भाग्य दिले तू मला - भाग ९८ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ९८

हर ख्वाहिश पुरी नही होती
कुछ ख्वाहिशे सांसे छिन लेती है
वक्त रेहतेही ऐतबार किया करो
वरणा सांसे दिलं पर बोझ बन जाती है...

एका मनमोहक सकाळीची सुरुवात कुणाच्या तरी गोड आवाजाच्या आरतीने सुरू झाली आणि आईचे डोळे पटकन उघडले. त्या आवाजात इतका गोडवेपणा, कारुण्यता होती की सकाळी-सकाळीच आईच्या मनाला समाधान मिळू लागल. आज खूप दिवसाने पहिला असा दिवस होता जेव्हा आईची सुरुवात पूजा न करताच झाली होती. तो आवाज त्यांनी पहिल्यांदा ऐकला होता म्हणून कुणाचा असेल ह्याचा अंदाजा त्यांना लागत नव्हता तेवढ्यात अन्वयचे बाबा मध्ये आले आणि अन्वयच्या आईने क्षणात विचारले," आपली निहारिका इतकी सुंदर गातेय? मला तर नव्हतं माहिती तिला इतकं सुंदर गाता येत ते? बाईसाहेबानी दिवसाची सुरुवात एकदमच खास केली म्हणावं."

अन्वयचे बाबा आईवर हसतच उत्तरले," निहारिका नाही स्वरा आहे ती. इतके दिवस झाले सोबत आहोंत तिचा आवाज इतका गोड आहे हे कधी अनुभवल सुद्धा नाही ना. मानलं पाहिजे मुलीला. दोन दिवस झाले नीट झोप झाली नाही तिची तरीही सकाळपासून काम करत आहे. तिच्या आई-वडिलांना कधी बघितलं नाही पण आनंदाने म्हणेन की खूप सुंदर संस्कार दिले आहेत त्यांनी. आजपर्यंत ती मेहनत करत होती पण आपण डोळे झाकून होतो म्हणून दिसत नव्हतं. आता डोळे उघडले आणि तिच्यातले हजारो गुण समोर येऊ लागले. कदाचित ते म्हणतात तसे नजर खरच महत्त्वाची असते."

अन्वयचे बाबा बोलत होते तर अन्वयच्या आई आताही स्वराच्या आवाजात हरवली होत्या. तिचा आवाज इतका गोड होता की कुणालाही प्रेमात पाडेल, नेमकं हेच आज अन्वयची आईसुद्धा अनुभवत होत्या. स्वराचा चेहरा जरी ऍसिडने नाहीसा केला होता तरीही तिचा गोड आवाज, तिचा सुंदर स्वभाव इतक्या वर्षात तिच्यापासून कुणीच हिरावून घेतला नाही हा विचार क्षणभर आईच्या मनात आलाच होता की स्वरा आरती घेऊन मध्ये आली. हळुवार तिने आरती घरभर फिरवली आणि जणू सकाळची त्या प्रकाशाची ऊर्जा रूममध्ये क्षणात पसरली. स्वराने आईला आरती दिली. आईने आरतीवरून हात घेत चेहऱ्यावर लावला. कितीतरी शांती त्यांना त्यातून मिळाली होती. आईने डोळे उघडले आणि स्वराकडे बघू लागल्या. पहिल्यांदा त्या तिच्याकडे एकटक बघत होत्या आणि जाणवलं की तीच हसू इतकं गोड आहे की ते त्या भाजलेल्या चेंहऱ्याच्या पलीकडे येऊन समोरच्याशी बोलतय. ते काहीतरी जगाला सांगण्याचा प्रयत्न करतय. काय त्याचा त्यांना अजूनही पत्ता लागला नव्हता. डोळे इतके शांत आहेत की त्यात कुणीही तिचा खरेपणा ओळखू शकतो. तिचे लांब-लांब केस चेहऱ्यावरून नजर हटवून तिच्या खऱ्या सुंदरतेच प्रतीक बनत होते. आई नकळत तिच्यात हरवल्या आणि स्वरा आरतीची थाळी बाजूला ठेवत म्हणाली," आई चला वॉशरूमला जाऊन येऊ. सोबतच फ्रेश व्हा म्हणजे मग नाश्ता वगैरे करता येईल. नंतर निवांत आराम करा."

