मला स्पेस हवी पर्व १ - भाग ७ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ७

मला स्पेस हवी पर्व १ भाग ७

मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा वाद होतो. सुधीरचे आईबाबा काळजीत असतात. सुधीर अक्षयला भेटण्यासाठी वेळ देतो. त्याप्रमाणे आज दोघं भेटणार आहेत. बघूया काय होईल?

ठरल्याप्रमाणे अक्षय आणि सुधीर हाॅटेलमध्ये भेटले. तेव्हा त्याने नेहाशी झालेलं बोलणं सांगीतलं. अक्षय जसजसं ऐकत गेला तसतसं त्याला वाटलं की आपण आपल्या सख्ख्या बहिणीला ओळखलंच नाही. नेहा अशी कशी वागू शकते? अक्षय काहीवेळ सुन्न झाला.

" बोल अक्षय आता यावर मी नेहाला आणखी किती समजावणार?"

"तुझं बरोबर आहे. मला नेहा अशी वागू शकते यावरच माझा विश्वास बसत नाही."

"माझं नेहावर खूप प्रेम आहे. तिच्या प्रेमाखातर मी ही सगळी ॲडजेस्टमेंट करायला तयार आहे पण तिचं जे मला स्पेस हवी असं म्हणणं आहे ते मला पटत नाही."

"सुधीर मलाही ते पटलेलं नाही. खरतर ते आपल्या दोन्ही कुटूंबामध्ये पटणार नाही."

"आमच्या लग्नाला सात वर्षे झाली आणि आता हिला स्पेस का हवी आहे? उलट आता तर तिचं मन आमच्या घरी आणि आमच्या सगळ्यांमध्ये रूजायला हवं."

"अवघड आहे सगळं. मी बोलून बघतो नेहाशी."

"नको अक्षय काही फायदा होणार नाही. ती आत्ता आपल्या म्हणण्यावर ठाम आहे."

"एकदा बोलून बघतो."

"नको.ती काही वेडंवाकडं बोलली तुला तर मला सहन होणार नाही."

"अरे नेहा पाठची बहीण आहे माझी. ती जर चुकली तर तिला कानपिचक्या द्यायचा मला अधिकार आहे."

"मान्य आहे मला.पण सध्या ती कुठलाही अधिकार आपल्याला देऊ इच्छित नाही. म्हणूनच तिने स्पष्ट सांगितलं माझ्या निर्णयाच्या मध्ये येऊ नकोस."

"हं ऋषीची काळजी वाटतेय."

"तेच नं. ऋषी जर बारा तेरा वर्षांचा असता नं तर एवढी काळजी मला वाटली नसती."

"सुधीर"

अक्षयने हळूच सुधीरचा हात धरलास आणि थोपटले. सुधीरच्या डोळ्यातून टचकन एक अश्रूंचा थेंब त्याच्या हातावर पडला.

"सुधीर मी समजू शकतो तुझी अवस्था खूप अवघड झाली आहे पण असा खचून जाऊ नकोस. ऋषीला सांभाळायचं आहे."

"हं. तोच प्रयत्न चालू आहे. नेहाने जेव्हापासून मला स्पेस हवी म्हटलं आहे तेव्हापासून मला काही सुचत नाही. एक अनामिक भीती मनाला घेरून राहिली आहे. घरात, ऑफीसमध्ये कुठेच रडता येत नाही. खूप रडावसं वाटतं रे."

सुधीर कळवळून म्हणाला.

"कळतंय मला तुझी अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. पण तू तरी काय करू शकतो? तुझ्या आईबाबांना नेहा बंगलोरला का जातेय माहिती आहे?"

"नाही. तिने फक्त प्रमोशन मिळालं म्हणून चालले आहे असं सांगितलं आहे."

"आईबाबांना तू सांगणार आहे का?"

"हो सांगीन. मी त्यांना अंधारात ठेवणार नाही पण नेहा बंगलोरला गेल्यावर सांगीन."

"कारे?"

"नेहा जाण्याआधी आईबाबांना कळलं आणि त्यांनी काही म्हटलं तर तिचा गैरसमज होईल की मी मुद्दाम सांगीतलं म्हणून."

" बरोबर बोलतोय तू. चल निघूया?"

"जा तू मी जरा वेळाने जाईन."

"अरे तू एकटा काय करशील?"

"घरीच जावसं वाटत नाही. पुढे सगळं कसं होणार हा प्रश्न मनात इतका दाटून येतो की इथे मोकळ्या ठिकाणी बाहेर कुठेतरी बसावसं वाटतं."

"अरे असं नको करू.मी थांबतो."

"नको तू जा. घरी काकू वाट बघत असतील. प्रणाली काळजीत पडेल.

