किमयागार - 29 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 29

किमयागार -जाणिव
त्याला या युद्धाच्या कल्पनेत रमण्यापेक्षा प्रेमाच्या कल्पनेत रमावे असे वाटत होते.
तो गुलाबी वाळू व वाळवंटातील दगडांवर लक्ष केंद्रीत करू पाहत होता पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात प्रेमामुळे निर्माण झालेली मृदू भावना त्याला तसे करू देत नव्हती.
त्याच्या मनात आले, राजा म्हणाला होता, शकुनांकडे काळजीपूर्वक अवधान ठेवावे. आपण जे काही स्वप्न पाहू ते प्रत्यक्षात येत असतेचं.
तो उठून खजुराच्या झाडांकडे परतीच्या मार्गावर चालू लागला. त्याला जाणवले की, प्रत्येक गोष्टीचा अर्थ दरवेळी बदलत असतो. आता यावेळी वाळवंट सुरक्षित व ओॲसिस भितीदायक बनले होते.
उंटचालक एका खजुराच्या झाडाखाली बसून सूर्यास्त पहात होता. त्याने तरुणाला येताना पाहिले. तरुण त्याला म्हणाला, सैन्य येत आहे. मला तसे स्पष्ट जाणवले.
माझ्या अंतर्मनात तशी जाणिव झाली. उंटचालक म्हणाला, वाळवंट माणसाला सूचना देत असते.
तरुणाने त्याला बहिरी ससाण्यांबद्दल सांगितले. त्यांना आकाशात विहरताना बघून त्याला जगदआत्म्याची जाणिव झाली हेही सांगितले. उंटचालकाला त्याचे म्हणणे कळले होते.
या जगात कोणतीही एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीचा इतिहास सांगत असते.
जसे एखाद्या पुस्तकाचे पान उघडावे, किंवा एखाद्या माणसाच्या हातांकडे पहावे किंवा पक्ष्यांचा आकाशातील संचार पाहावे, आपण ज्याचे निरीक्षण करतो, त्याचा आपण आपल्या अनुभवाप्रमाणे संबंध जोडत असतो, अर्थ लावत असतो.
खरेतर त्या गोष्टी स्वतः काही स्पष्ट करत नसतात तर माणूस त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनांमधून तसे अर्थ लावत असतो आणि त्याला त्याच्या मनात जगद्आत्म्याचा प्रवेश होण्याचा मार्ग सापडतो.
किमयागार -भविष्य
जगद्आत्म्याचे सूत्र गवसलेले काही लोक वाळवंटात होते.
त्याना द्रष्टा किंवा सिद्ध पुरुष असे म्हणत. ते माणसांच्या आयुष्यात काय घडेल ते सांगत असत.
ते त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. स्त्रिया, ज्येष्ठ लोकांना त्यांची भिती वाटत असे.
त्यांचा सल्ला घेण्याचे दडपण टोळीतील तरुणांना येत असे कारण आपण युद्धात मरणार आहे असे कळले तर आपण युद्धात उतरण्यास कच खाऊ असे त्याना वाटत असे. त्यापेक्षा सरळ युद्धात जाऊन जे होईल त्यास सामोरे जाणे त्याना बरे वाटत असे.
अल्लाहने प्रत्येकाचे भविष्य लिहून ठेवलेले असते आणि ते जे काही असते ते माणसाच्या चांगल्यासाठीच असते.
यामुळे टोळीतील लोक वर्तमानात जगत असतात. कारण त्यांना सतत आवाहनाना सामोरे जावे लागत असते. शत्रूची तलवार कोठे आहे, त्याचे घोडे कोठे आहेत आणि जिवंत राहण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याचाच ते विचार करत.
उंटचालकाने भविष्य सांगणाऱ्यांचा सल्ला घेतला होता. काहींचे सांगणे खरे ठरत असे तर काहींचे खोटेही ठरत असे.
एके दिवशी एका म्हातारा भविष्यवेत्ता उंटचालकाला म्हणाला, तू भविष्य जाणून घेण्यासाठी इतका उत्सुक का आहेस ?.
