छोटीसी है ये दुनिया
कभी तो तुमपे आकर रुकेगी
जो तुमने दिया है सबको
वो तुमको भी जरूर लौटायेगी...
पाहता-पाहता जवळपास एक दोन महिन्याचा कालावधी निघून गेला होता. आईच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झाली होती पण त्यांना अजूनही चालता येत नव्हते तर इकडे स्वरा त्यांचं मन शांतपणे जिंकत चालली होती पण ह्यावेळी ती स्वार्थी नव्हती. अन्वय सोबत लग्न करणे हा स्वार्थ तिने जगाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन स्वीकारला होता पण इथे आल्यावर समजलं की हाच स्वार्थ एका आईला मुलापासून दूर करतोय म्हणून तिने कदाचित त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ती आपले काही सुंदर आणि शेवटचे क्षण त्याच्या कुटुंबासोबत घालवू लागली. ती एक एक क्षण आपल्या मनात साठवत होती पण अन्वयला त्याबद्दल कल्पना नव्हती.
अशीच एक सकाळ. आई घरात बसून बसून कंटाळल्या होत्या हे स्वराला जाणवलं होत म्हणूनच तिने अन्वयला सांगून विल चेअर बोलावून घेतली होती. स्वराने सकाळीच देवपूजा केली आणि आरती घेऊन आईच्या बेडरूममध्ये आली. आई बेडवर कशातरी बसल्या होत्या आणि आरती देत स्वराने विचारले," आई घरात बसून बसून कंटाळा आला असेल ना तुम्हाला?"
आईने आरती घेतली आणि हळुवार हसत उत्तरल्या," हो ग पण करणार काय?? आताही नीट उठण होत नाही. कशीतरी वॉशरूमला जातेय तुझा आधार घेऊन तेच खुप झालं. कंटाळा आला तरी दुसरा पर्याय काय? काढायचे आणखी काही दिवस ह्याच रूममध्ये बसून."
स्वराने आरतीची थाळी क्षणात टेबलवर ठेवली आणि आईचा हात पकडत तिने विचारले," फिरायला जायला आवडेल तुम्हाला ? छान बाहेर फिरून या म्हणजे तुमचं मन शांत होईल."
आईदेखील गोड हसू चेहर्यावर आणत उत्तरल्या," स्वरा तू आता माझं श्रावणबाळ होणार आहेस का? तुला झेपणार आहे का इतकं वजन? थॅंक्यु हा बाळा पण ते शक्य नाही. मी बरी होईल तेव्हा जाऊ आपण. वाटल्यास रोज जाऊ तोपर्यंत मी आहे इथेच."
आई गोड हसत राहिल्या आणि स्वरा क्षणभर त्यांच्या हसण्याकडे बघत राहिली. स्वरा सून म्हणून घरात आल्यापासून पहिल्यांदा तिने त्यांना इतकं खळखळून हसताना बघितल होत म्हणून काही क्षण ती बोललीच नाही. ती फक्त आईकडे बघत होती आणि आईनेच विचारले," का ग एकटक बघत आहेस माझ्याकडे? भूत दिसतेय का मी?"
आई मस्करीमध्ये बोलून गेल्या आणि स्वराला काहीतरी आठवलं. कधीतरी ती स्वतःच अन्वयला अस काहीतरी बोलून गेली होती. मानूस जेव्हा एकच स्थिती सतत फेस करत असतो तेव्हा इरिटेड होऊन अस काही बोलून जातो मग तो मोठा असो की लहान त्याने फरक पडत नाही, स्वराच्या हे लक्षात येताच ती क्षणभर हसली आणि तशीच बाहेर पडली. काहीच क्षणात ती विल चेअर घेऊन मध्ये परतली आणि आईला हळूच हसत म्हणाली," मी नाहीये तुमचं श्रावणबाळ पण ही चेअर नक्की होऊ शकते. आता बोला आवडेल तुम्हाला फिरायला जायला. मी अन्वय सरांना उठवते आणि सांगते की तुम्हाला बाहेर घेऊन चला. थांबा हा आलेच मी."
स्वरा बाहेर जाणारच की आई मोठ्याने म्हणाल्या," तुला आता काही काम आहेत का?"
स्वरा क्षणभर थांबत उत्तरली," नाही आई पण.."