" मी प्रणालीला मेसेज करून सांगतो मला घरी यायला लेट होईल. अरे मी नुसता तुझ्या जवळ बसून राहीन. एक शब्द बोलणार नाही. जेव्हा तू घरी जायला निघशील तेव्हा मी निघेन. ठीक आहे?"

" ठीक आहे."

एवढं बोलून सुधीर आपल्याच तंद्रीत गुंतला. त्याच्याकडे बघून अक्षयच्या मनात गलबललं. तो जरा बाजूला सरकला आणि सगळी गोष्ट त्याने आपल्या बायकोला प्रणालीला मेसेज करून सांगीतली. तिलाही आश्चर्य वाटलं. ही गोष्ट आईला सांगू नकोस असेही त्याने तिला बजावलं. सुधीर जरा डिस्टर्ब आहे. एकटाच बसला आहे म्हणून मी त्याच्या जवळ बसलोय. आईला सांग मला काम आलं म्हणून मी उशीरा येतोय. आईला आणि मुलांना जेवायला वाढून दे.

प्रणालीने ठीक आहे म्हणून रिप्लाय केला.

हा एवढा सविस्तर मेसेज केल्यावर अक्षयला मनावरचं ओझं उतरल्या सारखं वाटलं.

सुधीर आपल्याच तंद्रीत होता.अक्षय आता मोबाईल वर गेम खेळत बसला पण त्याचं सुधीर कडे लक्ष होतं.

सुधीर चलतोस का घरी? साडेअकरा वाजत आले."

मानेनेच नाही म्हणतो

"म्हणजे तुला घरी जायचं नाही!"

सुधीर पुन्हा नकारार्थी मान हलवतो.

"सुधीर मला तुझं दु:ख समजतंय पण तू रात्रभर जर घरीच गेला नाही तर काकाकाकूंना काळजी वाटेल."

"अक्षय मला नेहाचं वागणं बघून ती परत येईल असं वाटत नाही."

"म्हणजे?"

अक्षयला सुधीरच्या बोलण्यातला अर्थ कळला नाही.

"मला वाटतं की तिचा माझ्यातला इंटरेस्ट संपला आहे."

"अरे असं काही तरी बोलू नकोस. ती दोन वर्ष काय दोन महिने सुद्धा बंगलोरला राहू शकणार नाही. खात्री आहे मला."

"जेव्हा तिने हा विषय काढला तेव्हा मला पण असंच वाटत होतं पण आता तसं वाटत नाही कारण ती बंगलोरला जाणार आहे आता पुन्हा लवकर भेट होणार नाही म्हणून ऋषी किती तिच्या मागेमागे असतो. नेहाला ऋषीबद्दल असं काही वाटतंय असं तिच्या वागण्यातून दिसतच नाही. आपल्या लहान मुलाला सोडून आपण दुसऱ्या गावी नोकरीला जाणारी स्त्री मुलाच्या किती अवती भवती करेल. नेहा असं नाही करत. पूर्वी जसे ती ऋषींचे लाड करायची तसं आता नाही करत."

," नेहा थोडीशी गोंधळली असेल.म्हणून असं वागत असेल."

"नाही अक्षय नेहा खूप बदलली आहे."

"सुधीर नेहा दुसऱ्या कोणाच्या गुंतली आहे असं तुला वाटतं आहे का?"

"तिच्या वागण्यातून तर ते मला दिसत नाही. पण हा विचार तिच्या मनात दोन तीन वर्षांपासून आहे म्हणाली. इतके दिवस तिच्या मनात असं काही आहे असं तिने आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. म्हणून वाटतं आत्ता ती फक्त दोन वर्षांकरिता जातेय असं भासवते आहे. तिथे गेल्यावर कदाचित खरं सांगेल."

"नेहा मतलबी स्वार्थी नाही पण सुधीर ती खूप गोष्टी आपल्या मनात ठेवते हे मी लहानपणापासून बघीतलं आहे. तू म्हणतोस तसं असू शकेल."

"मला पुढची काळजी वाटतेय. जर हिने आमच्या संसारातूनच मोकळं व्हायचं ठरवलं तर मी ऋषीला कसं समजावुन सांगीन. कळत नाही त्यामुळे मला घरीच जावसं वाटत नाही."

"असं करून पण चालणार नाही. तुला घरी जावं लागेलच."

अक्षय गोंधळलेला असतो पण तरीही तो सुधीरला समजवण्याचा प्रयत्न करत होता.

"अरे मला आता नेहाचा चेहरा बघीतला की दडपण येतं. नेहाच्या वागण्यातील बदल आईबाबांना पण कळला आहे."

"काका काकूंनी तसं बोलून दाखवलं का ?"

