Power of Attorney 2 - 8 books and stories free download online pdf in Marathi

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ८

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

  भाग ८

भाग ७  वरून पुढे वाचा  ....

माधवी आता निवांत पणे खुर्चीवर बसली. आता दुपारचे पांच वाजत आले होते, आणि सकाळपासून अन्नाचा एक कण सुद्धा तिच्या पोटात गेला नव्हता. तिला एकदम भुकेची जाणीव झाली. तिच्या बरोबर तिचा बँकेतला सहकारी होता, त्याने जाऊन काही तरी खायला आणलं. खाल्यावर जरा तरतरी आली.

“सकाळ पासून खूप विचित्र घटना घडताहेत, खूपच दगदग झाली. तुम्ही खूप थकल्या असाल, तुम्ही घरी जाऊन आराम करता का? मी थांबतो इथे.” – सहकारी.

“छे,छे. अरे, ज्या माणसाने माझ्या साठी जिवाची बाजी लावली, त्याला सोडून मी घरी जाऊ? माझ्या नवऱ्याच्या नावाला बट्टा लाऊ? शक्य नाही. उलट मी असं म्हणेन की तुझा संसार आहे, तू घरी जा. तुझी बायको आणि मुलगी वाट बघत असतील. मुलगी लहान आहे, त्यामुळे तूच घरी जा. फक्त एक कर, उद्या सकाळी ये, तो पर्यन्त सरांना शुद्ध आली असेल, मग मी घरी जाऊन, फ्रेश होऊन पुन्हा येईन.  सहकाऱ्याने माधवीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण  माधवी ठाम होती. शेवटी तो उद्या सकाळी चहा घेऊन येईन असं सांगून घरी गेला.

संध्याकाळ पर्यन्त लोकल चॅनेल वरची न्यूज सगळी कडे पसरली होती, आणि हॉस्पिटल मधे येणाऱ्यांची गर्दी वाढत चालली होती. नंतर हीच न्यूज राष्ट्रीय वाहिन्यांवर आल्या मुळे अचानक गर्दी वाढली, निरनिराळ्या वाहिन्यांचे वार्ताहर माधवीला भेटायला गर्दी करू लागले, शेवटी गर्दी कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. रात्र जसजशी वाढू लागली तसतशी गर्दी वाढतच चालली. बँक आणि सरकारवर ताशेरे ओढल्यामुळे, बँकेचे वरिष्ठ अधिकारी येऊन भेटून गेले, त्यांनी सर्व व्यवस्था उत्तमच होईल याचं आश्वासन दिलं. सरकारी आधिकारी पण येऊन गेले. वाहिन्यांचे लोकं घुटमळत होतेच. माधवीला एक मिनिट सुद्धा शांतता मिळत नव्हती.

***

पोलिस बँकेत दिवसभर चौकशी आणि तपास करत होते, फॉरेन्सिक टीमने येऊन सर्व गोष्टींचं रेकॉर्ड तयार केलं. दरोडेखोरांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी सापडल्या त्या व्यवस्थित पॅक करून घेतल्या. त्यात चार रिकामी कंडतुसं आणि एक गोळी मिळाली.  त्या दिवसभरात बँकेत कुठलंही काम झालं नाही. पोलिस निघून गेल्यावर बँकेतल्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नंतर अस्ताव्यस्त झालेली बँक पूर्वपदावर आणण्यात सर्वांचा जवळ जवळ एक तास गेला.