स्वरा बोलता-बोलता थांबली आणि आई हळुवार शब्दात उत्तरल्या," पण वगैरे काही नाही. चल मदत कर मला बसायला. आज दोघीही फिरू. तस पण मी अशी बेडवर पडून आहे तेव्हापासून तुलाही बाहेर फिरायला जाता येत नाहीये सो चल तू पण आज आपण मस्त फिरू. तेवढीच मला साथ मिळेल गप्पा मारायला. येतेस ना?"
स्वरा काही क्षण आईकडे बघत होती तर आई बेडवरून उठू लागल्या. त्यांची धडपड बघून स्वराने त्यांना आधार दिला आणि नीट खुर्चीवर बसविले. आई आता शांत बसल्या आणि स्वराने गोड हसत विचारले," सुरू करू मग आई सुंदर निसर्ग सफारी?"
आईने फक्त तिच्या डोळ्यात बघितले आणि पुढे कुठल्याही उत्तराची गरज पडली नाही. स्वराने हळुवार त्यांना रूममधून बाहेर काढले. आज पहिल्यांदा त्या दोघी एकत्र बाहेर पडल्या होत्या त्यामुळे चेहऱ्यावर आनंद असताना देखील स्वराच्या मनात थोडीशी भीती होती. कदाचित तिने जगाच वागणं स्वीकारलं होत पण तरीही एक क्षण कायम असा यायचा जेव्हा तिला लोकांच्या नजरेचा त्रास व्हायचा म्हणून थोडी ती घाबरली होती. ती एकटी असती तर हरकत नाही पण आज आईसोबत बाहेर निघाली होती तेव्हा कुणी त्यांना तिच्यासमोरच बोललं असत तर तिला नक्कीच सहन झालं नसत म्हणून ती इकडे-तिकडे नजर फिरवत चालू लागली. काहीशी अशीच स्थिती लग्नाच्या पहिल्या सकाळी अन्वयची होती. म्हणतात ना प्रत्येक गोष्ट कधी ना कधी फिरून येते म्हणून द्यायचंच असेल कुणाला तर आनंद द्या कदाचित तोच आनंद तुम्हाला परत मिळेल.
स्वरा आणि आई हळुवार घराच्या बाहेर पडले. सूर्य डोक्यावर येऊ लागला होता आणि कोवळी किरणे शरीराला ऊर्जा देऊ लागली होती. गाड्यांचा नेहमीचा कर्कश आवाज त्यांना आता त्रास देत नव्हता म्हणून हळुवार त्या दोघीही समोर चालू लागल्या. सकाळची वेळ असल्याने लोकांची बरीच गर्दी रस्त्याने दिसत होती आणि दोघांच्याही नजरा लोकांवर पडू लागल्या. आयुष्यात पहिल्यांदा अस झालं होतं की स्वरा आणि आई एकसारखं फिल करत होत्या. स्वराला बघून लोकांच्या नजरेत जे भाव असायचे तेच भाव अन्वयच्या आईला बघून लोकांच्या नजरेत येत होते. क्षणभर त्यांनाही ते जाणवलं आणि त्या लोकांशी नजरा मिळवू शकल्या नाहीत. पहिल्यांदा आई आणि स्वराच्या मनात एकच भाव असल्याने त्या दोघीही एकमेकांकडे बघू शकल्या नाहीत किंबहुना त्या समोर जात तर होत्या पण कुणाचीही कुणाशी बोलायची हिम्मत होत नव्हती. त्या शांत शांततेत समोर चालत राहिल्या आणि स्वरानेच शांतता मोडत विचारले," आई चहा घेऊया? खुप छान चहा मिळतो इथे. मी घेऊन येते मग बोलू निवांत कुठेतरी बसून."
आईच्या उत्तराची वाट न बघताच स्वरा समोर गेली तर आई क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे बघू लागल्या. ना तिच्या चेहऱ्यावर उदासी होती ना आनंद. आई तिच्याकडे बघतच होत्या की विल चेअरवर एक हात येऊन पडला आणि आई दचकल्या. आईने वर नजर करून बघितले तर त्यांना समोर अन्वय दिसला. अन्वयला बघताच क्षणात त्या शांत झाल्या आणि अन्वयने हळूच हसत विचारले," मातोश्री जमेलं का तुम्हाला तिचा चेंहरा वाचायला?"
आईने क्षणभर त्याच्याकडे बघत विचारले," तुला कस कळलं मी तिचा चेहरा वाचत होते ते?"
