पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १० Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १०

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

  भाग १०  

भाग ९ वरून पुढे वाचा  ....

“ताई, आता विसरा ते सर्व. चला आपण रूम मधे जाऊ, किशोर सर तुमच्या वाटे कडे डोळे लाऊन बसले आहेत.” माधवी म्हणाली आणि मग  दोघी जणी  रूम मधे जायला निघाल्या. विभावरीच्या डोक्यांवरचं ओझं आता पूर्ण उतरलं होतं आणि केंव्हा एकदा किशोरला भेटते असं तिला झालं होतं.

“त्यांना काय माहिती की मी आली आहे ते? त्यांचा तर फोनच लागत नाहीये. कोणा  जवळ आहे त्यांचा फोन?” – विभावरी.

“तो बँकेत कदाचित जे नवीन साहेब आले आहेत, त्यांच्या जवळ असेल. मी उद्या जाऊन घेऊन येईन. शुद्धीवर आल्या पासून सर तुमचीच चौकशी करताहेत. तुमचा नंबर  कोणाजवळ नव्हता म्हणून तुम्हाला कळवता आलं नाही. आता थोड्या वेळा पूर्वी त्यांनी मला बँकेत त्यांचा फोन असेल, तो आणायला सांगितलं. म्हणाले त्यात तुमचा अमेरिकेतला नंबर सेव केला  आहे.” – माधवी.

बोलता बोलता, किशोरची रूम आली. दोघी आत गेल्या, किशोर जागाच होता. त्याने विभावरीला पाहिलं आणि उठून बसायला लागला पण माधवी धावली आणि त्याला उठण्या पासून थांबवलं. हसली आणि हळूच रूमच्या बाहेर गेली. विभावरी खुर्ची जवळ ओढून बसली, किशोरचा हात आपल्या हातात घेतला आणि तिचा बांध फुटला. दोघांच्याही डोळ्यांना लागलेल्या धारा थांबण्याचं नाव घेईनात.

थोडा वेळ गेल्यावर दोघेही जरा भानावर आले. किशोरने विचारले “तुला कसं कळलं? माधवी म्हणत होती तुझा नंबर नाहीये म्हणून.”

मला न्यूज वरुन कळलं. मग मी इकडे येण्यासाठी ताबडतोब हालचाल केली तरी सुद्धा ४ दिवस गेलेच. पण आता मी आले आहे, आता सर्व ठीक होईल. माधवीची मात्र कमाल आहे. तिने तुझी खूप काळजी घेतलेली दिसते आहे.” – विभावरी.

“हो, तिने खूप धावपळ केली. खरं म्हणजे मी ना तिच्या नात्याचा की गोताचा, पण काही माणसं असतातच अशी, मदतीला धावून जाणं त्यांच्या रक्तातच असतं. माधवी तशीच आहे.” – किशोर. मग बराच वेळ, किशोर आणि विभावरी, नुसताच हातात हात धरून बसले होते. किशोरला आता झोप लागली होती. थोड्या वेळाने माधवी आत आली. मग दोघी बाजूच्या बेंच वर बसल्या. मग माधवीने घटने  बद्दल सविस्तर वृत्तान्त विभावरीला दिला. गेल्या चार दिवसांतल्या घडामोडी बद्दल सुद्धा तिला अवगत केलं. मग माधवी म्हणाली, “ताई, तुम्ही आज आराम करा जेट लॅग आला असेल आता सरांची तब्येत एकदम ठीक आहे. आज निवांत झोपा. उद्या पासून आहातच तुम्ही इथे.” विभावरीची इच्छा तिथेच राहण्याची होती, पण माधवीने तिला पटवून दिलं की तिची झोप होणं आवश्यक आहे. तरच ती किशोरची काळजी घेऊ शकेल म्हणून.” शेवटी विभावरी माधवीच्या प्रेमळ आग्रहापुढे हरली  आणि तिने हॉटेल वर जाण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळं आटोपून विभावरी हॉस्पिटल मधे पोचली. ती आल्यावर, संध्याकाळी येते असं सांगून, माधवी घरी गेली. दुपारी पोलिस येऊन किशोरचं सविस्तर स्टेटमेंट घेऊन गेले. पोलिसांना पण विभावरीला पाहून नवल वाटलं. पोलिसांना माहीत होतं की माधवी किशोरची बायको नाहीये म्हणून. त्यांनी विभावरीची विचारपूस केली आणि निघून गेले.