"त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं. त्यांनी काही विचारू नये म्हणून मी घरीच जास्त रहात नाही. ऑफीसमधून निघतो ते बगीच्यात जाऊन बसतो."

सुधीर दोन्ही हाताने डोके धरुन बसतो आणि रडायला लागतो. रडतच म्हणाला,

"घरी मला रडायची पण चोरी आहेरे. त्यामुळे मनावरचा ताण वाढत चालला आहे.".

अक्षय सुधीरच्या पाठीवर थोपटत राहिला. नेहा सख्खी बहीण असली तरी अक्षयला नेहाचा खूप राग आला.
सुधीरला कसंबसं समजावून अक्षय त्याला घरी सोडतो पण सुधीरच्या घरी जात नाही उगीच त्यांचे आईवडील दोघांना बरोबर बघून काही वेगळेच प्रश्न विचारतील तर वेगळेच प्रश्न ऊभे राहतील.

****

सुधीर आपल्या जवळच्या किल्लीने दार उघडून घरात येतो. सुधीरचे आईबाबा सोफ्यावर बसले असतात.
त्यांना बघून, सुधीर जरा दचकतो.

" आईबाबा तुम्ही अजून झोपला नाही?"

" कशी झोप येईल? मुलगा एवढ्या उशीरा घरी येत असेल तर काळजी वाटते."

आई काळजीने म्हणाली.

"आई अग इतक्यात ऑफिसचं काम खूप वाढलंय."

सुधीर कानकोंडल्या स्वरात म्हणाला.

"रोज एवढं काम कसलं असतं?"

"अगं ऑफीसमध्ये ऐनवेळी सुद्धा काही कामं निघतात. जी पूर्ण करावी लागतात. तेही डेडलाईनच्या आत. त्यामुळे ऑफीसमधलं रोजचं काम संपल्यावर थांबावं लागतं. अगं मीच एकटा नाही थांबत माझे साहेब सुद्धा थांबतात."

"किती दिवस हे काम चालणार आहे?"

सुधीरच्या बाबांनी विचारलं.

"बहुदा एक आठवडा लागेल."

"एक आठवडा! अरे नेहाला बंगलोरला जायला आता एकच आठवडा राहिला आहे.'

सुधीरचे बाबा म्हणाले.

"होनं मला वाटतं शनिवार आणि रविवारी तुम्ही तिचं कुठेतरी फिरायला जाऊन या. इथे ऑफीस मुळे तुम्ही दोघं एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. कुठे बाहेर फिरायला गेलात तर एकमेकांना वेळ देऊ शकाल. ऋषीलापण मजा येईल."

सुधीरची आई सुधीरला म्हणाली.

"बघतो."

काहीतरी ऊत्तर द्यायचं म्हणून सुधीर म्हणाला.

"नुसतं बघू म्हणू नकोस.खरच विचार साहेबांना."

आईने सुधीरला तंबी दिली.

"हो. झोपा दोघं आता.मी खूप दमलोय."

सुधीरचा थकलेला चेहरा बघून त्याच्या आईचं मन कळवळलं.

"हो बेटा जा झोपायला."

सुधीर आपल्या खोलीत गेला. ऋषी आणि नेहा झोपले होते. सुधीर कपडे बदलून फ्रेश झाला आणि पलंगावर येऊन झोपला. नेहा कडे पाठ करून झोपला.

मघाशी आईबाबा बोलले ते त्याला आठवलं त्याच्या मनात आलं की आईबाबांना काय सांगणार? तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही तिघं जाऊ बाहेर फिरायला. पण उपयोग काय ? तिथेही असंच असणार आहे.

नेहा आता खूप लांब गेल्यासारखी सुधीरला वाटत होतं. ती पुन्हा पहिल्या सारखी होईल की नाही याची खात्री तो स्वतःच स्वतःला देऊ शकत नव्हता तर इतरांना काय देणार?

सुधीरच्या डोक्यातील विचार संपतच नव्हते. नेहाने तिचा निर्णय सांगीतल्यापासून त्याला रात्री झोपच लागत नव्हती. विचाराने डोकं दुखायचे.ताणामुळे डोळ्यातून अखंड अश्रू धारा वहात होत्या. रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंड गच्च दाबून ठेवलेलं असायचं.

असाही क्षण आपल्या आयुष्यात येईल असं सुधीरला कधी वाटलं नव्हतं. नेहाने तिचा निर्णय सांगेपर्यंतच्या क्षणाला सुद्धा त्याला संशय आला नाही.

ऋषीला कसं सांभाळायचं हा प्रश्न त्याला पडला. विचारांच्या आवर्तनात कधीतरी त्याला झोप लागली.
________________________________
पुढे बघू सुधीर,नेहा आणि ऋषी फिरायला जातात का?

_________________________________