तिने बोलायला तोंड उघडले आणि तिच्या आवाजातली सकारात्मक ऊर्जा आईच्या मनापर्यंत पोहोचली. स्वराचा आवाज येताच त्यांनी सरळ तिला हात दिला आणि स्वराने आधार देत त्यांना बेडवरून उठविले. हळुवारपणे ती त्यांना वॉशरूममध्ये घेऊन गेली. स्वराच्या खांद्यावर हात ठेवला आणि आईला एक खरा आधार सापडला. एक असाच स्पर्श आईना अन्वयच्या मिठीत मिळायचा जेव्हा आईला बर नसायच आणि तो सरळ त्यांना बाहुत उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा. आजही स्वराच्या रुपात त्यांना काहीसं तेच जाणवत होतं आणि त्या तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिच्यासोबत चालू लागल्या कारण आजपासून काही महिने त्यांना स्वराचाच आधार घ्यावा लागणार होता.

आई वॉशरूममधून परतून बराच वेळ झाला होता. स्वराने वॉशरूममधून परत येताच पटकन किचनचा चार्ज सांभाळला आणि आईला नाश्ता घेऊन आली. एव्हाना घरातले सर्वच उठले होते. निहारिकाने सृष्टीला आईच्या हातात दिले आणि स्वता स्वराला मदत करायला किचनमध्ये पोहोचली. निहारीकाने चहा बनविला आणि सर्वाना घेऊन येऊ लागली तेव्हाच तिला जाणवलं की आईच्या मैत्रिणी तिला बघायला तिच्या रूममध्ये येत आहेत. निहारिकाने परत किचनमध्ये जाऊन पून्हा काही चहा टाकले आणि परत बेडरूममध्ये आली. तोपर्यंत त्या सर्व आईच्या बेडवर बसल्या होत्या. निहारिकाने त्यांना चहा दिला आणि द्विवेदी काकू म्हणाल्या," लता ये क्या हो गया यार? तेरा चेहरा इतना कैसे खराब हो गया वो भी दिवाली के दिनो मे. लगता है तुम्हे किसी की नजर लग गयी है. शायद तुम्हारे बहू के वजह से हुवा होगा. तुमने दो बाते सुनाई तो उसने कुछ ऐसा ही भगवान से मांगा होगा. सुना है ऐसें लोगो की बाते भगवान जलदीही सून लेता है. एक बार मे इतना हुवा तो आगे क्या-क्या होगा? संभल के रेहना लता तू तो... "

त्यांचं बोलणं होताच तिवारी काकु हळुवार आवाजात उत्तरल्या," हा सही है, उसकीही नजर लगे होगी तुम्हारे घर को. वरणा इतना बुरा तो नही होता तुम्हारे साथ. देख लो आयने मे कैसा चेहरा हो गया है तुम्हारा. देखणे को भी मन नही करता. भला इतनीभी क्या दुष्मनी थि उसकी तुमसे की उसने भगवानसे ऐसा मांग लिया. हमेभी बचके रेहना पडेगा उससे. क्या पता कल हमे भी कुछ हो जाये.."

आई फार बोलत नव्हत्या पण त्या बोलताना दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव वाचू पाहत होत्या. त्या दोघी आईकडे बघत तर होत्या पण त्यांच्या नजरेत त्यांना आदर दिसत नव्हता. त्या फक्त नावाला बोलत होत्या. त्यांच्यासोबत हा प्रसंग घडताना त्यांना स्वरासोबतच क्षण आठवला. त्याही तर तिच्यासोबत असच करत होत्या. त्यांनी त्या दोघींच्या नजरेत बघितले आणि आईला आपल्याच वागण्याची लज्जा वाटू लागली. त्यांनी नजर खाली केली ती पुन्हा वर झालीच नाही. त्याव्यतिरिक्त तिथे पुन्हा एक व्यक्ती होती जिला त्यांचा खूप राग आला होता पण निहारिका त्यांच्यावर रागावली नव्हती उलट तिने हसतच म्हटले," अच्छा हुवा आंटी आप दोनो घर पर आयी है. आपको तो पता है मेरी सांस अकेले नही रेह सकती. इसलीये दो दिन मे मै चली जाऊंगी. मेरी माँ का उनकी बहूसे पटता नही इसलीये अब आपही उनके सच्चे करिबी है. द्विवेदी आंटी प्लिज आप सुबहँ का नाश्ता और खाना बनाने के लिये आया करीये और तिवारी आंटी आप ममी को वॉशरूमके ले जाणे का काम ले लिजीए. आंटी अब आपके अलावा इनका कोई और नही है और मुझे पुरा यकीन है की आपण उनका साथ नही छोडेगो. करेंगी ना आपकी इनकी हेल्प ३-४ महिने. ३-४ महिने तो युही निकल जायेंगे आपको पता भी नही चलेगा."