किमयागार -उंटचालक
उंटचालक म्हणाला, मला काही गोष्टी करावयाच्या आहेत. आणि मला ज्या गोष्टी घडू नये असे वाटते त्या घडू नयेत असे काहीतरी करायचे आहे.
मला फक्त पुढे काय घडणार आहे ते कळावेसे वाटते, म्हणजे मी‌ त्या दृष्टीने स्वतः ची तयारी करू शकेन.
जर त्या गोष्टी चांगल्या असतील तर त्या तुझ्या दृष्टीने देणगी असतील पण जर वाईट घडणार असेल तर त्या आधीच कळल्यावर तुला त्या घडण्यापूर्वी खूप त्रास होईल.
उंटचालक म्हणाला, मी माणूस आहे मला जिवनाचे नियोजन करता यावे यासाठी भविष्य जाणून घ्यायचे आहे.
तो द्रष्टा फांद्या पासून बनवलेल्या ठोकळ्यांच्या सहाय्याने भविष्य जाणण्याच्या विद्येतील तज्ञ होता. आणि ठोकळे कसे पडतात यावरून प्रश्नाचे उत्तर सांगत असे.
पण त्यादिवशी तो भविष्य सांगणार नव्हता. त्याने सर्व ठोकळे उचलून एका कापडी पिशवीत भरले.

किमयागार -भविष्य
तो भविष्यवेत्ता म्हणाला, लोकांचे भविष्य सांगणे हा माझा व्यवसाय आहे.
मी या शास्त्रात पारंगत आहे. मी भूतकाळ सांगू शकतो तसेच वर्तमानातील संकेतांचे (शकुन) अर्थही सांगू शकतो. लोक माझा सल्ला घेतात. मी भविष्याचा अंदाज त्यांना देतो.
भविष्य ईश्वराचे हातात असते आणि तो ते क्वचितच स्पष्ट करतो. मी भविष्याचा वेध कसा घेतो म्हणशील तर आज जे संकेत अथवा शकुन दिसतात त्यावरूनचं.
वर्तमानातच हे गुपित दडलेले असते. तुम्ही जर आपल्या वर्तमानावर नीट लक्ष ठेवले तर तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करू शकता आणि येणारा काळ अधिक उत्तम बनवू शकता.
भविष्याचा जास्त विचार करू नका.
आपले जीवन मान्य तत्त्वांनुसार जगा, पूर्वापार मिळालेली शिकवण व मुल्ये जपा आणि विश्वास ठेवा की ईश्वर आपल्या सर्व मुलांवर प्रेम करतो. असे करशील तर प्रत्येक दिवस शाश्वतता घेऊन येईल.
तेव्हा उंटचालकाने विचारले होते की कोणत्या परिस्थितीत देव आपल्याला भविष्य समजू देतो. द्रष्टा म्हणाला, जेव्हा त्याला वाटते तेव्हांच. आणि ईश्वर क्वचितच असे करतो.
उंटचालकाला वाटले की ‌, ईश्वराने तरुणाला भविष्याचा काही भाग दाखवला आहे.
उंटचालक तरुणाला म्हणाला, टोळीप्रमुखांशी बोल व त्यांना सांग की सैन्य येत आहे.
तरुण म्हणाला, ते मला हसतील. उंटचालक म्हणाला, ते‌ वाळवंटात राहतात, आणि वाळवंटातील माणसे संकेतांवर विश्वास ठेवतात.
' मग त्यांना हे कळले असेल ' तरुण म्हणाला.
उंटचालक म्हणाला, त्यांचा विश्वास आहे की, जेव्हा एखादी गोष्ट कळावी असे अल्लाहला वाटते तेव्हा त्यांना ती कोणीतरी त्यांना सांगेल. असे पूर्वी घडले आहे आणि आता यावेळी तो माणूस तू असशील.
तरुणाच्या मनात फातिमाचा विचार आला आणि त्याने ठरवले की, टोळी प्रमुखांना भेटायचे.