****

पोलिसांनी मग रामसहायला पोलिस स्टेशन वर नेऊन दोघा बदमाशांची चित्रं  काढली. ही चित्र सर्व पोलिस स्टेशन मधे पाठवण्यात आली आणि एक टीम रसूलपुर ला त्यांचा शोध घेण्या करता गेली. त्या दिवशी पोलिस दिवसभर चौकशी करत होते, पण निष्पन्न काही निघालं नाही. बँकेच्या लोकांनी येऊन दरोडेखोरीची आणि अपहरणाची तक्रार पोलिसांत नोंदवली, त्या आधारे पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांवर FIR नोंदवली रॉबरी आणि अपहरणाची आणि खून व खुनाचा प्रयत्न करणे अशी कलमं लावली. इंस्पेक्टर प्रसाद विचार करत होते, त्यांनी जे स्केच बनवले होते, ते कम्प्युटर वर टाकले आणि त्यांना चित्राशी साधर्म्य असणाऱ्या दोघा जणांची माहिती मिळाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की “दोघा जणांच्या जवळ मोबाइल फोन आहेत का ते बघा. आणि दुसरं म्हणजे आपलं खबरी नेटवर्क अॅक्टिवेट करा. बघा काही माहिती मिळते का” यावर ताबडतोब अॅक्शन घेण्यात आली. त्यांनी दोन टीम बनवल्या आणि रसुलपूर आणि आजूबाजूच्या गावात पुन्हा एकदा चौकशी करायला पाठवलं. आता कुठून काही धागा मिळे पर्यन्त वाट पाहणे एवढंच उरलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी इंस्पेक्टर प्रसाद पोलिस स्टेशनला आले तेंव्हा, टेबल वर एक स्थानिक पेपर ठेवला होता, एका बातमी भोवती लाल पेनने वर्तुळ केलं होतं.

इंस्पेक्टर साहेबांनी ती बातमी वाचली. एका दुर्गाकुमार नावाच्या माणसाने लिहिलेलं पत्र होतं ते. पत्रात तो म्हणत होता की “मॅनेजर साहेबांनी एका माणसाचा गळा दाबला आणि तो माणूस मेला. दुसरं अजून दोन माणसाचे गोळ्या लागून मृत्यू झाले. ही सगळी माणसं बदमाश होती हे कशावरून? बदमाशांच्या गोळ्यांनी बँकेचे कर्मचारी किंवा ग्राहक मरायला हवे होते, पण दोन बदमाशच  मेले. ते काय, स्वत:वरच गोळी झाडून घ्यायला बँकेत आले होते का? गोळ्या मॅनेजर साहेबांना पण लागल्या, पण फक्त बदमाश मेले आणि मॅनेजर जिवंत, हे कसं काय? या लोकांची आणि मॅनेजरची काही दुशमनी होती का हे कोणीच तपासलं नाही. मॅनेजरने दुश्मन संपवले आणि  अपहरणाचं नाटक समोर केलं, असं पण असू शकतं. याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, अशी मी मागणी करतो.”

इंस्पेक्टर साहेबांनी पत्र पूर्ण वाचलं दोनदा वाचलं. सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि एका PSI ला त्या पेपरच्या  ऑफिस मधे पाठवलं. “हा कोण सडक्या मेंदूचा दुर्गा कुमार आहे, त्याला शोधा आणि घेऊन या. मग बघू त्याच्या काय मागण्या आहेत ते” इंस्पेक्टर साहेबांनी हुकूम दिला.

“कोण असेल हा दुर्गाकुमार? बदमाशांचा साथीदार तर नसेल?” -  PSI चेतन राम

“कदाचित हा मॅनेजर वर नाराज झालेला असू शकतो. आपल्याला मॅनेजर बद्दल जी माहिती मिळाली आहे, त्यावरून हा मॅनेजर खूप स्ट्रीक्ट दिसतो आहे, त्यामुळे दुर्गा कुमारचं काम अडकलं असेल, म्हणून तो मॅनेजर च्या विरोधात बोलत असेल. सगळीच माणसं काही पैशाने विकत घेता येत नाहीत.” इंस्पेक्टर प्रसाद ने आपला संशय बोलून दाखवला.