अन्वय काहीच बोलला नाही पण त्याच्या हसण्यात बरीच उत्तरे लपून होती. आईने त्याच्या डोळ्यात बघितले आणि हळुवार हसत उत्तरल्या," तुला नाही कळणार माझ्या मनातल तर कुणाला कळणार म्हणा? बाय द वे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता देते, नाही समजत अन्वय मला ती कोणत्या मातीची बनली आहे ते. आज पण बघ ना लोक माझ्याकडे, तिच्याकडे कसे बघत आहेत. एक क्षण मला भीती वाटत होती लोकांच्या नजरेची, वाटलं की पळून जावं पण स्वरा तर हे रोज फेस करते. कुठून दिली असेल रे देवाने तिला इतकी हिम्मत? अन्वय मला आज एक गोष्ट जाणवतेय. माझा चेहरा तर काही दिवसात नीट होणार आहे किंवा अस म्हण की माझं वय झालंय तेव्हा हा चेहरा असाच राहिला तरीही फरक पडणार नाही पण स्वराने ह्या वयात किती त्रास करून घ्यायचा? कितपत सोपं आहे लोकांच्या नजराणा फेस करणं ते पण काही दिवस नाही तर पूर्ण आयुष्य? अन्वय आज मला हा विचारच करून खूप भीती वाटतेय? कदाचित तिला आपण स्वीकारून घेऊ पण बाहेरच्या लोकांच्या नजरा तर बदलू शकत नाही मग तिने हे सर्व आयुष्यभर सहन करायचं का?"
आज पहिल्यांदा आईच्या चेहऱ्यावर तिच्या प्रति काळजी दिसत होती. म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही सेम तसेच आज आईनेही स्वराची स्थिती त्यांच्यावर तीच वेळ आल्यावर समजून घेतली होती. स्वरा नंतर आज आईने अन्वयला काही असे प्रश्न विचारले होते ज्याचे उत्तर खरच अन्वयकडे नव्हते. आई त्याच्याकडे शांत नजरेने बघत होत्या आणि अन्वय त्यांना आपल्या मनातले भाव समजू नये म्हणून हळूच हसत उत्तरला," म्हणून ती ग्रेट आहे मातोश्री. तिलाही माहिती आहे की त्रास होणार आहे पण हार मानेल ती स्वरा कसली? आई आपण जगात सर्व स्वार्थी आहोत, मला प्रेम मिळाव म्हणून मी तुमच्याशी भांडलो, तू आपला हट्ट पूर्ण व्हावा म्हणून, जग आपल्याशी भांडत आहे कारण आपण सुंदर दिसणारी सून आणली नाही पण ती आपल्या आयुष्यात सुद्धा काही नाती असावी म्हणून धडपड करते आहे. ती एकदा म्हणाली होती की तिने मला स्वीकारन म्हणजे स्वार्थ आहे पण आई एका व्यक्तीच्या आयुष्यात खूप त्रास येणार आहे हे माहिती असताना देखील ती जर काही नाती निभावू पाहत असेल तर ती खरच स्वार्थी आहे का? उलट मी म्हणेन की ती जितके नात निभावू शकते तेवढं तर सामान्य माणूस पण निभावू शकत नाही. तिने काही वर्षात जितके अनुभव घेतले आहेत त्यासमोर तुमचे अनुभव पण कदाचित कमी पडणार. बरोबर बोलतोय ना मी आई?"