निहारिका बोलून गेली आणि द्विवेदी काकू लगेच उत्तरल्या," निहारिका तुम्हे तो पता है ना. हमारे ये सुबहँ सुबहँ ऑफिस जाते है तो मुझे वक्त नही मिलेगा. उनका ना करणा होता तो मै जरूर आती."

तिवारी काकू हळुवार शब्दात उत्तरल्या," तुम्हे तो पता है मेरे बहू-बेटे सब जॉब पर जाते है तो मुझे फुरसद मिलने से ना रही. अब भी सिर्फ लता को देखणे के लियेे आयी हु. कितनी चिंता हो रही थि पता है हमे. वो अच्छि है सूनकर आज सुकून मिला. चलीये मिसेस द्विवेदी आपके और हमारे वो इंतजार कर रहे होगे."

निहारिकाने थोडा कामाचा विषय काय काढला त्या दोघी क्षणात पसार झाल्या. इतक्या फास्ट पळाल्या की त्यांना मिनिट सुद्धा लागला नव्हता आणि निहारिका हसत उत्तरली," पिल्लू बघितलं हे आहे तुझ्या आजीच जग, तुझी आजी सतत विचार करते ना तेच हे जग. कसे पळाले बघितलं ना? आणि ह्यांच्याच एकण्यावरून तुझी आजी तुझ्या मामीला नको नको ते बोलते. तू आता तिच्याजवळ आहेस ना तर तुच सांग तुझी मामी किती चांगली आहे ते . कशीही असली तरी शेवटपर्यंत तीच करेल तुझ्या आजीच बाकी सर्व असेच पळून जातील. शेवटचा सल्ला आहे म्हणावं ऐकायचं तर ऐका नाही तर ती निघून गेली तर परत कधीच येणार नाही. तिला सांग तिच्या सारख्या हेकड सासूला अशी सून कुठेच मिळणार नाही जी आपल्या सासुची घाण उचलायला पण मागे बघणार नाही. पिल्लू तूच सांग हा मी जाते कारण मी बोलले तर माझ्यावर ओरडेल ही आणि तिला विचार आता तरी समजतोय का आपल्या आणि परक्यातला फरक. तुला मिळालं की मला सांग हा उत्तर. आपण बोलू रात्री."

निहारिका हसत-हसत बाहेर पळाली तर सृष्टी आजीकडे बघून हसत होती. छोटीच गोड हसू बघून अन्वयच्या आईच तिला म्हणाल्या," बघितलं तुझी आई किती टोमणे मारते मला? कधी कधी वाटत हिच्या रुपात माझ्या सासुनेच जन्म घेतलाय. एक संधी सोडत नाही मला बोलण्याची. पिल्लु तू नको होऊस हा तिच्यासारखी. तू आपल्या मामा-मामी.."

आईने बोलता- बोलताच आपले शब्द थांबवले. त्यांनी जाणून काहीच म्हटलं नव्हतं पण आज अचानक त्यांच्या मनातून काही शब्द बाहेर आले. ज्याचा त्यांना स्वतःवर ताबा उरला नाही. त्या शांत तर झाल्या होत्या पण चेहऱ्यावर गोड हसू पसरल होत. अस हसू ज्या त्या कितीतरी महिने शोधत होत्या पण त्यांना अनुभवता आल नव्हत आणि त्यांनी ते हसू दिवसभर तसच ठेवलं..

सुकून शब्दो का खेल नही
दिलं की दस्तक है
जो अनसुना करता है
वो सब कुछ खो देता है...


तो प्रसंग होऊनही काही वेळ गेला होता. पुन्हा सर्व आपापल्या कामात व्यस्त झाले होते. स्वराही आपलं काम करत होती. ती आईला काही हवं की नको विचारायला रूममध्ये आली आणि त्यांना बघून काही क्षण शांतच बसली. आई आरशात स्वतःला बघत होत्या. आरशात बघतानाही वारंवार त्या चेहऱ्याला हात लावत होत्या. अस कितीतरी वेळेपासून त्यांचं सुरू होत आणि स्वरा त्यांना बघत होती. काहीसा एक अनुभव तिनेही घेतला होता म्हणून तिनेही तोंडातून शब्द काढला नव्हता. त्या आरशात बघत होत्या तर स्वरा त्यांच्यात स्वतःला शोधत होती. काही वेळ असाच गेला. काही वेळ स्वरा काहीच बोलली नाही पण त्यांना स्वतःला आरशात बघुन त्या काही क्षण निराश झाल्या आणि न राहवुन स्वरा रूम आवरायच्या निमित्ताने मध्ये येत म्हणाली," आई खरी सुंदरता चेहऱ्यात नसते तर ती मनाने अनुभवण्यात असते. आरशात फक्त तुमचं रूप दिसत तर डोळे लावून मनाने अनुभवलं तर आपल्यातले खरे आपण दिसतो. तेव्हा ह्या क्षणिक चेहर्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका उलट आपल्या मनाला विचारा तुम्ही किती सुंदर आहात ते. तो तुम्हाला खर उत्तर देईल. तुम्हाला वाटत असेल हिला फक्त ज्ञान द्यायला आवडत पण अस नाहीये आई. मी गोऱ्यापान दिसणाऱ्या स्वरापासून तर कुरूप चेहऱ्याच्या स्वराला बघितलं आहे. तेव्हा आनंदाने सांगेन की त्यावेळी स्वतःला आरशात बघून जितका आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त आनंद मला डोळे लावून मी काय आहे हे माझ्या मनाला विचारताना झाला. आपण जगाशी खोट बोलू शकतो पण मनाशी नाही तेव्हा मनाशी नक्की बोला. खरी सुंदरता तुम्हाला तेव्हाच अनुभवायला मिळेल."

