पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ६ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ६

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

  भाग ६   

भाग ५ वरून पुढे वाचा  ....

किशोर साधा माणूस होता, शाळा कॉलेज मधे सुद्धा त्याने कधी मारामारी केली नव्हती, पण आताचा प्रसंग वेगळा होता, आत्ता पर्यंत ते बदमाश बँक लुटायची गोष्ट करत होते, आणि किशोरच्या मानेवर सुरा ठेऊन एक जण उभा होता. पण आता त्यांचा विचार बदलला होता आणि ते आता माधवीला उचलून नेण्याची भाषा करत होते.

किशोर विचार करत होता, काहीही झाले तरी माधवीच्या मदतीला जायलाच पाहिजे, असा त्याच्या मनाने कौल दिला. हा विचार एकदा पक्का ठरल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता ज्याने माधवीला पकडले होते त्याच्यावर झेप घेतली.

किशोरचा मेंदू आता सुपर फास्ट एक्सप्रेस प्रमाणे धावत होता. त्याच्या मनाने काही तरी ठरवलं आणि झेप घेतल्यावर, ज्या बदमाशाने माधवीला पकडलं होतं, त्यांच्या माने भोवती उजव्या हाताने विळखा घालून मान आवळली आणि डाव्या हाताची दोन बोटं त्याच्या नाकात खोलवर खुपसली. त्या बदमाशाने याची कल्पनाच केली नव्हती, त्याचा जीव  गुदमरला, आणि त्यांच्या हातातला सुरा गळून पडला. किशोरने कधी मारामारी केली नव्हती, पण तो चांगला सुदृढ होता, त्यांच्या पकडीतून बादमाशाला सुटणं शक्यच झालं नाही. तो श्वास घेण्यासाठी धडपडत होता आणि त्यांच्या हातातून माधवी निसटली.

आता किशोरने मानेवरचा विळखा अजूनच घट्ट केला, आणि नाकातली बोटं अजूनच प्रेशर देऊन दाबून धरली. क्षणभराने त्या बादमाशाने मान टाकली. हे सगळं केवळ एक ते दीड मिनिटांत झालं, त्यामुळे काय होते आहे, हे कोणाला कळे पर्यन्त तो बदमाश कायमचा झोपला होता. लक्षात आल्यावर, काऊंटरच्या आतमध्ये असलेला दूसरा बादमांश किशोर वर धाऊन आला, त्याच्या हातात सुरा होता, आता किशोर सावध होता, आणि सर्व शक्तिनिशी तो दुसऱ्या बदमाशाबरोबर भिडला. त्याला पाहून बाकीच्या स्टाफला पण चेव आला आणि ते सगळे आपली जागा सोडून किशोरला मदत करायला धावले.  या चकमकीत कोणीतरी त्या बदमाशाचा हात असा काही पिरगळला  की त्याचा सुरा त्याच्याच  पोटात खुपसल्या गेला आणि तो सुद्धा विव्हळत खाली पडला. कोणीतरी गोंधळाचा फायदा घेऊन पोलिसांना फोन करून बातमी दिली आणि लवकर पोहोचा अशी विनंती केली. दरवाजावर उभा असलेल्या माणसाने दूसरा, जो कॅश काऊंटर वर उभा होता, त्याला म्हणाला “चलो, भागों यहाँसे नहीं तो हम भी मर जाएंगे.” दुसऱ्याला पण ते पटलं आणि तो पण धावला.