अन्वयच्या आई गोड हसत उत्तरल्या," हो बरोबर बोलतोयस बाळा तू. तुझ्या आत्या देखील मला म्हणाल्या होत्या की एक वेळ अशी येईल तुझी साथ सर्व सोडतील फक्त ही मुलगी सोडून आणि आज खरच ते जाणवतंय मला. गेले दोन महिने ती माझं सर्व करते आहे पण तिच्या नजरेत मला कधी घृणा दिसली नाही की दया. कायम प्रेमच बघत आले आहे. अन्वय तू खरच खूप सुंदर मुलगी आणली आहेस ह्या घरासाठी. अशी सुंदरता जी कधीच मिटणार नाही. तू बरोबर म्हणतोस चेहऱ्याची सुंदरता कधीतरी कमी होईल पण मनाची नाही आणि ह्याबाबतीत स्वरा सर्वात सुंदर आहे. आय एम प्रॉउड ऑफ यु माय सन. काही गोष्टी शोधून सापडत नाहीत, तर नशिबाने मिळतात. त्यातली स्वरा एक आहे. तू दिल्लीला असता तर कदाचित ती मिळाली नसती, अचानक तुझं मुंबईला जान व्हावं आणि स्वराची भेट व्हावी. कदाचित तुम्हाला देवानेच भेटवले होते म्हणून मी काय जगातली कोणतीही व्यक्ती आली असती तरी तुम्हाला वेगळं करणं अशक्य आहे. अन्वय तुझी आई म्हणून मी कमी पडले पण माझा मुलगा म्हणून तू कायमच वर राहिला आहेस. अन्वय सुंदरता चेहऱ्यानेच होते ही जगाची संकल्पना चुकीची आहे हे मला पटतंय. मनाची सुंदरता सर्वात महत्त्वाची, जी तोडण्यापेक्षा जोडण महत्त्वाचं मानते ती सुंदरता महत्त्वाची. खर म्हणतोस तू आहे ती ग्रेट. कदाचित वयापेक्षा जास्त प्रगल्भ.."
आईच बोलणं ऐकून अन्वयच्या डोळ्यात क्षणभर अश्रू धारा वाहू लागल्या होत्या, सेम स्थिती आईची होती पण समोरून स्वरा येताना दिसली आणि दोघांनीही डोळे पुसून घेतले. अन्वयने आपल्या चेहऱ्यावर हसू आणलं तर स्वरा जवळ येत म्हणाली," सॉरी सर दोन कप आणले फक्त. तुम्ही घ्या हा चहा मी आणते माझ्यासाठी."
ती जाणारच की अन्वयने तिला अडवत म्हटले," एकाच कपमध्ये शेअर केला तर तुला नाही आवडणार का?"
अन्वय अचानक रोमँटिक झाला आणि स्वरा क्षणभर शांत. आईसमोरच त्याने अस विचारल्याने स्वरा काही क्षण बोलूच शकली नाही तेव्हाच आई उत्तरल्या," अन्वय म्हणतात की चहा एकाच कपात पिल्याने प्रेम वाढत सो बायकोला सांग लाजायचं काही काम नाही. उगाच जगाचा विचार करत बसून आपले क्षण खराब करण्यात शहाणपणा नाही हे लक्षात घे म्हणावं, नाही तर जगणं कठीण आहे. ह्याला म्हणतात उशिरा आलेलं शहाणपण, काय म्हणता अन्वय सर, बरोबर ना?"
आईच्या बोलण्याने काही क्षण तिघेही हसत होते. ते हसू बघून स्वराची ऑकवर्डनेससुद्धा क्षणात नाहीशी झाली. पुढच्याच क्षणी आई चहा घेऊ लागल्या तर स्वराने आपल्या ओठाना लावलेला चहा अन्वयला दिला. अन्वय देखील शांतपणे चहा घेऊ लागला. काही क्षण तिथे फक्त शांतता होती पण एकमेकांच्या नजरा मात्र सतत बोलत होत्या. कदाचित आपल्या लोकांशी बोलायला शब्दांची गरज नसते हे तो क्षण सांगत होता. काहीच क्षणात त्यांचा चहा झाला आणि ते तिघेही एकत्र फिरू लागले. अगदी काहीच क्षण झाले आणि बाबाही त्यांना जॉईन झाले. आज सर्व लोक अन्वयच्या फैमिलीकडे विचित्र नजरेने बघत होते पण आज त्या कुणालाच कुणाच्या नजरेने कुणाच्या बोलण्याने फरक पडणार नव्हता कारण आज प्रत्येकाला एकमेकांचा आधार होता आणि सोबत होती हिम्मत जी प्रत्येक आव्हान पूर्णत्त्वाला नेणार होती. ते सर्व चालत होते. लोकांच्या नजरा तशाच होत्या आणि अन्वयच्या तोंडून पुन्हा खूप दिवसाने एक वाक्य निघाल..
कुछ तो लोग कहेंगे
लोगो का काम है केहना
छोडो इन बेकार की बातो को
कही बित न जाये रैना
कुछ तो लोग कहेंगे…..
**********
स्वरा आईला घरी घेऊन आली होती. तिने त्यांना बेडवर बसविले आणि बाहेर जाऊ लागली तेवढ्यात आईने तिला थांबवत म्हटले," स्वरा जरा वेळ असेल तर बसतेस का?"
