेला तसाच १५-२० मिनिटात परत सुद्धा आला. स्वराला घाई होत असल्याने दोघांनीही पटापट नाश्ता आवरला आणि दोघेही ऑफिसला निघाले.

*******

दुपारचे ११ च्या आसपास झाले होते जेव्हा ते दोघे ऑफिसला पोहोचले. आजच्या पूर्ण प्रवासात असा एक क्षण नव्हता जेव्हा स्वरा अन्वयकडे बघत नव्हती. तो तिला सतत हसवत होता आणि कदाचित हेच सर्व ती ह्या चार दिवसात मिस करत होती. ते ऑफिसला पोहोचले आणि ती आपल्या जागी विराजमान झाली. अन्वयनेही पिऊनकडून मिश्रा सर आल्याची खात्री केली आणि दारावर पोहोचत परवानगी मागितली, " मे आय कम इन सर?"

मिश्रा सरांनी हसतच म्हटले," अरे प्लिज! ( तो खुर्चीवर बसला) बोलो अन्वय कैसा गया सेमिनार? बाय द वे सेमिनार तो दो दिन मे था तुम कहा रुक गये थे इतने दिन?"

अन्वय जरा शांत वाटत होता आणि जरा नम्र आवाजातच म्हणाला," अच्छा गया सर सेमिनार. बहोतसी चीजे सिखने मिली वहापे. थॅंक्यु फॉर गिविंग मी दॅट काइंड ऑफ ऑपरचूनिटी और कुछ पर्सनल काम था इसलीये दो दिन ठेहर गया."

मिश्रा सर त्याच्याकडे बघून हसले पण समोर काहीच बोलले नाही तर अन्वय काहीतरी विचार करत होता. तो अजूनही शांत आहे आणि खुर्चीवर बसून आहे म्हणून सरांनीच विचारले," कुछ काम था अन्वय? कोई प्रॉब्लेम है क्या?"

अन्वय जरा हळुवार आवाजात म्हणाला," एक्चुली येस सर! सर मुझे ५० लॅक का लोण चाहीये था. अगर पोसीबील है तो क्या आप मुझे दे सकते है?"

अन्वयच बोलणं ऐकून सर काही वेळ शांतच होते तर अन्वय त्यांच्याकडे सतत बघत होता. काही क्षण दोघात शांततेच वातावरण राहिल्यावर मिश्रा सरांनी विचारले," बहोत बडी रकम है. क्या मै पुछ सकत हु किस बात के लिये चाहीये. नही बताना तो कोई बात नही."

मिश्रा सर आता त्याच्याकडे बघत होते आणि अन्वय शांत स्वरात त्यांना सर्व सांगू लागला. अन्वय पुढचे ५ मिनिट सरांना काहीतरी सांगत होता आणि सर शांत चित्ताने सर्व ऐकत होते. शेवटी अन्वयच बोलन थांबल आणि सरांच्या चेहऱ्यावर जरा हसू आलं. त्याच बोलणं पूर्ण होताच सर हसतच म्हणाले," डन!! मै अपने अकाउंट डिपार्टमेंटसे बात करता हु तुम्हे कुछ दिन मे मिल जायेगा लोण."

त्यांचे शब्द ऐकताच अन्वय क्षणभर हसला आणि त्यांचा हात मिळवित उत्साहाने म्हणाला," थॅंक्यु सो मच सर!! थॅंक्यु सो मच सर."

अन्वयने आनंदाच्या भरातच रूम सोडली तर तर मिश्रा सर त्याच्याकडे बघून हसत होते.

अन्वय बाहेर निघाला आणि स्वरावर त्याची नजर पडली. ती कामात बिजी होती म्हणून तीच लक्ष त्याच्याकडे गेलं नव्हतं. तो काही क्षण ती बघणार म्हणून तिच्याकडे बघत होता पण तिने काही नजर वर केली नाही आणि तो उदास होऊनच आपल्या केबिनमध्ये गेला आणि निवांत चेअरला टेकला.