स्वरा बाहेर जात होती आणि आईने तिला अडवत विचारले," स्वरा तुला इतके अनुभव आहेत मग तू तुझं आयुष्य एकट जगू शकली असती. एकटी असतीस तर कदाचित कुणाचा त्रास सहन करावा लागला नसता मग का अन्वयशी लग्न करून इतरांचा त्रास स्वतःच ओढवून घेतलास?"

स्वरा जाता-जाता थांबली आणि आईकडे वळून गोड हसत उत्तरली," हे जे मी बोलले ते माझे विचार नाहीत तुमच्या मुलाची देणं आहे. मी ठरवलं होतं की एकटीच राहीन पण अन्वय सरांची नजर, त्यांचं प्रेम बघितलं आणि माझ्याच मनाने मला विचारलं, तुला अन्वय सरांसोबत अस जीवन जगायला आवडेल का? ज्यांना तुझ्या चेहऱ्याने नाही तर मनाने फरक पडतो. ज्यांना लोकांच्या विचाराने नाही तर समोरच्याच्या आनंदाने फरक पडतो. अशा व्यक्तीसोबत तुला आयुष्य घालवायला आवडेल का? तर माझ्या मनाने उत्तर दिलं हो हवेत ते मला. आई त्रास तर कायम सहन केला होता त्यामुळे तो समोरहिबहोणारच होता पण अशा व्यक्तीच्या सहवासात राहणं मला कधीच मिळालं नसत. अन्वय सर मला नशिबाने मिळाले आणि मी त्यांना कधीच जाऊ दिल नाही. चांगली मानस आयुष्यात फार कमी वेळासाठी येतात तेव्हा त्यांना सोबत ठेवण्यात समजदारपणा आहे. हजारो लोक वाईट वागले म्हणून त्याच चष्म्याने सर्वाना बघन म्हणजे खरा मूर्खपणा. मीही होतेच मूर्ख पण अन्वय सर आले आणि तो चष्माही केव्हाच नाहीसा झाला. आजही डोळे मिटून मी मागे घडलेल्या प्रसंगाबद्दल विचार करताना मनाला विचारते की तू योग्य केलंस का अन्वय सरांशी लग्न करून?"

आईने पटकन विचारले," काय उत्तर देत तुझं मन?"

स्वरा गोड हसत उत्तरली," ते म्हणत की कुठे मिळणार तुला असा व्यक्ती जो लोकांनी रडवल्यावर ते रडन मिनिटभर सुद्धा अनुभवू देत नाही. आई हसवणारे हजार भेटून जातील पण जो आपल्याला कधीच रडू देत नाही तो आपला खरा जीवनसाथी आणि अन्वय सर तेच आहेत म्हणून मी स्वार्थी होऊन त्यांना निवडल. मान्य की माझ्यामुळे तुम्हा सर्वांना त्रास झाला पण माझ्यासाठी अन्वय सरांसोबत जे क्षण जगतेय ते आयुष्यातील सुंदर पर्व आहे. आज जरी देवाने मला वर नेल तरी मला त्याच वाईट वाटणार नाही कारण आनंद, समाधान काय असत हे मी काहीच दिवसात अनुभवलं आहे. तुम्हालाही कधी कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल नाही ना तर मनाला विचारा. तो समाधान नक्कीच देईल. म्हणतात मेंदू नफा बघतो आणि मन समाधान तेव्हा एकदा तरी आयुष्यात मनाच नक्की ऐकाव. मन आपल्याला काय समाधान देईल ते नक्कीच सांगत. मनाच ऐकल्यावर कदाचित फायदा होणार नाही पण काही क्षण आपण स्वतःला शांत करू शकतो हे नक्की सांगेन. मन प्रेम करायला शिकवीत आणि त्याच प्रेमाला निभवायला शिकवीत. ते त्रास होत आहे का हे नाही बघत तर आनंद किती मिळणार आहे हे सांगत. तो एकमेव आपला हितचिंतक आहे म्हणून तो कुणाचा होत नाही आणि कुणाच झालाच तर त्यांच्याशिवाय जगणे कठीण होऊन जाते. सोपं आहे मनाच काम फक्त त्याचा आवाज ऐकता यायला हवं. दुर्लक्ष केलं तर मग सर्व काही असेल पण समाधान नक्कीच मिळणार नाही."