आईच्या विनंतीनंतर स्वरा क्षणातच बेडवर बसली आणि त्यांना बघू लागली. आईना स्वराशी काहीतरी बोलायच होत पण त्या कदाचित हिम्मत करू शकत नव्हत्या म्हणून त्यांची नजर इकडे तिकडे फिरत होती. स्वराला हे जाणवलं आणि ती हसत म्हणाली,"आई काहीतरी बोलायच आहे ना तुम्हाला. बिनधास्त बोला. माझ्याशी बोलायला घाबरायची गरज नाहीये. जे असेल ते बोला. बोलल्यानेच मन हलकं होत."
स्वराचा हसरा चेहरा बघून आई थोड्या रिलॅक्स झाल्या आणि आईने स्वराकडे बघत विचारले," स्वरा मला ना एक प्रश्न खुप दिवसापासून त्रास देतोय. तो प्रश्न असा की तू इतक्या दिवसात एकदाही आरशात का बघितलं नाहीस? भीती वाटते तुला स्वतःला आरशात बघण्याची? जर तू स्वतालाच स्वीकारू शकणार नाहीस तर जग कस तुला स्वीकारणार?"
आईचा प्रश्न ऐकताच स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल तर आई जरा गोंधळून गेल्या होत्या. त्यांना तिच्या उत्तराची वाट होती आणि स्वरा म्हणाली," कारण हा आरसा फक्त जे आहे ते दाखवतो त्या पलीकडे काय आहे ते दाखवत नाही. मी कुरूप आहे हे सतत मला आरसा जाणीव करून देतो तर अन्वय सरांची नजर मला मी वरून काय आहे ह्यापेक्षा मधून काय आहे हे दाखवते. अस नाही की मी स्वतःला बघत नाही, मी रोज बघते पण त्यांच्या डोळ्यात, आरशात नाही. तिथे बघताना जगातली सर्वात सुंदर मुलगी मुलगी मीच आहे असा भास होतो. ती एक नजर काफी आहे मला माझी सुंदरता दाखवायला. बहिरंग बघायच असत तर मी आरशात नक्कीच बघितलं असत पण मला मी वरून कशी दिसते हे माहिती आहे म्हणून तिथे बघून स्वतःला कमजोर बनवून घेत नाही. मला अन्वय सरांची नजरच पुरेशी आहे माझ्यातली सुंदरता बघायला. तुम्हीच सांगा मी काही चुकीच करतेय का?"
कायम आपल्या प्रश्नाने इतरांना शांत करणारी स्वरा कधीतरी आपल्या उत्तराने शांत करेल अस अजिबात वाटलं नव्हतं. आता आईच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली होती. त्यांच्या चेहऱ्यावरून स्वराला अंदाज आला होता की त्यांना त्यांचं उत्तर मिळाल होत म्हणून स्वरा जाऊ लागली. स्वराने काही पावले टाकलीच होती की आई म्हणाल्या," स्वरा उद्यापासून रोज जाऊया फिरायला? नेशील ना मला फिरायला?"
स्वरा एक गोड स्माईल देऊन बाहेर गेली. स्वराने आज इतकं सुंदर उत्तर दिलं होतं की ते शब्द जणू रूममध्ये फिरत होते आणि एक प्रश्न त्यांनाही पडला," जर ती आपल्या मुलाच्या डोळ्यात बघून तिचे सर्व उत्तर सोडवते तर मग अन्वय माझ्यावर किती प्रेम करतो हे मी का पाहू शकले नाही?"
त्या विचार करतच होत्या की अन्वय मध्ये येत उत्तरला," मातोश्री कसल्या विचारात हरवल्या आहात?"
अन्वयचा चेहरा समोर येताच जणू त्यांना काहितरी गवसल्यासारखं झालं आणि त्या मोठ्याने उत्तरल्या," बर झालं तू आलास, ये इकडे मला तुझ्याशी काहितरी बोलायच आहे."
अन्वय हळुवार आईच्या बेडवर जाऊन बसला आणि त्यांचा हात हातात घेत त्याने विचारले," बोला मातोश्री कोणत्या प्रश्नाने तुम्हाला त्रास दिला आहे?"