‘साहेब, आपण मॅनेजर, कर्मचारी आणि जे हजर होते, त्या सर्व ग्राहकांचे स्टेटमेंट घेतले. सर्व लोकांची स्टेटमेंटस जवळ जवळ सारखीच आहेत. संशयाला काही जागाच नाहीये. परत जे लोकं मारल्या गेले आहेत, ते सगळे अट्टल बदमाश होते, आणि त्यांच्यावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत. तिघंही बदमाश या आधी सुद्धा जेल ची हवा खाऊन आले आहेत. ज्या माणसाने पेपर मधे पत्र लिहिलं आहे, त्याला पकडून आणलं पाहिजे.  माझ्या मते नक्कीच तो पाचवा साथीदार असावा.” – PSI चेतन राम

आपली टीम गेली आहेच सापडला तर तो आहे आणि मी आहे. बघू काय म्हणण आहे त्याचं.” इंस्पेक्टर प्रसाद.

***

विभावरीने हॉटेल सोडून दिलं आणि ती किशोर सोबत हॉस्पिटल मधेच शिफ्ट झाली. माधवीने पुन्हा बँकेत जायला सुरवात केली. ती रोज सकाळी येऊन विभावरीशी बोलून काही हवं नको विचारून जायची. संध्याकाळी जरा निवांत यायची, विभावरी आणि किशोरशी गप्पा मारल्यावर सर्वांनाच बरं वाटायचं. किशोरच्या प्रकृतीत विभावरी आल्यावर झपाट्याने सुधार होत होता. विभावरी रोज विचारायची की केंव्हा डिसचार्ज मिळेल म्हणून. डॉक्टरांनी सांगितलं की प्रवासाची दगदग सहन करण्याची शक्ति यायला अजून आठ दहा दिवस तरी लागतील, पण तुम्ही पोलिसांना पण विचारून घ्या, की शहर सोडू शकतो का म्हणून, कारण ही पोलिस केस आहे.  

दुसऱ्या एका केस च्या संदर्भात पोलिस इंस्पेक्टर प्रसाद हॉस्पिटल मधे आले होते, ते किशोरची तब्येत बघायला आले. किशोर त्या वेळेस वॉर्ड बॉय च्या मदतीने, खोलीतल्या खोलीत चालण्याचा प्रयत्न  करत होता. माधवी त्या वेळेस तिथेच होती.

“अरे वा किशोर साहेब, छान सुधारणा आहे. केंव्हा सुट्टी मिळणार आहे?” – प्रसाद.

डॉक्टर म्हणताहेत की अजून आठ दहा दिवस लागतील, मग काही टेस्ट करू, ओके झालं की मग पुण्याला जाऊ शकाल.” – किशोर म्हणाला. “पण डॉक्टर म्हणाले की तुमच्या परवानगी शिवाय दरभंगा सोडता येणार नाही म्हणून.”

“बरोबर आहे त्यांचं” इंस्पेक्टर प्रसाद म्हणाले. त्यांनी किशोर ला दुर्गा कुमारच्या पत्रा बद्दल सांगितलं. हे ऐकून किशोरच्या पायाखालची जमीनच सरकली. माधवी तर भयंकर संतापली. म्हणाली “अहो असं कसं, जे लोकं बँकेत होते, त्यांनी सगळं पाहीलं आहे, हा कोण माणूस आहे असं विपरीत बोलतो आहे? तद्दन खोटं आहे हे”

“माधवी मॅडम शांत व्हा. खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. या माणसाला शोधायला आमच्या टीम गेल्या आहेत. तो आल्यावरच कळेल की त्याचा असं पत्र लिहिण्या मागे काय उद्देश आहे तो. पण तुम्ही आणि किशोर साहेब निश्चिंत रहा. आम्ही बघून घेऊ.” – प्रसाद.

क्रमश:.......  

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.