स्वरा पटापट बोलून निघून गेली तर आई तिच्या बोलण्याचा विचार करत होती. स्वरा काहीच क्षणात दिसेनाशी झाली आणि आरशासमोर असलेल्या आईने स्वतःचा चेहरा बघणे सोडून डोळे घट्ट मिटले. काही क्षण त्यांनी आपल्या डोक्यातल्या सर्व विचाराना बाहेर काढले आणि आपल्याच विचारात हरवल्या. डोळे बंद होते आणि मन बोलत होते. मन त्या कुठे चुकल्या आणि कुठे बरोबर आहेत सर्व सांगत होत. त्यांना मनाच ऐकून आज स्वतःच्या चुका स्वीकारण्यातही आनंद मिळत होता.आज खरच त्यांना डोळे मिटल्यावर स्वतःला बघायला मिळाल होत. त्यांनी स्वतःला स्वतःच बघितले आणि जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली आणि खूप दिवसाने त्यांना एक शब्दाची व्याख्या सापडली होती. " समाधान"..

आयुष्यात फक्त नजर सुंदर असून चालत नाही मन सुद्धा स्वच्छ असावं लागतं नाही तर सर्व काही दिसूनही आपण काहीच बघू शकत नाही. वय किंवा अनुभव हे वयावरून नाही तर जगण्यातून येत असतात. काही लोक फक्त काही वर्षे जगून जीवनाचा खरा अर्थ समजून घेतात तर काहींना आयुष्य जात तरीही जीवनाचा अर्थ समजत नाही. काहीसे हेच विचार अन्वयच्या आईला आज येत होते. माणूस दुसर्याबद्दल तर्क-वितर्क तर कायम लावतो पण कधी कधी त्याने स्वतःच्या मनातही झाकून बघायला हवं. आपणच पूर्णपणे योग्य नसताना दुसऱ्याना बोलणे कितपत योग्य? एखादी गोष्ट ना समजायला फार वेळ जायची गरज नसते. एक क्षण पुरेसा असतो अक्कल यायला. अन्वयच्या आईने फक्त ह्या दोन दिवसात स्वराला एका वेगळ्या नजरेने बघितले आणि तिच्या चेहऱ्या पलीकडे सुद्धा एक सुंदरता आहे हे समजायला फार वेळ लागला नाही. पण हे समजायला फार उशीर तर झाला नव्हता ना? म्हणतात की एकदा घावावर घाव दिले आणि नंतर एखाद्यावर औषध केले तरीही त्या वेदना कमी होत नाहीत. त्या वेदना सहज स्वरा विसरू शकणार का हाच प्रश्न आता त्यांना सतावू लागला होता. त्यांच्याकडून चूक झाली हे त्यांना माहिती होत पण कदाचित तिला माफी मागायची हिम्मत त्यांच्यात उरली नव्हती.

ती सायंकाळची वेळ. औषधांच्या गुंगीने आईला दुपारी निवांत झोप लागली होती. त्या उठल्या आणि स्वराने त्यांना हातात चहा आणून दिला. त्या चहा घेतच होत्या की समोर कुणीतरी येऊन बसले. स्वरा त्यांना बघून जणू टेन्शनमध्येच आली होती. त्यांना बघून निहारिकाही धावतच मध्ये आली. ते स्वराचे आई-बाबा होते. स्वरा त्यांना बघून अडखळतच बोलून गेली," आई हे माझी आई-बाबा."

स्वराचे बाबा हळुवार आवाजात म्हणाले," नमस्कार ताई कशा आहात? जास्त त्रास तर होत नाहीये ना?"