रात्री उशिरा देशभर बातमी पसरल्या नंतर, पोलिस डिपार्टमेंट कार्यान्वित झालं कमिश्नर साहेब आले आणि माधवीला भेटून गेले. एक तातडीची हाय लेवल मीटिंग झाली, आणि ही केस क्राइम ब्रँच कडे सोपवण्यात आली. कुठलीही लूटपाट झाली नसली तरी, या घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला होता, एका महिला कर्मचाऱ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता. बँक मॅनेजर दरोडेखोरांबरोबर झालेल्या झटापटीत, गंभीर जखमी झाला होता. तीन साथीदार जागीच मेले होते, आणि चौथा फरार होता. पोलिसांची टीम त्या चौथ्या साथीदारांचा शोध घेण्यात गुंतली होती. जे तीन साथीदार मेले होते, त्यांच्या फोटो वरुन त्यांची ओळख पटवण्यात आली. बँकेत तीन कॅमेरे लावलेले होते, त्याचं फूटेज बारकाईने चेक करण्यास सुरवात झाली. सर्वच बदमाशांनी चेहरा झाकलेला असल्याने, त्यांची ओळख पटत नव्हती. मेलेले तिन्ही बदमाश कोणाच्या साथीने दरोडा घालतात, त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे, (मोडस ऑपरेंडी ) यांची कसून तपासणी चालली होती. देशभरात यांची चर्चा चाललेली असल्याने, पोलिसांची झोप उडाली होती. चौथा बादमांश कुठे पळून गेला, हे पाहाण्या साठी आसपासच्या रस्त्या वरच्या दुकानावरचे आणि चौका चौकातले कॅमेरे आणि त्यांचं फूटेज चेक करायला सुरवात झाली होती. अजून तरी काही त्याचा ठाव ठिकाणा  कळत नव्हता. बँकेतल्या लोकांची पुन्हा पुन्हा चौकशी होत होती, काहीही नवीन कळत नव्हतं. जेमतेम 15 मिनिटांची घटना, सांगून सांगून किती वेगळं कळणार होतं ते पोलिसांनाच माहिती. बँकेतले कर्मचारी पण तीच ती रेकॉर्डस लावून आता कंटाळून गेले होते.

***

तिकडे हॉस्पिटल मधे माधवी आणि तिचा सहकारी यांना सुद्धा तेच तेच सांगावं लागत होतं आणि आता ती  दोघ पण  कंटाळून गेली होती. अशातच आमदार साहेब आले, त्यांच्या बरोबर त्यांचा फौज फाटा अर्थातच होता. सर्वांचा एकाच गलका झाला. खुद्द आमदार साहेब असल्याने हॉस्पिटलच्या स्टाफ ला सुद्धा काही करता येईना. मग मोठे डॉक्टर आले आणि त्यांना समजावलं. मग आमदार साहेबांनी त्यांच्या लोकांना बाहेर थांबायला सांगितलं आणि मग माधवीला धीर दिला. जे जे शक्य ते ते सर्व करू असं आश्वासन देऊन ते गेले. यानंतर मात्र हॉस्पिटलचं  मेन गेट बंद करण्यात आलं. फक्त नवीन पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना आत येऊ द्या असं सांगितलं. आता जरा शांतता झाली होती. मग माधवी कॅंटीन मधे जाऊन जेवून आली. माधवी आता एकटीच हॉस्पिटल मधे थांबली होती. आता किशोरला शुद्ध आली होती आणि माधवीला ICU मधे काहीच न बोलण्याच्या अटीवर जाण्याची परवानगी मिळाली. माधवी आत गेली. किशोरचे डोळे मिटलेलेच होते. माधवी थोडा वेळ बसली. किशोरने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं आणि मंद हसला. माधवीने त्याचा हात हलका दाबला आणि “थॅंक यू सर” आणि “लवकर बरे व्हा” असं म्हणाली. किशोर हसला पण तेवढ्याने सुद्धा त्याला थकवा आला आणि त्याने डोळे मिटले. माधवी पांच मिनिटे थांबली, मग हळूच बाहेर आली.

***

विभावरीचं तातडीने  भारतात परतणं कसं आवश्यक आहे, हे विभावरी तिच्या बॉसला सांगण्याचा प्रयत्न करत होती.

“विभावरी, परिस्थिती गंभीर आहे यात वाद नाही.” बॉस विभावरीला म्हणत होता, “पण मला असं वाटतं की तू जाण्या आधी जरा चौकशी करावीस. तू किशोरच्या बँकेतल्या कोणा ऑफिसरशी बोलून बघ, किंवा किशोर ज्या हॉस्पिटल मधे अॅडमिट आहे, त्या हॉस्पिटलंला फोन लावून विचार.”