किशोर आत्तापर्यंत, एकट्याने मोर्चा सांभाळत होता, पण आता लोकांना पण जोर आला होता, बेंच वर बसलेल्या ग्राहकांपैकी, दोघा तिघांनी काऊंटर वरच्या बदमाशाला पळून जातांना रोखलं, आणि त्याला पकडलं आणि त्याच्या  हातातली पिस्तूल हिसकून घेतली. आता दारावरच्या माणसाजवळ एकट्यानेच पळून जाण्या शिवाय दूसरा पर्याय नव्हता. त्याला सुद्धा लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जाता जाता, आपल्या दोन्ही सहकाऱ्यांवर आणि किशोरवर गोळ्या झाडल्या, त्यानी गोळ्या झाडल्यामुळे, साहजिकच ज्यांनी त्याला पकडलं होतं ते जीव वाचवण्यासाठी दूर झाले. आणि तो दार उघडून पळून गेला. त्यानी झाडलेल्या गोळ्यां मुळे एक जो, सुरा लागल्यामुळे  आधीच खाली पडला होता आणि विव्हळत होता, तो गप गार झाला. पण आता दुसराही जखमी होऊन पडला. दोन गोळ्या किशोरला लागल्या आणि तो पण खाली कोसळला. अल्पावधीतच त्यांच्या शरीरा भोवती रक्ता चं थारोळं साचलं. सगळे हतबुद्ध होऊन हा सगळं प्रकार पाहत होते. आता परिस्थितीने फारच विचित्र आणि गंभीर वळण घेतलं होतं. १५ मिनिटांपूर्वी कोणी यांची कल्पना पण केली नव्हती, इतकं सर्व सुरळीत चालू होतं.

पांच एक मिनिटे तशीच शांततेत गेली आणि मग एकाच गलका झाला की अॅम्ब्युलन्स बोलवा, अॅम्ब्युलन्स बोलवा म्हणून, अर्ध्या तासात पोलिस पण तिथे पोचले. पोलिस सुद्धा तो सगळा  प्रकार पाहून हादरले. लगेच अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. ती आल्यावर किशोर आणि जखमी बादमाश दोघांना हॉस्पिटल मधे पाठवण्यात आलं.

हॉस्पिटल मधे नेल्यावर दोघांनाही तपासण्यात आलं, जखमी बादमाशाने तो पर्यन्त राम म्हंटला होता. किशोर जीवंत होता, त्याचा श्वास चालू होता, त्याला ताबडतोब ICU मधे नेण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यावर सांगीतलं की “रक्त स्त्राव खूप झाला आहे, दोन गोळ्या शरीरात घुसल्या आहेत त्यामुळे किती डॅमेज झालं आहे ते बघावं लागेल. ताबडतोब ऑपरेशन करावं लागणार आहे.” असं बोलून डॉक्टर ऑपरेशन थिएटर कडे गेले. बाहेर, बँकेच्या स्टाफ पैकी दोघं जण थांबले. पोलिस अर्थातच होते.

बँके मधे आता पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. सर्व प्रकार १५ मिनिटांत आटोपला होता, त्यामुळे विशेष सांगण्या सारखं काहीच नव्हतं. माधवीला पोलिसांनी विचारलं की तिला काही इजा वगैरे झाली आहे का म्हणून. माधवीला त्या बदमाशाने पकडलं होतं पण तिला काही इजा होण्या आधीच किशोरने त्याच्यावर झडप घातली होती. त्यामुळे ती सुरक्षित होती.

बँकेत मेन ब्रँच ला माहिती देण्यात आली. तिथून एक टीम निघाली होती, झालेल्या घटनेचा गोषवारा घेण्यासाठी. जी दोघं जण तिथे थांबली होती, त्यांना तिथेच थांबा असा संदेश देण्यात आला होता. पोलिस निघून गेल्यावर मेंन  ब्रँच मधून जे अधिकारी आले होते, त्यांना माधवीने विनंती केली की ती हॉस्पिटल मधे थांबण्या साठी तयार आहे, म्हणून तशी परवानगी द्यावी म्हणून. त्या अधिकार्‍याला कळेना की ही   एकटी बाई तिथे काय करणार, पण तरीही त्याने शेवटी होकार दिला. माधवी लगेच हॉस्पिटल मधे जायला निघाली.