स्वरा असो की निहारिका आता सर्व विचित्र नजरेने आईकडे बघत होत्या. काही क्षण तर अन्वयच्या आईला हसू आवरत नव्हतं तरीही हळुवार त्या उत्तरल्या," मी छान आहे, आराम सुरू आहे सध्या. तुमची मुलगी बघतेय माझं सर्व मग काळजी करायला काय काम? तुम्हाला माहिती आहे ना तुमची मुलगी कुठलंच काम अपूर्ण सोडत नाही मग मला पूर्णपणे बरे वाटल्याशिवाय ती शांत बसणार नाही. जिद्दी आहे तुमची मुलगी."

आईचे शब्द येताच निहारिका डोळे फाडून त्यांच्याकडे बघू लागली आणि आई हसतच म्हणाल्या," ए निहारिका मूर्ख स्वराचे आई-बाबा आलेत अटलिस्ट चहा तरी बनव. मला काय वेड्यासारखं बघते आहेस. चल ज लवकर."

निहारिका चिडून जाणारच की स्वरा तिला अडवून स्वतःच गेली आणि निहारिका हसत उत्तरली," थॅंक्यु वहिनी."

स्वरा तिथून गेली आणि स्वराच्या आई विचार करत उत्तरल्या," माफ करा हा हॉस्पिटलमध्ये नाही येऊ शकलो. स्वरानेच तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून यायला मनाई केली होती. ती आज पण नको येऊ म्हणाली होती पण मन मानत नव्हतं म्हणून आलो. लग्नानंतर पहिल्यांदाच आलो आहोत. कदाचित तेव्हा तशी स्थिती नव्हती म्हणून येऊ शकलो नाही पण आज नाही राहवलं बघितल्याशिवाय. तुम्हाला त्रास झाला असेल तर माफी असावी. आम्ही तुम्हाला फक्त बघून निघून जाऊ."

स्वराच्या आईच्या आवाजात शांतपणा जाणवत होता आणि अन्वयची आई हळुवार म्हणाली," मागच्या गोष्टी सोडा स्वराच्या आई. माझं देखील बरच चुकलं होत. आता मी नक्की कशा कशासाठी माफी मागू. आज पहिल्यांदा आलात पण शेवटच असू नये, कायम येत राहा. ह्या घराचे द्वार तुमच्या साठी कायमच उघडे आहेत. निहारिका मला आज स्वयंपाक बनवायला जमणार नाही तेव्हा तू बनव आणि ह्यांना जाऊ देऊ नकोस कुठेच. हे आज इथेच राहतील ह्यांची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. झेपेल ना तुला?"

निहारिका हसतच उत्तरली," जो हुकूम मातोश्री. आवडीने करेन."

अन्वयची आई निर्मळ मनाने व्यक्त होत होती तर स्वराच्या आईला नक्की काय सुरू आहे समजत नव्हतं. कारण दोन दिवस आधी जे घर तुटायला निघालं होत त्याच घरात अचानक आनंदाची वातावरण निर्माण झालं होतं. ते अचानक कस काय हा प्रश्न त्यांना पडत होता पण त्यांची विचारायची हिम्मत साहजिकच झाली नाही.

आजची सायंकाळ खरच खास होती. कधी नव्हे ते पूर्ण कुटुंब आज एकत्र होत. स्वरा-निहारिकाने जेवणाची तयारी केली होती तर अन्वय स्वराच्या आईबाबांना पहिल्यांदाच आपलं घर दाखवत होता. अन्वयलाही त्याच्या आई-बाबांच वागणं बघुन शॉक लागला होता पण सर्व त्याच्या मनासारखं घडत असल्याने त्याचाही आनंद आज गगनात मावत नव्हता. आज सरविकडे आनंदी आनंद होता. गप्पाना उधाण आले होत आणि पहिल्यांदा ते घर भरल्यासारखं वाटत होतं.

ती रात्रीची वेळ होती. सर्वांची जेवण आटोपली. स्वरा आपल्या आई-बाबांसोबत तिच्या बेडरूममध्ये बसली होती तर अन्वय, निहारिका आपल्या आई-बाबांसोबत आईच्या बेडरूममध्ये बसले होते. सर्वांचे जेवण आटोपल्यामुळे अन्वय आईचे औषध काढून देत होता. निहारिका आईच्या बाजूला बसून होती. शांततेच वातावरण होत आणि निहारिका म्हणाली," दादा तुला माहिती आहे स्वराचे आई-बाबा आले ना तेव्हा मला वाटलं की आज घरात नक्कीच महायुद्ध होणार म्हणून मी तर धावतपळत म्हणून बेडरूममध्ये आले पण झालं काहीतरी वेगळंच. चक्क मातोश्री त्यांना म्हणाल्या की सर्व मागचं विसरून जा आणि कायम घरी येत राहा. मला तर वाटलं मातोश्रीना ताप डोक्यावर चढला आहे त्यावेळी तपासून बघू शकले नाही पण आता बघते."

