पर्णकुटी पासून थोड्या अंतरावर रथ आणि सैन्य थांबवून भरत श्रीरामांना भेटायला येतात. इकडे लक्ष्मणास गैरसमज झाला असल्याने तो भरताच्या अंगावर धावून जायला निघतो पण श्रीराम त्याला थांबवतात आणि शांत राहण्यास सांगतात. त्यावर लक्ष्मण धुमसत तिथेच सावध पवित्र्यात उभा राहतो.
भरत येताच श्रीरामांच्या पायावर नतमस्तक होतो. व आपल्या अश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक घालतो. श्रीराम सुद्धा सद्गदीत होतात व भरतास उठवून त्याला आपल्या छातीशी घट्ट धरून त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात.
लक्ष्मणाचा क्रोध भरताच्या अश्या वागण्याने क्षणात मावळतो. आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू जमा होतात. जानकी देवींना सुद्धा गहिवरून येते.
भरत श्रीरामांना दशरथ राजे गेल्याची बातमी सांगतो ते ऐकून श्रीरामांसह जानकी देवी व लक्षण यांना धक्का बसतो. श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात.
"भ्राताश्री तात आता राहिले नाही त्यामुळे त्यासोबत त्यांचे वचनही गेले. आता आपल्याला अयोध्येत येऊन राज्यपदी बसण्यास काही हरकत नाही. मी आपल्याला न्यायलाच आलो आहे. माझ्या आईकडून जे पातक घडले त्याची मला लाज वाटतेय. पिताश्रींनी तरी मातेचं ऐकायला नको होतं. ते राज्य फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. त्यावर माझा अधिकार कधीच नव्हता. आता जास्त वेळ न दवडता आयोध्येस चालण्याची तयारी करावी.",भरत
"भरता! तू इथवर मला भेटायला एवढे कष्ट घेऊन आला ह्यातच तुझ्या मनात असलेलं माझं अढळ स्थान मला कळलं. आता तुझा ज्येष्ठ भ्राता म्ह्णून तुला सांगतोय ते ऐक! जे ही काही घडलं ते दैवधीन होतं. त्यात न कैकयी मातेचा दोष आहे न पिताश्रींचा! जे काही माझ्या प्रारब्धात होतं ते घडलं. ह्या पृथ्वीवर मानव प्राणी पराधीन आहे. मानवाच्या हातात काहीच नसते. अहंकाराच्या नादात माणूस म्हणतो मी असं केलं मी तसं केलं किंवा मी असं करेन मी तसं करेन परंतु वास्तवात मानव काहीच करत नसतो तर त्याच्या प्राक्तनात जे असते ते घडते. एका अज्ञात शक्तीच्या अंमलाखाली मानव कार्यरत असतो.
हा वनवास हा राज्यत्याग सर्व माझ्या गतजन्मीच्या कर्माचे फळ आहे. ह्या जगात जे ही काही अत्युच्च स्थानावर पोचते ते कधी न कधी खाली कोसळतेच. माणसाने कितीही गोष्टींचा संग्रह केला तरीही त्या वस्तूंचा कधी न कधी नाश होणं हे ठरलेलेच आहे. माणसं एकमेकांना भेटतात ते ही वियोग होण्यासाठीच. हा जगाचा नियमच आहे. जसे प्रवासात अनेक माणसं भेटतात,गप्पा करतात आणि त्यांचे नियोजित स्थळ आले की उतरून जातात व ते पुन्हा कधीही दिसत नाही त्याप्रमाणे आपल्या आयुष्याच्या प्रवासात सुद्धा अनेक माणसं भेटतात. काही जण आपल्याला आवडतात काही आवडत नाही. जे आवडतात ते सदैव आपल्या सोबत राहतातच असे नाही किंवा जे आवडत नाही कदाचित त्यांचं नियोजित स्थळ आपल्या नियोजित स्थळापेक्षाही पुढचं असते त्यामुळे आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणींपोचलो तरी त्यांचा प्रवास सुरूच असतो. एकंदरीत आपल्या हातात काहीही नसते. जे आपल्या पुढ्यात येईल ते आपल्याला निमूटपणे स्वीकारावे लागते.