माधवी हॉस्पिटलमधे पोचली तेंव्हा किशोर ऑपरेशन थिएटर मधे होता. रक्त स्त्राव इतका झाला होता, त्यांची पल्स खूप वाढून गेली होती आणि रक्त दाब झपाट्याने कोसळत होता. या क्षणी त्यांची पल्स १४० च्या आसपास आणि ब्लड प्रेशर ८०/५० होत. त्याचा ब्लड ग्रुप तपासण्यात आला. ब्लड ग्रुप कळल्यावर लगेच त्या ग्रुपचं रक्त  मागवण्यात  आलं. रक्तस्त्रावामुळे शरीरातली रक्ताची मात्रा बरीच कमी झाली होती आणि त्यामुळे ब्लड प्रेशर झपाट्याने उतरत होतं. ते ताबडतोब पूर्वपदावर येणं आवश्यक होतं, म्हणून रक्त येई पर्यन्त, वेगाने सलाईन चढवण्यास सुरवात केली. ब्लड प्रेशर हळू हळू वाढायला लागलं. मग रक्त आल्यावर ते लावलं. आता BP हळू हळू नॉर्मलवर यायला लागलं. निरनिराळ्या टेस्ट करण्यासाठी, पेशंटची अवस्था स्थिर होणं आवश्यक होतं. काही वेळ गेल्यानंतर, पल्स आणि BP जवळ जवळ नॉर्मल वर आल्यावर डॉक्टरांनी X – RAY काढायला सांगितलं.

***

मेन  ब्रँच मधून तातडीने एका सीनियर व्यक्तीला ब्रँच चा चार्ज घेण्यासाठी पाठवण्यात आलं. त्याने आल्यावर सर्व सूत्र हातात घेतली. किशोरचा मोबाइल, त्याने स्विच ऑफ करून ड्रॅावर मधे सुरक्षित ठेवला. मग एकाला बोलावून, किशोरच्या बायको आणि आईचे फोन नंबर मागितले.

विभावरी अमेरिकेत असल्याने तिचा फोन स्विच ऑफ येत होता. मग त्याने माईंचा फोन फिरवला, पण तो सुद्धा स्विच ऑफ येत होता. आता काय करायचं हे त्याला समजेना. त्याने मेन ब्रँच ला कळवलं की दोन्ही फोन लागत नाहीये म्हणून. मेंन  ब्रँच मधे साहेबापर्यंत हा रीपोर्ट गेल्यावर, त्यांनी पुण्याला फोन लावला आणि सर्व परिस्थितीची कल्पना दिली, आणि सांगितलं की कोणाला तरी प्रत्यक्ष किशोरच्या घरी पाठवा आणि घटनेची माहिती द्या.  

दुपारनंतर पुण्याच्या ऑफिस मधून एक चपराशी किशोरचं घर शोधत त्यांच्या घरी पोचला. घराला कुलूप बघितल्यावर शेजारी चौकशी करावी म्हणून वळला पण तिथेही कुलूप. खालच्या मजल्यावर एक दार उघडं दिसलं. त्याने दार ठोठावलं.

“कोण हवे आपल्याला?” एक मध्यम वयाची बाई.

“वरच्या मजल्यावर Mr. किशोर राहतात, ते केंव्हा घरी असतात?” – शिपाई.

“ते इथे नसतात. त्यांची बदली झाली आहे.” – बाई.

“मी बँकेतूनच आलो आहे, त्यांच्या पत्नी  किंवा आई भेटल्या असत्या तर बरं झालं असतं. त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण दोन्ही फोन लागत नाहीयेत. म्हणून आज घर शोधत आलो.” – शिपाई.

“त्यांची बायको अमेरिकेत असते आणि त्यांच्या आई ट्रॅवल कंपनी बरोबर कोस्टल कर्नाटक फिरायला गेल्या आहेत. म्हणून कदाचित लागत नसेल. तुमचं काय काम होतं हे सांगितलं तर मी त्यांना कॉनटॅक्ट करायचा  प्रयत्न करेन.” – बाई.

“नाही, तशी काही आवश्यकता आणि अर्जनसी नाहीये, फक्त सगळं ठीक ठाक आहे का अशी चौकशी करायची होती. पण सगळं ठीकच दिसतंय. काळजी नाही. बराय धन्यवाद. मी चालतो.” असं म्हणून तो निघाला. परिस्थितीचा उगाच गवगवा करण्यात काही अर्थ नाही असं त्याला वाटलं. हा रीपोर्ट दुसऱ्या दिवशी दरभंगा ब्रँच ला पाठवून दिला.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.