निहारिकाने त्यांच्या कपाळावर हात लावला आणि शांत होत म्हणाली," अंग थंड तर आहे मग हा अचानक बदल कसा? बहुतेक आईच्या मैत्रिणी आल्या होत्या ना भेटायला म्हणून तिला बर वाटत असेल, हो ना ग आई?"

अन्वयची आई ओठावर गोड हसू आणत म्हणाली," किती टोमने मारणार आहात बाईसाहेब आणखी? झाली चूक आली माझ्या लक्षात. आता नाही होणार अशी चूक. प्रॉमिस!!"

आईच्या तोंडून शब्द येताच निहारिकाने आईच्या दुसऱ्या गालावर किस्सी देत म्हटले," ही आहे माझी आई. कायम सर्वाना समजून घेणारी. तू अशीच होतीस ग कायम आणि अशीच राहा आणि सॉरी हा मातोश्री जास्तच बोलले असेल तर पण नाही बघवल मला तू वहिनीला काहीही बोलतेस ते बघून तरीही तुला काही वाटलं असेल तर माफ कर."

अन्वयच्या आईने निहारिकाच्या डोक्यावरून हात फिरविला तर अन्वय शांतपणे त्यांच्याकडे बघत होता. आईची नजर त्याच्यावर गेली आणि आई हळुवार आवाजात उत्तरल्या," माफी तर मला अन्वयची मागावी लागेल. किती प्रेम करतो तो माझ्यावर पण मी जगाचा विचार करून माझ्याच लेकाला समजून घेऊ शकले नाही. स्वरा फक्त काही महिने झाले त्याच्या आयुष्यात आली आणि तिने त्याला देवाचे स्थान दिले पण मी त्याची जननी असून त्याला समजून घेऊ शकले नाही. इथे हरले मी आई म्हणून. अन्वय माफ कर ह्या आईला. करशील ना रे माफ आणि पुन्हा सोडून जाणार नाहीस ना आईला?"

आईच्या डोळ्यात अश्रू होते. अन्वय तिच्यावर नक्कीच रागावला होता पण तो राग इतकाही मोठा नव्हता की तो विसरू शकणार नाही. त्याने हळूच जात तिचे अश्रू पुसले आणि आईच्या काळापावर किस करत म्हटले," आई गरज नाहीये आम्हाला सॉरी म्हणायची. मुलांना कोण सॉरी म्हणत बर? हक्क आहे तुझा रागावण्याचा आणि पुन्हा रडू नकोस कारण तुला माहिती आहे ना मला नाही आवडत तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले."

आईने अश्रू पुसले आणि त्याच्या कपाळावर किस करत म्हटले," माझा लाडका मुलगा."

निहारिका आईकडे बघतच होती की आईने तिच्याही कपाळावर किस करत म्हटले," आज मलां पहिल्यांदा माझ्या मुलीचा मुलापेक्षा जास्त अभिमान आहे कारण मुलगा आईच्या प्रेमासाठी कधी काही बोलला नाही आणि मुलगी एका दुसऱ्या मुलीसाठी आईशी भांडली. मला वाईट नक्कीच वाटत की मी चुकले पण आनंद आहे की माझी दोन्हीही मुलं कायम बरोबर होती. प्राउड ऑफ यु!!"

निहारिका भरलेल्या डोळ्याने त्यांच्याकडे बघत होती आणि मागून बाबांचा आवाज आला," मी पण सॉरी!! मी काहीच केलं नाही म्हणून सॉरी!! मला माफ कराल ना?"

बाबा हसत होते आणि क्षणात सर्व आजूबाजूला बसले. आज त्यांच्यात गप्पाच गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात निहारिकाने विचारले," आई आमची माफी नाही मागितली तरीही चालेल पण स्वराला नक्की म्हण हा. करशील ना एवढं आमच्यासाठी?"

आई जरा शांत आवाजात म्हणाल्या," हो मागेन पण आता नाही. मला स्वराचा सहवास आणखी जवळून अनुभवायचा आहे. अन्वय म्हणतो तिला जवळून समजून घेण्याची मज्जा वेगळी..मलाही ते पटलं दोन दिवसात. तिच्या शब्दात ती दिसत आणि हा स्वार्थ आता मलाही हवाच. मला रहायच आहे तिच्यासोबत. मी चांगली झाल्यावर मागेन तिची माफी आणि नंतर धूम धडाक्यात रिस्पेशन करू सर्वाना बोलावून. सांगेन ओरडून माझी सून आहे ही म्हणून. लोकांना सांगायला मला आता काहीच समस्या नाही. तुला आवडेल ना निहू माझ्यासोबत डान्स करायला? मी माझे शब्द खरे करून दाखवेन खरच माझ्या मुलाने जगातली सर्वात सुंदर मुलगी आणली आहे. कळू दे त्यांनाही."