आई क्षणाचाही विचार न करता म्हणाल्या," अन्वय मला सांग की तुझ्या मागे कितीतरी सुंदर सुंदर मुली लग्नासाठी धावत होत्या पण तू त्यांना न निवडता स्वराला का निवडलस? इतके सुंदर चेहरे बाजूला ठेवून स्वरासारख्या मनाने सुंदर असणाऱ्या मुलीसाठी तुझं हृदय समाजाशी घरच्यांशी बंड का करून गेलं?"
अन्वय आईचा प्रश्न ऐकून काही वेळ शांत होता. आई ऐकण्यासाठी आतुर होत्या आणि अन्वय म्हणाला," आई हजार कारण असतात साथ सोडायला फक्त एक कारण लागत नात टिकवायला. स्वरा त्यातलीच एक. तिला जगाने क्रूर वागणूक दिली पण तिने जगाला कधी सुनावल नाही उलट ती त्या प्रत्येक अनुभवातून शिकत गेली. ती जगातल्या नकोशा गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टी, चांगली नाती कायम स्वीकारत राहिली. तिच्याकडून खऱ्या अर्थाने मी जोडायच शिकलो. आई लग्न सुंदरतेशी करू नये, लग्न करावं ते समजूतदार व्यक्तीशी. मी सर्व मुलींना रिजेक्ट केलं कारण त्यांच्या शब्दात मला जाणवत होतं की त्या माझ्या आईबाबासोबत जास्त दिवस राहू देणार नाही तर स्वराशी न बोलताही, तिच्या संघर्षाची कहाणी ऐकूनच मी समजून गेलो होतो की ही फक्त एकमेव आहे जी कशीही स्थिती आली तरीही माझं घर तोडणार नाही. मी का नकार देत होतो हे तुला कायमच सांगायचं होत पण नाही करू शकलो. आई जी मुलगी सर्व गमावून सुद्धा जीवन जगत राहते ना ती खऱ्या अर्थाने नाते टिकविते. मग तूच सांग चेहऱ्याची सुंदरता महत्त्वाची की मनाची?"
आई चेहऱ्यावर गोड हसू आणत म्हणाल्या," तुझ्यासारख्या मुलाची कारण आम्ही बल्ब घेऊन शोधली असती तरीही आम्हाला अशी मुलगी शोधता आली नसती. अन्वय तू इतका मोठा कधी झालास रे? ती काही दिवस सोबत राहणारी मुलगी तुझ्या डोळ्यात बघून सर्व उत्तरे शोधते मग मी का नाही करू शकले? मी वाईट आहे ना? तुम्हाला खूप त्रास दिला ना मी?"
अन्वय आईकडे बघून म्हणाला," आई तुझेच संस्कार आहेत की मी एका मुलीचा कायम आदर करतोय. आई तू मला उत्तम माणूस बनविलस ह्यात शंका नाही पण स्वराने त्या माणसाला एक सुंदर वळन दिलं. हिऱ्याला चकाकी कशी देतात वरून सेम तस. तिच्यामुळे समजलं की आयुष्यात आपण संघर्ष अजून केलाच नाही आणि ते आयुष्यच काय ज्यात संघर्ष नाही. करिअरसाठी संघर्ष सर्व करतात पण एखाद्या व्यक्तीला समाजात स्थान मिळवून देणे ही संधी मला तिच्यामुळे मिळाली आणि बघ आज सर्व स्त्रिया माझा आदर करतात. मग तिची आई असो की माझी आई किंवा माझी लाडकी बहीण. अन्वय मोठा झाला पण ते फक्त स्वरामुळे. आता तुझं उत्तर देईन, तू वाईट नाहीस फक्त तू ना आपल्या मनाच ऐकणे सोडून दिलंस. लोक तुला जे जे सांगत राहिले तेच तुला आपलं मन सांगत आहे अस वाटत गेलं आणि तू अशी बनत गेलीस. एक शब्द ऐकला होता मी ' कन्फर्मेशन बायस' म्हणजे अस की जेव्हा आपण एखादी गोष्ट अशीच आहे हे डोक्याला पटवून देतो तेव्हा तीच गोष्ट योग्य कशी आहे ह्याचे पुरावे शोधतो. आपण आधीच जर अस मत बनविल नाही तर कदाचित समोरच्या व्यक्तीला ओळखता येईल. हे तुझ्यासोबत झालं. ह्याच