मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३

मला स्पेस हवी.भाग ३

मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाला प्रमोशन घेण्यापासून परावृत्त करतो पण नेहा ऐकत नाही पुढे काय होईल बघू.

आज नेहाचं ऑफीसमध्ये फार लक्ष लागत नव्हतं बराच वेळेपासून रंजना नेहाचं निरीक्षण करत होती. नेहाला इतकं अस्वस्थ तिने आजपर्यंत कधी बघीतलं नव्हतं. दोघीजणी गेल्या सहा वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी होत्या. लंचटाईम मध्ये नेहाला विचारू असं मनात म्हणत रंजनाने कामावर लक्ष केंद्रित केलं.

लंचटाईम झाला तसं रंजनाने आपलं टेबल आवरलं आणि नेहाच्या टेबलापाशी आली.
" नेहा आटोपलं का? लंचटाईम झाला आहे."
" हो झालंय. चल."
नेहा लंचबाॅक्स घेऊन उठली.दोघी कॅंटीनमध्ये गेल्या.

रिकामी जागा बघून दोघी बसल्या .
" नेहा मी मघापासून बघतेय तू खूप शांत आहेस. रोज कॅंटीनमध्ये येईपर्यंत तुझी किती बडबड चालू असते आज काय झालं?"
" काही नाही."
नेहाने रंजनाकडे न बघता थंड आवाजात ऊत्तर दिलं. नेहाचा स्वर रंजनाला खूप कोरडा आहे असं वाटलं.

"नेहा आज काय बिनसलंय? तुझं ऑफीसमध्ये आल्यापासून कामावर लक्ष नाही."

रंजनाने नेहाला विचारलं.

" मी तुला काही सांगीतलं तर तू ते समजून घेऊ शकशील?'
नेहाने विचारलं.
" तू सांगीतल्या शिवाय मी कसं सांगणार की तू जे सांगितलं आहे ते मी समजून घेऊ शकेन की नाही.'
"ठीक आहे.सांगते ."
" सगळं खरं सांग. काही लपवून ठेऊ नकोस."

रंजनाने पोळी आणि भाजीचा घास हातात घेत म्हटलं.

" रंजना मला स्पेस हवी आहे माझ्या आयुष्यात."

"म्हणजे?" रंजनाने गोंधळून विचारलं.

नेहाचं हे बोलणं ऐकताच रंजनाच्या हातातील घास तसाच राहिला.

"मला आता आजूबाजूच्या नात्यांमध्ये राहण्याचा कंटाळा आला आहे."

"नेहा हे काय वेगळंच काहीतरी डोक्यात आलंय तुझ्या?"

"मला त्याचं त्यांचं रूटीनचा कंटाळा आला आहे.."

"रूटीन तर तेच राहणार तू कुठेही गेलीस तरी. नोकरीमध्ये तुझे दहा तास रोज जातात ते कुठेही गेलीस तरी तेवढे तास तसेच राहणार आहेत."

"मला या दहा तासांचा नाही नंतरच्या वेळेतील तोच तो पणा नकोय."

म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला?"

"नोकरी नंतर घरी यायचं आल्यानंतर सासू सास-यांशी तेच संवाद नंतर स्वयंपाकघर. सगळ्यांना काय हवं तेच जेवणात बनवायचं. नंतर जेवताना सगळं तेच ते बोलणं नंर बेडरूममध्ये गेल्यावर तोच तो कंटाळवाणा रोमान्स नको नको झालंय सगळं."

रंजना डोळे विस्फारून नेहाचं बोलणं ऐकत होती.

"नेहा तुला जसं हे कंटाळवाणं वाटतय तसंच सुधीरलाही वाटतं असेल. याचा विचार केलास का ?"

"त्याला काय वाटतंय माहीत नाही. सुधीरला स्वतःला स्पेस देणं माहीत नाही. स्वतःला स्पेस देणं किती गरजेचं आहे त्याला कळत नाही."

"अगं या सो काॅल्ड स्पेस साठी तू काय संसारातून बाहेर पडणार आहेस?"

"त्याशिवाय मला माझी स्पेस मिळणार नाही."

"म्हणजे तू घटस्फोट घेण्याचा विचार करतेय.?"

"काही ठरवलं नाही अजून.पण मला या सगळ्या बंधनांचा आता कंटाळा आला आहे."

"नेहा सतत मला कंटाळा आला आहे असं म्हणू नकोस ग या सतत म्हणण्याने सबकाॅन्शस माईंडलापण तीच कमांड मिळते. नको असं करू."

"हे बघ रंजना मला ते सबकाॅन्शस माईंड वगैरे काही माहिती नाही. मला या जंजाळातून बाहेर पडायचय."

"नेहा सात वर्षे झाली तुझ्या लग्नाला तुझा मुलगा पाच वर्षांचा आहे."

"मग त्याने काय फरक पडतो?"

"स्पेस हवी असं म्हणत असताना तुझ्या मनात आई म्हणून मुलांचा विचार आला नाही? तो कसा राहील तुझ्या शिवाय?"

"हे बघ रंजना कोणाचं कोणावाचून अडत नाही.काही दिवस ऋषीला माझी उणीव भासेल नंतर तोही सरावेल माझ्या नसण्याला."

"नेहा इतकी कोरडी कशी झालीस ग? सगळं तुला आयुष्यात मिळालंय म्हणून तझी ही प्रतिक्रिया आहे का अगं आयुष्यात इतक्या कठीण प्रसंगांना हिमतीने तोंड देणा-या स्त्रिया आहेत पण त्याही इतक्या कोरड्या होत नाही. आपल्या मुलांना विसरून स्वतःचा विचार करत नाही. त्यांना एवढ्या कठीण काळात पण स्पेसची गरज लागत नाही. तुला का स्पेस हवी वाटतेय. मला तर वाटतंय तुझ्या वाट्याला इतकं सूख आलंय नं तेच बहुदा तुला टोचतय."

"तू काहीही म्हण मला फरक पडत नाही मला माझी स्पेस हवी आहे. मला फक्त माझ्या बरोबर जगायचंय.*

"त्यासाठी काय करणार? घटस्फोट घेणार?"

"नाही साहेबांनी प्रमोशन वर बंगलोरला जातेस का म्हणून विचारलं आहे त्याला मी होणार आहे."

"तिकडे गेल्यावर घटस्फोट घेणार आहेस?"

"नाही."

"का घे नं घटस्फोट. तुला कशाचा फरक पडत नाही नं मग कशाला थांबते?"

"सुधीर तयार होणार नाही."

"समजावं त्याला प्रमोशन घेऊन जातेय.मला नाही थांबायचं या संसारात मला घटस्फोट दे.सरळ सांग."

'काही दिवसांनी सांगेन."

"का?"

"मी तिकडे गेल्यावर सांगेन. इथे असतांनाच सांगीतलं तर कदाचित सुधीर मला बंगलोरला जाऊ देणार नाही."

"ते तर होईलच. तुझ्यावर खूप प्रेम करतो तो कसा तयार होईल? नेहा सात वर्ष तुम्ही दोघांनी बरोबर घालवली आहेत.सात वर्ष म्हणजे कमी नाही.एवढ्या वर्षात नवरा बायकोला एकमेकांची सवय होते. तुला सुधीरची सवय झाली नाही?"

रंजना पोटतिडकीने बोलत होती.

"रंजना मला एवढंच कळतं की माणसाने वेळ आली तर मूव्ह ऑन करायला शिकलं पाहिजे."

"अगं पण नेहा हे आताच्या परिस्थितीत लागू पडत नाही. सगळं छान चालू आहे तुझ्या आयुष्यात. तुझ्या घरचे सगळे समंजस आहेत तर मग हा निर्णय का घेतेय?"

" मला फक्त मी हवी आहे. इतर कोणीही नकोय."

नेहाच्या आवाजात अलिप्त पणाची झलक झळकलेली रंजनाला जाणवली तरीही ती म्हणाली,

"नेहा तुला सुधीरच्या स्पर्शाची सवय नाही झाली.तुला त्याची जवळीक आठवणार नाही. तू सुधीरच्या आठवणीने सैरभैर होणार नाहीस? सांग नं? अगं सात वर्षांत नव-याच्या प्रत्येक सवयीची आणि स्पर्शाची बायकोला सवय होते. तुला नाही झाली?"

नेहा काहीच बोलली नाही.

" बोल नं. आता का गप्प झालीस? तू इतकी कोरडी झाली नाहीस नेहा की तू सुधीरला तुझ्या मनातून पूर्ण पणे काढू शकशील."

" रंजना तुला वाटतं तसं काही नाही. मला अजीबात सुधीरच्या सवयीची आणि स्पर्शाची आठवण होणार नाही."

" हो. मग जा रहा एकटी. एन्जॉय कर तुझी स्पेस. सुधीर नाही पण तुझ्या आईबाबा आणि भावाची आठवण येईल नं की तीही येणार नाही?"

" नाही.सगळीच नाती मी इथेच सोडून जाणार आहे."
"
बंगलोरला नवीन नाती जोडशील. हो नं ?"

" माहीत नाही."

" नेहा ही गोष्ट तुझ्या माहेरी माहीत आहे का?"

"नाही. त्यांना सांगण्याची गरज नाही."

"असं कसं? त्यांना माहीत असायला हवं."

"मला माझ्या आयुष्याचे निर्णय घेता येतात. त्यांना विचारण्याची किंवा सांगण्याची गरज नाही."

यावर रंजनाला काय बोलावं सुचत नव्हतं ती गोंधळलेल्या नजरेने नेहाकडे बघत राहीली.नेहाला रंजनाची अवस्था लक्षात आली पण तिने त्याला फार महत्त्व दिलं नाही.

"रंजना उठूया लंचटाईम संपला."

नेहाने आपला डबा बंद करत विचारलं. नेहाचा चेहरा निर्विकार होता.

"हो उठूया तसंही आता या विषयावर मी काही बोलून उपयोग होणार नाही हे लक्षात आलय माझ्या."

"गुड वेळेवर लक्षात आलं. सुधीरच्या अजून लक्षात येत नाही. "

" तो खूप जीव लावतो तुला.तो इतक्या लवकर तुझ्या निर्णयाला कसा हो म्हणेल? त्याला तुझी काळजी वाटत असेल. "

" मला सुधीरने इतकं पॅम्पर केलेलं नकोय.मी काय लहान शाळकरी मुलगी आहे माझी एवढी काळजी करायला?"

" तू लहान नाहीस. पण सुधीरचा जीव तुझी काळजी करतो त्याला तोपण काही करू शकत नाही."

" मग माझा नाईलाज आहे."

" नेहा अगं सुधीरच्या भावना समजून घे. त्याची तुझ्या प्रती असलेली काळजी समजून घे"

रंजना तळमळून नेहाला पटविण्याचा प्रयत्न करत होती.

" माझं ठरलंय.मला आता कोणाच्या मनाला समजून घेत स्वतःचा कोंडमारा करून घ्यायचा नाही.'

नेहा आपला लंचबाॅक्स बॅगेत ठेवते म्हणाली.

"ठीक आहे. मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला.तरी सांगते कधी तुला माझी गरज लागली तर मला फोन कर. मी आहे. मी तुझी मैत्रीण आहे."

"हं थॅंक्यू. निघूया?"

दोघी उठतात.नेहाच्या उठवण्यात,चालण्यात आणि चेहऱ्यावर ठामपणा होता तर रंजना मरगळल्या सारखी उठली रंजनाची चालही मंदावली होती. रंजनाचा चेहराहीनेहाच्या काळजीने विदीर्ण झाला होता.

_______________________________
पुढे काय होईल बघू.