निहारिका जरा उडतच उत्तरली," मातोश्री दोघीच राडा घालू पूर्ण सोसायटीने बघायला हवं. माझ्या भावाच रिसेप्शन असेल कळायला नको सर्वाना. ह्यावेळी सारब आपणच करू. तू आणि मी फक्त..ह्यांना लुडबुड पण नाही करू द्यायची."

तेवढ्यात मागून बाबा म्हणाले," दोघी नाही हा चौघे, मी आणि स्वतःच्या मुलीला विसरलीस ना? आपण सर्वच डान्स करू. आपणच कशाला सर्व नातेवाईकाना बोलावून आनंद साजरा करू. इतकी सुंदर सून मिळाली मग जगाला ओरडून नको का सांगायला?"

आज रूममध्ये आनंदाच वातावरण होत. तिघेही हसत होते तर अन्वय शांतपणे त्या सर्वांकडे बघत होता. फायनली त्याने त्याचा शब्द पूर्ण केला होता. त्याने तिला तिच्या हक्काच स्थान मिळवून दिल होत. आदर मिळवून दिला होता आणि मिळाला होता तो त्या घराच्या सुनेचा हक्क. ज्यासाठी तिने ते सर्व सहन केले होते. आज इकडे आनंदी आनंद होता तर दुसरीकडे काहीसं वेगळं वातावरण होत. स्वरा आईच्या कुशीत झोपून होती. ती केव्हाची आईशी बोलायचा प्रयत्न करत होती पण तिची हिम्मत होत नव्हती. फायनली तिने हिम्मत करून म्हटले," आई तुम्ही मला कायम साथ दिलीत ना मग माझ्या एका निर्णयात पुन्हा साथ देणार? तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर?"

आई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या," बोल ना बाळा तुझी कधी साथ दिली नाही अस झालं का?"

स्वरा आई-बाबांचा हात हातात घेत म्हणाली," आई सासूबाईचा अपघात अन्वय सर दूर जाईल ह्या विचाराने झालाय. त्या नाही जगू शकणार त्याच्याविना. त्यांना मी त्यादिवशी त्रासामध्ये बघितलं आणि स्वतालाच वचन दिल की त्या ठीक झाल्यावर मी अन्वय सरांना कायमची सोडून जाईल. आई सोपं नाही मला त्यांच्याविना राहणं पण एका मुलाला आईपासून दूर करण मला नाही आवडणार. मला अन्वय सरांनी इतक्या सुंदर आठवणी दिल्यात की मी त्याच सोबत घेऊन राहील पण अन्वय सर माझ्यासोबत राहून त्यांच्या आई अस त्रासात जीवन जगातील ते मला नाही आवडणार त्यापेक्षा आपण दूर कुठेतरी जाऊ. मी तुमच्यासोबत राहीन आणि ते आपल्या लोकांसोबत. प्रेम तेवढंच राहील फक्त कदाचित आम्ही सोबत नसू. आई तुला वाटते का ग मी चुकीची?"

स्वराच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि बाबाच म्हणाले," स्वरा पुन्हा एकदा अभिमान वाटतोय मला तुझा. कशी शिकलीस ग इतक्या लहान वयात नाती सांभाळायला?"

आईने डोळे पुसले आणि हळुवार म्हणाली," तुला आवडेल तेच होईल स्वरा. काय प्रेम करताय ग तुम्ही? तो तुझ्यासाठी आईला सोडायला तयार झाला आणि तू आईसाठी त्याला. अभिमान आहे बाळा आम्हाला तुमचा. मन मानत नाही पण हरकत नाही, आम्ही तुझ्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत आहोत. तू सांग कधी निघायचं आम्ही तयार राहू."

आई-बाबांच उत्तर ऐकून स्वरा भारावून गेली होती. कधी नव्हे ते आज तिघांच्याही डोळ्यात अश्रू होते आणि स्वराच्या नजरेत एकच स्वप्न " आई-मुलाला कायमच मिळविणे मग त्यासाठी स्वतःचा आनंद हिरावून घेतल्या गेला तरीही चालेल.."

उनकी मोहब्बत को कैसे बया करे
दोनोही है मोहब्बत के रंग से भरे...