जिवंत उदाहरण स्वरा आहे. राजने तिची मदत केली आणि नंतर तिच्यासोबत असा अपघात झाला तेव्हा तिच्या डोक्यात हे फिट्ट होत गेलं की सर्वच लोक सारखेच आहे अर्थात तिला अस अनुभव आला होता म्हणून मी मदत केली तेव्हा तिला माझीही सुरुवातीला भीती वाटली होती पण कालांतराने तिने त्या पलीकडे जाऊन विचार केला आणि बघ आज आम्ही प्रत्येक क्षणाला सोबत आहोत. त्यावेळी जशी ती चुकली होती तशीच तिला ओळखायला तुही चुकलीस पण तिने चूक स्वीकारली आणि सर्व काही नीट झालं, तु चूक स्वीकार आणि त्या कन्फर्मेशन बायस चष्म्याच्या पलीकडे जाऊन जरा बघ मग तुझ्या मुलाच्या डोळ्यात प्रेम आणि सुनेच्या चेहऱ्यावरसुद्धा सुंदरता दिसेल. आई कुठलाच माणूस चुकीचा नसतो आणि कुठल्याच व्यक्तीला संधी मिळत नाही अस होत नाही. फक्त ती संधी स्वतःच शोधून सर्व नीट करायचं की त्या कन्फर्मेशन बायसमध्येच अडकून बसायचं ते आपण ठरवायच असत. तू ठरव आता तुला काय हवं ते..आई जगात वेगवेगळे लोक राहतात. समाजातील बहुतांश लोकांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती बरोबर आहे अस होत नाही, तर एखादा व्यक्ती जर दुसरा काही विचार करत असेल आणि ते पटवून देत असेल तर त्याच म्हणणंही तितकच योग्य आहे हा विचार करावा. सुंदरता लोक चेहऱ्यात मानतात हे सत्य आहे आणि मी ते बदलू शकत नाही पण लोकांनी सांगीतलेली सुंदरता मीही मानली पाहिजे असा विचार करणे मूर्खपणा. प्रेमात सुंदरता नसते आई, प्रेम स्वतःच एक सुंदरता आहे. ते व्यक्तीतले अवगुण बाजूला सारून गुणांवर प्रेम करत मग त्या प्रेमाला नाकारून जगाचे मत स्वीकारणे मला नाही परवंडणार. मला बदलायची आहे रित आई जगाची कारण बऱ्याच जुन्या गोष्टी काळानुसार विनकामी झाल्या आहेत आणि बदल करणे हे आपल काम. आशा करतो ह्याक्षणी तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळाल असेल. अर्थात तू अजूनही कॉन्फर्मेशन बायस असणार तर शक्य नाही, तुला न्यूटरल राहावं लागेल. आधी आयुष्यात आलेल्या अनुभवाना अनुभव समजून लोकांना जज करण्यापेक्षा, नवीन लोकांना अनुभवून स्वतःला अपडेट ठेवावं. सर्व मानस सारखी नसतात, तसा विचार स्वराने केला असता तर आम्ही आज सोबत नसतो. बघ तुला काय वाटत ते.."
अन्वय शांत झाला होता आणि आई विचार करत उत्तरली," अन्वय सोळा नवस बोलले होते तेव्हा तू झाला होतास. वाटलं नव्हतं की देव स्वतःचाच अंश माझ्या उदरात पाठवेल. अन्वय एक आई म्हणून नाही पण एक व्यक्ती म्हणून म्हणेन खूप खूप आदर आहे तुझा. कारण पुरुषी अहंकारी जगात राहूनही तू पुरुष म्हणजे नक्की काय आहे हे दाखवलं. प्रत्येक वेळी अधिकार दाखवनारा म्हणजे पुरुष नसतो तर कधी कधी स्वता झुकूनही स्त्रीला मोठं करणारा पुरुष असतो हे तुझ्याकडून शिकले मी. बाळा धन्यवाद माझ्या पोटातून जन्म घेतलास त्यासाठी. असाच राहा बाळा आणि तिच्यासाठी जमेल तेवढ कर. आता मीच सांगते की माझ्याकडे लक्ष कमी दिलंस तरीही चालेल पण जगातले सर्वंच्या सर्व आनंद तिच्या पायाखाली आणून ठेव, करशील ना माझ्यासाठी?"