एखादा जीव जन्मला म्हणजे कधी न कधी तो मरणारच हे नक्की. हे सगळे जग नाशवंत आहे. ह्या बेगडी आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचा शोक करू नको.
आपले तात स्वर्गवासी झाले. तुझे बंधू वनवासात आले हे दैवाने ठरल्याप्रमाणे घडलेलं आहे जरी अकस्मात झालं तरी त्यात अतर्क्य असे काही नाही. तसाही मानव तर्क मरेपर्यंत करू शकतो पण मृत्यूनंतर काय? ह्या प्रश्नापुढे प्रत्येकाचे तर्क थांबतात. मती कुंठित होते. कारण मृत्यू नंतरचे जग कोणालाच ज्ञात नाही. मृत झालेला व्यक्ती मृत्यूनंतर च्या जगाचे वर्णन करायला कधीच येत नाही. जीवन मृत्यू कोणालाच सुटले नाही. कोणीही दुःखमुक्त आयुष्य जगले नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही दुःख आहेच. जे जे आज उत्कर्षाला जाताना दिसतेय ते नाशाच्या मार्गानेच जाते आहे. आज उमलणारे फुल उद्या कोमेजून गळून पडणारच आहे. आज पिकलेलं फळ उद्या सडून नाश पावणारच आहे. आज असलेलं तारुण्य उद्या नाश पावून वृद्धत्वात बदलून जाणारच आहे. आज जे जगात आहे ते उद्या नसेल. माणसं एकमेकांना आयुष्यात काही काळासाठी भेटतात जसे समुद्रात दोन ओंडके काही काळासाठी जवळ येतात आणि पाण्याची एक लाट उसळताच ते एकमेकांपासून विलग होतात पुन्हा कधीही न भेटण्यासाठी तसेच मानवाच्या आयुष्यात दैवयोगाची लाट उसळते आणि मानव एकमेकांपासून दूर होतात.
भरता! भावा! म्हणून म्हणतो की अश्रू पूस. आणि मला इथेच वनात सोडून तू अयोद्धेकडे जा व राज्यपदी बस. आपल्या दोघांचा प्रवास वेगळा आहे. मी चौदा वर्षे वनवासात व तू अयोध्येत राज्यपदी असणेच योग्य आहे तेव्हा आपण आपापले कर्तव्य निभावू व आपल्या वडिलांच्या नावाला उज्वल करू.
आता आणखी एक माझं म्हणणं ऐक! जोपर्यंत चौदा वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आयोध्येस येणार नाही हे नक्की तेव्हा एवढ्या लांबवर कष्ट घेऊन तुम्ही पुन्हा कोणीही येऊ नका. तुमचे सगळ्यांचे प्रेम माझ्या मनात अबाधित राहील. आता त्वरा करा व भरता! राज्यकारभार सांभाळ! माझा तुला आशीर्वाद आहे.",अश्या पद्धतीने श्रीराम भरतास समजवतात.
(रामकथेचा पुढचा भाग वाचा उद्या. तोपर्यंत जय श्रीराम🙏💐)
ग. दि. माडगूळकर रचित गीतरामायण मधील पंचविसावे गीत:-
दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
अंत उन्नतीचा पतनी होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होते, नेम हा जगाचा
जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा?
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनात
अतर्क्य ना झाले काही, जरी अकस्मात
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा
जरामरण यातुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाहि गाठ
क्षणिक तेवि आहे बाळा, मेळ माणसांचा
नको आसु ढाळू आता, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा
नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होउ रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करि, का वेष तापसाचा?
संपल्याविना ही वर्षें दशोत्तरी चार
अयोध्येस नाही येणे, सत्य हे त्रिवार
तूच एक स्वामी आता राज्यसंपदेचा
पुन्हा नका येउ कोणी दूर या वनात
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनात
मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★