अन्वय आज खूप खुश होता. त्याने कसला तरी विचार केला होता ते पूर्ण होणार होत म्हणून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. कदाचित स्वराच्या बाबांना बिजनेस टाकून द्यायचा विचार त्याने एकवला होता आता ते स्वप्न पूर्ण होणार होत तर दुसरीकडे स्वरा पुन्हा एकदा विचारात हरवली होती. तिने आईला विचारलं तर होत की माझा इतका त्रास होतो का? त्यांनी त्यांच उत्तरही ऐकवलं होत आणि त्यांचा प्रश्नही तिला तसाच आठवत होता. उत्तर दिलंस तर सोडून जाशील का हे घर? हे ऐकून स्वराची बोबडी वळाली होती. तेव्हा त्यांना त्रास होतो हे माहीत असतानाही पुन्हा त्यांच्यासमोर जाण कितपत योग्य आणि जर जायचं नाही तर अन्वयला काय सांगायचं हा विचार तिच्या मनात ऑफिसला आल्यापासून सुरू होता. त्यामुळेबती आपल्याच विचारात केव्हाची हरवून बसली होती कारण ती घरी गेली असती तर आईला त्रास आणि नसती गेली तर सर्व सांगितल्यावर अन्वयला त्रास झाला असता म्हणून ती चिंतेत पडली होती. सकाळची दुपार झाली होती पण तिच्या चेहऱ्यावर हसू आलं नव्हतं. अन्वयची तिच्यावर नजर जाण अशक्य होतं. त्याच्या ते लक्षात आलं आणि त्याने गमतीत तिला मॅसेज केला…

" मॅडम असा चेहरा पाडून नका राहत जाऊ हा माझं कामात मन नाही लागत. प्लिज हस ना माझ्यासाठी."

स्वराने मोबाइल हातात घेतला आणि त्यांचा मॅसेज बघू लागली. त्याचा मॅसेज बघताच तिच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आलं पण ती दिलखुलास हसू शकली नाही आणि अन्वयने पुन्हा मॅसेज केला

" स्वरा तुला माहिती आहे लोकांचा श्वास म्हणजे जीवन आणि माझं जीवन म्हणजे तुझं हसू. तुझं हसू बघितलं नाही तर माझ मन जाग्यावर राहत नाही."

तिने हादेखील मॅसेज वाचला पण ती हसली नाही. ती हसतच नाहींये हे बघून अन्वयने पुन्हा मॅसेज केला.

" आता ब्रम्हास्त्र वापराव लागेल. वेट आता कॉल करतो आणि तुला केबिनमध्ये बोलावून घेतो. आता फक्त हसून जमणार नाही आता ओठांवर किस घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही. वेट हा!! विचार कर केबिनमध्ये रोमांस आणि सरांनी बघितलं तर काय म्हणतील स्वरा इतनी बेशरम हो गयी हो तुम.. तुम्हे एक महिने की छट्टी नही दि तो यही शुरु हो गयी. लगता है अब तुम्हे भेजनाही पडेगा हनिमून वरणा तुम यहा सबका काम बिघाडोगे. येतेस ना केबिनमध्ये मग??"

त्याचा हा मॅसेज बघताच स्वरा अचानक खळखळून हसू लागली. ती इतक्या मोठ्याने हसली होती की आजूबाजूचे सर्व तिला बघू लागले होते. स्वराला ते लक्षात आलं तेव्हा तिने ओठांवर हात ठेवला पण हसू तीच तसच कायम होत आणि तिने मॅसेज टाइप केला.

" अगदी वेडे आहात!! नशिबाने न मागता सर्वात सुंदर गिफ्ट मला दिलं असेल तर ते तुम्ही. माझे वेडोबा!!"

त्याने मॅसेज वाचला पण तो आताही तिच्या हसण्यातच गुंतला होता कारण तीच हसन म्हणजे त्याचा श्वास होता. ह्याबाबतीत अन्वयसुद्धा स्वार्थीच होता. कारण ती हसली नसती तर अन्वयच्या श्वासानी सुद्धा दगा द्यायला मागे पुढे बघितलं नसत..

स्वार्थ ही तो है
जो खुदके आनंद के बारे मे सोचता है
त्याग बडा तो बनाता है
पर खुशीया नही दे पाता..