अन्वयने आईच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला आणि अन्वय बाहेर जाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर सतत हसू होत आणि आई मोठ्याने म्हणाल्या," आज मी पण स्वराप्रमाणे म्हणेन अन्वय सर थॅंक्यु हा कन्फर्मेशन बायस बद्दल सांगायला. ह्या एका शब्दात तू मला माझ्या सर्व चूका लक्षात आणून दिल्यास आणि महत्त्वाचं म्हणजे एकही शब्द मनाला न लागता. क्या बात है सर!! तुमची आई नसते ना तर वाकून प्रणाम नक्किच केला असता तुम्हाला. अन्वय सर खरच ग्रेट आहात तुम्ही!!"
अन्वयने आईकडे हसून बघितले. आईच्या चेहऱ्यावर इतकं गोड हसू त्याने ह्याआधी कधीच बघितले नव्हते म्हणून कदाचित तोही आज हसू आवरू शकत नव्हता. पुन्हा एकदा त्याची आई परत आली होती आणि आता त्याला विश्वास होता की स्वराला ह्या घरात सुनेसारखी नाही तर मुलीसारखी ट्रीटमेंट मिळेल. अन्वय हसत होता आणि आई बेडवर पडत उत्तरली," भारी आहे कन्फर्मेशन बायस. जर जगातील सगळ्या लोकांना ह्याचा अर्थ समजला तर किती बर होईल ना?? किती सोपं आहे ना एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत बनवून घेणं आणि किती कठीण आहे जे दिसतंय त्यापेक्षाही पलीकडे जाऊन त्याला शोधन. अन्वय तू ते केलंस म्हणून तुझा आदर आहे. किप ईट अप माय सन!किप ईट अप!!"
आई डोळे मिटून निवांत पडल्या तर अन्वय बाहेर जाऊ लागला. आज त्याच्या चेहँऱ्यावर निखळ हसू होत कारण त्याला विश्वास होता की आता सर्व काही छान होणार आहे. कदाचित आता तो स्वराला जगातले सर्व आनंद देऊ शकणार होता..
अन्वय उड्या मारतच बाहेर पडला. स्वरा किचनमध्ये काम करत होती. त्याने धावतच तिला मिठी मारली. स्वरा त्याने मिठी मारताच ओरडत उत्तरली," अस कोण करत बर? घाबरले ना मी. घरच्या लोकांनी बघितलं तर म्हणतील बेशरम झालेत दोघेही. सोडा मला."
अन्वय मिठी पून्हा घट्ट करत म्हणाला," ते म्हणतात की आम्हाला आजी-आजोबा बनव तेव्हा बेडरूममध्ये रोमांस केला तर चालतो पण किचन मध्ये नाही. हे बरोबर आहे का ते सांग आधी मग सोडेल तुला."
स्वरा क्षणभर त्याच्या उत्तरावर हसत म्हणाली," मीच वेडी आहे, कायम विसरते की तुम्ही बोलण्यात कधीच हरणार नाहीत. सॉरी बाबा चूक झाली."
अन्वय हसतच उत्तरला," सही पकडे है.. माझा हा रोमांस कधीच कमी होणार नाही समजलं बाईसाहेब. उद्या मूल झाले तरीही त्यांना म्हणेल की आमच्या रोमांस मध्ये अजिबात यायचं नाही. तुमचं तुम्ही खेळा, आमचा आम्ही रोमांस करू."
अन्वय बोलायला लागला की स्वराला हसू आवरत नव्हतं आणि ती हसतच म्हणाली," यु आर जस्ट इम्पोस्सीबल!!"
ती हसत राहिली तर अन्वय तिच्या हसण्याकडे बघू लागला. तीच ते हसन, लाजनच खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी सुंदरता होती. जे जगाला कदाचित कधीच कळलं नव्हतं आणि कधी कळणारही नव्हतं पण अन्वयला समजला होता सुंदरतेचा अर्थ...सुंदरता… काय आहे बर ही सुंदरता?? हा तोच शब्द जो प्रत्येक व्यक्तीशी जुळून असतो. कुणाबद्दल चांगले तर कुणाबद्दल वाईट भाव निर्माण करतो तरीही कुणाला पक्का अर्थ सांगता येत नाही. नक्की सुंदरता म्हणजे काय???
फुलो पर कलिया खिली
तो किसिने कहा वो सुंदर है
बारिश की पहेली बुंदे जब जमी से मिली
कीसीने कहा वो सुंदर है..
सब देखते रहे उपर उपर की सादगी
किसींने नही सोचा असली सुंदरता दोनो के मेहक मे है..
क्रमशः....