“पण सर, त्यामुळे परिस्थितीत काहीच फरक पडणार नाहीये, मी लवकरात लवकर पोचणं हे जरुरीचं आहे.” – विभावरी.

“तू लगेचच भारतात जा, मी अडवत नाहीये, पण चौकशी केलीस, आणि किशोरची प्रकृती झपाट्याने सुधारते आहे, असं कळलं तर जातांना तू शांत मनाने जाशील. घाई घाईत गेलीस तर अस्वस्थ मनाने जाशील. म्हणून म्हणतो आहे मी. तू आज रात्र भर फोन वरुन  माहिती घे, आणि उद्या ठरव काय करायचं ते.” – बॉस.

“सर, न्यूज अपडेट वरुन एवढं कळलंय की किशोरचं ऑपरेशन ओके झालं आहे आणि आता त्याची प्रकृती सुधारते आहे म्हणून.” – विभावरी.

“मग झालं तर, म्हणजे काळजी करण्याचं काही कारण नाहीये, मग तू एवढी अपसेट होण्याचं मला तरी काही कारण दिसत नाही. शांत मनाने जा. नो प्रॉब्लेम” – बॉस.

“सर, माझी चिंता दुसरीच आहे. त्या बद्दल तुम्हाला काही माहीत नाहीये.” – विभावरी.

“काही कॉम्पलीकेशन झाले आहेत का?” – बॉस.

“नाही सर, खरी गोष्ट अशी आहे की, तिथे कोणी माधवी नावाची बाई समोर आली आहे, किशोरची बायको म्हणून, आणि ती हॉस्पिटल मध्येच राहून त्याची काळजी घेते आहे. सगळे न्यूज चॅनेल तिच्याशीच बोलताहेत. आता तुम्हीच सांगा ही चिंतेची बाब नाहीये का?” – विभावरीने आपली अडचण सांगीतली.

“माय गॉड, काय सांगतेस काय? पण असं कसं शक्य आहे? तुमचं तर लव मॅरेज आहे ना?” – बॉस.

“सर, किशोर बद्दल मला पूर्ण खात्री आहे, पण तरी सुद्धा ही बाई अशी का वागतेय हे कळत नाही. तिचा काय हेतू असेल हेच मुळात समजत नाहीये. म्हणून मी अस्वस्थ आहे. मला ताबडतोब निघायला हवं.” – विभावरी आता रडवेली झाली होती.

“बापरे, असा गोंधळ आहे तर, ओके. मी तुझी रजा ताबडतोब मंजूर करतो आहे, तू आज सुद्धा निघू शकतेस. ऑल द बेस्ट.” बॉस ने फायनल सांगितलं.

“थॅंक यू सर, आता मी बघते कोणती फ्लाइट मिळते ते.” आणि विभावरी जाण्या साठी उठली.

“एक मिनिट, विभावरी, थोडं थांबतेस का? माझ्या काही ओळखी आहेत एयरलाइन्स मधे, मी बघतो तुला उद्याची फ्लाइट मिळते का?” – बॉस.

“थॅंक यू सर, खरंच फार मोठी मदत होईल मला. थांबते मी.” – विभावरी.

जवळ जवळ अर्धा तास बॉस फोन वर बोलत होता, मग विभावरीला म्हणाला. “तुझं काम झालं आहे. उद्याच्या फ्लाइट मधे तुला जागा मिळून जाईल. मी एक फोन नंबर देतो, त्यांना कॉनटॅक्ट कर ते तिकीटाची व्यवस्था करतील.” – बॉस.  

विभावरी दुसऱ्याच दिवशी विमानात बसली. विमान सुरू झाल्यावर विभावरीने एक समाधानाचा श्वास घेतला. ती आता भारताच्या वाटेवर होती. पण डोक्यात माधवीचेच विचार होते, या विचारांचा भुंगा, दरभंग्याला पोहोचे पर्यन्त तिची पाठ सोडणार नव्हता.  

क्रमश:.......  

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद 

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED