मला स्पेस हवी भाग १०
मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जायची वेळ जवळ आली तशी ती सुधीर आणि ऋषीबरोबर खूपच कोरडी वागायला लागली. आज ती बंगलोरला जाणार आहे.बघू काय होईल.
नेहाची जायची वेळ झाल्याने सगळे जेवायला बसले. नेहा गप्पं होती. सुधीरच्या आईला वाटलं आता थोड्याच वेळात आपण बंगलोरला जाणार आहे तर नेहा ऋषीबरोबर खूप गप्पा मारेल पण असं काही घडत नव्हतं. ऋषी काही तिला विचारायचा तेव्हा ती मधून मधून हं हं करत होती.
नेहाच्या आवाजातील कोरडेपणा सुधीर, त्याची आई आणि बाबा यांना कळत होता पण ऋषीला कसा कळणार? शेवटी सुधीरची आई म्हणाली,
" ऋषी बेटा आईला बंगलोरला जायचय नं आईला जेवूदे. तूपण जेव."
" आजी मी आईला त्रास नाही देत. मी विचारलं की
आई ऊद्या हाॅटेलमध्ये उतरेल नं मग किती मज्जा येईल आईला."
सुधीरची आई हसली पण त्यात केविलवाणा भाव जास्त होता. नंतर कोणीच काही बोललं नाही.
नेहाचं जेवण झालं तशी ती उठली आपलं ताट घेऊन स्वयंपाक घरात गेली. सुधीरच्या आईबाबांची नेत्रपल्लवी झाली. बाबांनी आईला डोळ्यांनीच गप्प राह्यला सांगीतलं. सुधीर खाली मान घालून जेवत होता.
सुधीर जेऊन ऊठला. आज नेहमीसारखं त्याने आपलं ताट उचलून नेलं नाही. त्यांचा चेहरा उद्विग्न झाला होता.
" ऋषी बेटा जेव पटपट. आता आई जाईल. तुला टाटा करायचा आहे नं."
" हो. मी आणि बाबा बसस्टँडवर जाणार आहे आईला टाटा करायला."
" होका? मग तर तुला लवकर जेवावं लागेल. चल आटोप."
" हो आजी लवकर जेवतो."
ऋषी भरभर जेऊ लागला.
****
नेहा बॅगा घेऊन आपल्या खोलीतून बाहेर येणार तो तिला दाराशी सुधीर ऊभा असलेला दिसला. त्याची नजर खूप कावरीबावरी झाली होती. नेहाने जाऊ नये याचं आर्जव त्याच्या नजरेत तिला दिसलं. क्षणभर तिला सुधीरच्या आर्जवी नजरेचा मोह पडला पण क्षणभरच कारण तिने लगेच स्वतःला सावरलं.
तिच्या मनाने नेहाला सांगीतलं की या क्षणभंगुर क्षणांमध्ये अडकून नकोस. असे क्षण तू या घराचा उंबरठा ओलांडून जाईपर्यंत येतील ते टाळ. त्या क्षणांमध्ये अडकू नकोस. नेहाने आपल्या मानेला एक झटका दिला आणि ती सुधीरला म्हणाली,
" सुधीर बाजूला हो. असा दारात उभा राहू नकोस."
" शेवटच्या क्षणी का होईना तुझा निर्णय बदलवण्याचा एक प्रयत्न करून बघावा म्हणून असा दारात उभा आहे. यश मिळेल का?"
" ती आशा आता ठेऊ नकोस."
" का? इतकी कंटाळली मला आणि ऋषीला?"
" सुधीर मी माझ्या परतीच्या वाटा बंद करून इथून जातेय. त्यामुळे मी परत येईन अशी आशा ठेऊ नकोस."
" सात वर्षांचा सहवास आहे नेहा आपला. या सहवासातून आपल्याला ऋषीसारखं गोड बाळ झालंय हे तू विसरू कशी शकतेस?"
" मी सगळ्या गोष्टी इथल्या इथेच सोडून चाललें आहे. मला त्याची आठवण करून देऊन काही उपयोग नाही."
" मी काय केलं म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार नाहीस? तुला हवी ती स्पेस मी तू इथे राहीलीस तरी आम्ही देऊ."
" सगळे शाब्दिक बुडबुडे आहेत. मी आता इथून निघून चालले आहे म्हणून तुला हे सगळं सुचतंय. आधी कधी नाही सुचलं! सुचलं असतं तर हा निर्णय घ्यायची माझ्यावर वेळ आली नसती. "
नेहा हसत म्हणाली.
" नेहा मी तुझ्या आणि ऋषी बरोबर खूप आनंदात होतो ग. मला ही स्पेस नावाची गोष्ट असते हे माहीत नव्हतं. म्हणून माझ्या लक्षात आलं नाही की तुला तुझी स्पेस मिळत नाहीय. तू एकदा जरी बोलली असतीस नं तर मी लगेच तुला तुझी स्पेस दिली असती. समजून घे ग मला."
सुधीर रडायला लागला. नेहा स्थिर नजरेने त्याच्याकडे बघत होती. सुधीरचे हुंदके कमी झाले तशी नेहा म्हणाली,
" दारातून बाजूला हो. तू आणि ऋषीने बसस्टॅंडवर येण्याची गरज नाही. तिथे सगळ्यांसमोर मला ऋषीच्या रडण्याचा पुअर शो व्हायला नकोय. मी कॅब बुक केली आहे. येईलच पाच मिनिटांत. मी जाईन एकटी."
नेहाचा निर्विकार चेहरा बघून आणि कोरडा आवाज ऐकून सुधीर मनात पूर्णपणे कोसळला. तो दारात तसाच उभा होता. नेहाने त्याला हाताने बाजूला करत दोन्ही बॅगा खोली बाहेर आणल्या.
अस्पष्ट आवाजात नेहा आणि सुधीरचं बोलणं ऐकून सुधीरच्या आईबाबांना कसनुसं झालं. पाठोपाठ सुधीरच्या रडण्याचा आवाज आला. ते ऐकून सुधीरची आई खुर्चीवरून ऊठली पण सुधीरच्या बाबांनी त्यांचा हात पकडून त्यांना थांबवलं.
" अहो"
" नको जाऊस. त्या दोघांमधला वाद आहे.त्यांना सोडवू दे. तू मध्ये पडलीस तर त्याला वेगळं रूप प्राप्त होईल."
उदास चेहे-याने खाली बसता बसता आईचं लक्ष ऋषीकडे गेलं तो कार्टून बघण्यात दंग होता.त्यामुळे त्याच्या कानावर सुधीरचं रडणं गेलं नाही.ते बघून आईने देवाचे मनातल्या मनात आभार मानले.
नेहा बॅगा घेऊन समोरच्या खोलीत आली. तो आवाज ऐकून ऋषी टिव्ही समोरून उठला आणि म्हणाला,
"आजी मी आणि बाबा आईला टाटा करायला चाललो."
" हो. जाऊन ये."
" ऋषी आपण नाही जायचयं स्टॅंड वर."
" का? मघाशी तर जायचं ठरलं होतं."
" हो ठरलं होतं पण आता नाही जायचं. मला काम आहे. आत्ताच माझ्या साहेबांचा फोन आला होता."
ऋषी निराश झाला. त्याने नेहाच्या कमरेला मिठी मारली. शूज घालताना क्षणभर नेहा ऋषीच्या मिठीत अडकली पण लगेच मान झटकत बाहेर आली.
" ऋषी बाजूला हो मला शूज घालू दे. कॅब आली आहे."
" आई तू पुढच्या संडेला येणारं नं? मग आपण बाहेर फिरायला जाऊ."
ऋषीचे कमरेभवतीचे हात सोडवत नेहा सासू सास-यांकडे बघून म्हणाली,
" निघते मी."
झटकन बॅगा घेऊन नेहा घराबाहेर पडली. ऋषीही लगेच पायात बूट घालून तिच्या पाठीमागे धावला.
" आई सांगनं पुढच्या संडेला येशील नं?"
नेहाने काहीच उत्तर दिलं नाही.
सुधीर हताशपणे त्या दोघांच्या मागे गेला.
सुधीरच्या हताश चेहे-याकडे आणि नेहाच्या कोरड्या वागण्याकडे बघून सुधीरच्या आईबाबांच्या मनात खूप प्रश्नचिन्ह उभे राहिले.
" तुम्हाला काय वाटतंय आता आपण जे काही बघीतलं त्यावरून."
" नक्की काहीतरी गडबड आहे. सुधीर जरी दाखवत नसला तरी त्याचा आताचा चेहरा खूप काही सांगून गेला."
" दोघांमध्ये न सुधरण्या इतका बेबनाव झाला असेल का?"
" सांगता येत नाही. मला नेहाचं वागणं विचित्र वाटलं. ती सुधीर आणि ऋषीमधून बहुदा मुक्त झालेली दिसते आहे. म्हणूनच इतकं कोरा चेहरा घेऊन ती इतके दिवस वावरतेय. आपल्या लहानग्या मुलाची कमरेला पडलेली मिठी तिने किती सहज सोडवली हे बघीतलंस नं तू?"
" हो. म्हणूनच मला आता सुधीरची आणि ऋषीची काळजी वाटायला लागली आहे."
" हं आता आपण सुधीरला जायचं.ऋषीला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळायचं.लक्षात आलं नं?"
" हो."
****
नेहाच्या बॅगा ठेवायला म्हणून सुधीरने जेव्हा बॅगेला हात लावला तशी नेहाने चटकन त्याचा बॅगेवरचा हात बाजूला केला.
" अगं मी ठेवतो."
" नको मला आता तुझी मदत नको. मी ठेवीन.
नेहाने कॅबच्या डिकीत दोन्ही बॅगा ठेवल्या
" इतका तिरस्कार का करतेस माझा?"
" मला वेळ नाही ऊत्तर द्यायला."
" मला नको ऊत्तर देउस पण ऊद्या बंगलोरला पोचल्यावर निदान ऋषीशी बोल."
" बघीन."
गाडीकडे जाणाऱ्या नेहाचा हात पकडत कोरड्या आणि थंड आवाजात सुधीर नेहाला म्हणाला,
" इतका ॲटीट्यूड दाखवू नकोस. ऋषीसाठी म्हणून तुझ्याशी आत्ता पर्यंत सौम्य आवाजात बोललो. ऊद्या तिथे पोचली की तू फोनवर ऋषीशी बोलली नाहीस तर बघ."
एवढं म्हणून सुधीरने नेहाचा हात सोडला.
" नाही बोलले तर काय करशील?"
नेहाच्या डोळ्यात डोळे घालून सुधीर म्हणाला,
" ते वेळ आल्यावर तुला कळेल."
सुधीरने झटकन गाडीचा दार उघडलं न बोलता नेहा गाडीत बसली.सुधीरने गाडीचा दार लावलं.
" आई टाटा.मी बाबांना,आजी आजोबांना मुळीच त्रास देणार नाही. तू पुढच्या संडेला ये."
ऋषीचं बोलणं नेहाच्या कानात शिरण्या अगोदरच तिची कॅब झर्रकन निघून गेली.
सुधीर थकल्या अंगाने घरी गेला.ऋषी त्याच्या नेहमीच्या मूडमध्येच घरात शिरला आणि टिव्ही वर त्याचं कार्टून बघू लागला. सुधीर सरळ त्याच्या खोलीत गेला.त्याला असा थकलेला बघून आईबाबांना खूप वाईट वाटलं.
__________________________________
नेहा ऊद्या बंगलोरला पोचल्यावर ऋषीला फोन करेल का? बघू पुढील भागात.